मी मूर्ख आहे का? डॉक्टर आहे, पीएचडी होल्डर आहे - तानाजी सावंत

फोटो स्रोत, Facebook
विविध वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर आज प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. मी मूर्ख आहे का? डॉक्टर आहे, पीएचडी होल्डर आहे - तानाजी सावंत
"मी मूर्ख आहे का? मी डॉक्टर आहे, पीएचडी होल्डर आहे तसंच रँकर आहे. मीडिया मुद्दाम मला टार्गेट करून दाखवत आहे. जनतेची दिशाभूल केली जात आहे," असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे.
पुण्यातील ससून रुग्णालयात घडलेला प्रसंग एका वर्तमानपत्रात छापून आल्यानंतर त्याची राज्यभर चर्चा सुरु आहे.
याबद्दल छापून आलेली बातमी सोशल मीडियावर चांगली व्हायरल झाल्याने सावंत यांच्यावरती टीका सुरू झाली. या सर्व प्रकरणावर आरोग्य मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
'आरोग्यमंत्र्यांनी ससून रुग्णालयात हाफकिन माणसाकडून औषधं घ्यायचा बंद करा, असा आदेश दिला. त्यावेळी त्यांच्या पीएकडून त्यांना हाफकिन ही संस्था असल्याचं सांगितलं गेलं. त्यानंतर मंत्री तिथून निघाले,' असं एक वृत्त सर्वत्र व्हायरल होत आहे.
"हापकिन कोण आहेत हे मला माहिती नसल्याचं मीडियानं दाखवलं. मी ग्रामीण भागातील आहे. मी जर एखादी गोष्ट ग्रामीण भागातील म्हणालो, तर मीडिया माझ्या मागे फिरणार नाही," असंही सावंत यांनी म्हटलंय.
तानाजी सावंत यांनी म्हटलं की, "हे जनतेच्या मनातले सरकार आणले आहे. हे टाकाऊ सरकार नाही. मीडियाने टीका करायची आणि आम्ही ऐकायचं असं होणार नाही. यापुढे आमच्या कामातून सडेतोड उत्तरं मिळतील."
राज्यभरात वैद्यकिय क्षेत्रात असलेले अनेक प्रलंबित प्रश्न एका महिन्यांच्या आत मार्गी लावणार असल्याचं आश्वासन सावंत यांनी दिलं असल्याचं टीव्ही 9 मराठीने आपल्या बातमीत म्हटलं आहे.
2. ज्यांच्यासोबत निवडणुका लढवल्या, त्यांच्यासोबतच युती केली- एकनाथ शिंदे
"आम्ही चुकीचं काम केलं नाही. ज्या पक्षासोबत निवडणूक लढवली, त्यांच्यासोबतच आम्ही युती केली आहे. 2019 मध्ये ज्या निवडणुका झाल्या, त्यात बाळासाहेब आणि मोदी यांचे फोटो लावून आम्ही मतदारांसमोर गेलो. जनतेचा देखील हाच कौल होता की, शिवसेना-भाजप युतीच सरकार आलं पाहिजे. मात्र समीकरण बदललं, दुसरं सरकार आलं. ते आम्ही दुरुस्त केलं," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
त्यांनी असंही म्हटलं होतं की, आज जनता खुश आहे. जे 2019 मध्ये व्हायला हवं होतं, ते आम्ही आता केलं. 2019 मध्ये जे झालं ते कोणालाच आवडलं नाही.

फोटो स्रोत, ANI
शिंदे यांनी म्हटलं, "मतदारांनी युतीला कौल दिला होता. आता हे झाल्यानंतर मला खूप लोकांनी फोन करत अभिनंदन केलं. अनेक लोकांनी मला म्हटलं, की आम्ही युतीला मतदान केलं होतं. जनतेने युतीच्या बाजूने कौल दिला होता. त्यामुळे असे नवीन प्रयोग करताना आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं. आमची मतं घेऊन आमच्याशी विश्वासघात झाला होता. त्यामुळे आज आम्ही खूप खूश आहोत, असं मला अनेक लोकांनी म्हटलं."
"मी कुठल्याही फळाची अपेक्षा न करता फक्त मेहनत करत राहिलो. मी कधीही मुख्यमंत्री व्हावं, म्हणून हे काम केलं नाही," असंही त्यांनी म्हटलं.
3. 'हे खोके सरकार महाराष्ट्राच्या भल्याचं आहे का, याचा विचार जनतेनं करावा'
महाविकास आघाडी सरकारनं दिलेली विधानपरिषदेच्या 12 जागांच्या यादीवर राजकीय राज्यपालांनी कसलाही निर्णय घेतला नव्हता. आता नव्या यादीवर राजकीय राज्यपाल किती तत्परतेनं उत्तर देतात हे येणाऱ्या काळात समजेलच, असं शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं राज्यपालांना दिलेली विधानपरिषदेच्या 12 सदस्यांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या शिफारसीवरुन रद्द केली होती.

फोटो स्रोत, Facebook
आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील गणपती मंडळांना भेट दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना त्यांनी विधान परिषद सदस्यांच्या यादीसह अमित शाह यांचा मुंबई दौरा, शिंदे सरकारमधील मंत्र्यांचा कारभार यावरही भाष्य केलं.
"आरोग्यमंत्र्यांनी जाऊन 'हाफकिन' नावाचा माणूस म्हटलं. त्यांना 'हापकिन' पण दलाल वाटला. हाफकिन ही शासनाची संस्था आहे हे देखील त्यांना माहिती नव्हतं. ती खूप मोठी संस्था आहे हे त्यांना माहिती नाही. दुसऱ्या मंत्र्यांनी महत्त्वाच्या खात्याचा पदभार देखील घेतलेला नाही. हे खोके सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या भल्याचं आहे का याचा विचार जनतेनं करण्याची गरज आहे," असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.
महाराष्ट्र टाइम्सनं हे वृत्त दिलं आहे.
4. शेतकऱ्यांना कर्जमाफी, पाचशे रुपयांत गॅस सिलिंडर- राहुल गांधींचं आश्वासन
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी, पाचशे रुपयांना गॅस सिलिंडर देण्याचं आश्वासन गुजरातच्या जनतेला दिलं आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी (5 सप्टेंबर) अहमदाबादमध्ये सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी, गॅस सिलेंडर 500 रुपयांना देणार असल्याच्या घोषणा केल्या. आमचं सरकार आल्यास शेतकऱ्यांना 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्यात येईल, अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली.

फोटो स्रोत, FACEBOOK/INC
गुजरातमध्ये या वर्षा अखेरीस विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. राहुल गांधींनी गुजरातमध्ये 10 लाख नोकऱ्या आणि 3 हजार नव्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांची उभारणी करण्याची घोषणा केली. मुलींना मोफत शिक्षण देणार असल्याचंही राहुल गांधींनी म्हटलं.
राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल करताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला. भाजप देशातील बड्या उद्योजकांचं कर्ज माफ करतं, मात्र शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलेलं तुम्ही ऐकलंय का, असा सवाल राहुल गांधी यांनी केला.
टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.
5. 2017 मध्ये एनडीएसोबत जाण्याचा निर्णय मूर्खपणाचा- नितीश कुमार
'2017 साली एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तो मूर्खपणाचा होता. भविष्यात भाजपाशी कोणतीही युती करणार नाही,' असं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.
जनता दलच्या (युनायटेड) राष्ट्रीय परिषदेत नितीश कुमार बोलत होते. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
"भाजपाच्या नेत्यांनी माझं ऐकलं नाही. मात्र, नाईलाजास्तव आम्हाला एनडीएसोबत रहावं लागलं. एनडीएच्या आघाडीत असून सुद्धा जेडीयूला डावलण्यासाठी भाजपाने उपाययोजना केल्या होत्या. पण, आता विरोधी पक्षाने त्यांच्यातील मतभेद बाजूला ठेऊन एकत्र आलं पाहिजे," असं आवाहन नितीश कुमार यांनी केलं आहे.
"पूर्वेकडील राज्यांनी विशेष दर्जा देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली पाहिजे. जेडीयू कित्येक वर्षं एनडीएसमवेत होता. मात्र, तरीही केंद्र सरकारने बिहारला विशेष दर्जा देण्याची मागणी नाकारली," असा आरोप नितीश कुमार यांनी केला आहे.
भाजप सरकारच्या कार्यकाळात देशात 'अघोषित आणीबाणी' निर्माण झाली आहे. देशातील विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्र सरकारने तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला, असा आरोप देखील जेडीयूच्या बैठकीत करण्यात आला.
दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी (5 सप्टेंबर) दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पन्नास मिनिटे चर्चा झाली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








