उत्तर कोरियाशी बिनशर्त चर्चेसाठी तयार - अमेरिका

आण्विक शस्त्रकपातीच्या मुद्यावर उत्तर कोरियाशी विनाअट चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन यांनी सांगितलं आहे.

आण्विक अस्त्रांच्या मुद्यावरून गेल्या वर्षभरात अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातला तणाव वाढत चालला होता. मात्र सातत्यानं क्षेपणास्त्रांची चाचणी करणाऱ्या उत्तर कोरियाचा नायनाट करू अशी दर्पोक्ती अमेरिकेनं अनेकदा केली होती.

उत्तर कोरियाचं या मुद्यावर नेमकं काय म्हणणं हे समजून घेण्याची आवश्यकता आहे असं टिलरसन वॉशिंग्टनमध्ये आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलत होते.

कोणत्याही चर्चेआधी उत्तर कोरियानं आण्विक अस्त्रांचं नि:शस्त्रीकरण करणं आवश्यक आहे अशी भूमिका अमेरिकेनं अनेकदा घेतली होती. टिलरसन यांच्या वक्तव्यामुळे अमेरिकेनं एक पाऊल मागे घेतल्याचं स्पष्ट झालं आहे.

उत्तर कोरियाकडून सातत्यानं होणाऱ्या क्षेपणास्त्र चाचण्यांमुळे अमेरिकेनं त्यांच्यावर कडक निर्बंध लागू केले होते.

दरम्यान चर्चेसाठी तयारी असली तरी उत्तर कोरियावरचे आर्थिक आणि राजकीय निर्बंध कायम राहतील असं टिलरसन यांनी स्पष्ट केलं.

क्षेपणास्त्रांच्या चाचण्यांमुळे अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातले संबंध दुरावले आहेत. अमेरिकिचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि उत्तर कोरियाचे प्रमुख किम-जोंग-ऊन यांनी एकमेकांविरुद्ध तोंडसुख घेतलं होतं.

मात्र याप्रश्नी आडमुठ्या भूमिकेपेक्षा चर्चेचा मार्ग उपयुक्त ठरू शकतो असं टिलरसन यांनी सांगितलं. समोरासमोर बसून याविषयावर चर्चा होऊ शकते.

आण्विक अस्त्रांच्या मुद्यावर त्यांची भूमिका समजून घेता येऊ शकते. गोलमेज परिषदेद्वारे या प्रश्नावर तोडगा निघू शकतो. चर्चेनंतर नि:शस्त्रीकरणासंदर्भात आराखडा तयार होऊ शकतो असं त्यांनी पुढे सांगितलं.

आण्विक अस्त्रांच्या मुद्यावरून संघर्ष उद्भभवल्यास उत्तर कोरियातून बाहेर पडणाऱ्या निर्वासितांचा विचार करून चीननं आपात्कालीन धोरण आखलं असल्याचंही टिलरसन यांनी स्पष्ट केलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)