झाडांना असा सहन करावा लागतो तुमच्या-आमच्या शिक्षणाचा त्रास

    • Author, पीटर रूबिनस्टेन
    • Role, बीबीसी फ्यूचर

अनेक देशांमध्ये पावसाळ्याच्या दिवसांत शाळेच्या नव्या वर्षाला सुरुवात होते. पण, कोणी जर अमेरिका, रशिया, आईसलँड आणि चिलीमध्ये राहत असेल तर मग त्यांची गोष्टच वेगळी आहे.

सुरुवातीला काही प्रश्न.

1. कोणत्या देशात सर्वांत कमी वेळ मुलं शाळेत जातात?

2. कोणत्या देशातली कुटुंब शाळेच्या साहित्यावर सर्वांधिक खर्च करतात?

3. कोणत्या देशातली मुलं जिवनातली 23 वर्षं शिकण्यात वाया घालवतात?

जर भारतातली शिक्षण व्यवस्था खूप महागडी आहे असा विचार तुम्ही करत असाल तर आकड्यांवर नीट लक्ष द्या.

27.5 अब्ज डॉलर रुपयांमध्ये किती पेपर आणि गम खरेदी करता येईल?

अमेरिकेत कोणत्याही एका मुलाच्या किंवा मुलीच्या केजी ते सेकंडरी स्कूलपर्यंतच्या शिक्षणासाठी आई-वडील 685 डॉलरची स्टेशनरी खरेदी करतात. म्हणजेच अमेरिकेच्या प्रत्येक मुला-मुलींच्या इंटरमिजिएटपर्यंतच्या शिक्षणात 50,000 रुपये केवळ स्टेशनरीवर खर्च होतो.

2005मध्ये होणाऱ्या स्टेशनरीच्या खर्चापेक्षा हा खर्च २५० डॉलरने जास्त आहे. संपूर्ण अमेरिकेचा विचार करायचा झाला तर, 2018मध्ये आतापर्यंत 27.5 अब्ज डॉलर शाळेतल्या मुलांची स्टेशनरी खरेदी करण्यावर खर्च झाले आहेत.

या खर्चात विद्यापीठातल्या शिक्षणासाठी येणारा खर्च जोडला तर हा खर्च तब्बल 83 अब्ज डॉलर होईल. यात सगळ्यांत महागडी वस्तू असते कंप्युटर.

प्रत्येक अमेरिकी कुटुंब सरासरी 299 डॉलर म्हणजे जवळपास 21,000 रुपयांचा कंप्युटर खरेदी करतं. त्यानंतर सगळ्यांत मोठा खर्च असतो कपड्यांचा. प्रत्येक मुलाच्या कपड्यांसाठी 286 डॉलर म्हणजे 19,000 डॉलर इतका खर्च येतो.

बाइंडर्स, फोल्डर, पुस्तकं आणि दुसऱ्या इतर वस्तूंसाठी 112 डॉलर प्रत्येक मुलासाठी खर्च येतो. अमेरिकेतल्या मुला-मुलींच्या शाळेशी संबंधित खर्चामध्ये वाढ होतच आहे. (स्रोत - डेलॉय)

डेन्मार्कमधली मुलं वर्षभरात 1000 तास शाळेत घालवतात

33 विकसित देशांमध्ये रशियातली मुलं सगळ्यांत कमी वेळ शाळेत व्यतीत करतात. ते वर्षभरात केवळ 500 तास शाळेत घालवतात. तर, जगात सरासरी 800 तास मुलं वर्षभर शाळेत घालवतात.

रशियातल्या मुलांना प्रत्येक तासानंतर ब्रेक मिळतो. म्हणजे सरासरी प्रत्येक रशियन विद्यार्थी शाळेत दररोज 5 तास शाळेत घालवतो. रशियातली मुलं एकूण 8 महिने शाळेत घालवतात. इतकं असूनही रशियातली साक्षरता 100 टक्के आहे.

तर, दुसरीकडे डेन्मार्क हा देश आहे. इथं प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांना वर्षभरात 1000 तास शाळेत घालवावे लागतात.

रशियाच्या तुलनेत 2 महिने जास्त ही मुलं शाळेत जातात. डेन्मार्कमध्ये शाळेचे दिवसही मोठे असतात. शिक्षणाच्या प्रकरणात जगातल्या पहिल्या 5 देशात डेन्मार्कचा क्रमांक लागतो. शाळेत जास्त वेळ घालवण्याचे असे फायदे आहेत. (स्रोत - OECD)

स्वस्तात शिकायचं तर हाँगकाँगबद्दल विचारही करू नका

विकसित देशांचा विचार करायचा झाला तर शाळेच्या शिक्षणात 1 लाख डॉलरपर्यंत खर्च होऊ शकतो. क्लासची फी, पुस्तकं, येण्या-जाण्याचा खर्च, राहण्याचा खर्च, प्राथमिक शिक्षण ते पदवीपर्यंतच्या खर्चाचा विचार केला तर हाँगकाँगमधलं शिक्षण सर्वांत महागडं आहे.

इथल्या लोकांना सरासरी 1 लाख 31 हजार 161 डॉलर म्हणजेच 92 लाखांहून अधिक रक्कम खर्च करावी लागते. मुलांसाठी येणारा हा खर्च त्यांना सरकारकडून मिळणारा फंड किंवा कर्जाव्यतिरिक्त आहे.

महागड्या शिक्षणाच्या बाबतीत दुसरा क्रमांक संयुक्त अरब अमिरातीचा आहे. इथल्या एका मुलाच्या शिक्षणासाठी 99 हजार डॉलर म्हणजे जवळपास 70 लाख रुपये खर्च येतो. तर, सिंगापूरमध्ये एका मुलाच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी 71,000 डॉलर तर अमेरिकेत सरासरी 58,000 डॉलर म्हणजेच 41 लाख रुपये पडतात.

अमेरिकेत एवढं महाग शिक्षण असलं तरी इथल्या लोकांना यातला केवळ 23 टक्केच खर्चाचा भार उचलावा लागतो. फ्रान्समध्ये हाच खर्च सरासरी 16,000 डॉलर म्हणजेच 11 लाख रुपये एवढा असतो. (स्रोत - HSBC/सॅली)

झाडंही उचलतात मुलांच्या शिक्षणाचा खर्च

डिजिटल होऊ पाहणाऱ्या या जगात ही गोष्ट ऐकून हैराण व्हाल. आजही जगात मोठ्या प्रमाणात पेन्सिलीचा वापर शिक्षणात केला जातो. पेन्सिलीचा शोध लागल्यानंतर 400 वर्षांनंतरही आज जगभरात 15 ते 20 अब्ज पेन्सिलींची निर्मिती केली जाते.

यासाठी अमेरिकेत वायव्य पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावर उगवणाऱ्या सेडार वृक्षाच्या लाकडाचा वापर केला जातो. तर, पेन्सिलीत वापरलं जाणारं ग्रॅफाईट चीन किंवा श्रीलंकेतून येतं. यामुळे जगभरात भरपूर पेन्सिली उपलब्ध होतात. यासाठी वर्षभरात 60,000 ते 80.000 झाडं कापली जातात. (स्रोत - द इकोनॉमिस्ट)

ऑस्ट्रेलियातल्या मुलांचं एक चतुर्थांश आयुष्य शाळेत जातं

आयुष्यातली एक वेळ अशी येते की, शिक्षण आयुष्यातून संपून जातं. पण, न्यूझीलँड आणि आईसलँडमध्ये जवळपास दोन दशकं शिक्षण घ्यावं लागतं.

तर, याहून सगळ्यांत जास्त 22.9 वर्षं शिक्षण ऑस्ट्रेलियातल्या मुलांना घ्यावं लागतं. इथली मुलं 7व्या वर्षापासून शाळेत जाण्यास सुरुवात करतात.

नायजेरियातली मुलं सरासरी 5.3 वर्षं शाळेत जातात. ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत हे 17 वर्षं कमी आहे. (स्रोत - ग्लोबल इनोवेशन इंडेक्स)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)