You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वापरलेल्या सॅनिटरी पॅडच्या ढिगांचं काय करायचं?
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
काही वर्षांपूर्वी परिस्थिती वेगळी होती. टीव्हीवर 'त्या' जाहिराती लागल्या की वडील चॅनेल बदलायचे, आई वैतागायची आणि मुलांना नेमका प्रश्न पडायचा - पांढऱ्या पट्टीवर निळं पाणी ओतलं की नक्की काय होतं? आणि मुलींना जाहिरातीतल्या मुली फक्त 'त्या दिवसांत' फक्त पांढरे कपडेच का घालतात, हे कळायचं नाही.
मासिक पाळीला शुद्ध 'पाळी' किंवा पीरियड्स म्हणायची सोय नव्हती. कावळा शिवण्यापासून जरी काळ पुढे सरकला होता तरी हॅपी बर्थ डे(!), MC, सुट्टी अशा कोडमध्ये सांगायचं की मासिक पाळी सुरू आहे.
जाहिराती तरी कुठे सरळ बोलत होत्या. सारा आपला 'उन दिनों' का मामला! आणि दुकानात गेलं की दुकानदार त्याच्याकडे असेल तो सॅनिटरी पॅडसचा पुडा घाईघाईनं काळया पिशवीत कोंबून देणार.
त्या मानानं आताची परिस्थिती बरीच बदलली आहे. मासिक पाळीसंदर्भात जाहीर चर्चा होत आहे. महिलांच्या आरोग्याच्या मुद्दयांवर लक्ष केंद्रित केलं जात आहे. गोरगरीब स्त्रियांना मोफत सॅनिटरी पॅड देण्याची मागणी होत आहे.
महाराष्ट्र सरकारनं ग्रामीण भागातल्या महिलांना स्वस्तात सॅनिटरी पॅडस उपलब्ध करून द्यायची घोषणा केली आहे. इतकंच काय तर #PadManChallenge घेत बॉलीवुडच्या अनेक सेलिब्रिटींसकट सामान्य स्त्री-पुरुष, विशेषतः पुरुष, हातात सॅनिटरी नॅपकिन घेऊन काढलेले फोटो सोशल मीडियावर टाकत आहेत.
सारं कसं छान छान आहे नाही? एक छोटाशी अडचण वगळता. या सगळ्यांत आपलं कोणाचं पर्यावरणाकडे लक्षच नाही.
धोक्याची घंटा
मासिक पाळीसंदर्भात आपल्या समाजात खुलेपणानं होणारी चर्चा स्वागतार्ह असली, तरी पर्यावरणवाद्यांना यात धोक्याची घंटा ऐकू येत आहे.
पर्यावरण दक्षता मंचाच्या कविता वालावलकर म्हणतात की आपण जे सॅनिटरी पॅडस वापरतो, त्यात प्लॅस्टिक असतं. "ते नष्ट व्हायला शेकडो वर्षं लागतात. दुसरं म्हणजे त्यांची डिस्पोजल सिस्टीम नीट नसते. वापरलेल्या पॅडमध्ये अशुद्ध रक्त असतं. कचरा वेचणारे लोक त्यांना हाताने वेगळं करतात आणि त्यामुळे त्यातून जंतुसंसर्ग किंवा त्वचेचे तसंच इतर रोग होण्याची शक्यता असतेच."
"आजकाल कापडाचे इतके छान छान सॅनिटरी नॅपकिन आले आहेत. ते शिवलेले असतात, वापरायलाही सोपे असतात. थोडी मेहनत आपल्याला घ्यावी लागते, पण कोणतीही चांगली गोष्ट मेहनतीशिवाय पूर्ण होत नाही."
कविता पुढे सांगतात, "जर नेहमीचे सॅनिटरी नॅपकिन वापरण्याशिवाय पर्याय नसेलच, तर निदान त्यांची विल्हेवाट लावताना विशिष्ट प्रकारच्या पिशव्या वापरा, जेणेकरून सफाई कर्मचाऱ्यांना कळेल की यात काय आहे आणि ते मग आवश्यक ती काळजी घेतील. आजकाल बऱ्याच स्वयंसेवी संस्थांनी अशा पिशव्या तयार करायला सुरुवात केली आहे."
वापरेल्या सॅनिटरी नॅपकिन्सची नीट विल्हेवाट लावण्यासाठी सरकारनं काहीतरी ठोस उपाययोजना कराव्यात, म्हणून मुंबईच्या सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया सोनार यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
"आपल्याकडे घनकचरा नियोजनाचे काही नियम आहेत. त्यानुसार सॅनिटरी नॅपकिन बनवणाऱ्या कंपन्यांनी त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी पिशव्या द्यायला हव्यात, ज्या ते देत नाहीत. याचा पर्यावरणावर आणि कचरावेचक लोकांवर खूप वाईट परिणाम होतो," असं सुप्रिया सांगतात.
"एक बाई तिच्या संपूर्ण आयुष्यात दहा ते पंधरा हजार सॅनिटरी नॅपकिन्स वापरते. मग महिलांची लोकसंख्या बघा आणि करा गुणाकार, किती सॅनिटरी कचरा तयार होतो ते. दरवर्षी 40 हजार कोटी वापरलेले पॅड्स मुंबईसारख्या शहराच्या डंपिंग ग्राऊंडमध्ये येतात. हे ढीग जाणार तरी कुठे?"
नॅपकिन पुरवले म्हणजे झालं का?
नमिता भावे या भारत सरकारच्या स्वच्छ भारत योजनेअंतर्गत जिल्हा प्रेरक म्हणून काम करतात. पाळी संदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं हा त्यांच्या कामाचा भाग आहे. कापडी पॅडचा वापर वाढला पाहिजे, असं त्यांना वाटतं.
नमिता भावे त्यांचा अनुभव सांगतात.
"एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, पॅडमॅन मुरुगन यांनी जसे पॅड तयार केले, त्याप्रकारचे पॅड मी वापरून पाहिले आहेत. ते अगदी म्हणजे अगदीच गैरसोईचे आहेत. असे प्रयत्न करणाऱ्यांच्या हेतूबाबत शंका नाही, पण वस्तू म्हणून बचत गटांनी तयार केलेले पॅड अगदी वाईट असतात. मुळात पॅड चिकटण्यासाठी जो गोंद अशा पॅडमध्ये वापरलेला असतो तो इतका वाईट आहे की त्याने कपडे फाटतात."
"माझा मुद्दा हा आहे की आता सरकार जे पॅड स्वस्तात देणार आहेत, किंवा जिल्हा परिषदेतल्या शाळांना ज्यांचं वाटप होणार आहे, ते पॅडस चांगल्या दर्जाचे हवेत. असे वाईट पॅड्स देऊन काहीच साध्य होणार नाही," असं नमिता यांना वाटतं.
"दुसरं म्हणजे गावाखेड्यांमध्ये हे पॅड वापरले गेल्यानंतर त्यांच्या विल्हेवाटीचं काय?" त्या विचारतात.
हाच प्रश्न सुप्रियांना पण सतावतो. "आपल्याकडे लोकांना वाटतं महिलांना पॅड पुरवले म्हणजे झालं. पण त्यांची व्यवस्थित विल्हेवाट लावली नाही तर समोर उभ्या ठाकणाऱ्या पर्यावरणीय आणि आरोग्य समस्यांचा कोणी विचारच करत नाही."
"अस्मितासारखी योजना असेल किंवा महानगरपालिकेचं बजेट असेल, शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिनचं मशिन लावण्यासाठी किंवा महाराष्ट्र सरकारची मेन्स्ट्रुअल हायजिनबाबतची निर्देशक तत्त्वं असतील, या सगळ्यांत वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिनचं काय करायचं यासाठी कोणतीही तरतूद नसते," सुप्रिया सांगतात.
ग्रामीण भागात मुलींना पॅड उपलब्ध करून दिल्यानंतर त्यांची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी याबद्दल नमिता आग्रही आहेत. "मी 'स्वच्छ भारत अभियाना'च्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलले. वापरलेल्या सॅनिटरी पॅड्सची विद्युतदाहिनीत विल्हेवाट लावता येऊ शकते, असं त्यांचं म्हणणं पडलं. पण, मला तसं वाटत नाही."
ग्रामीण भागात जिथं तासंतास वीज नसते तिथं या विद्युतदाहिन्यांचा काय उपयोग, असा आणखी एक प्रश्न नमिता उपस्थित करतात. "आणि या दाहिन्यांचं बिल कोण भरणार?" असा प्रश्नही त्या विचारतात.
त्यापेक्षा काही स्वयंसेवी संघटनांनी तयार केलेल्या मातीच्या दाहिन्या वापराव्यात, असं त्यांना वाटतं. अर्थात याने वायू प्रदूषण होण्याचा धोका आहेच!
मग सॅनिटरी नॅपकिनला पर्याय काय?
सीमा परदेशी-खंडाळे यांना सॅनिटरी नॅपकिन्सचा कचरा ही एक भयानक समस्या वाटते. त्या सॅनिटरी पॅड वापरण्याऐवजी इतर एको-फ्रेंडली पर्याय वापरण्यासाठी जनजागृती करतात.
"विचार करा ना, तुम्ही वापरलेलं पहिलं सॅनिटरी पॅड या ना त्या अवस्थेत अजूनही जमिनीवरच पडून आहे. ते नष्ट होणारच नाही आणि दरवर्षी कोट्यावधी पॅडचा कचरा वाढतोच आहे. या परिस्थितीत आपल्याला काहीतरी पर्याय शोधावेच लागणार."
सीमा मेन्स्ट्रुअल कपच्या बाबतीत महिलांमध्ये जागृती करतात. हे कप महिलांना सहजपणे उपलब्ध करून देता यावे, म्हणून त्यांनी स्वतः याचं उत्पादनही सुरू केलं आहे.
"हे कप वापरायला अगदी सोपे आहेत आणि अनेक वर्षं वापरता येतात," सीमा माहिती देतात.
अनेक वर्षं सॅनिटरी पॅड वापरल्यानंतर भुसावळच्या रेश्मा पंडित आता कप वापरतात. "मी आता दुसरं काही वापरायचा विचार करूच शकत नाही. पॅड वापरल्यामुळे होणारे रॅश, डाग लागण्याची भीती, यातलं काही नाही आता," असं व्यवसायाने डॉक्टर असणाऱ्या रेश्मा सांगतात.
जितक्या महिलांनी मेन्स्ट्रुअल कप वापरले आहेत, बहुतांश जणींना ते अतिशय सोईस्कर वाटतात.
पण 'कप' भारतात लोकप्रिय का नाहीत?
मेन्स्ट्रुअल कप वापरताना ते योनीमध्ये आत टाकावे लागतात. "हे भारतीय मानसिकतेत बसणारं नाही. बायका बिचकतात हे खरं. अगदी लग्न झालेल्या बायकांच्या अंगावरही मेन्स्ट्रुअल कप म्हटलं की काटा येतो," सीमा म्हणतात.
"विवाहित असो वा अविवाहित, हे कप सगळ्यांसाठीच सोयास्कर आहेत. एकदा जरी बायकांनी हे कप वापरले ना, तर त्यातून मिळणारा आराम त्यांना नंतर दुसरं काही वापरू देत नाही."
रेश्मा पंडित यांच्या मते अगदी विशीच्या आतल्या मुली सोडल्या तर इतर सगळ्यांनी हे कप वापरायलाच हवेत.
पण कप किंवा कापडी पॅडच्या किंमती सर्वांच्या आवाक्यातल्या नाहीत. "मी परवाच काही कापडी पॅड मागवले. मला एक पॅड दोनशे रुपयाला पडलं. नेहमीच्या पॅडपेक्षा कितीतरी जास्त महाग," नमिता माहिती देतात.
पण म्हणून मासिक पाळी जास्तीत जास्त एको-फ्रेंडली बनवण्याचे प्रयत्न सोडून द्यायला नकोत.
"मासिक पाळी, स्वच्छता आणि महिलांचं आरोग्य यासंबंधात काम करणाऱ्या सगळ्या संस्था, सरकार आणि कंपन्यांनी एकत्र यायला हवंय. आमचा तोच प्रयत्न आहे. चर्चा करू, मार्ग निघेल," सुप्रियांना विश्वास आहे.
कापडाच्या पॅडचा पर्याय कितपत सोईस्कर?
सॅनिटरी पॅडच्या ऐवजी तुम्ही पूर्णवेळ कापडी पॅड वापरू शकत नाही. त्यांची कमी शोषक्षमता असल्याने डाग लागणं, कपडे खराब होण्यासारखे प्रश्न नेहमीचेच.
दुसरं आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे कापडी पॅडचा फायदा तेव्हाच होतो जेव्हा ते स्वच्छ धुवून, जंतुनाशक लिक्विडमध्ये भिजवून, पुन्हा धुवून उन्हात कोरडे वाळवले जातीत. नाहीतर उलट त्रासच व्हायचा.
"तुम्ही प्रवासात किंवा 8-9 तास ऑफिसमध्ये असता तेव्हा कापडी पॅड वापरू शकत नाही. पण निदान जेव्हा घरी असता तेव्हा हे पॅड नक्कीच वापरू शकता. एका पाळीमध्ये तुम्ही 10 पॅडस वापरत असाल तर त्यातले 3 जरी कापडी वापरलेत तर ती एक चांगली सुरुवात असेल," असं नमिता म्हणतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)