इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांचं नातं कसं होतं?

    • Author, बर्टिल फाल्क
    • Role, लेखक

इंदिरा आणि फिरोज यांच्या नात्यांची वीण उसवलेली होती. पण फिरोज यांच्या मृत्यूनंतर इंदिरा यांनी लिहीलेल्या एका पत्रात लिहिलं होतं की, जेव्हा जेव्हा त्यांना फिरोज यांची गरज भासली तेव्हा तेव्हा त्यांनी इंदिरांना कायमच साथ दिली होती.

इंदिरा यांनी त्यांच्या दोन मुलांना घेऊन लखनऊमधलं आपलं घर सोडलं आणि आपल्या वडिलांच्या आनंद भवन या घरात रहायला आल्या आणि हे सगळे ताणतणाव सुरू झाले.

बहुतेक हा योगायोग नव्हता. पण त्याचवर्षी म्हणजे 1955 साली फिरोज यांनी काँग्रेस पक्षातील भ्रष्टाचारविरोधात अभियान सुरू केलं होतं. महत्त्वाचं म्हणजे इंदिरा गांधीसुद्धा याचवर्षी काँग्रेस वर्किंग कमिटी आणि केंद्रीय निवडणूक समितीच्या सदस्य झाल्या होत्या.

त्याकाळी संसदेत फक्त काँग्रेसचं वर्चस्व होतं. विरोधी पक्ष छोटे आणि अतिशय दुर्बळ होते. म्हणून भारतीय लोकशाहीत एक प्रकारची पोकळी निर्माण झाली होती.

फिरोज हे सत्तारूढ पक्ष असलेल्या कुटुंबाच्या जवळचे होते. पण ते विरोधी पक्षाचे अनौपचारिक नेते आणि या देशाचे पहिले व्हिसलब्लोअर नेते झाले होते.

त्यांनी खूप दक्षता घेऊन भ्रष्ट लोकांचा पर्दाफाश केला होता. त्यामुळे अनेकांना तुरुंगात जावं लागलं होतं. विमा क्षेत्राचं राष्ट्रीयीकरण झालं आणि देशाच्या अर्थमंत्र्यांनासुद्धा राजीनामा द्यावा लागला होता.

जेव्हा फिरोज यांनी इंदिरांना फॅसिस्ट म्हटलं...

फिरोज यांचे सासरे जवाहरलाल नेहरू त्यांच्यावर फारसे खूश नव्हते. इंदिरा गांधी यांनी देखील संसदेत फिरोज यांच्या महत्त्वपूर्ण कामाची फारशी स्तुती केली नव्हती.

आपल्या पत्नीच्या मनमानी वृत्ती ओळखणारे फिरोज हे पहिले व्यक्ती होते.

1959 साली जेव्हा इंदिरा गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या तेव्हा केरळचं पहिलंवहिलं कम्युनिस्ट सरकार बरखास्त करून तिथं राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

आनंद भवनमध्ये जेवणाच्या टेबलवर फिरोज यांनी इंदिरा यांना 'फॅसिस्ट' म्हटलं. त्यावेळी तिथं नेहरूसुद्धा उपस्थित होते. त्यानंतर एका भाषणात त्यांनी आणीबाणीचेही संकेत सुद्धा देऊन टाकले होते.

फिरोज गांधी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. त्या काळात संसदेत काहीही बोलता यायचं. पण एखाद्या पत्रकारानं त्याविषयी काही लिहिलं तर त्याला त्याची शिक्षा मिळण्याची शक्यता असायची.

हे सगळं थांबवण्यासाठी फिरोज गांधी यांनी संसदेत एक खासगी विधेयक आणलं होतं. हे विधेयक आणल्यानंतर एक कायदा अस्तित्वात आला. या कायद्यालाच 'फिरोज गांधी प्रेस लॉ' या नावानं ओळखलं जातं. हा कायदा तयार होण्याची गाथा फारच रोचक आहे.

फिरोज गांधी यांच्या मृत्यूनंतर पंधरा वर्षांनी इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची घोषणा केली. आपल्याच नवऱ्याच्या नावावर बनवलेल्या कायद्याला त्यांनी यावेळी कचऱ्याची पेटी दाखवली होती.

त्यानंतर सत्तेवर आलेल्या जनता सरकारनं हा कायदा पुन्हा लागू केला. त्यामुळे संसदेतलं कामकाज आपण टीव्हीवर बघू शकतो. त्याबरोबरच फिरोज गांधी यांचे प्रयत्न अमर झाले.

राजकीय विचारसरणीत मतभेद

फिरोज आणि इंदिरा गांधी यांचे जवळजवळ सगळ्याच बाबतीत मतभेद होते. मुलांचं संगोपन कसं करावं याबाततीत दोघांची मतं फारच वेगळी होती. राजकारणाबद्दल त्यांचे विचार वेगळे होते.

इंदिराचे निकटवर्तीय असलेल्या मेरी शेलवनकर यांनी मला सांगितलं, "इंदिरा आणि मी प्रत्येक गोष्टीवर चर्चा करायचो. ही चर्चा मैत्रीपूर्ण असायची. मला वाटतं प्रत्येकाला आपलं मत सांगण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण त्या मदर इंडियासारख्या प्रतिमांवरून प्रेरित होत्या. त्यांना आपल्या हातात पूर्ण ताकद हवी होती. त्यांचा भारताच्या लोकशाही पद्धतीला विरोध होता. त्यांना असं वाटायचं की भारत संघराष्ट्र होण्यासाठी अजून पूर्णपणे विकसित नाही."

त्यांनी सांगितलं, "फिरोज यांचे विचार यापेक्षा वेगळे होते. 1950च्या दशकात मी नवी दिल्लीत फिरोज यांना तीन ते चार वेळाच भेटले होते. पण मी कधीच त्यांच्या फार जवळ जाऊ शकले नाही. कारण इंदिरा यांना ते नको होतं. पण इंदिरा यांच्याशी झालेल्या चर्चेअंती मला असा वाटलं होतं की फिरोज हे भारताच्या संघराष्ट्र पद्धतीचे समर्थक होते आणि कोणत्याही शक्तीच्या केंद्रीकरणाच्या विरोधात होते."

हे स्वाभाविक आहे की, फिरोज गांधींच्या लोकशाहीच्या वारशाला संपवण्यात इंदिरा गांधी यशस्वी ठरल्या.

दोघांनाही बागकामाची आवड

अहमदनगर फोर्ट जेलमध्ये बंद असलेल्या आपल्या वडिलांना लिहिलेल्या पत्रात इंदिरा यांनी फिरोज यांच्या बागकामाची स्तुती केली होती.

22 नोव्हेंबर 1943 रोजी आनंद भवन इथून लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी लिहीलं, "मी आताच बागेतून येते आहे. काही महिन्याआधी इथे फक्त गवत होतं. पण आता त्यांनी बागेतलं गवत कापलं आहे.

फुलझाडं छान ओळीत लावली आहेत जी अतिशय सुंदर दिसतं आहेत. हे सगळं फिरोजमुळे होतं आहे. त्यांनी जर बागेची जबाबदारी घेतली नसती मला माहिती नाही मी काय केलं असतं. मला एवढं माहिती आहे की मी काही करू शकले नसते."

फिरोज गांधी यांच्या नात्यातल्या निष्ठेबद्दल तेव्हा अनेक अफवा उडत होत्या. काही लोकांनी इंदिरा गांधी आणि त्यांच्या नात्याबद्दल चर्चा करायला सुरुवात केली होती. पण भारताच्या विकासासाठी फिरोज आणि इंदिरा यांची गरज लक्षात घेता या चर्चांना कुणी फारसं गांभीर्यानं घेतलं नाही.

ते एकमेकांत पूर्णपणे गुंतले होते एवढं मात्र नक्की होतं.

असं वाटतं की फिरोज यांनी केरळ प्रकरणात जी प्रतिक्रिया दिली होती ती इंदिरा यांच्यासाठी धोक्याचा इशारा होता. त्यांनी मुदतीपूर्वीच पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

फिरोज आणि इंदिरा आपल्या दोन मुलांसोबत एक एक महिन्याच्या सुट्टीसाठी काश्मीरला निघून गेले.

राजीव गांधी यांच्यामते या काळात त्यांच्या आईवडिलांमध्ये जे मतभेद होते ते पूर्णपणे संपले होते. त्यानंतर ह्दयविकाराच्या तीव्र धक्क्यानं फिरोज गांधीचं निधन झालं.

(बर्टिल फाल्क स्वीडनमध्ये राहतात. त्यांनी फिरोज गांधीवर एक पुस्तक लिहिलं आहे. फिरोज गांधींचं हे एकमेव चरित्र आहे)

हे तुम्ही वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotifyआणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)