You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
देहविक्रीच्या चक्रात अडकलेल्या पीडितांची आता चॅटबॉट करणार सुटका!
- Author, डेव्ह ली
- Role, बीबीसी अमेरिका, तंत्रज्ञान प्रतिनिधी
"हा चॅटबॉट सर्वांत भारी काम तेव्हाच करतो जेव्हा तो असं भासवतो, की मी एक 15 वर्षांची मुलगी आहे," असं या चॅटबॉटचे निर्माते कौतुकानं म्हणत होते.
चॅटबॉट म्हणजे असा रोबो जो तुमच्याशी चॅटिंग करू शकतो. काय नवल वाटलं ना ऐकून?
हा चॅटबॉट फक्त गप्पाच मारत नाही तर वाईट हेतूने इंटरनेटवर पाळत ठेवणाऱ्यांवर वचक ठेवण्याचं कामही करतो. सेक्ससाठी लहान मुलांच्या शोधात असणाऱ्या लोकांवर हा चॅटबॉट नजर ठेऊ शकतो.
"या चॅटबॉटच्या साहाय्याने देहविक्रीसाठी होणारी मानवी तस्करी रोखण्यास मदत होत आहे," असं या चॅटबॉटच्या निर्मात्यांचं म्हणणं आहे. सिअॅटल भागात देहविक्री करणाऱ्या पीडितांची सुटका या तंत्रज्ञानामुळं झाली.
कसं रोखलं जातं लैंगिक शोषण?
इंटरनेटवर शरीरसुख विकत घेण्याचा प्रयत्न करू पाहणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. इंटरनेटवर बरेच लोक देहविक्री करणाऱ्या महिलांचा शोध घेतात.
कुणी जर असा शोध घेत असेल तर त्यांच्या ब्राउजरमध्ये एक जाहिरात झळकते. "सेक्सची इच्छा आहे का अशी विचारणा होते?"
"तुमची पैसे देण्याची तयारी आहे का?" किंवा इतर असे अनेक प्रश्न या चॅटबॉटकडून विचारले जातात. जेव्हा ती व्यक्ती आपली पूर्ण तयारी दर्शवते तेव्हा एक मेसेज चॅटबॉटकडून येतो.
"लैंगिक सुख विकत घेणं हा गुन्हा आहे. यामुळे जगभरातील हजारो महिलांचं मोठं नुकसान होतं."
"जे लोक लैंगिक गुन्हे करण्याच्या मार्गावर आहेत त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. बऱ्याचदा त्यांना वाटतं की, आपण अनामिक आहोत. आपल्या मागावर कुणीच नाही. इंटरनेटच्या माध्यमातून आपण लैंगिक सुखासाठी दुसऱ्या व्यक्तीचा वापर करू शकतो. असं ज्या लोकांना वाटतं त्यांच्यासाठी ही धोक्याची सूचना आहे," असं 'सिअॅटल अगेन्स्ट स्लेव्हरी'चे रॉबर्ट बेझर म्हणतात.
इंटरनेटवर वाढत आहे देहविक्रीच्या जाहिराती
इंटरनेटचा वापर जसा वाढला तसं देहविक्री करणारे लोकही इंटरनेटचा वापर करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये मानवी तस्करी रोखणं हे एक मोठं आव्हान बनलं आहे.
अमेरिकेत नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने मानवी तस्करीला आळा घालण्याचा एक नवा उपाय शोधण्यात आला आहे. सिअॅटलसारख्या भागात याचा वापर करून लैंगिक शोषण थांबवण्यात यश मिळालं आहे.
हल्ली शरीरसुखाच्या शोधासाठी इंटरनेटचा आधार घेतला जातो. ज्या पुरुषांना स्त्रिया हव्या आहेत त्यांना रेडलाइट भागामध्ये जाण्याची गरज उरली नाही. ते लोक आता आपल्या स्मार्टफोनच्या साहाय्याने महिलांचा शोध घेतात.
अशा कामांसाठी स्मार्टफोनचा वापर करणं हे पुरुषांना गोपनीयतेच्या दृष्टीनं सोयीस्कर बनलं आहे.
पण, या व्यवसायाबद्दल त्या क्षेत्रातील महिलांचं काय म्हणणं आहे? स्टेफनी हॅरीस यांना काही काळ देहविक्री करावी लागली होती. आता त्या या कचाट्यातून सुटल्या आहेत आणि देहविक्रीसाठी होणारी मानवी तस्करी थांबावी असं त्यांचं मत आहे.
"तो काळ खूप कठीण होता. माझं शोषण होत असे. मला ग्राहकांचं टारगेट दिलेलं असायचं ते पूर्ण करणं मला भागच असे. मी कित्येक महिने हॉटेलमधील एका खोलीत राहिले होते," असं स्टेफनी सांगतात.
"त्या चार भिंती.... मला आठवतं त्या खोलीत एक टीव्ही असायचा. तो दिवसभर सुरू असायचा. मी त्या खोलीत बसून विचार करायचे की जगाला माझा विसर तर पडला नाही ना?" असं स्टेफनी सांगतात.
मोठ्या प्रमाणात होणारं शोषण
काही जण रेडलाइट भागामध्ये जाण्याची बिचकायचे. पण इंटरनेटमुळे त्यांना नवा पर्याय मिळाला आहे. काही लोक निर्धास्तपणे इंटरनेटवर असलेल्या साईटचा वापर करत आहे.
"इंटरनेटमुळे देहविक्रीच्या व्यवसायामध्ये अचानकपणे मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं निदर्शनास आलं," असं व्हॅल रिची म्हणतात. रिची हे सिअॅटल ज्या काउंटीत मोडतं त्या किंग काउंटीचे सरकारी वकील म्हणून काम करतात.
"आम्ही सिअॅटल या भागातील देहविक्री व्यवसायाशी संबंधित 130 वेबसाइट्स शोधल्या. यापैकी एका वेबसाइटवर महिन्याला 34,000 पेक्षा जास्त जाहिराती असल्याचं आमच्या लक्षात आलं," असं रिची म्हणतात.
"आमच्या भागात अनेक जणांचं शोषण होत आहे असं आम्हाला वाटलं. त्यामध्ये किमान 300-400 लहान मुलं असावीत असा आमचा अंदाज आहे," असं रिची सांगतात.
ते म्हणतात, "या व्यवसायाला आळा घालण्यासाठी लोकांना नैतिक मूल्यांचं स्मरण करून देणं आवश्यक आहे, असा आम्ही विचार केला. पण हा पर्याय थोडा खर्चिक वाटला. कारण त्यासाठी एखादा तज्ज्ञ या कामी नियुक्त करावा लागला असता."
"आपल्याला हे माहीतच आहे की इंटरनेटवर हे 'ग्राहक' आपल्याला हव्या तशा 'सेवां'च्या शोधात असतात. त्यांचा हा शोध दिवस-रात्र सुरूच असतो. याची आम्हाला कल्पना आहे," रिची म्हणाले.
"मग आम्ही खोट्या अॅड पोस्ट करतो. अॅड पोस्ट केल्यानंतर आम्हाला पहिल्या दोन तासांमध्ये किमान 250 उत्तरं मिळतात. एवढ्या लोकांना उत्तरं देणं शक्यच नाही," असं रिची यांनी सांगितलं. "पण आता चॅटबॉटच्या माध्यमातून आम्ही या 'ग्राहकां'शी संपर्क साधू शकतो. याआधी हे तर शक्यचं नव्हतं," असं रिची सांगतात.
खऱ्या व्यक्तीप्रमाणेच उत्तर देणारे चॅटबॉट
"आम्हाला असा चॅटबॉट बनवायचा होता जो खऱ्याखुऱ्या व्यक्तीप्रमाणेच वाटेल. तसा चॅटबॉट तयार करणं हे आमच्यासमोर आव्हान होतं. जर यात काही जरी कसर बाकी राहिली असती तर त्या ग्राहकाला शंका आली असती. त्यामुळं आम्ही पूर्ण खबरदारी घेतली," असं बेझर सांगतात.
"आम्ही या कामासाठी पीडितांचं सहकार्य घेतो. आम्ही त्यांना विचारतो की ग्राहक आणि देहविक्री करणाऱ्या व्यक्तीमध्ये कसा संपर्क साधला जातो?"
"या प्रोजेक्टला मायक्रोसॉफ्टचं सहकार्य आहे. हा प्रोजेक्ट मशीन लर्निंगवर आधारित आहे. जितके अधिक लोक चॅटबॉटसोबत गप्पा मारतील तितका तो अधिक शिकत राहील," असं निर्माते सांगतात.
"जेव्हा या चॅटबॉटची चाचणी घेतली जात होती तेव्हा आम्ही पहिल्या टप्प्यात 1500 लोकांशी संवाद साधला. काही जण अगदी वाईट शब्दांत भाषेत बोलतात, असं लक्षात आलं. ग्राहकानं शरीरसुख विकत घेण्याचा विचार केला की, त्याला धोक्याची सूचना पाठवायची अशा प्रणालीची रचना आम्ही केली," अशी माहिती बेझर यांनी दिली.
संवादादरम्यान ग्राहकाला सेल्फी मागण्याविषयी सूचना चॅटबॉटला देण्यात आल्या आहेत.
"या चॅटबॉटचा वापर करून ग्राहकांना अजूनतरी अटक केली जात नाही, कदाचित भविष्यात तसं होऊ शकेल," असं बेझर म्हणतात.
महिलांना सहकार्य
या प्रकल्पाचा दुसरा महत्त्वपूर्ण भाग आहे तो म्हणजे महिलांना सहकार्य करणं. याविषयी जास्त माहिती घेण्यासाठी आम्ही गेलो ऑरोरा अव्हेन्यू इथे.
या ठिकाणी देहविक्री केली जाते. एखाद्या नवख्या व्यक्तीच्या चटकन लक्षात येणार नाही या ठिकाणी काय चालतं, पण आम्ही समाजसेविका अमांडा हायटॉवर यांच्यासोबत गेलो होतो.
त्यांनी त्या ठिकाणी काय आणि कसं चालतं हे आमच्या लक्षात आणून दिलं. आपल्या हाताखाली काम करणाऱ्या बायकांवर लक्ष ठेऊन असलेले दलाल त्यांनी आमच्या निदर्शनास आणून दिले.
देहविक्रीच्या जाळ्यातून महिलांना बाहेर काढण्यासाठी हायटॉवर झटत आहेत. त्यांची संस्था रिअल एस्केप फ्रॉम सेक्स ट्रेड (रेस्ट) ही पूर्वाश्रमीच्या देहविक्री करणाऱ्या महिलांना वेगवेगळ्या पद्धतीनं सहकार्य करते.
ज्या महिलांना हा व्यवसाय सोडायचा आहे, त्यांना निवारा देणं, त्यांची व्यवस्था करणं हे काम रेस्ट ही संस्था करते. या महिलांना कपडे देणं, शूज देणं यासारखी कामं देखील रेस्ट ही संस्था करते.
सिअॅटलच्या रेडलाइट भागात दारूची दुकानं आहेत, स्वस्त हॉटेल्स आहेत. त्या ठिकाणी दोन महिला उभ्या होत्या आणि त्या बोलत होत्या.
हायटॉवर त्यांच्याशी बोलू लागल्या. त्यांनी आम्हाला सांगितलं, "तुमच्याजवळचा कॅमेरा लपवा." आम्ही त्याप्रमाणे केलं.
त्या महिलांच्या लक्षात आलं की, हायटॉवर यांच्याशी बोलणं हे धोक्याचं ठरेल. त्यांनी हायटॉवर यांचं थोडावेळ नम्रपणे ऐकून घेतलं. आणि नंतर त्या त्यांच्या कामात व्यग्र झाल्या.
"आधी अशा महिलांशी संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेणं सोपं होतं," असं हायटॉवर सांगतात. "पण आता आपल्या व्यवसायासाठी अनेक महिला ऑरोरा अव्हेन्यूला येत नाहीत. त्या इंटरनेटवर आहेत."
"अशा महिलांना ऑनलाइन मदत करणं रेस्टसारख्या संस्थांना अवघड झालं आहे. कारण इंटरनेटवर अशा शेकडो जाहिराती असतात. त्यांना सहकार्य हवं की नाही हे कसं पाहणार?" हायटॉवर सांगतात.
हायटॉवर पुढं म्हणतात, "काही सॉफ्टवेअरच्या मदतीनं फिल्टर्स लावून त्यांच्यापर्यंत पोहोचता येतं. या सॉफ्टवेअरच्या मदतीनं त्यांचे फोन नंबर मिळवून आम्ही एकदाच 200 महिलांना मेसेज करतो."
"जर त्या सुरक्षित असतील तर त्या आम्हाला लगेच उत्तर देतात. जर त्यावेळी त्या कुणासोबत असतील तर त्या काही वेळानं मेसेजला उत्तर देतात," असं हायटॉवर यांनी सांगितलं.
"जर त्यांची फसवून मानवी तस्करी झाली असेल तर त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले जातात. कधीकधी तर असं होतं की, मेसेज मिळाल्याच्या खूप दिवसानंतर या पीडिता आमच्याशी संपर्क साधतात. गेल्या वर्षी रेस्टनं अशा 40 महिलांची या व्यवसायातून सुटका केली आहे. आणि हे या नव्या प्रणालीमुळंच शक्य झालं," अशी माहिती हायटॉवर यांनी दिली.
खरं समाधान
"या तंत्रज्ञानाचा वापर जगभर व्हायला हवा असं त्यांना वाटतं. अशा टेक्नॉलॉजीचा उपयोग फक्त पीडित महिलांशी संपर्क साधण्यापुरता मर्यादित राहायला नको, त्या महिलांना नंतर पुनर्वसनासाठी सहकार्य मिळायला हवं," असं हायटॉवर म्हणतात.
"या प्रकल्पाची सुरुवात आम्ही 12 शहरांत केली आहे. आतापर्यंत 90,000 फोन नंबरची ओळख पटली आहे. ज्यांच्याशी आमचे तज्ज्ञ संपर्कात राहतील," असं त्या सांगतात.
अमेरिकेतल्या काही राज्यांतील नव्या कायद्यानुसार इंटरनेटवर अशा प्रकारच्या जाहिराती प्रदर्शित करण्यास बंदी घातली आहे. या कायद्याचं समर्थन हायटॉवरसारख्या अनेकांनी केलं.
काही दिवसांच्या चर्चा आणि वादविवादानंतर आता देहविक्रीसंबंधी जाहिरात प्रतिबंध कायद्याचं पालन करण्याचं तंत्रज्ञान क्षेत्रातल्या मोठ्या कंपन्यांनी मान्य केलं आहे.
याचा अर्थ असा की, ज्या वेबसाइटवर देहविक्रीची जाहिरात होते त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. अशा वेबसाइटपैकी एक आहे बॅकपेज डॉटकॉम. या वेबसाइटशी संपर्क साधून बीबीसीनं त्यांना याबाबत विचारलं. त्यांनी याबाबत बोलायचं टाळलं.
दरम्यान, अमांडा हायटॉवर यांच्यासारखे कार्यकर्ते आपलं कार्य नेटानं पार पाडत आहेत. त्या सांगतात, "कालच माझ्याकडे एक मुलगी आली. तिला आम्ही आमच्या पुनर्वसन कार्यक्रमांतर्गत मदत केली आहे. ती खूप आनंदी होती. ती मुलगी म्हणते, अमांडा माझ्याकडं कार आहे, लायसन्स आहे, इन्श्युरन्स आहे. सर्वकाही कायदेशीर आहे."
पुढे त्या म्हणतात, "असे काही समाधानाचे क्षण आम्हाला लाभतात. आपण करत असलेलं कार्य योग्य दिशेनं जात आहे याची जाणीव आम्हाला यामुळं होतं. कारण आम्हाला माहीत आहे, आम्ही जे करत आहोत त्यामुळं कुणाच्या तरी आयुष्यात बदल घडत आहे."
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)