You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उत्तर कोरियाने अणू चाचणींचे बोगदे 'उद्ध्वस्त केले'
उत्तर कोरियाने अणुचाचण्यांसाठी वापरण्यात येणारे बोगदे उद्धवस्त केल्याचं म्हटलं आहे. आशियातला आण्विक तणाव कमी होण्याच्या दृष्टीने आणि एकूणच आण्विक निःशस्त्रीकरणाच्या दिशेने हे एक मोठं पाऊल मानलं जात आहे.
पुंगे-री या ठिकाणचे अणुचाचण्यांसाठी उपयोगात आणले जाणारे बोगदे मोठ्या धमाक्याद्वारे उद्धवस्त करण्यात आल्याचं तिथे उपस्थित विदेशी पत्रकारांनी सांगितलं.
अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्याशी डावपेचात्मक चर्चा सुफळ होण्यासाठी उत्तर कोरियाने यंदाच्या वर्षीच पुंगे-रीचा अण्वस्त्रांचा प्रकल्प बंद करण्याची तयारी दर्शवली होती.
मात्र सप्टेंबर 2017 मध्ये घेण्यात आलेल्या अणुचाचणीनंतर हा प्रकल्प काही प्रमाणात ढासळल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं. प्रकल्प पुन्हा वापरण्याच्या अवस्थेत असल्याचंही शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं होतं.
उत्तर कोरियातर्फे अणुचाचण्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या पुंगे-री या ठिकाणी अणुचाचण्यांचे बोगदे नष्ट करण्यात येत असताना स्वतंत्र निरीक्षकांना उपस्थित राहण्याची अनुमती नव्हती. वीस निवडक आंतरराष्ट्रीय पत्रकार मात्र यावेळी उपस्थित होते, ज्यापैकी एक होते स्काय न्यूजचे टॉम चेशायर.
सकाळच्या सत्रात दोन तर दुपारहून चार स्फोटांद्वारे हे बोगदे कायमस्वरूपी नष्ट करण्यात आले.
चेशायर यांनी सांगितलं की या बोगद्यांच्या दारांना अनेक तारा जोडण्यात आल्या होत्या. "आम्ही डोंगरावर चढून गेलो आणि साधारण 500 मीटर अंतरावरून हे बोगदे नष्ट होताना पाहिले."
"त्यांनी आधी काउंटडाऊन केलं आणि मग धमाक्याचा जोरदार आवाज ऐकू आला. त्यानंतर सर्वत्र धुळीचा लोट पसरला. धमाक्याचा आवाज तर होताच, स्फोटाची धगही आमच्यापर्यंत पोहोचली," असं टॉम यांनी स्काय न्यूजशी बोलताना सांगितलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)