पाहा फोटो : जगभरात प्रसिद्ध झालेल्या या गोंडस गोरिलाच्या फोटोमागचं सत्य

2018चा 'वाइल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द इअर' - पीपल्स चॉईसचा पुरस्काराचा मानकरी ठरलेला हा फोटो आहे एका गोरिला आणि त्याच्या जीवनदात्याचा.

या गाडीत गोरिला त्याचा जीव वाचवणाऱ्या माणसाला कवटाळून बसला आहे. मृत्यूच्या दाढेतून सुटका होऊन मोकळा श्वास घेता येऊ लागल्याचं समाधान आणि दात्याप्रती कृतज्ञता गोरिलाच्या डोळ्यातून व्यक्त होते आहे. गोरिलाच्या डोळ्यातले हे जिवंत असल्याचे भाव कॅनडास्थित फोटोग्राफर जो अॅन मॅकऑर्थर यांनी सुरेखरीत्या टिपले आहेत.

गोरिला आणि चिंपाझीच्या संवर्धनासाठी आफ्रिकेत कार्यरत 'एप अॅक्शन आफ्रिका' या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी 'पिकीन' नावाच्या या गोंडस गोरिलाची सुटका केली. हा फोटो कॅमेरूनमधल्या एका अभयारण्यातला आहे.

24 फोटोंमधून गोरिलाचा हा फोटो सर्वोत्तम ठरला. 20,000 निसर्ग चाहत्यांनी या फोटोवर सर्वोत्तम म्हणून मोहोर उमटवली आहे.

वसंतू ऋतूत, बर्फाच्छादित प्रदेशात उब मिळवण्यासाठी आपल्या आईला बिलगणारी ध्रुवीय अस्वलांची पिल्लं.

अस्वलांची ही मायलेकरं गुहेतून बाहेर येण्यासाठी फोटोग्राफर डेब्रा गॅरसाइड यांना सहा दिवस प्रतीक्षा करावी लागली.

कॅनडातल्या मॅनिटोबातील वॅपुस्क नॅशनल पार्कमधलं हे कौटुंबिक प्रेमाचं दृश्य. हा फोटो टिपला तेव्हा बोचरे वारे वाहत होते आणि तापमान होतं उणे तीसच्याही खाली.

केनियातल्या जगप्रसिद्ध मसाई मारा राष्ट्रीय अभयारण्यातली प्राणीपक्ष्यांची अनोखी युती टिपली आहे लक्षिथा करुणारत्ना यांनी.

एरव्ही हवेत विहरणाऱ्या रंगीबेरंगी पक्ष्यानं पांढऱ्या आणि काळ्या पट्ट्यांची नक्षी लाभलेल्या झेब्र्याच्या पाठीवर बसून जंगल सफारी केली. या फोटोत अनेक झेब्रे जमलेले असताना फोटोग्राफरनं पक्ष्याची अचूक टिपलेली मुद्रा.

ब्राझीलमधल्या दक्षिण बाहिआ प्रांतातल्या रेनफॉरेस्टमध्ये एका झाडावर चढून ल्युसिआनो कँन्डिसानी यांनी झाडाला लटकलेल्या स्लॉथ या प्राण्याचा काढलेला हा फोटो.

झाडाला ओळखिंबे घेऊन जगणाऱ्या आणि झाडाची पानंच मुख्य अन्न असणाऱ्या या प्राण्याच्या आयुष्यातला हा निवांत क्षण.

दरवर्षी जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत हंपबॅक व्हेल मासे अंटार्क्टिक भागाकडून उत्तरेकडे सरकतात.

ध्रुवीय प्रदेशाच्या तुलनेत उष्ण प्रदेशासाठी ते स्थलांतर करतात. वा वू बेट समूहातल्या समुद्रात व्हेल मासे नक्षीदारपणे वावरत असताना रे चिन यांनी काढलेला हा फोटो.

रे यांनी मूळ फोटोला ब्लॅक अँड व्हाइट सादर करण्याचा निर्णय घेतला.

'वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इअर' हा नॅशनल हिस्ट्री म्युझियमतर्फे दिला जाणारा वार्षिक पुरस्कार आहे. यात छायाचित्रण आणि छायाचित्रण पत्रकारिता क्षेत्रातल्या सर्वोत्तम कलाकृती निवडल्या जातात.

हे वाचलंत का?

हे पाहिलं आहे का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)