चीनमध्ये झटपट नूडल्सची लोकप्रियता घटली...

फोटो स्रोत, AFP
- Author, सिमोन अॅटकिन्सन
- Role, आशिया व्यापार प्रतिनिधी
'पिकतं तिथे विकत नाही' ही म्हण चीनच्या इन्स्टंट नूडल्सला लागू होताना दिसत आहे. स्वस्तात मस्त अन्नपदार्थ म्हणून इन्स्टंट नूडल्सची लोकप्रियता जगभर वाढत असताना चीनमध्ये नूडल्स विक्रीत घट झालेली पाहायला मिळते आहे.
घरापासून दूर राहणारे विद्यार्थी, ट्रेन किंवा बसमधून जातानाचं झटपट जेवण, कामादरम्यान पटकन मिळेल आणि पोटभरीचं होईल असा कामगारांचा नाश्ता अशा विविध स्तरातल्या माणसांसाठी झटपट नूडल्स हा मोठाच आधार असतो.
भारतातही इन्स्टंट नूडल्सचे अनेक नवे ब्रॅण्ड गेल्या दोन- तीन वर्षांत दाखल झाले आहेत. पण चीनमध्ये परिस्थिती पालटत आहे.
2013 मध्ये चीन आणि हाँगकाँगमध्ये मिळून 42.2 अब्ज झटपट नूडल्सच्या पाकिटांची विक्री झाली होती.
2016च्या आकडेवारीनुसार ही विक्री घटून 38.5 अब्ज इतकी झाली आहे. 'वर्ल्ड इन्स्टंट नूडल असोसिएशन'नेच ही माहिती दिली आहे. झटपट नूडल्सची लोकप्रियता कमी होत आहे हे मान्य करावं लागेल असं संघटनेनं म्हटलं आहे. विक्रीत झालेली घट 17 टक्क्यांची आहे.

फोटो स्रोत, Getty Images
जगभरात झटपट नूडल्स विक्रीचा अभ्यास केला असता, विक्रीदर गेली काही वर्षं साधारण स्थिर असल्याचं चित्र आहे. (अपवाद : 2015 मध्ये भारतात मॅगी नूडल्सच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली. त्यावेळी भारतात विक्रीदर झपाट्याने घसरला होता.)
मग आता नक्की काय घडतंय? नूडल्सची कर्मभूमी असणाऱ्या चीनमध्ये घटलेली विक्री बदलत्या सामाजिक दृष्टिकोनाचं द्योतक आहे का?
सकस अन्नाच्या शोधात
झटपट नूडल्स करण्याची पद्धत अगदीच सोपी. उकळतं पाणी घ्या, मसाला टाका, थोड्या भाज्या आणि हवं असेल तर चिकन, मटणही टाकू शकता. झाल्या तयार नूडल्स.
तोंडाला पाणी सुटेल आणि लगेच तयार होऊ शकेल असा हा पदार्थ. वाफाळत्या खमंग नूडल्स कोणाला आवडणार नाहीत?

मात्र या नूडल्स नकोशा होण्याची कारणं हळूहळू स्पष्ट होत आहेत. सकस, कसदार खावं असा विचार काही चायनीज मंडळी करू लागली आहेत.
'नूडल्सविक्रीतली घट चीनमधल्या ग्राहकांच्या बदललेल्या प्राधान्यक्रमाचं प्रतीक आहे', असं अकॅडमी ऑफ चायना काउन्सिल फॉर प्रमोशन ऑफ इंटरनॅशनल ट्रेंड संघटनेचे झाओ पिंग यांनी सांगितलं.
जगणं दर्जेदार आणि गुणात्मक असावं हा विचार ग्राहकांमध्ये रुजतो आहे, असं पिंग यांनी 'चायना डेली' वृत्तपत्राला सांगितलं.
ग्रामीण भागातले कामगार परतीच्या वाटेवर
एका गृहितकानुसार, स्थलांतरित कामगारांसाठी नूडल्स मोठा आधार आहे. दाटीवाटीच्या ठिकाणी ते राहतात. स्वयंपाक करण्यासाठी सोयीसुविधा मर्यादित असतात. जास्तीत जास्त पैसे वाचवून गावी पाठवण्यासाठी ते उत्सुक असतात. त्यांचं जगणं बघता नूडल्स त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
2014 पर्यंत चीनमध्ये ग्रामीण भागातून शहरात कामानिमित्ताने स्थलांतर करणाऱ्यांचं प्रमाण वाढत होतं. मात्र गेल्या दोन वर्षांत हे चित्र उलटं होताना दिसत आहे. (2017चे आकडेही लवकरच स्पष्ट होतील. मात्र यंदाही हे प्रमाण कमी राहण्याचीच शक्यता वर्तवण्यात आली आहे.)
2017च्या तुलनेत चीनमधल्या शहरांत 17 लाख कामगार कमी झाली आहेत. कामगार कमी म्हणजेच नूडल्स खाणाऱ्यांचा एक वर्ग कमी होताना दिसत आहे.
प्रवासाच्या सवयी बदलत आहेत
वीस वर्षांपूर्वी चीनमध्ये प्रवास करताना वेळोवेळी मी नू़डल्स खाऊन पोट भरत असे. प्रवासातले खाचखळगे आणि त्यामुळे येणारी अस्वस्थता नूडल्स तात्काळ दूर करत असे.

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या काही वर्षांत चीनमधील रेल्वे आणि रेल्वेस्थानकं यामध्ये आमूलाग्र सुधारणा झाली आहे. प्रवासाचा वेळ कमी झाला आहे. प्रवासादरम्यान मिळणाऱ्या पदार्थांची संख्या वाढली आहे. नूडल्स हा आता एकमेव पर्याय उरलेला नाही. स्थानिक पदार्थांच्या बरोबरीने अनेक आंतरराष्ट्रीय पदार्थ सहज उपलब्ध असतात.
विमानसेवेला प्राधान्य
मोठा बदल म्हणजे चायनीज मध्यमवर्ग सुट्यांदरम्यान आपल्या आवडत्या ठिकाणी जाण्यासाठी विमानसेवेला अधिकाअधिक प्राधान्य देऊ लागला आहे. सुट्टीसाठी परदेशी जाण्याचा ट्रेंडही वाढू लागला आहे. साहजिकच रेल्वेप्रवास कमी होऊ लागला आहे. रेल्वेप्रवासाचा नूडल्स अविभाज्य घटक होता. ट्रेनप्रवास घसरणीला असल्याने नूडल्सच्या मागणीत घट होताना दिसते आहे.
गेल्या वर्षी चीनमध्ये 50 कोटी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय उडाणं झाल्याची माहिती चीनच्या हवाई वाहतूक मंत्रालयाने दिली आहे. मात्र प्रवासाला विलंब ही चीनच्या हवाई वाहतुकीचे वैशिष्ट्य आहे. असंख्य प्रवासी विमानतळावर विमानाच्या प्रतीक्षेत असतात. रेल्वे स्थानकाप्रमाणे विमानतळावरही नूडल्स विक्रीला वाव आहे.
स्मार्टफोन आणि इंटरनेट - नवं खाणं
सरकारनेच दिलेल्या माहितीनुसार चीनमधल्या 73 कोटी नागरिकांना इंटरनेटची सुविधा आहे. देशातल्या नागरिकांपैकी 95 टक्के लोक स्मार्टफोन वापरतात.
घरी किंवा कार्यालयात जेवण, नाश्ता पुरवणारं अॅप खूप लोकप्रिय होताना दिसत आहे. यामुळे नूडल्ससारख्या कामचलाऊ पदार्थावर विसंबून राहण्यापेक्षा आवडीचे पदार्थ खाण्याचा कल वाढला आहे.
नूडल्सपेक्षा घरपोच येणारे पदार्थ निश्चितपणे महागडे असतात. मात्र हे पदार्थ चवदार आणि रुचकर असतात. साहजिकच नूडल्सऐवजी सर्वसमावेशक खाण्याला पसंती मिळू लागली आहे.
आशावाद
मात्र नूडल्सची जागतिक बाजारपेठ लक्षात घेतली तर चीन अजूनही नूडल्स विक्रीचा बालेकिल्ला आहे. दुसऱ्या स्थानावर असलेल्या इंडोनेशिया तर तृतीय स्थानी असलेल्या जपानच्या तुलनेत चीनचं नूडल्स मार्केट आघाडीवर आहे.

इंडोनेशियाच्या तुलनेत चीनमध्ये झटपट नूडल्सच्या पाकिटांची विक्री तिप्पट आहे. चीनमध्ये होणारी झटपट नूडल्स पाकिटांची विक्री ही जपान, इंडोनेशिया, भारत, अमेरिका, दक्षिण कोरिया आणि फिलीपाइन्स या सगळ्या देशांच्या एकत्रित नूडल्स विक्रीपेक्षा जास्त आहे.
जपानमध्ये 'निस्सीन फूड्स' या नूडल्स विक्रेत्या कंपनीने हाँगकाँगमध्ये पसारा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने 145 दशलक्ष डॉलर्स .. निर्णय घेतला आहे.
जपानी कंपनीला हाँगकाँग मार्केटमध्ये स्थान मिळणं दुर्मीळ आहे. निस्सीन कंपनी चीनमध्येही व्याप वाढवणार आहे. आता निस्सीन चीनमधला नूडल्स विक्री करणारा पाचवा मोठा ब्रँड आहे.
'काही ग्राहकांनी झटपट तयार होणाऱ्या नूडल्स खाणं बंद केलं आहे. काहींनी नूडल्सचा दर्जा सुधारायला हवा अशी मागणी केली आहे', असं कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कियोटाका अँडो यांनी सीएनबीसीशी बोलताना सांगितलं.
आणखी चांगल्या दर्जाच्या नूडल्स आम्ही ग्राहकांना पुरवू शकतो. त्यामुळे उद्योगाचा पसारा वाढवायला वाव आहे असं त्यांनी पुढे सांगितलं.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








