You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जर्नेलसिंग भिंद्रनवाले पंजाबमध्ये सुरू झालेल्या कट्टरतावादाचं मूळ होते?
- Author, जगतार सिंह
- Role, ज्येष्ठ पत्रकार
शीख समुदायातील तरुणांचा सैन्याप्रति असलेला ओढा त्यांच्या नावातही दिसतो. जसं की सैन्यात जनरल हा शब्द आर्मी जनरल पदाशी संबंधित असते, कर्नल हे एक पद असतं. अगदी तसंच शीख लोकांमध्ये काही लोकांची नावं जर्नेल सिंग, कर्नेल सिंग आणि मेजर सिंग अशी असतात.
एक काळ असा होता की, ब्रिटिश-भारतीय सैन्यात भरती करायची असेल तर पंजाबचा पट्टा सर्वात महत्वपूर्ण मानला जायचा.
1980 च्या दशकात ज्याने शीख कट्टरतावादाचा पुरस्कार केला त्याचं नाव जर्नेल सिंग. हे नाव त्याला त्याच्या आईवडिलांनी दिलं.
या जर्नेल सिंग नावासोबत भिंद्रनवाले जोडलं गेलं दमदमी टकसालच्या अध्यक्षपदी निवडून आल्यावर. दमदमी टकसाल ही संस्था शीख धर्म आणि ग्रंथाची शिकवण देते.
भगतसिंग आणि भिंद्रनवाले
ग्रामीण भागातून आलेल्या या तरुणाला औपचारिक असं शिक्षण मिळालं नव्हतं.
भिंद्रनवालेचा उदय अगदी रहस्यमय पद्धतीने झाला. पंजाबला 'स्वतंत्र' करण्यासाठी जी भीषण लढाई लढली गेली त्याबाबत तो खूप काही सांगून जातो. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर शीख समुदायाचा दुवा म्हणूनही या आंदोलनाकडे पाहिलं जातं.
हे युद्ध जिंकण्यासाठी जे सामर्थ्य हवं होतं ते काही भारत सरकार समोर टिकलं नाही. मात्र भिंद्रनवालेचं व्यक्तिमत्व आणि विचार आजही जिवंत आहेत.
मागच्या काही वर्षांत या भागात भगतसिंह आणि संत भिंद्रनवाले यांच्या सर्वाधिक फोटोकॉपी विकल्या गेल्यात.
भिंद्रनवालेची संघटना
भगतसिंह आणि भिंद्रनवाले या दोघांची तुलना करणं शक्यच नाही.
शहीद भगतसिंग यांची ओळख त्यांच्या विचारात दिसून येते. तेच भिंद्रनवाले मात्र 'गन कल्चर' किंवा बंदूक संस्कृतीशी संबंधित असल्याचं दिसतं.
याशिवाय या दोघांमध्ये आणखी एक मोठा फरक आहे.
दक्षिण आशियाचा विचार करता शहीद भगतसिंग यांच्याविषयी सर्वांमध्ये आदरभावना दिसून येते. मात्र तेच भिंद्रनवालेंची ओळख एका विशिष्ट समुदायाचा नेता अशी आहे.
दमदमी टकसालचे अध्यक्षपद
त्यामुळे त्यांच्यावर जेवढे लोक प्रेम करतात अगदी तेवढेचं किंवा त्याही पेक्षा जास्त लोक त्यांचा तिरस्कार करतात.
एखादया व्यक्तीला हिरो अथवा अतिरेकी ठरवणं ही गोष्ट सापेक्ष पद्धतीची आहे.
वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी दमदमी टकसालचे अध्यक्षपद भूषवणारे भिंद्रनवाले यांच्याविषयी असा विचार करावा लागेल अशी कल्पनाही कोणी केली नसेल.
पुढचे काही महिने नव्या गृहीतकांना हवा देण्यात आली. त्यानंतर या सीमांत प्रांतात अनपेक्षितरित्या उलथापालथ झाली.
ही उलथापालथ जवळपास एका दशकाहून अधिक काळ सुरू होती. या काळात हजारो निष्पाप लोक मारली गेली.
आता यात विशेष गोष्ट म्हणजे भारतात पुन्हा एकदा कट्टरतावाद फोफावतो आहे. मात्र कट्टरतावादाच्या नादात पंजाबमध्ये काय घडलं हे आपण जवळपास विसरूनच गेलोय.
निरंकाऱ्यांशी संघर्ष
अशा स्थितीत पंजाब मधील कट्टरतावादाचं मूळ समजल्या जाणाऱ्या भिंद्रनवाले यांच्या भूमिकेचं योग्य विश्लेषण करण्याची गरज आहे.
1977 मध्ये भिंद्रनवाले यांची दमदमी टकसालचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, शिखांची सर्वात मोठी धार्मिक संस्था शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष गुरचरण सिंग तोहरा आले होते.
भिंद्रनवाले यांची नियुक्ती झाल्यावर तिथली राजकीय समीकरण बदलू लागली.
भिंद्रनवाले यांनी दमदमी टकसालचं अध्यक्षपद जसं स्वीकारलं तसं निरंकाऱ्यांशी त्यांचा थेट सामना झाला.
हे आंदोलक दमदमी टकसाल आणि अखंड कीर्तनी जथ्याशी संबंधित होते.
1978 च्या त्या रक्तरंजित बैसाखीच्या घटनेनंतर पंजाब बदलला तो कायमचा. पूर्वी सारखं तिथं काही राहिलंच नाही.
पारंपारिक अकाली नेतृत्व
पुढच्या काही दिवसांतच भिंद्रनवाले यांनी नवा मार्ग पत्करला होता. पंजाबमधील न्यायव्यवस्था कोलमडली आहे, लोकांमध्ये सूडाची भावना निर्माण झाली आहे हे या घटनेतून आता स्पष्टच दिसायला लागलं होतं.
पत्रकार असल्याने त्यांच्याशी बऱ्याचदा औपचारिक आणि अनौपचारिक बोलणं व्हायचं. तेव्हा ते म्हणायचे की, ते त्यांच्या पंथासाठी सर्वोच्च बलिदान म्हणजेच जीव सुद्धा द्यायला तयार होते.
याचा परिणाम ते पारंपारिक अकाली नेतृत्वापासून पूर्णपणे वेगळे झाले.
त्यानंतर परिस्थिती इतकी चिघळली की या संघर्षाचं रूपांतर भारताविरुद्धच्या संघर्षात झालं. मात्र ऑपरेशन ब्लू स्टारपूर्वी या संघर्षाचा हेतू स्पष्ट नव्हता.
पण हे सुद्धा तितकंच स्पष्ट आहे की, जर्नेल सिंग यांनी कधीही वेगळ्या खलिस्तानची मागणी केली नव्हती.
1973 मध्ये अकाली दलाने आनंदपूर साहिब ठराव पास केला होता. आणि जर्नेल सिंग या ठरावाबद्दल बोलले, हे खरं होतं. पण हा ठराव स्वतंत्र राष्ट्राचा नसून स्वायत्ततेचा होता.
सुवर्ण मंदिर परिसरात
निरंकारी पंथाचे अध्यक्ष गुरबचन सिंग आणि नंतर हिंद समाचार-पंजाब केसरी वृत्तपत्र समूहाचे संपादक लाला जगत नारायण यांची हत्या झाल्यानंतर भिंद्रनवालेचं प्रस्थ आणखीनच वाढलं. लाला जगत नारायण यांनी निरंकारी पंथाला आपलं समर्थन दिलं होतं.
त्यानंतर भिंद्रनवाले दमदमी टकसालमधून सुवर्ण मंदिरात जसे पोहोचले तशी त्यांच्या आजूबाजूला लोकांची गर्दी वाढू लागली.
यानंतर सुवर्ण मंदिर सुटलं ते भिंद्रनवालेचा शेवट झाल्यावरचं. तोपर्यंत तरी त्यांनी तिथून मुक्काम हलवला नव्हता.
भिंद्रनवालेला मानणारा एक मोठा गट होता. यात शीख समुदायातील उच्च पदस्थ आणि विविध क्षेत्रात कार्य करणारे लोक होते. जसं की, लष्करातून निवृत्त झालेले जनरल, नोकरशहा, शिक्षणतज्ञ आणि सामान्य लोक यांच्यावर भिंद्रनवालेचा पगडा होता.
शीख समुदायाशी ते थेट संवाद साधायचे, सोबतच त्यांनी मिळवलेली विश्वासार्हता...या दोन्ही गोष्टींमुळे त्यांचा करिष्मा वाढला होता. पण दुसरीकडे शिरोमणी अकाली दलाने हीच विश्वासार्हता गमवायला सुरुवात केली होती.
ऑपरेशनच्या वेळी अकाल तख्त
अत्यंत काटकसरीचं आयुष्य जगणारे भिंद्रनवाले द्वैत गोष्टींवर विश्वास ठेवायचे नाहीत. जेव्हा ऑपरेशन ब्लू स्टार सुरू झालं तेव्हा ते अकाल तख्त येथून पळून जाऊ शकले असते पण त्यांनी तसं न करता दुसरा मार्ग निवडला.
यामुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व आणखीनचं शक्तिशाली बनलं.
26 मे 1984 रोजी लेखकाने त्यांची भेट घेतली. आणि याच दरम्यान ऑपरेशन सुरू करण्यासाठी लष्कराला ग्रीन सिग्नल मिळाला होता.
तासाभरापेक्षा जास्त वेळ ते आमने सामने होते. त्यांच्यात बैठक झाली, पुढं काय होणार याची जाणीवही सर्वांना झाली होती.
या मुद्द्यावर एखादा मध्यममार्गी तोडगा निघावा म्हणून ते विरोधात नव्हते. बाजूच्या खोलीत त्यांचे सहकारी बंदुका साफ करत बसले होते.
पैसा आणि सत्ता या दोन्ही गोष्टी त्यांना भ्रष्ट बनवू शकल्या नाहीत. हीच गोष्ट एसजीपीसी अध्यक्ष गुरुचरण सिंह तोहरा यांच्याबाबतही म्हणता येईल. काही गोष्टी मान्य नसताना देखील त्यांनी भिंद्रनवाले यांना अनेक कठीण प्रसंगात नैतिक पाठिंबा दिला.
'शहादत की तलाश में...'
भिंद्रनवाले यांना शीख समाजात, विशेषतः ग्रामीण भागात मोठी मान्यता मिळाली होती.
त्यांच्या बद्दलच्या गोष्टी आणि मिथकं सांगायची सुरुवात झाली 1981 मध्ये. त्यांनी मुंबई पोलिसांना चकवा देऊन अमृतसरमधील मेहता चौकातील मुख्यालय गाठलं असल्याच्या चर्चा तेव्हा जोरावर होत्या.
ऑपरेशन ब्ल्यू स्टार नंतरची दोन दशकं भिंद्रनवाले जिवंत होते असा प्रचार दमदमी टकसालने केला होता. आणि याला आधार ही मिथक होती.
1981 मध्ये लेखकाने भिंद्रनवालेची जी मुलाखत घेतली होती, ती एका भारतीय इंग्रजी वृत्तपत्रात छापून आली होती. त्याचं हेडिंग होतं 'शहादत की तलाश में...'.
शीख समुदायात सक्रिय होऊन मुख्य पटलावर येण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती.
त्यांनी जो मार्ग निवडला होता तो त्यांच्या शेवटाचं कारण ठरला. पण कदाचित ते याच मार्गाच्या शोधात होते.
(जगतार सिंग हे एक वरीष्ठ पत्रकार आहेत. त्यांनी पंजाब मध्ये राहून इंडियन एक्सप्रेससाठी जवळपास 25 वर्ष रिपोर्टिंग केलं आहे.
जगतार सिंग यांनी केलेलं हे विश्लेषण याआधी म्हणजेच 6 जून 2009 साली बीबीसी हिंदी डॉटकॉमवर प्रकाशित करण्यात आलं होतं.)
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)