26 फुटांचा अजगर त्यांनी चक्क तळून खाल्ला

फोटो स्रोत, AFP/GETTY IMAGES
तब्बल 26 फूट लांबीचा अजगर पाहणाऱ्यांची बोबडी वळवू शकतो. मात्र इंडोनेशियातल्या सुमात्रा बेटावरच्या लोकांनी या अवाढव्य अजगराला मारून त्यावर तावही मारला.
इंडोनेशियात सुमात्रा बेटावरील बतांग गन्साल या जिल्ह्यात एका भल्यामोठ्या अजगराला मारुन खाण्यात आलं.
इथल्या सिक्युरिटी गार्ड रॉबर्ट नबाबन यांना ताडाच्या झाडांमध्ये एक महाकाय अजगर दिसला.
सूत्रांनुसार, नबाबन यांनी 7.9 मीटर म्हणजे जवळजवळ 26 फूट लांब अजगराला पकडण्याचा प्रयत्न केला.
अजगराने त्यांच्यावर हल्ला केला पण शेवटी गावकऱ्यांच्या मदतीने अजगराला मारण्यात यश आलं. नबाबन मात्र थोडक्यात वाचले.
या अजगराला खाण्याअगोदर गावात सगळ्यांना पाहण्यासाठी तो टांगण्यात आला.

फोटो स्रोत, AFP/GETTY IMAGES
'देतीक' या इंडोनेशियन वृत्तसंस्थेला बोलताना नबाबन म्हणाले, "मी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण माझा हात त्याच्या जबड्यात सापडला. मी खूप मेहनतीने बाहेर काढला.
37 वर्षीय सिक्युरिटी गार्डने अजगराला मारण्याचं नेमकं कारण सांगितलं नाही. या अजगरामुळं गावकरी रस्ता पार करायला घाबरायचे असं त्यांनी सांगितलं.
स्थानिक पोलिसांनी एएफपी या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार अजगराचे दात गार्डच्या हातात रुतले होते.
त्यांना पकानबारू या शहरातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अजूनही उपचार चालू आहे, असं बतांग गन्साल जिल्ह्याप्रशासनाचे प्रमुख एलिनारियॉन यांनी सांगितलं आहे.
इतर इंडोनेशियन लोकांप्रमाणं एकाच नावाचा आग्रह धरणाऱ्या या अधिकाऱ्यानं बीबीसीला सांगितलं की, नबाबन यांचा हात गंभीररित्या जखमी झाला आहे आणि डॉक्टरांना कदाचित तो कापावा लागेल.
'चविष्ट अजगर'
मोठे अजगर या भागात कायम दिसतात. "अगदी वर्षातून किमान 10 वेळा तरी अजगर नजरेस पडतात. उन्हाळ्यात अजगर पाण्यासाठी बाहेर येतात तर पावसाळयात पावसात भिजण्यासाठी."
तसंच, पामवृक्षांच्या गर्दीत खूप उंदीर असतात त्यामुळे त्यांच्या शिकारीसाठीही अजगर बाहेर येतात, असं एलिनारियॉन यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, AFP/GETTY IMAGES
"लोकांनी मोठ्या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या नादी लागू नये. सापांच्या बाबतीत नाहीच नाही, जर तसं केलं तर ते संतापून तुमच्यावर माघारी हल्ला करू शकतात", असा इशाराही ते देतात.
त्यांच्या मते, इथे अजगर खाणं ही आश्चर्याची गोष्ट नाही. "माझ्या मित्रांनी अजगर खूप चविष्ट असल्याचं सांगितलं आहे. 7 मीटर लांब साप म्हणजे नक्कीच भरपूर मटन असणार! लोकांच्या मते, अजगराच्या रक्तात औषधी गुणधर्मही असतात", असंही ते सांगतात.
इथे काल अजगराला गावकऱ्यांनी खाल्लं, पण गेल्या वर्षी मार्चमध्ये इंडोनेशियातील अजगराच्या पोटात एक मृत माणूस सापडला होता.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








