रशिया-युक्रेन : माणसांना बाहुल्यांसारखं नाचवणारा जगातला सर्वात शक्तिशाली माणूस

    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी

2011 चा जानेवारी महिना. कडाक्याच्या थंडीतल्या एका रात्री मॉस्कोतले लिबरल नेते, उच्चभ्रू लोक मॉस्को आर्ट्स थिएटरचं उद्घाटन होतं. शुभारंभाचा प्रयोग होता. या नाटकाची तिकीटंही अगदी चढ्या दराने विकली गेली होती.

साम्यवादाला जुनं समजणारे, जगाशी जुळवून घेऊ पाहाणारे, नव्या युगाचे हे प्रेक्षक होते.

अभिनेते अॅनाटोली बेलींनी स्टेजवर एन्ट्री घेतली.

ते जे भूमिका वठवत होते, ते पात्र म्हणजे एक अत्यंत एक अत्यंत हुशार, चलाख माणूस होता. त्याच्या हातात असंख्य दोऱ्या आणि त्या दोऱ्यांना लटकलेल्या बाहुल्या कुठे कुठे पसरलेल्या. कुठली दोरी कधी ओढायची आणि कुणाला कसं नाचवायचं हे फक्त त्या माणसालाच माहिती.

तो नवनवीन जग निर्माण करायचा. असं जग जिथे खरं काय आणि खोटं काय या शेवटपर्यंत पत्ता लागू नये. तो एक असा अदृश्य सूत्रधार होता ज्याच्या हातात रशियाची, आणि पर्यायाने जगाची सूत्रं होती. या सगळ्यातून तो स्वतःला हवं ते मिळवायचा.

जसजसा प्रयोग पुढे जायला लागला, प्रेक्षक चुळबुळायला लागले. अॅनाटोली बेली सादर करत असलेली भूमिका रशियाच्या एका प्रचंड ताकदवान माणसावरच बेतली आहे की काय वाटायला लागलं. तो माणूस अस्तित्वात होता, आणि अनेकांनी त्याच्याबद्दलच्या दंतकथाही ऐकल्या होत्या.

पण प्रेक्षकांना अजून एक धक्का बसणार होता. ज्या लघुकथेवर हे नाटक बेतलं होतं, त्या लघुकथेचा लेखकही हाच रशियातला खराखुरा माणूस होता. त्याचं नाव व्लादिस्लाव्ह सरकॉव्ह.

त्यानेच हे नाटक बसवून घेण्यासाठी प्रयत्न केले आणि उदारमतवादी लोकांचा किल्ला समजल्या जाणाऱ्या मॉस्को आर्ट्स सेंटरमध्ये 'ऑलमोस्ट झिरो' हे नाटक त्याने त्याच उदारमतवादी लोकांच्या नाकावर टिच्चून घडवून आणलं.

'तुम्ही ज्या सिस्टिमला शिव्या देता, मी त्याचाच भाग आहे, तुम्हीच मला घडवलंय आणि आता तुम्ही काहीही करू शकत नाही' हा व्लादिस्लावचा संदेश नाटकानंतर अख्ख्या मास्कोत पसरला.

फेब्रुवारी 2014. युक्रेनमध्ये तत्कालीन सरकारविरोधात लोक रस्त्यावर आले होते. त्यांची मागणी होती की युक्रेनने युरोपियन युनियनमध्ये सहभागी व्हावं आणि तेव्हाचं युक्रेनचं सरकार मॉस्कोधार्जिणं होतं त्यामुळे अर्थात लोकांची मागणी फेटाळून लावली जात होती. दोन महिने आंदोलन चाललं होतं पण काहीच निष्पन्न होत नव्हतं.

अशाच एका थंडीतल्या दुपारी राजधानी किएव्हच्या मुख्य चौकात निदर्शक आणि पोलीस समोरासमोर उभे ठाकले होते आणि अचानक गोळीबार सुरू झाला. बीबीसीचे प्रतिनिधी गेब्रिएल गेटहाऊस तेव्हा तिथेच उपस्थित होते. त्यांच्या हॉटेलसमोर अफरातफरी माजली. पोलिसांनी गोळीबार सुरू केला.

गेटहाऊस ज्या हॉटेलमध्ये उतरले होते, तिथे घाईघाईने जखमी आंदोलकांना आणलं जातं होतं.

पण अचानक आसपासच्या उंच बिल्डिंग्सवरून गोळ्या झाडल्या जाऊ लागल्या. पण या गोळ्या दोन्ही बाजूंवर झाडल्या जात होत्या. कोणीतरी तिसरंच यात गुंतलं होतं. कोणीतरी बाहुल्यांच्या दोऱ्या ओढत होतं.

गोंधळ कमी झाला, गोळीबार थांबला तेव्हा कळलं की 75 हून जास्त लोकांचा जीव गेलाय. पण या घटनेमुळे अशा काही गोष्टी घडत गेल्या की युक्रेन, क्रायमिया आणि रशियाचं भविष्य बदललं.

सगळ्यात गंमतीची गोष्ट म्हणजे या ही घटना आंदोलन चिरडण्यासाठी झाली नव्हती, निदान त्यानंतर ज्या गोष्टी घडल्या त्यावरून तरी वाटत नाही. त्यादिवशी आंदोलकांवर गोळीबार करणारे पोलीस गायब झाले. युक्रेनची संपूर्ण गुप्तहेर यंत्रणा एका रात्रीत गायब झाली. तत्कालीन रशियाधार्जिण्या राष्ट्राध्यक्षांनी राजीनामा दिला.

व्हॅलेंटिन नलेव्हाइचिंको गुप्तहेर प्रमुख झाले. त्यांनी त्या बीबीसीच्या गॅब्रिएल गेटहाऊस यांच्याशी बोलताना त्या दिवसाचं वर्णन केलं.

"गुप्तहेर संघटनेचं मुख्यालय रिकामं पडलं होतं. मागच्या अंगणात काही कागद आणि फाईल जाळल्याच्या खुणा होत्या. तुम्ही कल्पना करू शकत नाही. आमच्याकडे कोणतंच सुरक्षा सैन्य नव्हतं. आमच्या राष्ट्राच्या सुरक्षिततेच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या होत्या."

आंदोलकांच्या हातात सत्ता आली होती. पण युक्रेनच्या सुरक्षा यंत्रणा आता रशियासाठी काम करत होत्या. याच काळात रशियन सैन्याने क्रायमियाचा भाग ताब्यात घेतला. पण आधी ही सैनिक रशियाचे नाहीत असंच भासवलं गेलं

पण हे कसं आणि का घडलं? कोणालाच थांगपत्ता नाही. पण या गोळीबारच्या एका वर्षानंतर युक्रेनचे अध्यक्ष पेट्रोशेंको म्हटलं की या सगळ्याचा एकच सुत्रधार आहे आणि तोच बाहुल्यांच्या दोऱ्या ओढतोय. त्याचं नाव व्लादिमीर सरकॉव्ह.

दोनेत्स्क आणि लुहान्स्क प्रांत या युक्रेनच्या दोन प्रांतांचा ताबा फुटीरतवाद्यांनी 2014 मध्ये घेतला.

या फुटीरतावाद्यांचा नेता होता अॅलेक्झांडर बारडाय. बीबीसीचे गेब्रयल गेटहाऊस त्यांना भेटलेही होते. गंमत म्हणजे हा माणूस रशियन होता.

ते म्हणतात, "मी व्लादिस्लावला अनेकदा भेटलो होतो. मला तो माणूस एक कसलेला अभिनेता वाटतो. त्याचा शो आपण सगळे जण पाहातो आहोत. त्याने जे चित्र उभं केलं, जे जगाला दाखवलं, ते प्रत्यक्षात तसं होतं की नाही हे कोणाला माहिती. पण जगाचा पट व्लादिस्लाव्हने आपल्या पद्धतीने मांडला."

"रशिया युक्रेन युद्धाबद्दल तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल," बारडाय म्हणतात.

"युक्रेन नेहमीच रशियन जगाचा भाग होतं आणि राहील. हे युद्ध रशिया आणि पाश्चिमात्य देशांमधलं युद्ध आहे."

गेल्या 10 वर्षांत युक्रेनमध्ये जे घडत गेलं, क्रायमिया तसंच दोनेत्स्क आणि लुहान्स्क या भागांना रशियाने अवैधरित्या ताब्यात घेतल्यानंतर या दोन देशांमध्ये जे युद्ध सुरू झालं ते जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी होतं, आहे.

चर्चेच्या अनेक फेरी झडल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या माणसावर युक्रेनवर युद्ध लादल्याचा आरोप केला जातो, तोच माणूस या चर्चांमध्ये रशियाचं प्रतिनिधित्व करत होता, व्लादिस्लाव्ह सरकॉव्ह.

गेल्या दशकातल्या असंख्य तुकड्यांपैकी हे तीन तुकडे. अशाच तुकड्या तुकड्यांनी ही गोष्ट उभी राहाते कारण व्लादिमीर सरकॉव्ह या माणसाविषयी संपूर्ण माहिती कोणालाच नाही. ज्यांना होती, तेही कधी पुढे आले नाहीत.

ही गोष्ट आहे जगातल्या त्या सर्वात शक्तिशाली माणसाची ज्याच्याविषयी तुम्ही कदाचित कधीच ऐकलं नसेल. व्लादिस्लाव्ह सरकॉव्ह यांनी रशियन गुप्तहेर एजन्सी केजीबीच्या एका माजी गुप्तहेर घेतला, त्याला राजकारणाचे धडे दिले आणि राजकारणात आणलं.

आज जग त्यांना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन म्हणून ओळखतं.

पुतीन यांच्या सत्तास्थानाला धक्का लागू नये म्हणून सरकॉव्ह यांनी विरोधी पक्ष तयार केले, विद्यार्थी चळवळी तयार केल्या. पुतीन यांना विरोध करणारे लोकही सरकॉव्हने दिलेल्या स्क्रीप्टमधून आपले डायलॉग म्हणत होते.

जगातल्या काही अभ्यासकांच्या मते सरकॉव्ह पोस्ट ट्रुथ वर्ल्डचे जनक आहेत. म्हणजे? मुळ मुद्दे सोडून इतरच विषयांवर मीडियाचं लक्ष असतं, प्रत्येकाची आपली मतं असतात आणि तेच सत्य आहे असं त्यांना वाटतं. खरं काय खोटं काय हा मुद्दा राहातो बाजूला, प्रत्येक जण आपआपल्या फायद्याची गोष्ट विणत राहातो आणि सर्वसामान्यांना गंडवत राहतो.

ओळखीचं वाटतंय ना? तेच जे ट्रंप, ब्रेक्झिटपासून अगदी आताच्या महाराष्ट्रातल्या मंदिर-मशीद-भोंगे वादात घडतंय.

व्लादिस्लाव्ह सरकॉव्हच्या करियरची सुरुवात नाट्यक्षेत्रात झाली. ते कविता लिहायचे आणि त्यांनी नंतर पीआरमध्येही काम केलं.

रशियाच्या 'मॅनेज्ड डेमोक्रसीची' सुरुवात त्यांनी केली. म्हणजे काय तर निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करून आपल्या मनासारखे निकाल आणणं.

सरकॉव्ह आधी राष्ट्रपती प्रशासन विभागाचे उपप्रमुख होते, नंतर रशियाचे उप-पंतप्रधान झाले आणि नंतर रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या परराष्ट्र धोरणांचे सल्लागार.

रशियाच्या राजकारणावर 'नथिंग इज ट्रू अँड एव्हरीथिंग इज पॉसिबल' हे पुस्तक लिहिणारे पीटर पॉमेरांस्तेव्ह आपल्या एका लेखात लिहितात, "सरकॉव्हने रशियन समाजाला एका रिएलिटी शो सारखं चालवलं. त्याने एक टाळी वाजवली की हवेतून एखादा नवा राजकीय पक्ष तयार होतो. त्याने दुसरी टाळी वाजवली की 'नाशी' ही तरुणांची संघटना तयार होते जी हिटलरने तयार केलेल्या तरुण संघटनांच्या तत्त्वांवर चालते."

नाशीचे तरुण सदस्य रस्त्यावर राडा करायला कायम तयार असतात. लोकशाहीवादी कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली की त्यांच्या अंगावर धावून जातात. त्यांच्या दृष्टीने 'राष्ट्रदोही' असलेल्या लेखकांची पुस्तकं जाळतात.

राष्ट्रपती प्रशासन विभागाचे उपप्रमुख असताना सरकॉव्ह दर आठवड्याला रशियातल्या टीव्ही चॅनल्सच्या मालकांना भेटायचे. त्यांच्या चॅनल्सव्दारे कोणाचं कौतुक झालं पाहिजे, कोणावर हल्ला झाला पाहिजे, कोण टीव्हीवर दिसलं तर चालेल, कोण अजिबात दिसलं नाही पाहिजे अशा सगळ्या गोष्टी ठरवून द्यायचे.

रशियातले श्रीमंत लोक, अमेरिका आणि मध्यपुर्वेतले देश यांच्याविषयी इतकं काहीकाही बोललं जायचं, आणि त्या बोलण्यात सतत 'आपण' आणि 'ते' ही तुलना यायची की सर्वसामान्य रशियन माणसाला मनापासून पटलं पाहिजे की हे आपले शत्रू आहेत असं धोरणं सरकॉव्ह यांनी ठरवून दिलेलं होतं.

90 च्या दशकात सोव्हियत युनिनयचं विघटन झालं होतं. कम्युनिझमची पकड सैल होत होती. याच काळात रशियाला जाहिराती आणि पीआरचं महत्त्व कळायला लागलं होतं.

रशियात खाजगी चॅनल्स नव्हते आणि तेव्हाच्या सरकारी चॅनल्सवर जाहिरातींना परवानगी नव्हती. पण एक दिवस अचानक सरकारी चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांना धक्का बसला. त्यावर एक जाहिरात चालली. सरकॉव्हने हे कसं घडवून आणलं कोणालाच माहिती नाही.

त्यावेळी सरकॉव्ह एका अतिश्रीमंत माणसासाठी काम करत होते. त्याचं नाव मिखाईल खोदोरकोवस्की. 1992 साली या खोदोरकोवस्कीचीच जाहिरात टीव्हीवर दिसली.

खोदोरकोवस्कीच्या हातात पैशांचं एक बंडल होतं, चेहऱ्यावर स्मितहास्य होतं आणि म्हणत होता, "तुम्हालाही असे पैसे कमवायचे असतील तर माझ्या बँकेत खातं उघडा."

रशियाच्या समाजाला धक्का बसणारी गोष्ट होती ही. कारण पहिल्यांदा कंपनीचा मालकच जाहिरातीत दिसला. तो माणूस पैशांचं बंडल दाखवत होता. कधी नव्हे ते पैशांचं प्रदर्शन झालं. रशियात अतिश्रीमंत माणसं होते पण त्यांनी आपली श्रीमंती कायम लपवून ठेवली. पण समाज बदलतोय हे सगळ्यात आधी सरकॉव्हला समजलं.

1999 साली त्याने रशियाच्या संसदेत कामाला सुरुवात केली. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांची इमेज बदलण्याचं काम सरकॉव्हकडे आलं. याच काळात रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी खोदोरकोवस्कीला देशाबाहेर काढलं. त्यांच्यावर खटला चालला आणि याही वेळेस खोदोरकोवस्कीची अपराधी म्हणून इमेज सरकॉव्हनेच बनवली. एक नवा फोटो प्रकाशित झाला ज्यात खोदोरकोवस्की तुरुंगाच्या सळयांच्या मागे दिसत होते.

अर्थ स्पष्ट होता - तुम्ही अपराधी आहात की पैसे वाटणारे अतिश्रीमंत. तुमच्या नशिबाचा फैसला फक्त एक फोटो करणार आहे.

सरकॉव्हचे बॉस, विचार, निष्ठा दिवसागणिक बदलत होते. पण हा खेळही धोकादायक होता. 2011-12 च्या सुमारास त्यांना पदावरून दूर केलं गेलं. लोकांना वाटलं सरकॉव्ह संपला पण क्रायमियचं युद्ध सुरू झालं तेव्हा लक्षात आलं की याच्या मागे सरकॉव्हच होते.

काही वर्षांपूर्वी त्यांनी एक लघुकथा लिहिली होती. तिचं नाव 'विदाऊट स्काय'. या काल्पनिक कथेत एका युद्धाचं वर्णन आहे. ही कथा त्यांनी टोपणनावाने लिहिली आणि या कथेत पाचव्या महायुद्धानंतर जग कसं असेल याचं चित्रण आहे.

ग्लोबलाझेशनच्या काळात प्रत्येक माणसाची प्रगती होण्याऐवजी वेगवेगळ्या चळवळी, कंपन्या, शहरं आणि सरकारं एकमेकांशी कसे लढताहेत याचं वर्णन या कथेत आहेत. कोणी एक शत्रू नाही, सगळेच एकमेकांचे शत्रू.

"काही भाग एका बाजूने लढताहेत. त्यांच्याविरोधात उभी ठाकली आहे. एक अख्खी पिढी किंवा पुरुष आणि स्त्रिया एकमेकांच्या विरोधात लढताहेत. एक गाव एका बाजूने तर दुसरं दुसऱ्या बाजूने. कधीकधी तर चालू युद्धात लोक आपली बाजू बदलत आहेत. प्रत्येकाचं लक्ष्य वेगवेगळं आहे. त्यांना कळून चुकलंय की युद्ध जगण्याचा भाग आहे," सरकॉव्ह या कथेत लिहितात.

ज्या जगात आपण राहातो त्यावरच हे भाष्य आहे असं अनेक विचारवंतांना वाटलं. रशिया जागतिक राजकारणात जसं वागतो त्याचंच हे प्रतिबिंब होतं हेही अनेकांनी म्हटलं.

पीटर लिहितात, "रशियाकडून वेगवेगळ्या गटांना वेगवेगळे संदेश जातात. ते कायम आपली बाजू परिस्थितीनुसार बदलत असतात. युरोपच्या अतिउजव्या, राष्ट्रवादी गटांना रशियाची युरोपियन युनियनविरोधातली भूमिका जवळची वाटते. डाव्यांना ते अमेरिकेच्या भांडवलशाहीचं वाढतं साम्राज्य कसं धोकादायक आहे हे सांगून आकर्षित करतात. तर खुद्द अमेरिकेतल्या कट्टरतावाद्यांना रशियाचा संसदेने समलैंगिकतेविरोधात पुकारलेल्या लढाईचं कौतुक आहे. काय खरं, काय खोटं कोणालाच माहिती नाही. पण प्रत्येकाला जे ऐकायचं ते ऐकवलं जातंय."

वीस वर्षांच्या या खेळानंतर व्लादिमीर सरकॉव्ह पुन्हा नाहीसे झालेत. पुतीन यांची त्यांच्यावर खप्पा मर्जी झालीये अशा वंदता उठल्यात.

फेब्रुवारी 2020 मध्ये बातमी आली की पुतीन यांनी सरकॉव्ह यांना आपल्या पदावरून बाजूला केलंय. पण बीबीसीच्या गॅब्रिअल गेटहाऊस यांना असं अजिबात वाटत नाही की सरकॉव्ह संपलेत.

ते आपल्या एका लेखात लिहितात की, "एक काळ होता जेव्हा व्लादिमीर सरकॉव्ह रशियातला, आणि कदाचित जगातला सर्वात शक्तीशाली माणूस होता. रशियात त्याच्या इशाऱ्यावर सगळ्या गोष्टी घडायच्या. सरकारच नाही, विरोधी पक्षही त्याच्या म्हणण्यावर चालायचे."

पण 2011-12 साली रशियात पुतीन यांच्याविरोधात लोक रस्त्यावर आले, मोठी आंदोलनं झाली. ही आंदोलनं थांबवण्यात सरकॉव्ह यांनी काहीचं केलं नाही असा आरोप झाला आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला.

" लोकांना तेव्हाही वाटलं की सरकॉव्ह संपला पण जेव्हा त्याचं पुन्हा दर्शन झालं तो चक्क रशियाचं युक्रेनविरोधातलं युद्ध घडवून आणत होता. आज तो पडद्यामागे गेला असला तरी पुन्हा कधीही उगवेल."

पीटर पॉमेरांस्तेव्ह यांनी आपल्या पुस्तकात सरकॉव्हचा एक किस्सा सांगितलेला आहे.

ते लिहितात, "2013 सालच्या आपल्या एका भाषणात सरकॉव्ह म्हणाला होता की मी नव्या रशियाची गोष्ट लिहिणाऱ्या लेखकांपैकी एक आहे. क्रेमलिन (रशियाची संसद)मध्ये माझ्याकडे विचारधारा, माध्यमं, राजकीय पक्ष, धर्म, आधुनिकीकरण, संशोधन, परराष्ट्र संबंध आणि मॉडर्न आर्ट या सगळ्यांची जबाबदारी आहे."

लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अँड पॉलिटिकल स्टडीजच्या विद्यार्थ्यांसमोर भाषण देताना सरकॉव्हने त्यांना म्हटलं की मी भाषण करणार नाही, आपण एकमेकांशी संवाद साधू, तुम्ही तुमचे प्रश्न विचारा.

"पहिल्या प्रश्नानंतर सरकॉव्ह 45 मिनिटं बोलला आणि इतरांना काही विचारायची संधीच मिळाली नाही," पीटर लिहितात.

"त्याने जन्माला घातलेल्या, घडवलेल्या राजकीय सिस्टिमचा हा उत्तम नमुना होता. जिथे वरवर दाखवायला लोकशाही आहे, पण प्रत्यक्षात काही ठरविक माणसं सगळं कंट्रोल करतात."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)