You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
साहित्य संमेलन विशेष: बडोद्यातल्या या आधीच्या संमेलनांविषयी 5 महत्त्वाच्या गोष्टी
- Author, रवींद्र मांजरेकर
- Role, बीबीसी प्रतिनिधी, बडोदे
गुजरातच्या बडोदे शहरात गुरुवारी मोठ्या झोकात ग्रंथदिंडी काढण्यात आली. निमित्त होतं 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं.
सयाजीराव गायकवाड विद्यापीठाच्या भव्य प्रांगणात 16 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख .
या आधीही बडोद्यात साहित्य संमेलन झालेलं आहे. त्या संमेलनाविषयी या पाच गोष्टी नक्की जाणून घ्या.
1. बडोद्यातलं पहिलं संमेलन
बडोद्यात पहिल्यांदा मराठी साहित्य संमेलन भरलं होतं ते ऑक्टोबर 1909 मध्ये. बडोदे न्यायमंदिरासमोरच्या मोकळ्या मैदानात झालेल्या या सातव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लेफ्टनंट कर्नल डॉ. कान्होबा रणछोडदास किर्तीकर होते. स्वागताध्यक्ष बॅरिस्टर संपतराव गायकवाड तर उद्घाटक सयाजीराव गायकवाड होते.
2. नाव बदललं!
याच संमेलनापासून 'मूळ मराठी ग्रंथकारांचं संमेलन' हे नाव बदलून 'महाराष्ट्र साहित्य संमेलन', असं व्यापक नाव देण्यात आलं. आणि तत्कालीन महाराष्ट्राबाहेर आयोजित करण्यात आलेलं हे पहिलंच संमेलन.
3. वाद झालाच!
बडोद्यात दुसरं साहित्य संमेलन झालं ते नोव्हेंबर 1921मध्ये. साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांच्या अध्यक्षतेखालील हे संमेलन राजमहालाच्या प्रांगणात भरलं होतं. न. चिं. केळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर वाद निर्माण झाला.
त्यावेळी केसरीचे संपादक असलेल्या केळकरांनी कोल्हापूरचे शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्यातल्या वादासंदर्भात ऑगस्ट-स्पटेंबर महिन्यात शाहू महाराजांच्या विरोधात लेखन केलं होतं. त्यामुळे संतापलेल्या काही लोकांनी शाहू महाराज हे सयाजीराव महाराजांचे व्याही असल्याचं कारण पुढे करत केळकर यांची निवड रद्द करण्याची मागणी केली होती.
केळकरांनी स्वत:हून राजीनामा द्यावा असाही प्रस्ताव देण्यात आला. पण स्वागताध्यक्ष संपतराव गायकवाड यांनी ठाम भूमिका घेतली आणि ही मागणी तसंच प्रस्ताव फेटाळून लावला.
4. अडीच तास भाषण!
न. चिं. केळकर यांनी त्या वर्षी अध्यक्षपदावरून बोलताना अडीच तास भाषण केलं. तसंच भाषण सुरू असताना कोणत्याही महत्त्वाच्या व्यक्तीनं उठून जायचं नाही, अशी अटही त्यांनी घातली होती.
5. साहित्य संमेलनात लष्करी परेड
मग 1934 साली बडोद्यात तिसरं संमेलन झालं. या 20व्या संमेलनाचे अध्यक्ष होते ना. गो. चापेकर तर स्वागताध्यक्ष होते सेनाध्यक्ष जनरल नानासाहेब शिंदे.
न्यायमंदिर हॉलमध्ये झालेल्या या संमेलनात लष्करी परेडही झाली. त्यात पायदळ, घोडदळ आणि तोफखाना यांचा समावेश होता.
या संमेलनाला वि. स. खांडेकर, कवी अनिल, वामन मल्हार जोशी आदी उपस्थित होते. माधव ज्युलियन कवी संमलनाचे अध्यक्ष होते. त्या वर्षी उत्कृष्ट कवितेसाठीचं सुर्वणपदक बा. भ. बोरकर यांना मिळालं होतं. त्यांनी त्यावेळी तेथे कर माझे जुळती आणि मुशाफिर या कविता सादर केल्या होत्या.
(लेखक प्रा. संजय बच्छाव यांनी दिलेल्या माहितीवर आधारित.)
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)