You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
...आणि 'मेलेला' पत्रकार 24 तासांनी जगासमोर आला
रशियाचे पत्रकार आर्काडी बाबचेंको यांच्या हत्येची बातमी खोटी ठरल्याचं समोर आलं आहे. एका योजनेअंतर्गत आर्काडी यांच्या हत्येची बातमी जाणूनबुजून पसरविल्याचं युक्रेनचं म्हणणं आहे.
41 वर्षीय आर्काडी यांची युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये गोळी घालून हत्या करण्यात आली आहे, अशी बातमी मंगळवारी समोर आली होती.
याच बातमीनुसार, गोळीचा आवाज ऐकून आर्काडी यांची पत्नी बाहेर आली आणि तिने त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत पाहिलं. आर्काडी यांच्या पाठीत गोळी लागलेली आहे आणि हॉस्पिटलमध्ये नेताना त्यांचा मृत्यू झालाय, असं त्यांच्या पत्नीने सांगितलं होतं.
त्यानंतर युक्रेननं या हत्येमागे रशियाचा हात असल्याचं सांगितलं होतं. त्यांना "या प्रकरणात एक प्रकारचा रशियन पॅटर्न दिसत होता."
पण बुधवारी घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत आर्काडी सर्वांसमोर आले. एका रशियन एजंटचा कट उधळून लावण्यासाठी आर्काडी यांच्या हत्येची बातमी आम्हाला पसरवावी लागली, असं आता युक्रेन म्हणत आहे.
'हे प्रकरण म्हणजे स्टिंग ऑपरेशन'
युक्रेनच्या सुरक्षा सेवेचे प्रमुख वसील हृटसेक यांनी बुधवारी माध्यमांना सांगितलं की, "हे सर्व प्रकरण म्हणजे एक मोठं स्टिंग ऑपरेशन होतं. आर्काडी यांच्या हत्येचं कुभांड रचून रशियानं पाठवलेल्या हल्लेखोराला पकडण्यासाठी ते घडवण्यात आलं."
"आर्काडी यांची हत्या करण्यासाठी रशियाच्या सुरक्षा यंत्रणेनं युक्रेनच्याच एका नागरिकाला तयार केलं होतं. हा हल्लेखोर युद्धनीती आखणाऱ्या अनेक जाणकारांच्या संपर्कात होता आणि आर्काडी यांच्या हत्येसाठी त्यांना दोन कोटींहून अधिक रक्कम देण्यास तयार होता," असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
हल्लेखोराच्या योजनेची सूचना युक्रेनच्या सुरक्षा यंत्रणेला मिळाली आणि याचं स्टिंग ऑपरेशन करण्यासाठी त्यांनी आर्काडी यांच्या हत्येची खोटी बातमी पसरवली.
या प्रकरणात एका जणाला अटक केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
आर्काडी यांच्या मते, त्यांना या सर्व प्रकाराबाबत माहिती होतं. पण दुसरा कोणताही पर्याय नसल्यानं त्यांनी या स्टिंग ऑपरेशनमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पत्नीला यासंबंधी माहिती होती की नाही, याबद्दल अजून काहीही स्पष्ट झालेलं नाही.
'माझ्याकडे दुसरा काहीही पर्याय नव्हता'
आर्काडी यांना बुधवारी एका पत्रकार परिषदेत येताना पाहून काही लोक टाळ्या वाजवताना दिसून आले होते. आर्काडी यांनी पत्रकार परिषदेत आपला जीव वाचवल्याबद्दल युक्रेनच्या सुरक्षा यंत्रणेचे आभार मानले. या प्रकरणात सहभागी होण्यावाचून माझ्याकडे दुसरा काहीही पर्याय नव्हता, असं ते म्हणाले.
"जवळपास महिन्याभरापूर्वी मला रशियाच्या या षड्यंत्राविषयी माहिती झालं, ज्यात माझी हत्या करण्याची योजना बनवण्यात आली होती."
तसंच गेल्या काही दिवसांपासून आपण युक्रेनच्या सुरक्षा यंत्रणेच्या संपर्कात असल्यांचही आर्काडी यांनी म्हटलं आहे.
रेडियो फी यूरोप/रेडियो लिबर्टी नेटवर्क यांनी ट्विटरवर एक व्हीडिओ पोस्ट केला आहे, ज्यात आर्काडी जिवंत असल्याची बातमी मिळाल्यानंतर त्यांचे सहकारी आनंद व्यक्त करताना दिसून येत आहेत.
"हे संपूर्ण प्रकरण म्हणजे प्रपोगंडा पसरवण्यासाठी केलेलं नाटक आहे," असं रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया जैकरेवा यांनी म्हटलं आहे. आर्काडी जिवंत असल्यानं मला आनंद झाला आहे, असं त्या म्हटल्या आहेत.
"आपण आर्काडी आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा देण्यासाठी तयार आहोत," असं युक्रेनचे राष्ट्रपती पोरोशेंको यांनी म्हटलं आहे.
आर्काडी हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे टीकाकार राहिले आहेत. जीवाला धोका असल्याचं कारण सांगून त्यांनी वर्षभरापूर्वी रशिया सोडलं होतं.
युक्रेन आणि सीरियात रशिया करत असलेल्या सैन्य कारवाईवरही ते टीका करत राहिले आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)