ऑपरेशन ब्लू स्टार : अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात शिरले होते भारतीय सैन्याचे रणगाडे...

    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी

पंजाब जेव्हा फाळणीच्या उंबरठ्यावर होता तेव्हाच्या या सगळ्या घडामोडी आहेत. 31 मे 1984चा दिवस होता. मेरठमधील नाईन इन्फंट्री डिव्हिजनचे कमांडर मेजर जनरल कुलदीप बुलबुल ब्रार आपल्या पत्नीबरोबर दिल्लीला जाण्याच्या तयारीत होते. दुसऱ्या दिवशी ते मनीलाला फिरायला जाणार होते.

गुरुद्वारामध्ये पंजाबला भारतापासून वेगळं करून एक वेगळा प्रदेश करण्यासाठी भाषणं दिली जात होती. भारताबरोबर सशस्त्र संघर्ष करायला तयार रहा, असंसुद्धा सांगितलं जात होतं. पंजाबमध्ये सुरू असलेल्या घडामोडींमुळे दिल्लीत बसलेल्या अधिकाऱ्यांची चिंता वाढत होती.

अशातच सत्तेच्या सर्वोच्च स्थानावरून एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला - ऑपरेशन ब्लू स्टारचा निर्णय. आणि या ऑपरेशनची जबाबदारी मेजर जनरल ब्रार यांना देण्यात आली.

सुवर्णमंदिरावर भिंद्रनवालेंचा ताबा

मेजर जनरल कुलदीप ब्रार सांगतात - "संध्याकाळी मला एक फोन आला की दुसऱ्या दिवशी एक तारखेला सकाळी मला चंडी मंदीरात एका मिटिंग साठी जायचं आहे.

1 तारखेला आम्हाला खरंतर मनीलाला जायचं होतं. आमची तिकिटंसुद्धा बुक झाली होती. आम्ही आमचे ट्रॅव्हलर्स चेक घेतले होते आणि आम्हाला दिललीहून आमची फ्लाईट होती.

"मला कळलं की सुवर्णमंदिरात भिंद्रनवालेने संपूर्णपणे कब्जा केला आहे आमि पंजाबमध्ये कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. मला सांगितलं गेलं की ही परिस्थिती लवकरात लवकर सुधारायची आहे. असं केलं नाही तर पंजाब हातातून निघून जाईल."

"मी माझी सुट्टी रद्द केली आणि लगेच विमानाने अमृतसरला पोहोचलो," ब्रार यांनी सांगितलं.

भिंद्रनवालेंचे काँग्रेस कनेक्शन

भिंद्रनवालेंला काँग्रेसनेच वर आणलं होतं. त्यामागे काँग्रेसचा उद्देश असा की शीख लोकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अकालींविरुद्ध अशी एखादी तरी व्यक्ती असावी जी त्यांना मिळणाऱ्या पाठिंब्याला खीळ घालू शकेल.

भिंद्रनवाले वादग्रस्त मुद्द्यांवर भाषणं करत होते आणि हळूहळू त्यांनी केंद्र सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली होती. तसंच पंजाबात हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत होती.

1982 साली भिंद्रनवाले चौक गुरुद्वारा सोडून आधी सुवर्ण मंदिरमध्ये गुरू नानक निवास आणि त्याच्या काही महिन्यानंतर अकाल तख्त वरून त्यांनी आपले विचार व्यक्त करण्यास सुरुवात केली.

शेताच्या पलीकडे पाकिस्तान आहे

अनेक वर्षं बीबीसीबरोबर काम केलेले ज्येष्ठ पत्रकार सतीश जेकब यांनी अनेकदा भिंद्रनलवालेंची भेटही घेतली होती. ते सांगतात -

मी जेव्हाही तिथे जायचो तेव्हा भिंद्रनवालेंचे अंगरक्षक दुरूनच म्हणायचे, की 'आओजी आओजी बीबीजी आ गए.' त्यांनी कधीही बीबीसी असा उच्चार केला नाही. म्हणायचे तुम्ही आत या. संतजी तुमची वाट पाहत आहेत.

भिंद्रनवाले माझी अतिशय सहज भेट घ्यायचे. मला आठवतं मी जेव्हा मार्क टुलींची आणि त्यांची भेट घालून दिली तेव्हा त्यांनी त्यांचा धर्म विचारला!

टुलींनी 'ख्रिश्चन' असं उत्तर दिलं. त्यावर भिंद्रनवाले म्हणाले की 'मग तुम्ही येशू ख्रिस्ताला मानता का?'

हो.

तेव्हा भिंद्रनवाले म्हणाले,"येशु ख्रिस्त दाढी ठेवायचे. मग तुम्ही दाढी का ठेवत नाही?"

"असंच ठीक आहे," मार्क म्हणाले.

यावर भिंद्रनवाले म्हणाले की "विना दाढीचे तुम्ही मुलींसारखे दिसता". मार्क टुलींनी ही गोष्ट हसून टाळली.

भारत पाकिस्तान सीमा

भिंद्रनवालेंशी एकदा झालेल्या सविस्तर चर्चेविषयी जेकब सांगतात -

म्ही दोघंही सुवर्णमंदिराच्या छतावर बसलो होतो. तिथे कुणीही यायचं नाही. फक्त माकडं फिरत असायची.मी बोलता बोलता त्यांना विचारलं की जे काही तुम्ही करत आहात, त्यावर तुमच्याविरुद्ध काही कारवाई होईल, असं वाटत नाही का?

त्यावर ते विश्वासाने म्हणाले, "माझ्यावर काहीही कारवाई होणार नाही."

त्यांनी मला गच्चीवरून इशारा करून सांगितलं की "समोर शेत आहे. सात आठ किलोमीटर पुढे गेल्यावर भारत-पाकिस्तान सीमा आहे. आम्ही मागून निघाल्यावर सीमा ओलांडून निघून जाऊ आणि तिथून युद्ध करू."

मला असं वाटायचं की हा माणूस सगळं सांगतोय आणि माझ्यावर विश्वास ठेवतोय.हे कधीही छापू नका असंही त्यांनी मला कधीही सांगितलं नाही.

रांगत अकाल तख्त कडे जा

4 जून 1984 ला भिंद्रनवालेच्या लोकांची पोझिशन समजून घेण्यासाठी साध्या वेशात अधिकाऱ्यांना सुवर्ण मंदिरात पाठवलं. 5 जूनच्या सकाळी ब्रार यांनी ऑपरेशन मध्ये भाग घेण्यासाठी सैनिकांना ब्रीफिंग केलं.

बीबीसीशी बोलताना जनरल ब्रार सांगतात, "5 तारखेला सकाळी साडेचार वाजता मी बटालियनकडे गेलो आणि जवानांशी अर्धा तास चर्चा केली. मी त्यांना सांगितलं की सुवर्णमंदिराच्या आत जाताना आपल्याला हा विचार करायचा नाही की आपण एका पवित्र जागेवर जातोय. आपण ती जागा स्वच्छ करायला जातोय, असा विचार करा. जितकी जीवितहानी कमी होईल तितकं चांगलं."

"मी त्यांना हेसुद्धा सांगितलं की कोणाला आत यायचं नसेल तरी हरकत नाही. मी माझ्या कमांडिंग ऑफिसरला तसं सांगेन आणि तुमच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. असं म्हणत मी तीन बटालियन्स मध्ये गेलो. कोणीही उभं राहिलं नाही. चौथ्या बटालियनमध्ये एक शीख ऑफिसर उभा राहिला. मी म्हटलं की काही हरकत नाही. तुमच्या भावना इतक्या तीव्र आहेत तर आत जायची गरज नाही."

"तो अधिकारी म्हणाला की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी सेकंड लेफ्टनंट रैना आहे. मला आत जायचं आहे आणि मी सगळ्यांत पुढे जाऊ इच्छितो. इतकंच काय तख्तावर सगळ्यांत आधी जाऊन भिंद्रनवालेंना पकडून देण्याची माझी इच्छा आहे."

मला अंदाज नव्हता की त्या फुटीरवाद्यांकडे रॉकेट लाँचर होते, मेजर जनरल ब्रार सांगतात.

"मी त्यांच्या कमांडिंग ऑफिसरला सांगितलं की रैना यांची तुकडी सगळ्यांत आधी आत जाईल. ते आत गेलेही, पण फुटीरवाद्यांच्या मशीन गनच्या इतक्या गोळ्यांनी रैनांचे दोन्ही पाय तुटले, खूप रक्त वाहत होतं."

"त्यांचा कमांडिंग ऑफिसर मला सांगत होता की त्याने रैना यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते थांबतच नाहीये. ते अकाल तख्तकडे रांगत जात आहेत. मी आदेश दिला की त्यांना जबरदस्तीने उचलून अँबुलन्समध्ये उचलून न्यावं. त्यानंतर त्यांचे दोन्ही पाय कापावे लागले. त्यांच्या शौर्यासाठी मी रैनांना अशोकचक्र मिळवून दिलं," ब्रार सांगतात.

पॅराशूट रेजिमेंट

ऑपरेशनचं नेतृत्व करणारे जनरल सुंदरजी, जनरल दयाल, जनरल ब्रार यांची योजना होती की रात्रीच्या अंधारात ही मोहीम फत्ते करावी. दहा वाजताच्या आसपास समोरून हल्ला झाला.

काळा गणवेश घातलेल्या पहली बटालियन आणि पॅराशूट रेजिमेंटच्या कमांडोंना आदेश दिला की त्यांनी परिक्रमेकडे जावं, उजवीकडे वळावं आणि जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर अकाल तख्तकडे कूच करावी. पण जसं कमांडो पुढे सरकले तसं दोन्ही बाजूंनी ऑटोमॅटिक हत्यांरांनी जोरदार गोळीबार सुरू झाला. काही कमांडो या हल्ल्यातून बचावले.

त्यांची मदत करण्यासाठी आलेल्या लेफ्टनंट इसरार रहीम खान यांच्या नेतृत्वात दहाव्या बटालियनच्या गार्ड्सनी जिन्याच्या दोन्ही बाजूंनी मशीन गनचा मारा निष्क्रिय केला. पण सरोवरच्या दुसऱ्या बाजूने त्यांच्यावर जबरदस्त गोळीबार झाला.

कर्नल इसरार खाँ यांनी सरोवर भवनवर गोळी चालवण्यासाठी परवानगी मागितली, पण त्यांना परवानगी नाकारण्यात आली. सांगण्याचा अर्थ असा की लष्कराला ज्या विरोधाचा सामना करावा लागला त्याची त्यांना कल्पना नव्हती.

मजबूत तटबंदी

ब्रार सांगतात, "त्या लोकांचं प्लॅनिंग अतिशय जबरदस्त आहे, हे पहिल्या 45 मिनिटांतच आम्हाला कळलं. त्यांची तटबंदी अतिशय मजबूत होती, त्यामुळे ती ओलांडणं इतकं सोपं नाही हे आम्हाला आधीच कळलं होतं."

"सैनिकांनी तिथे स्टन ग्रेनेड फेकावे, असं मला वाटत होतं. स्टन ग्रेनेड मध्ये जो गॅस असतो त्याने लोक मरत नाही. त्याने फक्त डोकं दुखतं, डोळ्यात पाणी येतं आणि त्याला नीट दिसत नाही. त्याचदरम्यान आमचे जवान आत गेले. पण ग्रेनेड आता फेकण्याचा दुसरा कोणताच मार्ग नव्हता. प्रत्येक खिडकी आणि दरवाजावर सँड बॅग लागले होते. ग्रेनेड भिंतीवर आदळून परिक्रमेवर परत येत होते आणि आमच्याच जवानांवर त्याचा परिणाम होत होता."

फक्त उत्तर आणि पश्चिम भागात सैनिकांवर फायरिंग होत नव्हतं. उलट फुटीरवादी जमिनीच्या आतून मेन होलमध्ये निघून मशीन गनने गोळीबार करत आतल्या आत पळून जात होते.

जनरल शाहबेग सिंग यांनी त्यांच्या लोकांना गुडघ्याच्या आसपास गोळीबार करण्याचं ट्रेनिंग दिलं होतं, कारण त्यांना अंदाज होता की भारतीय सैनिक रांगत आपल्या लक्ष्याकडे जातील. इथे कमांडो रांगत काय अगदी चालत पुढे जात होते. म्हणूनच बहुतांश सैनिकांना पायावर गोळी लागली होती.

जेव्हा सैनिक पुढे जायचे थांबले तेव्हा जनरल ब्रार यांनी Armed Personnel Carrierचा (APC) वापर केला. पण जसं APC अकाल तख्तकडे जाऊ लागला, त्याला एका 'मेड इन चायना' रॉकेट लाँचरने उडवलं.

प्रखर उजेडाचा फायदा

जनरल ब्रार सांगतात की APCच्या आत बसलेल्या सैनिकांना संरक्षण मिळतं. "आमचा प्रयत्न होता की जवानांना अकाल तख्तच्या जवळ पोहोचवावं, पण त्यांच्याकडे रॉकेट लाँचर होतं हे आम्हाला माहिती नव्हतं. ज्या पद्धतीने चारी बाजूंनी येणाऱ्या गोळ्यांनी भारतीय सैनिकांचा पाडाव होत होता, माझ्यापुढे टँकची मागणी करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता."

मी जनरल ब्रार यांना विचारलं की टँकचा वापर करण्याची योजना आधीही होती की?

ब्रार उत्तरले, "बिल्कुल नाही. आम्ही टँक तेव्हाच बोलावले तेव्हा आम्हाला लक्षात आलं की आम्ही तख्तच्या जवळपाससुद्धा पोहोचू शकत नाही आहोत. आम्हाला भीती होती की सकाळ होताच हजारो लोक येतील आणि चहुबाजूंनी सैन्याला घेरतील."

"आम्हाला टँक वापरायचे होते कारण त्यांच्यावर लागलेले हॅलोजन बल्ब खूप प्रखर असतात. या प्रखर उजेडात त्यांचे डोळे दीपतील आणि तेवढ्यात आम्ही त्यांच्यावर हल्ला करू शकू."

"पण ते बल्ब जास्तीत जास्त 20-30 किंवा 40 सेकंदांपर्यंत राहतात आणि मग फ्यूज होऊन जातात. बल्ब फ्यूज झाल्यावर आम्ही टँक परत घेऊन गेलो. मग दुसरा टँक आणला. पण जेव्हा कशातच यश येत नव्हतं आणि सकाळ होऊ लागली होती तेव्हा अकाल तख्तमधल्या लोकांनी हार मानली नाही, तेव्हा आदेश दिला गेला की टँकच्या सेकंडरी आर्मामेंटहून अकाल तख्तच्या वरच्या भागावर फायर करावं. त्यामुळे वरून पडणाऱ्या दगडांमुळे लोक घाबरतील आणि बाहेर येतील."

ऑपरेशनच्या या वळणावर अकाल तख्तला लक्ष्य करणं इतर कोणत्याही सैनिकी लक्ष्यासारखं मानलं गेलं. नंतर निवृत्त जनरल जगजीत सिंग अरोरा यांनी जेव्हा सुवर्ण मंदिराचा दौरा केला तेव्हा त्यांना कळलं की भारतीय सैन्याने अकाल तख्तवर 80 बाँबगोळ्यांचा वर्षाव केला होता.

मृत्यूला दुजोरा

जनरल शाहबेग सिंग आणि भिंद्रनवाले मारले गेले याचा अंदाज तुम्हाला कधी आला, मी जनरल ब्रार यांना विचारलं. ब्रार यांनी उत्तर दिलं, "अंदाजे तीस ते चाळीस लोकांनी बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. गोळीबार बंद झाला याचा अर्थ काहीतरी झालंय, असं आम्हाला वाटलं.मग आम्ही आमच्या जवानांना आत जाऊन शोध घेण्याचा आदेश दिला. तेव्हा आम्हाला ते दोघं मेल्याचं कळलं.

"पण दुसऱ्या दिवशी भिंद्रनवाले पाकिस्तानला निघून गेले, अशा बातम्या येण्यास सुरुवात झाली. पाकिस्तानी टीव्ही भिंद्रनवाले पाकिस्तानात आहेत, अशा आशयाच्या घोषणा करू लागले. त्यांना 30 जूनला टीव्हीवर दाखवलं जाणार अशाही घोषणा होत होत्या," ते सांगतात.

"मला सूचना आणि प्रसारण मंत्री एच. के. एल. भगत आणि परराष्ट्र सचिव रसगोत्रा यांचा फोन आला की 'तुम्ही म्हणताय की ते ठार झाले आणि पाकिस्तान सांगतंय की ते जिवंत आहेत?' मी त्यांना सांगितलं की ओळख पटवली आहे. भिंद्रनवालेंचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आला आहे. त्यांच्या अनुयायांनी अंतिम दर्शन घेतलं आहे. त्यांचा मृत्यू झाला आहे. आता पाकिस्तानला जे बोलायचं आहे ते बोलत बसतील."

या संपूर्ण ऑपरेशनमध्ये भारतीय लष्कराचे 83 सैनिक मारले गेले आणि 248 सैनिक जखमी झाले. याशिवाय 492 लोकांचा मृत्यू झाला आणि 1,592 लोकांना अटक झाली.

या घटनेमुळे संपूर्ण जगातील शीख धर्मियांच्या भावना दुखावल्या. हे ऑपरेशन म्हणजे भारतीय सैन्याचा विजय होता, पण राजकीयदृष्ट्या एक मोठा पराभव होता.

या ऑपरेशनची वेळ, तयारी, अंमलबजावणी याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि शेवटी इंदिरा गांधीना आपला जीव गमावून त्याची किंमत चुकवावी लागली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)