मिखाईल गोर्बोचेव्ह : सख्ख्या आजोबांना ज्यांनी गोळ्या घातल्या त्यांच्याच पक्षाला एकनिष्ठ राहाणारा नेता

सोव्हिएत संघ जेव्हा अस्तित्वात होता तेव्हा त्याने पृथ्वीची 1/6 धरती व्यापून टाकली होती. याचे शेवटचे प्रमुख होते मिखाईल गार्बोचेव्ह. ते पदावर असतानाच सोव्हिएत संघाचे 16 तुकडे झाले होते.

ही 20 व्या शतकातली सगळ्यांत भयानक गोष्ट होती असंही पुतिन जाहीरपणे म्हणाले होते. शांततेचं नोबेल मिळवणारा पण रशियातल्या कित्येकांसाठी व्हिलन ठरलेला हा माणूस कोण होता? कसा होता? ही त्याचीच कथा

गोर्बाचेव्ह सोव्हिएत युनियनचे प्रमुख म्हणून सूत्रं सांभाळणार त्याच्या काहीशी आधीची गोष्ट. ते तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांना भेटायला लंडनला गेले होते.

वातावरणात तणाव होताच, कारण थॅचर या पक्क्या कम्युनिस्टविरोधी तर गोर्बोचेव्ह सर्वांत मोठ्या कम्युनिस्ट साम्राज्याचे नेते.

दोन्ही नेते कट्टर, आक्रमक म्हणून प्रसिद्ध होते. पण या भेटीतल्या एका क्षणी गोर्बोचेव्ह पुढे झुकून थॅचर यांच्या कानात म्हणाले, "हे पाहा, तुम्हाला काही आमच्या पक्षात घेण्याचा आमचा विचार नाही."

थॅचर यांच्या हास्याचा स्फोट झाला, वातावरण एकदम निवळलं.

यानंतर पत्रकारांनी बोलताना मार्गारेट थॅचर म्हणाल्या होत्या, "मला मिखाईल गोर्बोचेव्ह आवडले. त्यांच्याशी आम्ही मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करू शकतो."

लक्षात घ्या, हा शीतयुद्धाचा काळ होता. पाश्चात्य देश आणि सोव्हिएत युनियन एकमेकांना पाण्यात पाहात होते, अशावेळी ब्रिटनच्या पंतप्रधानांनी असं विधान करणं खूपच मोठी गोष्ट होती.

गोर्बोचेव्ह यांची प्रतिमा नंतर अशीच बनत गेली. असा कम्युनिस्ट नेता, ज्याच्याशी मतभेद असले, तरी चर्चा होऊ शकते, संवाद साधता येऊ शकतो, गप्पा मारता येऊ शकतात.

आजोबांना घातल्या होत्या स्टॅलिनच्या पोलिसांनी गोळ्या

गार्बोचेव्ह यांचा जन्म झाला 1931 साली. त्यावेळी स्टॅलिनने आपली मूठ रशियाभोवती आवळली होती. त्याच्या धोरणांनी हजारो रशियानांचा जीव गेला होता, तर स्टॅलिनचे पोलिस नव्या राजवटीचे नियम न मानणाऱ्या सामान्य लोकांना दिवसागणिक ठार करत होते.

अनेक लोकांना छळछावणीत पाठवलं जात होतं, व्यक्तींची खाजगी मालमत्ता संपुष्टात आली होती. याच काळात गोर्बोचेव्ह यांचे दोन्ही आजोबा स्टॅलिनच्या राजवटीतल्या नियमांच्या कचाट्यात सापडले.

आईच्या वडिलांना सार्वजनिक शेती (व्यक्तीची जमिनीवरची मालकी संपून ती सरकारी मालकीची होईल आणि त्यावर शेतकरी राबेल, त्याबदल्यात त्याला मोबदला मिळेल) मान्य नव्हती. त्यांना स्वतःची जमिनी स्वतः कसायची होती.

त्यांना कोर्टात हजर केलं गेलं, याच काळात त्यांच्या कुटुंबातले निम्म्याहून जास्त सदस्य मरण पावले. दुसरीकडे गोर्बोचेव्ह यांच्या वडिलांचे वडील कम्युनिस्ट विचारांना मानणारे होते, तरी पोलीस त्यांना पकडून घेऊन गेले. या आजोबांना तर गोळ्या घातल्या गेल्या, पण ते सुदैवाने वाचले.

अशाच परिस्थितीत, घरात मिखाईल गोर्बोचेव्ह यांचा जन्म झाला. त्यांचे आईवडील कम्युनिस्ट राजवटीत सार्वजनिक शेती करायचे.

घरात स्टॅलिनच्या राजवटीची झळ पोहोचली असली तरी गोर्बोचेव्ह यांना कायमच कम्युनिस्ट विचार पटले आणि किशोरवयापासूनच ते कम्युनिस्ट पक्षाची कामं करायला लागले.

पुढची वीस वर्षं ते पक्षात वेगवेगळी पदं भूषावून मोठे होत राहिले.

नव्या पिढीचा, ताज्या दमाचा कम्युनिस्ट

जसंजसे नेता म्हणून गोर्बोचेव्ह मोठे होत गेले, त्यांच्याच पक्षातल्या म्हाताऱ्या लोकांच्या हातात निर्णय घेण्याचे सारे अधिकार एकवटलेले आहेत हे पाहून चरफडत होते.

वयाच्या 49 व्या वर्षी ते पोलिटब्यूरोचे सर्वांत तरूण सदस्य बनले. गोर्बोचेव्ह तेव्हा एकमेव महत्त्वाचे नेते होते ज्यांनी रशियन राज्यक्रांती पाहिली नव्हती. ज्यांचा जन्म त्या क्रांतीनंतर झाला होता. त्यामुळे जनतेलाही ते ताज्या दमाचे, नवा विचार करणारे नेते वाटत होते.

ते जेव्हा कृषीखातं सांभाळत होते, त्यावेळी त्यांनी अनेक परदेश दौरे केले. सोव्हिएत संघात जे भांडवलशाही देशांबदद्ल चित्रं रंगवलं जायचं ते खरं नव्हतं हे त्यांना दिसलं.

युरोप अमेरिकेतली काही मुल्यं आपल्या देशात आणावी असं त्यांना वाटलं, आणि नंतर त्यांनी ती आणलीही.

1984 साली पोलिटब्यूरोचे जनरल सेक्रेटरी आंद्रेपॉव्ह मरण पावले. त्यांच्या जागी गोर्बोचेव्ह जनरल सेक्रेटरी (म्हणजे राष्ट्रप्रमुखच) होतील असा अंदाज होता, पण कॉन्स्टॅटिन चेर्नेंको जनरल सेक्रेटरी बनले. ते आधीच वयस्कर आणि आजारी होते.

वर्षभरात त्यांचंही निधन झालं. मग हे पद गोर्बोचेव्ह यांच्याकडे आलं.

गोर्बोचेव्ह यांची कामाची पद्धत, जनतेशी संवाद सांधायची पद्धत वेगळी होती. आधीच्या कम्युनिस्ट प्रमुखांसारखे ते व्यासपीठावरून घोकलेली भाषणं द्यायचे नाहीत. लोकांमध्ये मिसळायचे. स्पष्ट बोलण्याबद्दल ते प्रसिद्ध होते.

त्यांचे कपडे स्टायलिश असायचे, अगदी त्यांच्या पत्नी राईसाही लोकांना दिसायच्या, लोकांमध्ये वावरायच्या. तेव्हाचे लोक म्हणत की राईसा पोलिटब्यूरोच्या जनरल सेक्रेटरीच्या बायकोसारखं न वागता अमेरिकेच्या फर्स्ट लेडीसारखं वागायच्या.

मुक्त अर्थव्यवस्था

एव्हाना सोव्हिएत युनियनने अफगाणिस्तानवर आक्रमण केलं होतं. अमेरिका सोव्हिएत युनियनशी अफगाणिस्तानच्या भूमीतून छुपं युद्ध लढत होता. रशियात लोक या युद्धाला वैतागले होते, तरुण पिढी मारली जात होती. अर्थव्यवस्थेची दुरवस्था झाली होती

गोर्बोचेव्ह यांच्या हातात सूत्रं आली तेव्हा तर रशियाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडायच्या बेतात होती. उपासमार, जीवनावश्यक वस्तूंची टंचाई सर्वसामान्यांना भेडसावत होती.

गोर्बोचेव्ह यांच्या पूर्वासुरींच्या राजवटीत कम्युनिस्ट राजवटीच्या विरोधात कोणी बोललं तर त्याला शिक्षा होत होती. एकीकडे जागतिकीकरणाचं वारं वाहात होतं, आणि अर्थव्यवस्था मुक्त केली तरच आपल्या नागरिकांना दोन वेळेचं जेवण नीट मिळू शकेल असं गोर्बोचेव्ह यांना वाटत होतं.

गोर्बोचेव्ह यांच्या बाबतीतला एक किस्सा प्रसिद्ध आहे. त्याचे व्हीडिओ आजही युट्यूबवर पहायला मिळू शकतात. जनरल सेक्रेटरी झाल्यानंतर ते लोकांना भेटत होते, एवढ्यात एक महिला तिथे आली आणि गोर्बोचेव्ह यांच्यावरच आवाज चढवून म्हणाली, "बघा माझ्याकडे, मला आंघोळीची गरज आहे, मला बदलायला कपडेही नाहीयेत. तुमच्या सोव्हिएत राजवटीत बायकांना अशा परिस्थितीत जगावं लागतंय."

गोर्बोचेव्ह यांच्या राजवटीत रशियन लोकांना आपलं मत मांडायचं स्वातंत्र्य मिळालं होतं.

गोर्बाचेव्ह यांच्याजागी कोणीही असतं तर या महिलेला नक्कीच शिक्षा झाली असती, पण याच भेटीत गोर्बोचेव्ह यांनी जनतेला म्हटलं, "आपण आधी जगत होतो तसं जगून आता आपल्याला नाही चालणार. आपल्या सगळ्यांनाच बदलावं लागेल."

पण हा बदल म्हणावा तितका सोपा नव्हता.

मुक्त बाजारपेठ

दोन शब्द परवलीचे झाले होते - पेरेस्त्रॉईका म्हणजे पुर्नबांधणी आणि ग्लासनोस्ट म्हणजे खुलेपणा.

गोर्बोचेव्ह यांना नव्या रशियाची बांधणी करायची होती जिथे खुलेपणा असेल, स्वातंत्र्य असेल. पण, यातला ग्लासनोस्टचा फटका त्यांना बसणार होता, कसा ते पुढे येईलच.

सोव्हिएत युनियनला आर्थिक सुधारणांची गरज होती आणि त्यासाठी कम्युनिस्ट पक्षाच्या अजेंड्याच्या विरोधात जाण्याचीही गोर्बोचेव्ह यांची तयारी होती.

त्यांना सोव्हिएत युनियनमध्ये भांडवलशाही आणायची नाही हे त्यांनी स्पष्ट केलं होतं, पण तरीही काही प्रमाणात सरकारी मुठीतून उद्योग आणि बाजारपेठांची सुटका व्हायला हवी एवढं त्यांनी मान्य केलं होतं.

त्यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या जेष्ठ धुरिणांनाही ठणकावून सांगितलं होतं, "तुम्ही मागे पडला आहात. तुमची धोरणं भिकार आहेत."

सोव्हिएत संघ अनेक वर्षं आहे त्याच परिस्थितीत अडकला होता, चाचपडत होता. यातून बाहेर काढण्याचा आणखी एक रस्ता गोर्बोचेव्ह यांनी स्वीकारला तो म्हणजे लोकशाही.

त्यांच्याच राजवटीत सोव्हिएत संघात पहिल्यांदा लोकप्रतिनिधींची निवड करण्यासाठी खुल्या निवडणुका झाल्या.

चेर्नोबिल

ही घटना माहिता नाही असे लोक तुरळकच असतील. ही घटना घडली गोर्बोचेव्ह यांच्या कार्यकाळात. त्यावेळी नक्की काय झालं होतं हे तुम्ही इथे क्लीक करून वाचू शकता.

पण चेर्नोबिल दुर्घटनेचा सोव्हिएत संघावर खूप मोठा परिणाम झाला. एकतर त्या आपत्तीशी झगडताना सरकारचा कस लागला. गार्बोचेव्ह यांनी आपल्या एका जुन्या मुलाखतीत म्हटलं होतं, "सिस्टिम बधत नव्हती मग आम्ही ठरवलं की बदल स्वीकारू न शकणारी सिस्टिमच बदलून टाकायची."

चेर्नोबिलनंतर सोव्हिएत युनियनमध्ये माहितीचा धबधबा सुरू झाला. आधीच्या कम्युनिस्टांच्या राजवटीत बंदी असलेली पुस्तकं, गाणी, सिनेमे, नाटकं नव्या पिढीच्या हाती आले त्यांच्यावरची बंदी उठवली गेली. कम्युनिस्ट राजवटीत धर्माचं स्वातंत्र्य नव्हतं.

ही विचारसरणी धर्म मानत नव्हती त्यामुळे जनतेलाही आपल्या धर्माचं आचरण करायची मुभा नव्हती. 1988 नंतर हे चित्र बदललं. धर्मगुरूंचं प्राबल्य वाढलं. तब्बल 70 वर्षं लोकांना जे मुलभूत अधिकार मिळाले नव्हते ते मिळाले.

सोव्हिएत युनियनच्या लोकांना पासपोर्ट मिळायला लागले, कायदेशीररित्या इतर देशात प्रवास करणं आणि दुसऱ्या देशात स्थायिक होणं शक्य झालं.

पोलादी पडदा उघडायला लागला होता.

यानंतर पुढच्याच वर्षी, 1989 साली गार्बोचेव्ह यांनी अफगाणिस्तानातलं युद्ध थांबवलं आणि सोव्हिएत सैन्य मागे घेतलं. त्यांच्या या निर्णयाचंही पाश्चात्य देशांनी स्वागत केलं.

यानंतर अनेक दशकं चाललेलं शीतयुद्ध संपवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि अमेरिकेशी चर्चा सुरू केली.

विरोधाचे वारे

आता कोणालाही वाटेल की सोव्हिएत युनियनमध्ये जे दडपशाहीचं वातावरण होतं ते संपुष्टात येत होतं, लोकांना बोलण्याची मुभा मिळाली, हक्क मिळाले ही चांगलीच गोष्ट आहे.

पण या सगळ्या निर्णयांमुळे सोव्हिएत युनियनमध्ये, कम्युनिस्ट पक्षात गोर्बोचेव्ह यांच्या विरोधात वातावरण तयार होत होतं. पक्षातले जुने लोक या बदलांना स्वीकारत नव्हते.

गोर्बोचेव्ह आपल्या जुन्या मुलाखतीत म्हणाले होते, "प्रशासकीय अधिकाऱ्यांना एका विशिष्ट पद्धतीने वागायची सवय होती. आता त्यांना ती बदलावी लागणार होती. अनेक लोकांचा या नव्या बदलांना विरोध होता."

सोव्हिएत नागरिकांवर असणारे निर्बंध शिथिल झाल्याचा आणखी एक परिणाम असा झाला की सोव्हिएत युनियनचा भाग असलेल्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये घुसळण झाली.

आधी वेगवेगळी राष्ट्र म्हणून अस्तित्वात असलेले हे प्रदेश जबरदस्तीने, तिथल्या नागरिकांच्या इच्छेविरूद्ध सोव्हिएत युनियनमध्ये सहभागी करून घेतले होते.

सगळ्यांच नागरिकांना स्वातंत्र्य मिळत होतं. यातले विविध वंशाचे, धर्माचे नागरिक आता सोव्हिएत युनियनमधून बाहेर पडू पाहात होते. या राष्ट्रांना स्वतंत्र व्हायचं होतं.

सुरुवातीला गोर्बोचेव्ह यांनी हे लढे दडपण्याचा प्रयत्न केला.

डिसेंबर 1986 मध्ये कझाकिस्तानात मोठ्या दंगली झाल्या. आणि मग अनेक प्रदेशांमध्ये स्वातंत्र्यलढ्याची लाट आली.

सगळ्यांत आधी बाल्टिक प्रदेशातल्या लाटविया, लिथूएनिया आणि इस्टोनिया देशांनी स्वातंत्र्य घोषित केलं. त्यांनी मॉस्कोशी असणारे आपले संबंध तोडले.

पण सगळ्यांत नाट्यमय घटना घडली 9 नोव्हेंबर 1989 रोजी. यादिवशी बर्लिन शहरात निघालेल्या एका प्रचंड मोठ्या मोर्चाने बर्लिनची भिंत तोडली आणि पूर्व जर्मनी-पश्चिम जर्मनीचं एकीकरण झालं.

तुम्ही म्हणाल जर्मनीचा आणि सोव्हिएत युनियनचा काय संबंध, तर त्यासाठी थोडं मागे जावं लागले. दुसऱ्या महायुद्धात जेव्हा नाझी जर्मनीचा पराभव झाला तेव्हा रशिया आणि अमेरिका-युरोप यांच्या एकत्रित मित्रराष्ट्र फौजा अशा दोन्ही सैन्याने जर्मनी ताब्यात घेतला.

मग जर्मनीची विभागणी झाली आणि पश्चिम जर्मनी युरोपात राहिला तर पूर्व जर्मनी सोव्हिएत संघाच्या ताब्यात गेला. त्यानंतर 40 हून अधिक वर्षं कम्युनिस्टांची राजवट चालली.

त्या काळात मित्रराष्ट्र आणि रशिया यांच्या शीतयुद्धाला सुरूवात झाली, दोन्ही बाजू एकमेकांना पाण्यात पाहायच्या. त्यामुळे पश्चिम जर्मनीतून कोणालाही पूर्व जर्मनीत येता यायचं नाही, ना पूर्व जर्मनीतून पश्चिम जर्मनीत जाता यायचं.

लोकांना प्रतिबंध करण्यासाठी बर्लिनमध्ये भिंत उभारली गेली होती, तीच इतिहासातली प्रसिद्ध 'बर्लिन वॉल'.

9 नोव्हेंबर 1989 ला ही भिंत जर्मनीतल्या लोकांनी पाडली. जर्मनीचं अधिकृतरित्या एकीकरण झालं, फाळणी झालेला हा देश पुन्हा एक झाला. कम्युनिस्टांच्या युरोपातल्या गडाला मोठं खिंडार पडलं होतं.

आता गोर्बोचेव्ह यांच्या जागी जर दुसरा कोणी कम्युनिस्ट नेता असता, विशेषतः जुन्या मतांचा (ज्यांना ओल्ड गार्ड असं म्हणतात) तर या दिवशी सोव्हिएत संघाने युद्ध छेडलं असतं. युरोपच्या उरावर रणगाडे नेऊन ठेवले असते आणि कितीही नुकसान झालं तर युद्ध चालू ठेवलं असतं. (आताच्या परिस्थितीशी साध्यर्म्य आढळलं तर निव्वळ योगायोग समजावा.)

पण अफगाणिस्तानात सोव्हिएत संघाचे हाल झाले होते, नामुष्की पत्कारून माघार तर घ्यावी लागली होतीच, जोडीला प्रचंड मनुष्यहानी आणि उर्जा, पैसा गेला होता. अर्थव्यवस्था डबघाईला आलीच होती.

कदाचित याच कारणांचा विचार करून गार्बोचेव्ह यांनी जर्मनीच्या एकीकरणाला 'त्यांचा अंतर्गत प्रश्न' म्हटलं आणि हस्तक्षेप करायचं टाळलं.

1990 साली गोर्बोचेव्ह यांना अमेरिका-युरोप आणि सोव्हिएत संघ 'यांच्यातले संबंध सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल' शांततेचं नोबेल देण्यात आलं.

बंड आणि अटक

गोर्बोचेव्ह अनेकांच्या डोळ्यात सलत होतेच.

21 डिसेंबर 1991 साली रशियाच्या टीव्हीवर संध्याकाळच्या बातम्यांमध्ये एक धक्कादायक गोष्ट सांगितली गेली. "नमस्कार, या संध्याकाळच्या बातम्या आहेत. आजपासून सोव्हिएत संघाचं अस्तित्व संपलं..."

या नाट्यमय घोषणेच्या काही दिवस आधी एकापाठोपाठ एक घडामोडी घडत होत्या. रशिया, बेलारूशिया आणि युक्रेनच्या नेत्यांनी एकत्र येत ठरवलं की आता सोव्हिएत संघातून बाहेर पडायचं. यानंतर 8 राष्ट्रांनी तोच मार्ग अवलंबिला.

ऑगस्ट 1991 मध्ये, म्हणजे या घटनेच्या काही महिनेच आधी, सोव्हिएत संघाच्या जुन्या कम्युनिस्ट नेत्यांनी सैन्याला हाताशी धरून बंड केलं. गोर्बोचेव्ह यांना अटक केली गेली.

त्यांच्या सुटकेच्या बदल्यात त्यांच्याकडून त्यांच्या सगळ्या राजकीय शक्ती काढून घेतल्या गेल्या.

त्या दिवसांची आठवण सांगताना मिखाईल गोर्बोचेव्ह बीबीसी रशियाचे एडिटर स्टीव रोझनबर्ग यांना म्हणाले होते, "हे सगळं कटकारस्थान माझ्या पाठीमागे सुरू होतं. त्यांना फक्त एक सिगरेट पेटवायची होती, पण त्यासाठी त्यांनी अख्ख्या घराला आग लावली."

ते पुढे म्हणतात, "त्यांना कायदेशीर पद्धतीने, लोकशाही मार्गाने सत्ता मिळवता येत नव्हती मग त्यांनी दगाबाजी केली."

25 डिसेंबर 1991 साली मिखाईल गोर्बोचेव्ह यांनी राजीनामा दिला. सोव्हिएत युनियनचा झेंडा खाली उतरवला गेला.

स्टीव रोझेनबर्ग यांच्याशी बोलताना गोर्बोचेव्ह म्हणाले होते, "आम्ही सगळे गृहयुद्धाच्या वाटेवर होतो आणि मला ते टाळायचं होतं."

"आम्ही अशा दुभंगलेल्या समाजात राहात होतो जिथे संघर्ष होता, प्रत्येकाच्या हातात शस्त्रं होती, अगदी अणुबॉम्बही होते या राष्ट्रांकडे. अंतर्गत युद्ध झालं असतं तर लाखो लोकांचे जीव गेले असते. सत्तेत राहाण्यासाठी मी या लोकांचा बळी देऊ शकत नव्हतो, पदावरून पायउताप होणं हाच माझा विजय होता."

सोव्हिएत युनियनचे तुकडे होऊन रशिया बनल्यानंतर तिथल्या राजकारणात गोर्बोचेव्ह बॅकफूटवर गेले. ते जेव्हा 1996 साली पुन्हा रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी उभे राहिले तेव्हा त्यांना मोजून 5 टक्केही मतं मिळाली नाहीत.

पण ते परदेशात व्याख्यानं द्यायला कायम जायचे. त्यांनी आपल्या परदेशी मित्रांशी कायम संपर्क ठेवला. त्यांना खरंतर युरोपात, अमेरिकेत जास्त मानसन्मान मिळाला. अनेक पदव्या, मानपत्रं दिली गेली.

पण मायदेशात हा नेता नंतरच्या आयुष्यात एकाकी राहिला आणि त्याच्या मताला फारशी किंमत राहिली नाही.

1999 साली त्यांच्या पत्नी राईसा यांचं कॅन्सरने निधन झाल्यानंतर ते अधिकच एकटे झाले. पण ते आयुष्यातल्या नंतरच्या काळात व्लादिमीर पुतिन यांचे कट्टर विरोधक बनले.

"पुतिन यांनी खोटी लोकशाही उभी केली आहे,"असंही ते अनेकदा म्हणायचे. अपवाद एकच, जेव्हा रशियाने युक्रेनचा क्रायमिया हा भाग बळकावला, तेव्हा त्यांनी याचं समर्थन केलं होतं.

गोर्बोचेव्ह यांनी जगाला काय दिलं? तर सोव्हियत नागरिकांना स्वातंत्र्य, शीतयुद्धाचा शेवट आणि आण्विक अस्त्रांची संख्या घटवणं.

पण तरीही अनेक रशियन लोकांच्या नजरेत ते असा खलनायक ठरले ज्यांनी त्यांच्या देशाचे तुकडे केले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)