पॉर्नच्या आरोपांवरून मंत्र्याची थेरेसा मे कॅबिनेटमधून हकालपट्टी

फोटो स्रोत, PA
मंत्रीपदी असताना आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी ब्रिटनच्या एका कॅबिनेट मंत्र्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
पंतप्रधान थेरेसा मे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे डेमियन ग्रीन यांच्या कार्यालयातील संगणकावर 2008 मध्ये पॉर्न मजकूर आढळला होता. त्या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान दिशाभूल केल्याप्रकरणी ग्रीन दोषी आढळले होते. त्यांना आता राजीनामा देण्याचा आदेश देण्यात आला.
ग्रीन यांनी 2015 मध्ये लेखिका केट माल्टबी यांना संकोच वाटेल अशी वागणूक देण्यासाठीही त्यांची माफी मागितली आहे.
थेरेसा मे यांच्यासमोर ग्रीन यांचं मंत्रीपद काढून घेण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता, असं बीबीसीच्या राजकीय संपादक लौरा कुसेनबर्ग यांनी सांगितलं. त्यांच्यानुसार ग्रीन हे सरकारच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावत होते आणि त्यांच्या हकालपट्टीने थेरेसा मे आता एकट्या पडल्या आहेत.
61 वर्षीय ग्रीन हे ब्रिटन मंत्रीमंडळात कॅबिनेट दर्जाचे मंत्री होते. गेल्या दोन महिन्यांमध्ये मे यांच्या मंत्रीमंडळातला हा तिसरा राजीनामा आहे. याआधी मायकेल फलॉन आणि प्रीती पटेल या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

फोटो स्रोत, PA
ग्रीन यांच्या राजीनाम्याप्रकरणी पंतप्रधान मे यांनी खेद व्यक्त केला आहे. कॅबिनेट मंत्र्यांकडून जबाबदार वर्तनाची अपेक्षा असते. मात्र ग्रीन यांचं वर्तन तसं नसल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला, असं मे म्हणाल्या.
पत्रकार आणि हुजूर पक्षाच्या कार्यकर्त्या माल्टबी यांच्याशी आक्षेपार्ह वर्तन केल्याप्रकरणी ग्रीन यांची चौकशी सुरू होती. पण असं वर्तन केल्याच्या आरोपांचं त्यांनी 2013 साली खंडन केलं होतं.
ग्रीन यांच्यावर कार्यालयीन संगणकावर पॉर्न मजकूर डाऊनलोड तसंच पाहण्याचे आरोपही झाले होते. ज्यांचं त्यांनी खंडन केलं होतं.
पॉर्न मजकूर डाऊनलोड करणं तसंच पाहण्यासंदर्भात ग्रीन यांनी चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली, असं कॅबिनेट कार्यालयाने दिलेल्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. हा मंत्र्यांसाठीच्या आचारसंहितेचा भंग असल्याचं या अहवालात सांगण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, Elizabeth handy
ग्रीन आणि माल्टबी हे एकमेकांना वैयक्तिक कारणांसाठी भेटले होते. या खाजगी बैठकांसंदर्भात देण्यात आलेली माहिती विरोधाभास दर्शवणारी होती. मात्र माल्टबी यांची बाजू रास्त असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
एक मंत्री म्हणून ग्रीन खोटं बोलत आहेत, याविषयी माल्टबी यांच्या आईवडिलांना जराही आश्चर्य वाटलं नाही. तसंच, ग्रीन यांचं वर्तन आक्षेपार्ह आहे हे सिद्ध करण्यासाठी आपल्या मुलीला साक्ष द्यावी लागेल, हेही त्यांना अपेक्षितच होतं.
अधिकारांचा गैरवापर करणाऱ्या ग्रीनविरुद्ध बोलण्याचं धाडस केटने दाखवल्याबद्दल तिच्या पालकांनी तिचं अभिनंदन केलं.
दरम्यान, ग्रीन यांच्या राजीनाम्यासंदर्भात केट यांनी कोणतेही वक्तव्य केलेलं नाही. याप्रकरणाबाबत त्या कॅबिनेट कार्यालयाकडून अधिक माहिती जाणून घेत आहेत.
"पोर्नोग्राफीसंदर्भातले उद्गार अधिक सुस्पष्ट असायला हवे होते. माझं वक्तव्य दिशाभूल करणारं होतं. याकरता मी माफी मागतो," असं ग्रीन यांनी राजीनाम्यात म्हटलं आहे.
"डेमियन ग्रीन प्रचंड राजकीय जनाधार असलेले नेते नाहीत, तसंच ते फार लोकप्रियही नाहीत. पण पंतप्रधान थेरेसा मे यांचे ते निकटवर्तीय समजले जातात. राजकीय मित्रत्वापेक्षाही दोघे एकमेकांचे अनेक वर्ष स्नेही आहेत. ग्रीन यांना पायउतार व्हावं लागल्यानं मे यांचं प्रशासन आणखी कमकुवत झालं आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे," असं बीबीसीच्या लौरा क्युइनसेनबर्ग यांनी सांगितलं.
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








