You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हत्तीरोग म्हणजे काय? तो कसा होतो? याला आळा घालणं शक्य आहे का?
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
हत्तीरोग डास चावल्याने जंतू संसर्गामुळे होणारा रोग आहे. हत्तीरोग झालेल्या रुग्णाच्या पायला खूप जास्त सूज येते, ज्यामुळे पायाचा आकार बदलतो आणि पाय विद्रुप झालेला दिसून येतो. राज्यात हत्तीरोगाचे सर्वाधिक 23 हजार 823 रुग्ण पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्यांमध्ये असून चंद्रपूर जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे.चंद्रपूर जिल्ह्यात हत्तीपायाचे 10 हजार 380 रुग्ण आढळून आल्याचे जानेवारी 2023 मध्ये निदर्शनास आले आहे.
'क्युलेक्स' प्रजातीच्या डासांपासून हत्तीरोग पसरतो. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार क्लुलेक्स डास हत्तीरोगास कारणीभूत 'बुचेरिया बॅनक्रॉफ्टीया' या परजीवी जंतूंचा प्रसार करतात.
आरोग्य विभागाचे सहसंचालक आणि हत्तीरोग मोहिमेचे प्रमुख डॉ. स्वप्नील लेळे यांनी राज्यभरात सद्यस्थितीत हत्तीरोगाने ग्रस्त 29,000 पेक्षा जास्त रुग्ण असल्याची माहिती दिली आहे.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हत्तीरोगाचा मु्द्दा मोठा गाजला होता. हत्तीरोगाचा प्रसार कसा होतो? त्याला आळा घालणं शक्य आहे का? हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
हत्तीरोग कसा पसरतो?
डास चावल्यामुळे हत्तीरोग होतो.
क्लुलेक्स प्रजातीचे डास हत्तीरोगासाठी कारणीभूत 'बुचेरिया बॅनक्रॉफ्टीया' या परजीवी जंतूंचे वाहक असतात. हा परजीवी वाहक डास मानुष्याला चावल्यानंतर हत्तीरोगाचे जंतू माणसाच्या शरीरात सोडतो.
माणसाच्या शरीरात हे जंतू चावलेल्या ठिकाणाहून किंवा अन्य ठिकाणाहून त्वचेतून शरीरात प्रवेश करतात.
प्रौढ अवस्थेमध्ये हत्तीरोगाचे जंतू लसीका संस्थेच्या (lymph node) वाहिन्यांमध्ये राहतात. लसीका संस्था ही लसीकाग्रंथी आणि लसीका वाहिन्यांची बनलेली यंत्रणा असून ती शरीरातील रोगप्रतिकार शक्ती अबाधित ठेवण्याचं कार्य करते.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, हत्तीरोगाच्या जंतूंनी शरीरात प्रवेश केल्यानंतर मायक्रोफायलेरिया रक्तात सापडण्याच्या निश्चित कालावधीबाबत माहिती नाही. पण, हत्तीरोगाच्या जंतूंनी शरीरात प्रवेश केल्यानंतर लक्षणं दिसून येण्यासाठी साधारणत: 8 ते 16 महिन्यांचा कालावधी लागतो.
मुंबईतील जनरल फिजिशियन डॉ. अनिल पाचणेकर सांगतात, मुंबईत हत्तीरोग रुग्णांची संख्या 2-3 टक्के आहे.
राज्यातील हत्तीरोगाचा मुद्दा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मोठा गाजला होता. त्यावेळी बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले होते, "राज्यातील 18 राज्यात हत्तीरोगाचे रुग्ण आहेत. ज्यातील सिंधुदुर्ग, अकोला, जळगाव, अमरावती, वर्धा, सोलापूर, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांनी संक्रमक तपास सर्व्हेक्षणाच्या तीन फेऱ्या पूर्ण केल्या आहेत.
तर चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, ठाणे, नागपूर, नांदेड, यवतमाळ, नंदुरबार आणि पालघरमध्ये कारवाई सुरू आहे.
हत्तीरोगाची लक्षणं काय?
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, हत्तीरोगाच्या लक्षणाच्या चार अवस्था असतात.
जंतू शरीरात शिरकाव केल्यानंतर आजाराची लक्षणं दिसून येऊ शकतात.
लक्षणविरहीत किंवा वाहक अवस्थेमध्ये रुग्णाच्या रात्री घेतलेल्या रक्ताच्या नमुन्यात मायक्रो फायलेरिया आढळून येतात. मात्र रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं आढळून येत नाहीत.
तीव्र लक्षण अवस्थेत- ताप येतो, लसीकाग्रंथींचा दाह सुरू होतो. लसीकाग्रंथींना सूज येते किंवा पुरुषांमध्ये वृषणदाह सुरू होतो.
दीर्घकालीन संसर्गावस्थेत, हात, पाय आणि बाह्य जननेंद्रीयांमध्ये सूज येते.
मुंबई महापालिकेचे अधिकारी म्हणतात, हत्तीरोगाचे जंतू विशिष्ठ सवयीमुळे माणसाच्या रक्तात रात्री मोठ्या प्रमाणात आढळून येतात.
डॉ. पाचणेकर सांगतात, "हत्तीरोगाचे जंतू संध्याकाळी 8.30 ते रात्री 12 या काळात जास्त अॅक्टिव्ह असतात. त्यामुळे रात्रीच रक्ताचा नमुना घेऊन हत्तीरोगाची तपासणी करण्यात येते."
भारतात 98 टक्के हत्तीरोगाचा प्रसार 'बुचेरिया बॅनक्रॉफ्टीया' या परजीवीमुळे होतो. क्युलेक्स जातीच्या डासांमध्ये हे परजीवी आहेत का नाही हे तपासण्यासाठी मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागाचे कर्मचारी, क्युलेक्स प्रजातीचे डास पकडून त्यांचा अभ्यास करतात.
क्युलेक्स डासांची उत्पत्ती कुठे होते?
हत्तीरोग पसरवणाऱ्या परजीवींचा वाहक क्लुलेक्स प्रजातीच्या डासांच्या वाढीसाठी 22 ते 37 डिग्री तापमान आणि 70 टक्के आद्रता हे पोषक वातावरण असतं.
तज्ज्ञांच्या मते, क्लुलेक्स प्रजातीचे डास दुषित पाणी आणि घाणीच्या जागी मोठ्या प्रमाणात वाढतात. मुंबई महापालिकेचे अधिकारी सांगतात, क्युलेक्स प्रजातीचे डास बांधकाम मजुरांची घरं, पडक्या इमारती, नाल्यांच्या बाजूला असणारी घरं या परिसरात मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.
कोरोनानंतर मुंबईत गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणावर हत्तीरोग पसरवणारे वाहक डास आढळून आले होते.
मुंबई महापालिकेच्या प्रयोगशाळा तज्ज्ञ उषा वाघ याचं कारण सांगताना म्हणाल्या, "कोरोनाकाळात मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालं. मजूर आपल्या गावी राहिले. त्यानंतर परत आलेले काही लोक बहुदा संक्रमित होते. त्यामुळे आम्हाला गेल्यावर्षी खूप इनफेक्टेड डास आढळून आले होते."
हत्तीरोगाची लागण कोणाला होऊ शकते?
माणसांमध्ये फार पूर्वीपासून हत्तीरोगाचे जंतू आढळून येतात. देशातील 250 जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वरुपात लागण झालेल्या हत्तीरोग रुग्णांची नोंद आहे.
आरोग्यविभागाच्या मते -
- सर्व वयोगटातील व्यक्तींना हत्तीरोगाची लागण होऊ शकते.
- स्त्री आणि पुरुष दोघांनाही हत्तीरोग होऊ शकतो.
- हत्तीरोगाचा प्रादुर्भाव असलेल्या परिसरात पुरुषांमध्ये हत्तीरोगाचं प्रमाण जास्त असल्याचं दिसून येतं.
- काम आणि इतर कारणांमुळे वारंवार स्थलांतर करणाऱ्या लोकांमुळे एका भागातून दुसऱ्या भागात हत्तीरोगाचा प्रसार होतो.
- हत्तीरोगाच्या रोगप्रतिकारशक्तीबाबत अद्याप निश्चित माहिती उपलब्ध नाही.
- वाढतं शहरीकरण, स्थलांतर, औद्योगिकीकरण, अस्वच्छता, गरीबी आणि इतर कारणं याच्या प्रसारासाठी कारणीभूत आहेत.
प्रतिबंधात्मक उपाययोजना काय?
- डास अळी अवस्थेत असताना डासांची उत्पत्ती स्थानं कमी करणे.
- मैला, घाण यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे.
- साचलेल्या पाण्यातून वनस्पती, गवत काढून टाकणे.
- कीटकनाशकांची फवारणी करणे.
- लोकांमध्ये हत्तीरोगाबाबत जनजागृती करणे.
या बरोबरच हत्तीरोग झालेल्या रुग्णांनी काळजी घेणंसुद्धा गरजेचं आहे.
तज्ज्ञ सांगतात -
- हत्तीपाय ग्रस्त रुग्णांनी तीव्र लक्षणं टाळण्यासाठी पायांची किंवा बाधित अवयवांची साबण आणि पाण्याने स्वच्छता ठेवावी.
- पायाच्या आकाराप्रमाणे चपला घालाव्यात. पायाला जखम होणार नाही याची काळजी घ्यावी.
- आपल्या आसपासच्या परिसराची स्वच्छता राखावी.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)