शिक्षक दिन : 'कुणीही यावं आणि टपली मारावं, ही आमची अवस्था’, राज्यातले शिक्षक का संतापले आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
तुमच्या ऑफीसमध्ये किंवा कार्यालयात तुमचं काम सोडून तुम्हाला जर कुणी अगदी दररोज इतर कामं सांगत असेल तर तुम्ही काय कराल? आणि ही 'इतर' कामं म्हणजे शासन निर्णय, उपक्रम, अभियान, प्रशिक्षण, सर्वेक्षणं अगदी गुरं मोजण्यापासून ते शौचालय स्वच्छतेची जबाबदारी घेण्यापर्यंत साधारण 100 एक कामं असतील तर तुम्ही तुमच्या कामाला 100 टक्के न्याय देऊ शकाल का? आणि आता विचार करून पाहा, या 'इतर' कामांच्या धबाडग्यात हजारो मुलांच्या 'भविष्याशी तडजोड' करावी लागत असेल तर? हीच परिस्थिती आज महाराष्ट्रातील शिक्षकांची आहे.
राज्य सरकारने नुकतेच शाळांच्या वर्गखोलीत शिक्षकांचे फोटो लावण्याचे आदेश दिलेत. पण शिक्षकांना वर्गात हजर राहता येत नसेल किंवा वर्गात असूनही शिकवायचं सोडून इतर कामं करावी लागत असतील तर शिक्षकांचा 'तो' फोटो विद्यार्थ्यांना शिकवणार आहे का? असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
आता तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल की अशी शिक्षकांना किती अशैक्षणिक कामं करावी लागतात? शिक्षक दावा करतात त्याप्रमाणे अशैक्षणिक कामांची यादी खरंच खूप मोठी आहे का? यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होतोय का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
अलिकडच्या काळातील वादग्रस्त अशैक्षणिक कामं
अलिकडच्या काळात विविध पदावरील अधिकाऱ्यांनी आदेश काढत शिक्षकांना काही कामं नेमली. हे आदेश वादाच्या भोवऱ्यात अडकले आणि विरोध झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी काही आदेश मागे घेतले.
23 ऑगस्टला जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील तहसीलदारांनी प्राथमिक शिक्षकांना पीक पाहणीचे काम करण्यासाठी आदेश जारी केले. (हा आदेश विरोध झाल्यानंतर मागे घेण्यात आला आहे.)
राजापूर तालुक्याच्या तहसीलदारांनी कोकणात गौरी-गणपतीसाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या स्वागतासाठी प्राथमिक शिक्षकांना बस स्थानकावर उपस्थित राहण्याचे आदेश दिले. तर रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील तहसीलदारांनी म्हप्रळ जेटी येथील नाक्यावर नाकेबंदीसाठी प्राथमिक शिक्षकांची नेमणूक केली आहे.

फोटो स्रोत, RAJESHREE AUTI
या अशा आदेशांमुळे पुन्हा एकदा राज्यातील शिक्षकांनी अशैक्षणिक कामांचा मुद्दा उपस्थित केला. हे केवळ तीन आदेश असे नाहीत ज्याचा शिक्षणाशी संबंध नाही पण ही यादी खूप मोठी आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा मोठा परिणाम होतोय, अशी विविध शिक्षक संघटनांची भूमिका आहे.
खरं तर ही पहिलीच वेळ नाही जेव्हा शिक्षक अशा कामांना विरोध करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी शिक्षकांची ही मागणी आहे की, शिक्षकांची शाळाबाह्य कामं बंद करा. पण शिक्षण हक्क कायदा असूनही त्याची अंमलबजावणी केली जात नाही, अशी तक्रार शिक्षकांकडून करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, मुख्याध्यापक संघटना, अॅक्टिव्ह टीचर्स फोरम, आप पालक समिती अशा अनेक संघटनांनी याविरोधात आपली भूमिका जाहीर केली आहे. अॅक्टीव्ह टीचर्स फोरम ही राज्यभरातल्या विविध शाळांच्या शिक्षकांची आणि प्रयोगशील शिक्षकांची एक सक्रिय संघटना आहे. या शिक्षकांनी समाज माध्यमांवर #आम्हालाशिकवूद्या या मोहिमेला सुरूवात केली आहे. तसंच 'आपले गुरूजी' या सरकारच्या उपक्रमावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.
यासंदर्भात बोलताना काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांची चहापाण्याची व्यवस्था किंवा वाहतूकीचे नियोजन करणे ही शिक्षकांची कामं नाहीत. त्यामुळे शिक्षकांना असा आदेश देणाऱ्या रत्नागिरी आणि जामनेर इथल्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे. इतर कामांबाबत बैठकीत बोलून निर्णय घेऊ."
अशैक्षणिक कामांची यादी
महाराष्ट्रातील दुर्गम, ग्रामीण आणि नीम शहरी भागात शिकवणाऱ्या शिक्षकांवर अनेक जबाबदाऱ्या असतात. शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यापलिकडे शासनाच्या प्रत्येक उपक्रमात, अभियानात, आरोग्य संकटात, आपत्कालीन व्यवस्थापनात शिक्षकांची भूमिका असते.
ही अशी किती कामं आहेत? याचा अंदाज यावा यासाठी आम्ही राज्यातील काही शिक्षकांशी बोललो. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार,

विविध उपक्रम आणि सर्वेक्षणे
1. हात धुवा दिन साजरा करा आणि विद्यार्थ्यांच्या फोटोंसह त्याचा अहवाल पाठवा.
2. सर्व क्रांतीकारक, महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीनिमित्त शाळांमध्ये वेगवेगेळे कार्यक्रम घ्या.
3. स्वच्छता अभियान राबवा.
4. झाडं लावण्यासाठी गावांमध्ये जनजागृती करा आणि याचा फोटोसह अहवाल पाठवा.
5. शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करुन त्यांना शाळेत दाखल करुन शाळेच्या प्रवाहात आणण्याची जबाबदारी.
6. संपूर्ण गावाचे वयोगटानुरुप, संवर्गानुरुप साक्षर-निरक्षरसह दाखलपात्र विद्यार्थी सर्वेक्षण करणे.
7. दारिद्रय रेषेखालील लोकांचे सर्वेक्षण.
8. पशुसर्वेक्षण - गुरं मोजायला जाणे आणि त्याची नोंद ठेवणे
9. शौच्छालयाचे सर्वेक्षण
10. ग्रामपंचायत निवडणूक पार पाडणे, पंचायत समितीची निवडणूक, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत प्रशिक्षणाला हजर राहणे आणि निवडणुकीचे कामकाज करणे. मतदारांच्या याद्या तयार करणे.

आरोग्यसंबंधी शिक्षकांना करावी लागणारी अशैक्षणिक कामे
1. प्रत्येक मुलाची आरोग्य तपासणी करुन घेणे आणि तपासणी कार्डच्या नोंदी ठेवणे.
2. तंबाखूमुक्त शाळांची नोंदणी करणे. त्यासाठी डिजिटल बोर्ड तयार करणे.
3. रुबेला, गोवर लसीकरणाच्या नियोजनाची जबाबदारी शिक्षकांवर आहे.
4. जनगणनेसाठी काम
5. जंतनाशक गोळ्या, प्रशिक्षण आणि वाटपासाठी आरोग्य केंद्रात शिक्षकांचं काम, गोळ्या वाटपाची नोंदवही
6. लोहयुक्त गोळ्यांचे वाटप.

शालेय समित्या स्थापण करणे
1.शालेय व्यवस्थापण समिती स्थापन करण्यासाठी संपूर्ण निवड प्रक्रिया पार पाडणे.
2.शालेय व्यवस्थापण समितीच्या मासिक सभा, पालक समिती निवड करणे, माता-पालक समिती निवड करणे, शालेय पोषण आहार समिती निवड करणे, विद्यार्थीनी सुरक्षा समिती तयार करणे, विद्यार्थी परिवहन समिती तयार करणे अशा सर्व समित्यांची दरमहा सभा घेणे आणि त्याचे इतिवृत्त कार्यवाही रजिस्टर मेंटन करणे.
3. तंबाखू व्यसनमुक्त समिती तयार करणे आणि मासिक सभा घेणे. तसंच तंबाखू मुक्त शाळा घोषित करणे.
4. गावातील तंटामुक्त व इतर समित्यांवर पदसिद्ध सदस्य म्हणून मु.अ.ना काम करणे.
5. ग्रामसेवकाच्या अनुपस्थीतीत ग्रामसभेचा सचिव म्हणून मु.अ.ना. काम करणे.
विविध शिष्यवृत्ती योजनांची अंमलबजावणी
1.पूर्व उच्च प्राथमिक इयता 5 वी आणि पूर्व माध्यमिक इयता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करुन घेणे. अर्ज आनलाईन भरणे. परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर पोहचवण्याची आणि आणण्याची व्यवस्था करणे.
2. नवोदय परिक्षेची तयारी करुन घेणे,फार्म भरणे, हॉल तिकीट काढणे, परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर पोहचवण्याची आणि आणण्याची व्यवस्था करणे.
3. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती प्रस्ताव तयार करुन पाठवणे.
4. अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती प्रस्ताव तयार करुन सादर करणे.
5. शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडून अनेकवेळेला ऐनवेळी मागितली जाणारी माहिती,
6. प्रत्येक हेडवाईज कॅशबुकच्या खर्चाच्या पावत्यांचे स्वतंत्र फाईल्स, आवक फाईल, जावक फाईल,
7. प्रत्येक शिष्यवृतीचे स्वतंत्र फाईल, पगार पत्रक फाईल, शालेय पोषण आहार फाईल
8. टी.सी.फाईल, जन्म तारिख दाखले फाईल, रजा फाईल, आर्डर फाईल
9. दिव्यांग विद्यार्थांसाठी विशेष कृतिकार्यक्रम राबवणे.

प्रशिक्षण आणि इतर उपक्रम
1. वर्गवार प्रत्येक विषयाची केंद्र ते जिल्हा राज्य स्तरापर्यंतची प्रशिक्षणे
2. मासिक शैक्षणिक परिषदा, गट संमेलन, क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव, तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव
3. जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव
4. पंच तथा इतर समित्यात कार्य
5. तंत्रस्नेही प्रशिक्षणे
6. महिला मेळाव्याचे आयोजन करणे.
7. बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करणे.
8. विद्यार्थ्यांसाठी सहलीचे आयोजन व नियोजन करणे.
9. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे.
10. डायसच्या प्रशिक्षणासाठी हजर रहा आणि त्यासाठी अर्ज ऑनलाईन भरा.
शिक्षक म्हणतात...
अशैक्षणिक कामांविरोधात आतापर्यंत अनेक शिक्षक संघटनांनी आपली भूमिका मांडली आहे. "शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षकांना आणि प्रशासकीय यंत्रणेला अशैक्षणिक कामं नाकारण्याचा अधिकार आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार, जनगणना, निवडणुकीची कामं आणि आपत्कालीन व्यवस्थापनाची कामं वगळता शिक्षकांना इतर कोणतेही काम देता येत नाही. त्यामुळे शिक्षकांनी अशैक्षणिक कामं नाकारावीत आणि त्यावर बहिष्कार टाकावा," असं आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेने केलं आहे.

फोटो स्रोत, Mahadev Mandale
पुणे जिल्ह्यातील शिक्षक महादेव मांदळे यांनी एका कवितेच्या माध्यमातून अशैक्षणिक कामांची व्यथा मांडली आहे. ते म्हणतात, "दररोज अशा निघणाऱ्या आणि श्वासाइतक्याच महत्त्वाच्या असणा-या गरिमा संपवणाऱ्या आदेशांनी शिक्षक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मरत आहे रोज थोडे-थोडे.
"एकूण परिस्थिती अशी की, स्वतःहून संपले पाहिजे गुणवत्तेसाठी धडपडणाऱ्या शिक्षकांनी, मागावेत हिशोब दारूच्या रांगेचे, फुटकळांच्या स्वागताचे, हागणदारीतल्या टंबरेलाचे, व्यर्थ सर्वेक्षणाचे, गळणाऱ्या धरणाचे, पेट्रोल-डिझेल वाटपाचे, रेशनिंगच्या रांगेचे, आगंतूकाच्या सॅनिटायझेशनचे, याचे, त्याचे, शिक्षण सोडून उरलेल्या सर्व विभागाच्या हरकाम्याचे, फोटोचे, अहवालाचे व गोरगरिबांच्या लेकरांच्या शिक्षणाला मारणाऱ्या सर्वांचे..."
परंतु ही सगळीच कामं अशैक्षणिक नाही असंही काही शिक्षकांना वाटतं. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका वैशाली गेडाम सांगतात, "निश्चितपणे या अशैक्षणिक कामाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता शिक्षणावर होतोय. त्याच्याशी शिक्षकांना तडजोड करावी लागते. पण मला वाटतं सगळीच कामं अशैक्षणिक नाहीत. काही कामं ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या संबंधितच आहेत. त्यामुळे अशैक्षणिक कामांबाबत भूमिका घेत असताना नेमक्या कुठल्या कामांना विरोध आहे आणि यापैकी कोणती कामं अशैक्षणिक आहेत यावर काम करण्याची गरज आहे."
त्या पुढे सांगतात, "बीएलओचं काम खूप वेळखाऊ आहे. तसंच अधून मधून येणारी सर्वेक्षणं आणि SCERT आणि DIET यांसारख्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात. विविध व्यासपीठांवरून या योजना शिक्षकांपर्यंत पोहचवतात. पण या योजना, उपक्रम राबवणारे हात मर्यादीत आहेत याचा विचार व्हायला हवा. तसंच यामुळे शिक्षकांना स्वत:ची कल्पकता राहत नाही. त्यासाठी वेळही मिळत नाही."

फोटो स्रोत, VAISHALI GEDAM
शिक्षक सांगतात, या यादीतील प्रत्येक काम अर्थात रोज करायचे नाहीय. काही कामं दैनंदिन आहेत. काही कामं दर पंधरा दिवसांनी किंवा दर महिन्याला करायची आहेत. तर काही कामं पाठपुरावा म्हणून करायची आहेत. पण असं असलं तरी एकामागे एक या कामांचं चक्र सुरूच राहतं अशी शिक्षकांची भावना आहे.
'गुरुजींचा शाळेत फोटो लावा'
शिक्षण विभागाच्या 'आपले गुरूजी' या उपक्रमाला राज्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने विरोध दर्शवला आहे.
विद्यार्थ्यांना शिक्षकांसाठी आदर निर्माण व्हावा यासाठी वर्गात शिक्षकांचे फोटो दर्शनी भागात लावण्यात यावे याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आणि त्यानंतर शिक्षण विभागाने उपसंचालकांना यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
परंतु शिक्षकांसमोर डोंगराएवढ्या समस्या असताना आणि सातत्याने शिक्षकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले असताना वर्गखोल्यांमध्ये आमचे फोटो लावून सरकार काय साध्य करू पाहत आहे? असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे.
"राज्यातील शिक्षतांना अशैक्षणिक कामांमधून मुक्त करून विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिक्षण देण्यासाठी वेळ द्यावा," अशी मागणीही शिक्षकांकडून करण्यात येत आहे.

फोटो स्रोत, BHAUSAHEB CHASKAR
शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रमांमध्ये काम करणारे आणि जि.प. शाळेचे शिक्षक भाऊसाहेब चासकर सांगतात, "कोणीही येतं आणि टपली मारून जातं अशी अवस्था आहे. अशा वातावरणात आत्मसन्मान जोपासणाऱ्या, स्वाभिमानी आणि संवेदनशील शिक्षकांना आपण शिक्षक राहू नये, असे वाटते आहे. रोज नवं काहीतरी ताटात वाढून ठेवलं जातं आहे. अनेक शिक्षकांचं मन मरून चाललं आहे."
"आपण शिक्षक म्हणून काम करू नये अशी मानसिकता तयार केली जात आहे. शाळांचा मुख्य आधारखांब असलेले असे गावोगावचे शेकडो गुणी, उद्यमशील शिक्षक आहेत. हे शिक्षक कधी व्यवस्थेच्या बाहेर पडताय, याची वाट 'ते' बघत आहेत. म्हणजे सरकारी शाळा बंद करायची वाट सोपी होईल," अशी टीकाही त्यांनी केली.
#आम्हालाशिकवूद्या मोहीम
अशैक्षणिक कामांची यादी वाढत चालल्याने राज्यातल्या शिक्षकांनी '#आम्हालाशिकवूद्या' ही मोहीम समाज माध्यमांमध्ये सुरू केलीय.
कोरोना आरोग्य संकटात दोन वर्षं शाळा बंद होत्या त्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत अपेक्षित गुणवत्ता शिक्षण पोहचलेलं नाही. तसंच दोन वर्षं प्रत्यक्ष शाळेत न शिकल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गुणवत्ता खालावल्याचंही शिक्षक सांगतात.
विशेषत: ग्रामीण भागात विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे असंही शिक्षकांना वाटतं. कारण कोरोना काळात डिजिटलच्या माध्यमातून शिक्षण सुरू होतं पण ग्रामीण भागात प्रत्येक विद्यार्थ्याकडे मोबाईल किंवा लॅपटॉप नव्हता. तसंच बहुसंख्य गावांमध्ये सलग अनेक तास वीज नसते. अशा अनेक समस्यांमुळे हे विद्यार्थी शिकू शकले नाहीत.
अशा गंभीर परिस्थितही शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकांचा वेळ अशैक्षणिक कामातच जातोय अशी शिक्षकांची तक्रार आहे.
अकोले येथे जिल्हा परिषदेचे शिक्षक आणि अशैक्षणिक कामांविरोधात जनजागृती करणारे भाऊसाहेब चासकर सांगतात, "अशैक्षणिक कामांमुळे शिक्षक गंजले आहेत. व्यवस्थाजन्य अडथळे दूर करा आणि #आम्हालाशिकवूद्या अशी मागणी शिक्षक करत आहेत. इतकी सगळी अशैक्षणिक कामे करता करता शिक्षणाचे काम शिक्षक करत आहेत."
"जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तुलनेने गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळते म्हणून गेल्या काही वर्षांत प्रत्येक शैक्षणिक वर्षात सुमारे एक लाख विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सोडून इकडे दाखल झालेले आहेत. अशैक्षणिक कामांमधून शिक्षकांना मुक्त केल्यास गुणवत्ता वर्धनाचा आलेख उंचावत जाईल असा विश्वास वाटतो," असंही भाऊसाहेब चासकर सांगतात.
या विषयासंदर्भात आम्ही काही शैक्षणिक अधिकाऱ्यांशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
शिक्षक दिनानिमित्त देशभरात विविध उपक्रम राबवले जातात. समाज माध्यमांवर शिक्षकांवर शुभेच्छांचा वर्षाव होतो. परंतु ग्रामीण आणि दुर्गम भागात शिक्षण देणाऱ्या शिक्षकांच्या प्रश्नांवर लवकरात लवकर तोडगा निघावा ही शिक्षकांची मागणी आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








