विदर्भाला पहिल्यांदा रणजी करंडक जिंकून देणारे 15 विदर्भवीर

फोटो स्रोत, DESHAKALYAN CHOWDHURY/Getty Images
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी
प्रथम श्रेणी क्रिकेटचा मानबिंदू असणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेत विदर्भाच्या शिलेदारांनी अंतिम फेरी जिंकत पराक्रम केला आहे.
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत अनेक वर्ष प्लेट अर्थात खालच्या गटात खेळणाऱ्या विदर्भ संघानं यंदा पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीचं दडपण न घेता विदर्भाने दिल्लीसारख्या मजबूत संघाला 9 विकेट्सनी नमवत बाजी मारली.
प्रस्थापित संघांची मक्तेदारी मोडून काढत दमदार कामगिरी करणाऱ्या विदर्भाचे शिलेदार आहेत तरी कोण?
1. वसीम जाफर
मुंबई क्रिकेटची शान असलेला हा अनुभवी खेळाडू आता विदर्भ संघाचा अलिखित प्रशिक्षकरूपी आधारवड आहे. भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या वसीमच्या नावावर रणजी स्पर्धेत 10,000 धावांचा विक्रम आहे.
1934-35 मध्ये रणजी स्पर्धा सुरू झाल्यापासून हा विक्रम रचणारा वसीम पहिलावहिला खेळाडू आहे.
225हून अधिक सामने, 17000 हून अधिक धावा, 52 शतकं, 85 अर्धशतकं, रणजी करंडक विजेत्या मुंबई संघाचं नेतृत्व असा भारीभक्कम दस्ताऐवज वसीमच्या नावावर आहे. 39 वर्षीय वसीमचा अनुभव दडपणाच्या क्षणी विदर्भाच्या खेळाडूंसाठी मोलाचा ठरला आहे.
2. उमेश यादव
भारतीय संघातला विदर्भाचा पहिलावहिला खेळाडू. नागपूरजवळच्या वणीमध्ये सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेला उमेश आता भारतीय संघाचं वेगवान अस्त्र झाला आहे.

फोटो स्रोत, Daniel Munoz/Getty Images
नागूरजवळच्या वणी भागात राहणारा उमेशने वयाच्या विशीपर्यंत लेदर बॉल क्रिकेट खेळलेला नव्हता. वडील कोळसा खाणीत काम करत असत. बारावीनंतर शिक्षण सोडलेल्या उमेशकडे नोकरी नव्हती, डिग्रीही नव्हती.
पोलीस खात्यात भरती होण्याची संधीही थोडक्यात हुकली. त्यावेळी विदर्भ जिमखान्यातर्फे खेळण्याची संधी मिळाली. यानंतर उमेशने मागे वळून पाहिले नाही.
भन्नाट वेग आणि अचूकतेच्या बळावर उमेशने देशांतर्गत स्पर्धा गाजवल्या. 2010 मध्ये उमेशने भारतासाठी पदार्पण केलं. सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर उमेश भारताच्या कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-20 संघाचा अविभाज्य भाग आहे.
आयपीएल स्पर्धेत 'दिल्ली डेअरडेव्हिल्स' आणि 'कोलकाता नाइट रायडर्स' संघांचा प्रमुख गोलंदाज म्हणून उमेशची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. व्यग्र आंतरराष्ट्रीय कॅलेंडरमुळे उमेश विदर्भसाठी सगळे सामने खेळू शकत नाही.
यंदाच्या रणजी हंगामात उमेशने आपल्या वेग आणि अनुभवाद्वारे विदर्भाला काही सामन्यात विजय मिळवून दिला. उमेशचा आंतरराष्ट्रीय अनुभव विदर्भाच्या अनुनभवी गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरला.
3. फैझ फझल
विदर्भ संघाचा कर्णधार. प्रसिद्धीपराङ्मुख अशा या विदर्भाच्या डावखुऱ्या शैलीदार फलंदाजाची भारतीय संघात निवड झाली तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

फोटो स्रोत, facebook/faiz fazal
30व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण करणारा फैझ स्थानिक क्रिकेटमध्ये अनेक वर्षं सातत्याने धावा करतो आहे. इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेत फैझ राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे.
इंग्लंडमधल्या लिव्हरपूल प्रीमिअर लीग स्पर्धेत एन्सडेल संघाकडून खेळण्याचा अनुभवही फैझकडे आहे. वजन वाढू नये म्हणून फैझने गोड पदार्थ आणि मैदा यांना आहारातून वजा केलं आहे. यंदाच्या हंगामात सर्वाधिक रन्स करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत फैझ तिसऱ्या स्थानी आहे.
4. गणेश सतीश
बलाढ्य कर्नाटक संघाचा अविभाज्य घटक असलेला फलंदाज. मात्र कर्नाटक संघात एकापेक्षा एक सरस खेळाडू असल्याने गणेशला अपेक्षेइतकी संधी मिळेनाशी झाली.
2014 मध्ये अखेर गणेशने विदर्भाकडून खेळण्याचा निर्णय घेतला. त्याच्या समावेशाने विदर्भ संघाची फलंदाजी मजबूत झाली. युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची जबाबदारीही गणेशवर आहे.
5. रजनीश गुरबानी
उंच आणि बारीक चणीच्या रजनीशला पाहून भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरची आठवण होते. मात्र त्याच्या सडपातळ बांध्यावर जाऊ नका. रजनीशचा वेग भल्याभल्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडतो.

फोटो स्रोत, facebook/ rajneesh gurbani
रजनीश सिव्हिल इंजिनियर आहे. आठही सेमिस्टर प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या रजनीशसमोर दणकट पगाराच्या उत्तम संधी समोर होत्या. मात्र केडीके महाविद्यालयाच्या रजनीशने इंजिनियरिंग आणि क्रिकेट अशी दुहेरी कसरत यशस्वीपणे पेलली.
आंबेडकर क्रिकेट क्लबचा विद्यार्थी असलेल्या रजनीशने विदर्भच्या वेगवान माऱ्याची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. कर्नाटकविरुद्ध कोलकाता येथे सुरू असलेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत रजनीशने एका डावात पाच बळी घेत उपयुक्तता सिद्ध केली आहे.
6. अक्षय कर्णेवार
आपल्या अनोख्या शैलीमुळे अक्षयचं नाव जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांपर्यंत पोहोचलं आहे. अक्षय उजव्या आणि डाव्या हाताने तितक्याच अचूकतेने गोलंदाजी करतो.
आंतरराष्ट्रीय स्तरावर हनीफ मोहम्मद, ग्रॅहम गूच, हशन तिलकरत्ने, कामिंदू मेंडिस, यासिर जन या पुरुष तर शैला शरमीन आणि बार्स्बी या महिला क्रिकेटपटूंनी ही करामत करून दाखवली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडा गावच्या अक्षयची ही खुबी प्रशिक्षक बाळू नवघरे यांनी हेरली. विदर्भ क्रिकेट ट्रायल्सदरम्यान प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी अक्षयला पाहिलं आणि त्याच्या गोलंदाजीला प्रोत्साहन दिलं.
यंदाच्या वर्षीच बोर्ड प्रेसिडेंट इलेव्हन संघातर्फे खेळताना अक्षयने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना बुचकळ्यात टाकले होते. अवघड असं कौशल्य जपणाऱ्या अक्षयला आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या संघात सामील केलं आहे.
7. ललित यादव
शालेय स्तरावर भालाफेक, त्यानंतर राज्यस्तरीय ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक आणि आता वेगवान गोलंदाजी- 22 वर्षीय ललितचा प्रवास भन्नाट आहे.
नागपूरच्या प्रवीण हिंगणीकर क्रिकेट अकादमीचा हा विद्यार्थी सुसाट वेगाने प्रतिस्पर्धी फलंदाजांना हैराण करतो.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
चेन्नईतल्या एमआरएफ पेस अकादमीत सुब्रतो बॅनर्जी आणि विदर्भचे माजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी ललितच्या गुणवत्तेला पैलू पाडले. दोन वर्षांत या पठ्ठ्याने विदर्भाच्या गोलंदाजीला मजबूत केलं आहे.
8. अक्षय वाखरे
नरेंद्र हिरवाणींचा शिष्य ही उंचपुऱ्या अक्षयची ओळख. दहावीत असताना इतिहासाचा कंटाळवाणा तास टाळण्यासाठी अक्षय त्याचवेळी सुरू असलेल्या चाचणीला हजर राहिला. पुढे क्रिकेट हेच आयुष्य होईल याची त्याला कल्पना नव्हती.
32 वर्षांचा फिरकीपटू अक्षय विदर्भाच्या गोलंदाजीचा महत्त्वपूर्ण घटक आहे. 'सेंट्रल झोन झोनल क्रिकेट अकादमी'चे प्रमुख प्रशिक्षक राजेश चौहान यांनीही अक्षयच्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दहा वर्षं विदर्भाचे प्रतिनिधित्व करत असतानाच अक्षय आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता.
9. आदित्य सरवटे
गेल्या महिन्यात कल्याणी येथे सुरू असलेल्या बंगालविरुद्धच्या लढतीत उसळता चेंडू डोक्यावर आदळल्याने विदर्भाचा अष्टपैलू खेळाडू आदित्य सरवटेचं नाव देशभर पसरलं. सुदैवाने ही दुखापत गंभीर नसल्याचं स्पष्ट झालं.
संघाला संतुलित करण्याचं काम अष्टपैलू खेळाडू करतो. आदित्य नेमकी हीच भूमिका विदर्भ संघासाठी पार पाडत आहे.
10. संजय रामास्वामी
अकराव्या वर्षी संजयने नागपूरमधल्या डॉ. आंबेडकर कॉलेज क्रिकेट अकादमीमध्ये प्रवेश घेतला. सडपातळ बांध्याचा संजय खेळू शकेल अशी शंका प्रशिक्षक प्रशांत बंबाळ यांना होती. मात्र संजयने आपल्या फलंदाजीने सगळ्यांना प्रभावित केलं.

फोटो स्रोत, Instagram/ faiz fazal
याच कामगिरीच्या बळावर विदर्भाच्या 19 वर्षांखालील संघात निवड झाली. मात्र एकही सामना न खेळवता त्याला डच्चू देण्यात आला.
'क्रिकेट सोडण्याचा विचार माझ्या डोक्यात आला होता. पण प्रशांत सरांच्या मार्गदर्शनामुळे संयम राखू शकलो, खेळत राहिलो. शरीर बळकट करण्यासाठी दररोज जिमला जाऊ लागलो', असं संजयने सांगितलं.
प्रयत्नांचं फळ मिळालं आणि विदर्भ संघात निवड झाली. डावखुरा शैलीदार संजय विदर्भसाठी खोऱ्याने धावा करतो आहे.
11. अपूर्व वानखेडे
पाच वर्षांपूर्वी आयपीएल स्पर्धेतला बलाढ्य संघ मुंबई इंडियन्स संघाने अपूर्वला ताफ्यात सामील केले तेव्हा पहिल्यांदा त्याच्या नावाची चर्चा झाली. मात्र संघात मोठ्या खेळाडूंचा भरणा असल्याने अपूर्वला फारशा संधी मिळाल्याच नाहीत.

फोटो स्रोत, facebook/apoorv wankhede
पैसा आणि प्रसिद्धी अनुभवलेला अपूर्वला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. मात्र गेल्या दोन वर्षांत अपूर्वने स्वत:ला फलंदाज म्हणून विदर्भच्या संघात सिद्ध केलं आहे.
12. करण शर्मा
रेल्वे संघाचा अनुभवी शिलेदार व्यावसायिक खेळाडू म्हणून विदर्भच्या ताफ्यात सहभागी झाला. लेगस्पिन हे दुर्मीळ होत जाणारं कौशल्य जपणाऱ्या करणच्या अनुभवामुळे विदर्भची फिरकी आघाडी भक्कम झाली.
क्रिकेट बॅटच्या फॅक्टरींकरता प्रसिद्ध करण मूळचा उत्तर प्रदेशातील मेरठचा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा टिळा माथी लागलेल्या करणने आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद तिन्ही संघांसाठी चमकदार कामगिरी केली.
13. शलभ श्रीवास्तव
नाम साधर्म्यामुळे शलभकडे संशयानं पाहिलं जातं. पाच वर्षांपूर्वी फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्यामुळे वेगवान गोलंदाज शलभ श्रीवास्तववर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली. पण विदर्भचा शलभ हा वेगळा असून त्याच्या संघासाठी तो फलंदाजीची ताकद आहे.
2005 मध्ये विदर्भसाठी पदार्पण करणाऱ्या शलभच्या नावावर तब्बल 68 सामन्यांचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांतल्या विदर्भाच्या यशस्वी वाटचालीत शलभची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.
14. श्रीकांत वाघ
बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यातील श्रीकांत विदर्भच्या अनुभवी शिलेदारांपैकी एक आहे. चेन्नईस्थित एमआरएफ पेस अकादमीचा विद्यार्थी असलेल्या श्रीकांतने 2011 मध्ये आयपीएल स्पर्धेत 'पुणे वॉरियर्स'करून खेळताना सलामीच्या लढतीत टाकलेला स्पेन आजही क्रिकेटचाहत्यांच्या स्मरणात आहे.
चार ओव्हर्समध्ये अवघ्या 16 धावांच्या मोबदल्यात श्रीकांतने 3 विकेट्स मिळवल्या. त्यासाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. डेनिस लिली आणि टी.ए. शेखर या अनुभवी मार्गदर्शकांकडून गोलंदाजीचे धडे गिरवलेला श्रीकांत विदर्भ संघाचा कणा आहे.
15. जितेश शर्मा
फलंदाजीची पाठ्यपुस्तकी शैली बाजूला सारून खेळणारा फलंदाज. अव्वल दर्जाला साजेसं तंत्र नसल्याने जितेश मागे पडतो अशी टीका होते. मात्र फलंदाजीच्या याच आक्रमक पवित्र्यामुळे मुंबई इंडियन्स संघाने त्याला संघात सामील केलं होतं.

फोटो स्रोत, facebook/jitesh sharma
फलंदाजीबरोबर यष्टीरक्षणात चुणूक दाखवणारा जितेश विदर्भ संघाचा यष्टींपाठी कणा होऊ पाहतोय.
युवा ऊर्जा
कूचबिहार करंडक आणि 19 वर्षांखालील स्पर्धा गाजवणाऱ्या अक्षय वाडकर, सिद्धेश वाठ, शुभम कापसे या युवा खेळाडूंनी विदर्भ संघात स्थान मिळवलं आहे.
प्रशिक्षक चंद्रकांत पंडित
पाच कसोटी सामने आणि 36 एकदिवसीय सामन्यांचा अनुभव असलेले चंद्रकांत पंडित स्थानिक क्रिकेटमधले द्रोणाचार्य म्हणून ओळखले जातात.
मुंबई संघाने पंडित यांच्या मार्गदर्शनाखालीच 2002-03 आणि 2003-04 तसंच 2014-15 मध्ये रणजी करंडकाचं जेतेपद पटकावलं. याव्यतिरिक्त राजस्थान आणि केरळ संघांच्या वरिष्ठ आणि कनिष्ठ संघांच्या क्रिकेट डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे हेड म्हणूनही काम पाहिलं. यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेत विदर्भाच्या वाटचालीचं श्रेय प्रशिक्षक पंडित यांना जातं.
रणजी करंडक
स्थानिक क्रिकेटमधली 'रणजी करंडक' स्पर्धा सगळ्यात जुनी आणि प्रतिष्ठेची स्पर्धा. 1934 पासून सुरू झालेल्या या स्पर्धेचं नामकरण ज्येष्ठ क्रिकेटपटू रणजीतसिंहजी यांच्या नावाने ओळखली जाते.
एलिट आणि प्लेट
सुरुवातीला उत्तर, पश्चिम, पूर्व, दक्षिण आणि मध्य अशा विभागातील संघांमध्ये होत असे. 2002-03 मध्ये क्षेत्रीय संरचना बदलून एलिट आणि प्लेट अशा दोन गटांत संघांची विभागणी करण्यात आली.
2012-13 पासून पंधराचे अठरा संघ झाले आणि त्यांची तीन गटांत विभागणी करण्यात आली. होम आणि अवे अशा पद्धतीने सामने होतात. स्पष्ट निकाल न लागल्यास पहिल्या डावात आघाडी मिळवणारा संघ विजयी ठरतो.
मुंबई, महाराष्ट्र आणि विदर्भ असे राज्याचे 3 संघ स्पर्धेत खेळतात. विदर्भाने पहिला सामना 1957-58च्या हंगामात खेळला होता. मुंबईने सर्वाधिक 41 वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे.
अनेक वर्षं 'प्लेट' अर्थात खालच्या गटात खेळणाऱ्या विदर्भाने यंदा पहिल्यांदाच स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.
विदर्भाची यंदाच्या हंगामातली वाटचाल
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








