BBC Marathi : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख, खास तुमच्यासाठी..

नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या. आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील. पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.

तर मंडळी काळजी नको. आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.

बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.

राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख खास तुमच्यासाठी..

1. भारतीय नौदलाचं नवं बोधचिन्ह छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरित होऊन असं तयार झालं..

भारताची सर्वांत मोठी, स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत भारतीय नौदलात दाखल झाली. यावेळी भारतीय नौदलाच्या नवीन चिन्हाचंही अनावरण करण्यात आलं, ज्यात पूर्वीच्या दोन लाल रेषा आता काढून टाकण्यात आल्या आहेत. त्यांना सेंट जॉर्जेस क्रॉस म्हणत असत. या दोन रेषा कायमच भारतीय नौदलाच्या चिन्हावर राहिल्या आहेत, ज्या ब्रिटिश राजवटीपासून तशाच राहिल्याचं सांगितलं जात आहे.

आता मात्र भारतीय नौदलाच्या नवीन झेंड्यावर एकीकडे वर भारताचा तिरंगा दिसणार आहे, तर त्याच्या बाजूला नौदलाचं हे बोधचिन्ह अगदी ठळकपणे दिसणार आहे.

वसाहतवादाच्या प्रभावापासून दूर जाण्याच्या भूमिकेमुळे नौदलाचं नवीन बोधचिन्ह तयार करण्याचा विचार समोर आला. या चिन्हाला इतिहासाचा संदर्भ असावा असा विचारही केला गेला. त्यानुसार नवीन चिन्हासाठी संपूर्ण नौदलाकडून वेगवेगळ्या कल्पना मागवण्यात आल्या होत्या. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरामारापासून प्रेरित होऊन हे नवं बोधचिन्ह तयार करण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनावरण करताना सांगितलं आहे. जाणून घ्या नौदलाच्या नव्या बोधचिन्हाविषयी सर्व काही..

2. मुकेश अंबानींचे वारसदार कोण, कोणत्या मुलाजवळ जाणार कोणता व्यवसाय?

जेव्हा 2002 मध्ये रिलायन्स उद्योगसमूहाचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांचं निधन झालं, तेव्हा त्यांच्या संपत्तीवरून त्यांच्या दोन मुलांमध्ये अर्थात मुकेश आणि अनिल अंबानींमध्ये मोठा वाद झाला होता.

अखेर त्यांची आई कोकिळाबेन धीरुभाई अंबानी यांना मध्यस्थी करावी लागली होती आणि दोन भाऊ, त्यांचे उद्योग वेगळे झाले होते.

अशीच परिस्थिती पुढच्या पीढीवर उद्भवू नये, याची खबरदारी घेत मुकेश अंबानी यांनी आपल्या वारसा पुढे कुणाकडे कसा जाणार, याची माहिती दिली आहे.

नुकत्याच मुंबईत झालेल्या Reliance Industries Limited च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांनी संकेत दिले आहेत की त्यांच्या तीन मुलांकडे म्हणजेच अनंत, आकाश आणि ईशा यांच्याकडे वेगवेगळ्या उद्योगांची धुरा सोपवण्याची तयारी सुरू झाली आहे.

3. मारुती ते अमूल - स्वातंत्र्योत्तर भारताला आकार देणारे 5 ब्रँड

काही गोष्टी कायम आपल्यासोबत राहतात, आपल्या आठवणी बनून. तुमच्याही लहानपणी अशा काही गोष्टी असतील, ज्या तुमच्यासाठी खास असतील. हेच कारण आहे, ज्यामुळे काही कंपन्यांचे ब्रँड ग्राहकांच्या पहिल्या पसंतीचे असतात.

भारतात तर असे काही ब्रँड आहेत, ज्यांनी केवळ ग्राहकांच्या मनावरच राज्य केलं नाही, तर देशाच्या उभारणीतल्या विविध टप्प्यांवर महत्त्वाची भूमिका बजावली.

1947 साली भारतानं ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवलं. स्वातंत्र्योत्तर भारताला विकासाच्या प्रगतीपथावर नेण्यासाठी इथल्या शासन-प्रशासनानं विविध धोरणं आखली, तशीच इथल्या उद्योगधंद्यांनीही आपापल्या परीने आपलं योगदान दिलं.

गेल्या 75 वर्षात भारत हा जगासाठी मोठी बाजारपेठ म्हणूनही समोर आला. गुंतवणूकदारांची ओढा भारताकडे कायमच जास्त राहिलाय. जगाच्या कानाकोपऱ्यातील अनेक कंपन्यांचे ब्रँड भारतात दाखल झालेत.

मात्र, तरीही इथल्या काही ब्रँडनी भारतीयांच्या मनावर आणि भारताच्या उभारणीत आपला ठसा उमटवलाय. आपण आज अशाच पाच ब्रँडबद्दल जाणून घेणार आहोत.

4. मिखाईल गोर्बोचेव्ह : सख्ख्या आजोबांना ज्यांनी गोळ्या घातल्या त्यांच्याच पक्षाला एकनिष्ठ राहाणारा नेता

सोव्हिएत संघ जेव्हा अस्तित्वात होता तेव्हा त्याने पृथ्वीची 1/6 धरती व्यापून टाकली होती. याचे शेवटचे प्रमुख होते मिखाईल गार्बोचेव्ह. ते पदावर असतानाच सोव्हिएत संघाचे 16 तुकडे झाले होते.

ही 20 व्या शतकातली सगळ्यांत भयानक गोष्ट होती असंही पुतिन जाहीरपणे म्हणाले होते. शांततेचं नोबेल मिळवणारा पण रशियातल्या कित्येकांसाठी व्हिलन ठरलेला हा माणूस कोण होता? कसा होता? ही त्याचीच कथा.

5. हत्तीरोग म्हणजे काय? तो कसा होतो? याला आळा घालणं शक्य आहे का?

हत्तीरोग डास चावल्याने जंतू संसर्गामुळे होणारा रोग आहे. हत्तीरोग झालेल्या रुग्णाच्या पायला खूप जास्त सूज येते, ज्यामुळे पायाचा आकार बदलतो आणि पाय विदृप झालेला दिसून येतो.

'क्युलेक्स' प्रजातीच्या डासांपासून हत्तीरोग पसरतो. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार क्लुलेक्स डास हत्तीरोगास कारणीभूत 'बुचेरिया बॅनक्रॉफ्टीया' या परजीवी जंतूंचा प्रसार करतात.

आरोग्य विभागाचे सहसंचालक आणि हत्तीरोग मोहिमेचे प्रमुख डॉ. स्वप्नील लेळे यांनी राज्यभरात सद्यस्थितीत हत्तीरोगाने ग्रस्त 29,000 पेक्षा जास्त रुग्ण असल्याची माहिती दिली आहे.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हत्तीरोगाचा मु्द्दा मोठा गाजला होता. हत्तीरोगाचा प्रसार कसा होतो? त्याला आळा घालणं शक्य आहे का? हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

पाहा बीबीसी मराठीचे व्हीडिओ

काँग्रेस आणि भाजपमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक कशी होते? सोपी गोष्ट 676

गणेशोत्सव : या शेतकऱ्याने केली कांद्याच्या गणपतीची प्रतिष्ठापना

माणूस पुन्हा चंद्रावर का चालला आहे? | सोपी गोष्ट 673

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)