You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शाबेग सिंह : चीन आणि पाकिस्तानविरुद्ध लढणाऱ्या भारतीय जनरलने भारताविरोधातच युद्ध पुकारलं
- Author, रेहान फजल
- Role, प्रतिनिधी, बीबीसी
ऑपरेशन ब्लू स्टार घडण्यापूर्वी अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात जर्नेल सिंह भिंद्रनवालेसोबत कायम लांब पांढरी दाढी आणि पगडी बांधलेला एक इसम दिसायचा.
दिसायला सडपातळ असली तरी चेहऱ्यावरून ही व्यक्ती कुशाग्र बुद्धिमत्ता असणारी वाटायची. आपण सुवर्ण मंदिरातले ग्रंथी (मंदिरातले पुजारी) असल्याचं भासवत असले तरी ते एक सैनिक होते. त्यांचं नाव होतं मेजर जनरल शाबेग सिंह. याच शाबेग सिंह यांनी सुवर्ण मंदिरात भारतीय सैन्याविरोधात व्यूहरचना आखली होती.
तब्बल तीन महिन्यानंतर भारतीय सैन्य सुवर्ण मंदिरात घुसलं. त्यावेळी याच मेजर जनरल शाबेग सिंह यांनी आपल्या 200 अनुयायांना सोबत घेत भारतीय जवानांचा सामना केला होता.
शाबेग सिंह यांना वाचनाची आवड होती. पंजाबी, फारसी, उर्दू, बांगला, गोरखाली, हिंदी आणि इंग्रजी अशा सात भाषा ते अस्खलीत बोलायचे.
मे. जन. शाबेग सिंह यांचं व्यक्तिमत्व कसं होतं?
सध्या पंजाबमधल्या भिवाडीमध्ये राहणारे त्यांचे पुत्र प्रबपाल सिंह यांना मी हाच प्रश्न विचारला.
यावर प्रबपाल सिंहांचं उत्तर होतं, "त्यांची उंची 5 फूट 8 इंज होती. ते उत्तम अॅथलिट होते. वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी 100 मीटर स्पर्धेत भारताच्या विक्रमाची बरोबरी केली होती. ते उत्तम घोडेस्वार होते आणि स्विमिंगही उत्तम करायचे. मात्र, त्यांची इच्छा सैन्यात जाण्याची होती."
प्रत्येक युद्धात भारताकडून लढले
आपल्या लष्करी कारकिर्दीत भारताने लढलेल्या प्रत्येक युद्धात ते भारताकडून लढले. दुसरं महायुद्ध असो, 1948 साली पाकिस्तानने केलेलं आक्रमण असो, 1962 सालचं भारत-चीन युद्ध असो किंवा 1965 आणि 1971 सालचं भारत-पाकिस्तान युद्ध.
प्रबपाल सिंह सांगतात, "1942 साली त्यांना किंग्ज कमिशन मिळालं होतं. त्यांनी ब्रिटीश सैन्यासोबत सिंगापूर आणि मलेशियाला स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं. 1948 साली ते काश्मिरात पाकिस्तानविरुद्ध लढले. तिथे ब्रिगेडिअर उस्मान यांचे ते स्टाफ ऑफिसर होते. युद्धात उस्मान ठार झाले त्यावेळी ते अवघ्या 60 फुटांच्या अंतरावर होते."
प्रबपाल सिंह सांगतात, "1962 च्या युद्धात ते तेजपूरमध्ये तैनात होते. जखमी जवानांनी त्यांनी खांद्यावर उचलून तेजपूर हॉस्पिटलला आणलं होतं."
"1965 च्या युद्धात त्यांनी हाजीपीरमध्ये नेतृत्व केलं होतं. लेफ्टनंट कर्नल पदावरून थेट ब्रिगेडिअर पदावर पदोन्नती मिळणारे ते एकमेव अधिकारी होते. 1969 साली त्यांची पोस्टिंग नागालँडला झाली. बांगलादेशचा संघर्ष सुरू झाला तेव्हा त्यांना हाजीपीवरूनच बोलावण्यात आलं होतं."
मे. जन. शाबेग नव्हे मिस्टर बेग
1971 साली बांगलादेश संघर्ष सुरू झाला. त्यावेळी भारतीय सैन्यप्रमुख सॅम मानेक शॉ यांनी शाबेग सिंह यांना दिल्लीला बोलावून घेतलं. तिथे त्यांच्यावर 'मुक्ती वाहिनी' उभारण्याची आणि प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
ही एक गुप्त मोहीम होती. आपण 'मुक्ती वाहिनी'ला प्रशिक्षण देतोय हे भारताला जगाला कळू द्यायचं नव्हतं. भारताने अजूनही 'मुक्ती वाहिनी'ला प्रशिक्षण दिल्याचं मान्य केलेलं नाही.
पूर्व कमांड प्रमुख जनरल जगजीत सिंह अरोरा यांच्या मते 'मुक्ती वाहिनी'ला प्रशिक्षण देण्यात शाबेग सिंह यांची मोठी भूमिका होती.
त्याकाळी ते परंपरवादी शीख नव्हते. कामाची गरज म्हणून त्यांनी स्वतःचे केसही कापले.
शाबेग सिंह यांचे पुत्र प्रबपाल सिंह सांगतात, "माझे वडील मुक्ती वाहिनीला प्रशिक्षण देत होते त्यावेळी ते कुठे आहेत, याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती. फोनवर बोलताना आम्ही त्यांना त्यांचा पत्ता विचारला. ते म्हणाले मिस्टर बेग, हबीब टेलरिंग हाऊस, आगरतळा.
बरेच दिवस वडील घरी आले नव्हते. पत्राला उत्तरही देत नव्हते. त्यामुळे काळजीत असलेल्या माझ्या आईने माझ्या मोठ्या भावाला सुट्टी घेऊन वडील कुठे आहेत, हे बघून यायला सांगितलं. तो तिथे गेला तेव्हा वडील म्हणाले, 'मी बरा आहे. मी एका अंडरग्राउंड ऑपरेशनवर आहे. मी आता ब्रिगेडिअर शाबेग नाही. आता माझं नाव मिस्टर बेग आहे."
मुक्ती वाहिनीचं ट्रेनिंग
ब्रिगेडिअर शाबेग सिंह यांची डेल्टा सेक्टरमध्ये मध्य आणि पूर्व बांगलादेशच्या भागात 'मुक्ती वाहिनी' प्रशिक्षणाच्या इंचार्जपदी नेमणूक करण्यात आली होती.
त्यांनी पाकिस्तानी सैन्याला सोडून आलेले झिया उर रहमान आणि मोहम्मद मुश्ताक यांना ट्रेन केलं होतं. पुढे हेच बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष आणि सैन्यप्रमुख बनले.
शाबेग यांच्या प्रयत्नांतूनच जानेवारी ते ऑक्टोबर 1971 या काळात बांगलादेशमध्ये छापामार आंदोलन एवढ्या मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आलं होतं की प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली त्यावेळी पाकिस्तानी सैन्याची इच्छाशक्ती जवळ-जवळ संपली होती.
प्रबपाल सिंह सांगतात, "माझ्या वडिलांनी मुक्ती वाहिनीला शस्त्र चालवण्याचं ट्रेनिंग दिलं. छापामार युद्धाचं तंत्र शिकवलं. चितगाव बंदरात त्यांनी एकाच वेळी पाच छोट्या युद्धनौका उद्ध्वस्त केल्या होत्या.
मुक्ती वाहिनीने पाकिस्तानी सैन्याधिकाऱ्यांवर पाळत ठेवून हल्ले सुरू केले. ते पाकिस्तानी सैन्य तुकडीवर हल्ला करायचे, पूल उडवायचे. यातून पाकिस्तानी सैन्याला धान्य सामुग्री मिळू नये, हा त्यांचा प्रयत्न असायचा. या सगळ्यांचं प्रशिक्षण ब्रिगेडिअर शाबेग सिंह यांनी दिलं होतं."
परम विशिष्ट सेवा सन्मान
बांगलादेश युद्धात त्यांनी दिलेल्या सेवेसाठी भारत सरकारने ब्रिगेडिअर शाबेग सिंह यांचा परम विशिष्ट सेवा सन्मान देऊन गौरव केला. त्यापूर्वी त्यांना अतिविशिष्ट सेवा सन्मान मिळाला होता.
राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या या विशेष पुरस्कार सोहळ्यासाठी स्वतः प्रबपाल वडिलांसोबत गेले होते.
प्रबपाल सांगतात, "त्यावेळी व्ही. व्ही. गिरी राष्ट्रपती होते. पुरस्कार सोहळ्यानंतर त्यांनी अशोक हॉटेलमध्ये एक पार्टी आयोजित केली होती. आम्ही उभे होतो. तेवढ्यात सॅम मानेक शॉ यांचा आवाज आला. ते म्हणाले, 'ओये शाबेग, तेरी सिंगनी कित्थे है? (तुमच्या पत्नी कुठे आहेत?)' सगळे माझ्या वडिलांकडे बघू लागले. माझे वडील म्हणाले, 'सर मी लगेच त्यांना घेऊन येतो.' मग सॅम माझ्या आईला भेटले. मीही त्यांना भेटलो. एका नेपाळी जवानाच्या पत्नीशी ते नेपाळीमध्ये बोलले. ते इतके चांगले होते की सर्वांमध्ये मिसळायचे."
10 लाख रुपयांचं बक्षीस
1971 च्या युद्धानंतर शाबेग सिंह यांना जबलपूरमध्ये पाकिस्तानी जवानांच्या युद्धबंदी कॅम्पची जबाबदारी देण्यात आली. त्याच कॅम्पमध्ये जनरल नियाजी आणि पाकिस्तानी सैन्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ठेवण्यात आलं होतं.
एकदा शाबेग सिंह युद्धबंदी कॅम्पला जात असताना त्यांचा मुलगा प्रबपाल यांनीही तिथे जाण्याची इच्छा व्यक्त केली.
प्रबपाल सांगतात, "मी तिथे पोहोचलो तेव्हा तिथे पाकिस्तानी सैन्यातले अनेक बडे अधिकारी बसले होते. एवढ्यात मेजर जनरल राव फरमान अली खोलीत आले. येताच त्यांनी माझ्या वडिलांना निरखून बघितलं. नियाजी हसून म्हणाले, 'या बहुरुप्याला ओळखलं नाहीत?' फरमान अली म्हणाले, 'नाही, पण यांना कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं.' माझ्या वडिलांनी पगडी काढली. फरमान अली म्हणाले, 'तू मिस्टर बेग आहेस.' माझ्या वडिलांनी पगडी घातली आणि म्हणाले, 'आय एम जनरल शाबेग सिंह.'"
प्रबपाल पुढे सांगत होते, "मग मी फरमान अली यांना माझ्या वडिलांशी तुम्ही असं का बोललात, असं विचारलं. ते म्हणाले, 'तुझ्या वडिलांवर 10 लाख रुपयांचं बक्षीस ठेवलं होतं. त्यांना जिवंत किंवा ठार पकडून देणाऱ्याला 10 लाख रुपये देण्यात येणार होते..'"
प्रबपाल सिंह सांगतात, "नियाजी ट्रेनने पाकिस्तानला निघाले त्यावेळी माझे वडील त्यांना स्टेशनवर सोडायला गेले. मीही त्यांच्यासोबत गेलो. मी नियाजींना एक पेढ्यांचा डबा दिला आणि सोबत के. एल. सहगल यांच्या 6 ऑडियो रेकॉर्ड्स दिल्या. ते गहिवरले होते."
शाबेग सिंह सस्पेंड झाले तेव्हा…
यानंतर त्यांची उत्तर प्रदेशातील बरेलीत पोस्टिंग झाली. तो मोठा भाग होता. त्यात दोन-तीन ट्रेनिंग सेंटर्स होते. तिथे एका ऑडिट रिपोर्टमध्ये आर्थिक अनियमितता आढळून आली. जनरल शाबेग सिंह यांनी या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न केला. पण, वरिष्ठाना ते रुचलं नाही.
परिणामी निवृत्तीच्या आदल्या दिवशी कुठलाही तपास, शहानिशा, कोर्ट मार्शल न करता त्यांना नोकरीवरून बडतर्फ करण्यात आलं.
त्यांचं निवृत्ती वेतन रोखण्यात आलं. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. जबलपूरहून बदली झाली त्यावेळी त्यांनी 2500 रुपयांचं एक चांदीचं ताट भेट म्हणून स्वीकारल्याचाही आरोप झाला. घर बांधण्यासाठी मिळकतीपेक्षा जास्त खर्च केल्याचाही आरोप करण्यात आला.
सतीश जेकब यांनी ऑपरेशन ब्लू स्टारवर 'Amritsar : Mrs Gandhi's Las Battle' हे पुस्तक लिहिलं आहे.
यात ते लिहितात, "सरकारच्या या कारवाईमुळे जनरल शाबेग सिंह खूप दुखावले गेले आणि ते सरकारविरोधी बनले. त्यांनी सरकारच्या या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिलं. न्यायालयाने त्यांच्याविरोधात करण्यात आलेले आरोप चुकीचे असल्याचं सांगितलं. मात्र, कोर्टाच्या निर्णयानंतरही सरकारविषयी त्यांच्या मनातला रोष कमी झाला नाही. याच काळात त्यांनी मनःशांतीसाठी धर्माचा आधार घेतला आणि तेव्हाच ते जनरल भिंद्रनवालेच्या प्रभावाखाली आले."
…आणि जनरल शाबेग सिंह सतीश जेकब यांना आरडले
सतीश जेकब आणखी एक किस्सा सांगतात, "मी भिंद्रनवालेंच्या अनेक मुलाखती घेतल्या होत्या. त्यामुळे मी त्यांना फार पूर्वीपासून ओळखायचो. सहसा ते खालीच बसायचे. मागे उशी असायची."
"एक दिवस मी त्यांच्याजवळ बसलो होतो. एका जागी बसून बसून माझ्या पायाला कळ लागली होती. पाय मोकळा करण्यासाठी मी पाय सरळ करताना भिंद्रनवालेंना पायाचा स्पर्श झाला. शेजारी बसलेले जनरल शाबेग सिंह यांनी रागाने माझ्याकडे बघितलं आणि दरडावत म्हणाले - सांभाळून, संत नाराज होतील."
"भिंद्रनवाले मला चांगलं ओळखायचे हे कदाचित शाबेग यांना माहिती नव्हतं. त्यांनी मला शाबेग यांच्याशी बोलताना बघितलं. त्यांनी विचारलं तुम्ही काय बोलत होतात? मी विषय टाळायचा प्रयत्न केला. पण, भिंद्रनवाले यांनी पुन्हा विचारलं. तेव्हा मी घडलेला किस्सा सांगितला आणि म्हणालो की त्यांनी मला तुमच्याशी अदबीने वागायची ताकीद दिली आहे. हे ऐकून भिंद्रनवाले यांनाही हसू आलं."
सुवर्ण मंदिरातील व्यूहरचना
भिंद्रनवाले यांच्या आदेशावरून शाबेग सिंह सुवर्ण मंदिरात रहायला गेले. भिंद्रनवाले यांनी त्यांच्यावर सुवर्ण मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवली.
तीन महिन्यांहून जास्त काळ तिथे राहून शाबेग सिंह यांनी भारतीय सैन्याला सुवर्ण मंदिरात पायही ठेवू दिला नाही.
प्रबपाल सिंह सांगतात, "लोक म्हणतात शाबेग सिंह गोरिल्ला युद्धनीतीचे हो ची मिन्ह आहेत. त्यांनी तळघर आणि मुख्य हॉलच्या खाली आपल्या शिपायांना तैनात करून भारतीय जवानांच्या तळपायांना लक्ष्य करण्यास सांगितलं. बहुतांश भारतीय जवानांच्या पायाला गोळ्या लागल्या. गोळ्या कुठून येत आहेत, हेच जवानांना कळत नव्हतं."
"भारतीय सैन्याने ऑपरेशन ब्लू स्टारसाठी आपले सर्वोत्तम कमांडो पाठवले होते. मात्र, शुभ्र पांढऱ्या संगमरवराच्या पार्श्वभूमीवर काळे कपडे घातलेले कमांडो. त्यामुळे अंधारात शीख फुटिरतावाद्यांनी त्यांना सहज लक्ष्य केलं."
पुढे भारताच्या लष्कर प्रमुखपदी विराजमान झालेले जनरल व्ही. के. सिंह यांनी "Courage And Conviction" या आपल्या आत्मचरित्रात "मेजर जनरल शाबेग सिंह यांच्या देखरेखीखाली सुवर्ण मंदिराच्या सुरक्षेची योजना आखण्यात आली होती. सर्व शस्त्र जमिनीपासून थोड्याच इंचाच्या उंचीवर ठेवण्यात आली", असं लिहून ठेवलं आहे.
"यामुळे झालं काय की भारतीय जवानांचे पाय तर जखमी झालेच शिवाय रांगत पुढे सरकण्याचा पर्यायही राहिला नाही. कारण रांगून पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता तर गोळ्या थेट त्यांच्या डोक्यात लागल्या असत्या."
"हल्ल्यापूर्वी जनरल ब्रार यांनी साध्या कपड्यांमध्ये सुवर्ण मंदिरात जाऊन पहाणी केली होती. दूर्बिणीने नजर ठेवून असलेल्या शाबेग सिंह यांनी त्यांना लगेच ओळखलं. पण, त्यांनी आपल्या साथीदारांना जनरल ब्रार यांच्या समोर न जाण्याचे आदेश दिले."
जनरल शाबेग सिंहांना न ओळखण्याची चूक
पुढे 4 जून 2014 साली वरिष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी "The Audacity of Incompetence" या शिर्षकाखाली द इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्रात लेख लिहिला.
यात ते लिहितात, "आपला सामना नवख्यांशी नाही तर अशांशी आहे ज्यांचं नेतृत्त्व त्यांच्याच सारखा एक माजी वरिष्ठ भारतीय अधिकारी करतोय आणि तो अधिकारी त्यांच्याहून उजवा नसला तरी त्यांच्या तोडीचा आहे, याकडे वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष झालं. या अधिकाऱ्याने भारतीय सैन्यात काम केलं आहे. इतकंच नाही तर त्याने मुक्ती वाहिनीला युद्धकलेचं प्रशिक्षणही दिलं आहे."
शेखर गुप्ता लिहितात, "सुवर्ण मंदिराच्या सुरक्षेसाठी खूप मोठी रणनीती आखण्यात आली नव्हती किंवा जुन्या काळातल्या छापामार तंत्राचाही वापर केला नव्हता. तर ते म्हणजे एका वास्तूचं बटालियन पातळीवरच्या जवानांनी सुनियोजितपणे केलेलं रक्षण होतं."
"त्यांनी फुटबॉल मैदानाच्या निम्म्याएवढे क्षेत्र पूर्णपणे व्यापलं होतं. तिथे भारतीय सैन्याला आपण वरचढ असल्याचं भासत होतं. शाबेग यांच्यासाठी हे म्हणजे आधीच तयार करण्यात आलेलं 'किलिंग ग्राउंड' होतं ज्याला सैनिकी भाषेत FIBUA (Fighting in Built Up Areas) म्हणतात."
"आपणच जिंकणार या भ्रमात शाबेग नव्हते. भारतीय सैन्यापुढे आपला निभाव लागणार नाही, याची त्यांना पूरेपूर कल्पना होती. पण, जास्तीत जास्त जवानांना जखमी करून अधिकाधिक वेळ काढून घ्यावा. जेणेकरून सकाळ उजाडेपर्यंत तिथे भाविकांची गर्दी होईल आणि त्यामुळे लष्करी कारवाई आपोआपच थांबवावी लागेल, अशी त्यांची योजना होती. भारतीय सैन्याने रणगाडे आत घुसवले नसते तर शाबेग सिंह यांची ही योजना बऱ्याच अंशी यशस्वी झाली असती."
जनरल शाबेग यांचा मृत्यू
जनरल कुलदीप ब्रारर आपल्या "Operation Blue Star : The True Story" या पुस्तकात लिहितात, "आम्हाला जनरल शाबेग सिंह यांचा मृतदेह तळघरात सापडला. मृत्यूनंतरही त्यांच्या हातात बंदूक होती. त्यांचा वॉकी टॉकी त्यांच्या मृतदेहाजवळच खाली पडला होता."
मात्र, शाबेग यांचे पुत्र प्रबपाल त्यांच्या मृत्यूविषयी वेगळी माहिती देतात.
ते म्हणतात, "ऑपरेशन ब्लू स्टारनंतर जोधपूरमध्ये रवानगी केलेल्या अनेकांना मी भेटलो. त्यांनी मला सांगितलं की जनरल शाबेग सिंह यांचा मृत्यू एक दिवस आधी म्हणजे 5 जून रोजीच झाला होता."
सरकारने 6 जून रोजी जनरल शाबेग सिंह ठार झाल्याची घोषणा केली. मात्र, त्यांचा मृत्यू 5 जूनलाच झाल्याचं प्रबपाल यांचं म्हणणं आहे.
ते सांगतात, "त्यांना मशीनगनच्या एका बर्स्टच्या सात गोळ्या लागल्या होत्या. भिंद्रनवाले यांनी त्यांचा मृतदेह जमिनीवर ठेवून बरदास (शेवटचे विधी) केली. त्यांनी बॉडी स्वच्छ केली. मग ते बॉडी तळघरात घेऊन गेले. जेव्हा आर्टिलरीचा गोळीबार झाला त्यावेळी पडणाऱ्या भिती आणि छतामध्ये त्यांचा मृतदेह पुरला गेला."
'Amritsar : Mrs Gandhis Last Battle' या आपल्या पुस्ताकत सतीश जेकब आणि मार्क टुली लिहितात, "9 जूनपर्यंत शाबेग सिंह यांच्या मृतदेहावर पोस्ट मॉर्टम झालं नव्हतं. मात्र, त्यानंतर त्यांची बॉडी खराब होऊ लागली होती. त्यामुळे पूर्ण पोस्ट मॉर्टम झालंच नाही."
सरकारचा शाबेग सिंह यांचा मृतदेह द्यायला नकार
शाबेग सिंह यांच्या कुटुंबाला त्यांच्या मृत्यूची माहिती कळताच त्यांच्या सुनेने लष्करप्रमुख जनरल वैद्य यांना कॉल केला आणि आम्हाला नुकतंच कळलंय की ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये माझ्या सासऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तेव्हा याबद्दल तुम्ही काही माहिती देऊ शकता का, अशी विचारणा केली.
प्रबपाल सिंह सांगतात, "यावर जनरल वैद्य यांनी आपल्याला कुठलीच माहिती नसल्याचं म्हटलं. इतकंच नाही तर ऑपरेशन ब्लू स्टार झालेलंच नाही आणि लष्कराने कुठलीही कारवाईसुद्धा केलेली नाही, असंही सांगितलं."
"मी तात्काळ चंदिगढला गेलो. तिथून मी राज्यपाल बी.डी. पांडे यांना कॉल केला आणि त्यांना म्हणालो, 'मला माझ्या वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करायचे आहेत.' मात्र, राज्यपाल पांडे म्हणाले की 'या कामात मी तुम्हाला कसलीच मदत करू शकत नाही. कारण मी तुम्हाला याची परवानगी दिली तर हजारो लोकांना द्यावी लागेल.'"
"तेव्हा मी त्यांना विचारलं की या ऑपरेशनमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला, हे तुम्ही मान्य करता का? यावर त्यांनी काहीही उत्तर न देता फोन ठेवून दिला. त्यानंतर ते माझ्याशी बोललेच नाहीत. मी तीन दिवस त्यांच्या गेटबाहेर उभा होतो. पण काहीही उपयोग झाला नाही."
"माझ्या वडिलांवर अंत्यसंस्कार केव्हा झाले, कसे झाले, मला काहीही माहिती नाही. त्यांनी आम्हाला माझ्या वडिलांची कुठलीही वस्तू दिली नाही की त्यांच्या अस्थीही दिल्या नाहीत."
1984 सालच्या जुलै महिन्यात केंद्र सरकारने एक श्वेतपत्र काढून सांगितलं, "ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये भारतीय सैन्यातले 83 जवान शहीद झाले आणि यात 4 अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचं सांगितलं. तसंच 273 जवान आणि 12 अधिकारी जखमी झाले."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)