You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पर्ससोबत तीही घुसली एक्स-रे स्कॅनिंग मशीनमध्ये...
तुमच्या बॅग किंवा पर्स चोरीला जायची भीती वाटते? मग या चीनी महिलेबद्दल तुम्ही वाचलंच पाहिजे. आपल्या पर्सच्या प्रेमापोटी ती चक्क एक्स-रे मशीनमध्ये शिरली.
डाँगुआन रेल्वे स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना धक्काच बसला जेव्हा त्यांना सामान तपासणाऱ्या एक्स रे मशीनमध्ये एक मानवी आकृती दिसली.
एका ऑनलाईन व्हीडिओत ही विचित्र घटना कैद झाली आहे. ही घटना घडली चिनी नववर्षाच्या दिवशी. चंद्रावर आधारित असणाऱ्या चिनी कॅलेंडरनुसार रविवारी नववर्षाचा पहिला दिवस होता. नववर्ष असल्याने डाँगुआन स्टेशनवर बरीच गर्दी होती.
आपली पर्स या गर्दीत हरवून जाईल या भीतीने ही महिला सुरक्षेसाठी असलेल्या एक्स-रे मशीनच्या सरकत्या पट्ट्यावरून पर्समागोमाग स्वतः घुसली. बाहेर आल्यावर त्या महिलेने आपली पर्स तपासली आणि ती निघून गेली.
या वेळच्या एक्स-रे मध्ये ती तिच्या पर्सच्या मागे गुडघ्यांवर बसलेली दिसत आहे. अगदी तिच्या हाय-हील सॅण्डल्ससकट.
महिलेला आपल्या पर्सची इतकी का काळजी होती याचं काही ठोस उत्तर मिळू शकलं नाही पण चिनी नववर्षाच्या वेळेस अनेक लोक मोठी रक्कम सोबत घेऊन प्रवास करतात.
पिअर व्हीडिओकडून आलेल्या दृश्यांमध्ये ही महिला आपली सामानाची मोठी बॅग सरकत्या पट्ट्यावर ठेवताना दिसते. पण हातातली पर्स ती ठेवत नाही. नंतर तिने बाहेर लावलेल्या स्कॅनरमधून जायचा प्रयत्न केला, पण तिने तिची पर्स हातात ठेवल्याने तिला जाऊ दिलं नाही.
पर्स आपल्यापासून दूर ठेवणं तिला कदाचित मंजूर नसावं, त्यामुळे पर्ससोबत आपणही एक्स-रे मशीनमध्ये शिरण्याची अभिनव शक्कल तिने शोधून काढली.
काहीही दुखापत न होता ती महिला जेव्हा मशीनच्या दुसऱ्या बाजून बाहेर निघाली तेव्हा तिथे असलेल्या एकमेव सुरक्षा रक्षकाला हसू आवरत नव्हतं.
या घटनेनंतर डाँगुआन रेल्वे स्टेशनच्या प्रशासनाने प्रवाशांना एक्स-रे मशीनमध्ये न शिरण्याच्या सूचना दिल्या आहेत. एक्स-रे मशीनचा किरणोत्सर्ग आरोग्यासाठी धोकादायक असल्याचं प्रशासनानं सांगितल्याचं स्थानिक माध्यमांनी म्हटलं आहे.
16 फेब्रुवारीला असणऱ्या चिनी नवर्षासाठी प्रवास करण्याऱ्या 3 कोटी 90 लाख प्रवाशांपैकी ही महिला एक होती.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)