मदर्स डे : 'आई तू कधीच मला सोडून जाणार नाहीस, झाडांच्या रुपात नेहमी सोबत असशील'

    • Author, स्वाती पाटील
    • Role, बीबीसी मराठीसाठी

अभिनेते सयाजी शिंदे यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने पन्हाळा, वसंतगड, सदाशिवगड या गडांवर शेकडो झाडं लावण्याचा उपक्रम राबवला होता. मदर्स डे च्या निमित्ताने त्या उपक्रमाविषयी जाणून घेऊया.

सयाजी शिंदे यांनी त्यांच्या आई सुलोचना मुगुटराव शिंदे यांच्या वजनाच्या बिया महाराष्ट्रभर लावण्याचा निर्धार केला आहे.

"आई तू कधीच मला सोडून जाणार नाहीस, झाडांच्या रुपात तू नेहमी माझ्या सोबत असशील," असं आपण आईला सांगितलं होतं असं सयाजी शिंदे सांगतात.

आईच्या प्रेमाखातर त्यांनी त्यांच्या आईच्या वाढदिवसाला एक अनोखी भेट दिली होती. सयाजी यांनी झाडांच्या बियांसोबत आईची तुला केली होती. आईच्या वजनाइतक्या बिया त्यांनी महाराष्ट्रात लावल्या. त्यामुळे रुजलेल्या या बियांच्या झाडात आईचं वास्तव्य आहे, असं ते सांगतात.

आई जिवंत असताना तिच्या वाढदिवसाला तिच्या वजनाएवढ्या बियांची तुला केली होती. त्या बिया महाराष्ट्रात लावतोय त्यामुळं त्या झाडात, पानात, फुलांत, सुंगधात आई जिवंत आहे. त्यामुळं मृत्यूनंतरही आई सोबत आहे, असं सयाजी यांनी सांगितलं.

झाडाचे गुण गाऊ, झाडाचं गुण घेऊ असं सांगत अभिनेता सयाजी शिंदे यांनी वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला आहे. झाडांबद्दलचं हे प्रेम ही प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या आईंकडून मिळाल्याचं सयाजी सांगतात.

"माणसांच्या सावलीला आपण उभं राहत नाही तर आपण झाडाच्या सावलीला उभं राहतो. त्यामुळे आपल्या माणसांसाठी ही झाडं जगवली पाहिजेत त्यासाठी प्रत्येकाने स्वतः पुढाकार घेतला पाहिजे," असं ते पुढे सांगतात.

वृक्षसंवर्धनाची गरज असल्याने प्रत्येकानं झाडं जगवली पाहिजेत. यासाठी प्रत्येकाचा सहभाग असायला हवा हे सांगताना त्यांनी झाडाचं महत्व पटवून दिलं.

आज आपल्या प्रत्येकाला जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे. पण त्यासाठी आपण काय करतोय असा सवाल ते करतात. त्यामुळे वृक्षसंवर्धनाची सुरूवात स्वतःपासून करायला हवी असं ते सांगतात.

शिवाजी महाराजांनी दिली प्रेरणा

वृक्षसंवर्धानाची ही प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पर्यावरण प्रेमावरून सयाजी यांनी घेतली आहे. शिवरायांनी त्यांच्या काळात रयतेच्या भाजीच्या देठाला हात लावला नव्हता. इतकी त्याना झांडाबद्दल तळमळ होती.

आंबा, फणस, सागवान अशी झाडं शिवरायांनी आरमाराच्या प्रयोजनासाठी जगवली होती. ही झाडं तोडू नये यासाठी त्यांनी आज्ञापत्रं काढलं होतं.

या आज्ञापत्रानुसार, रयतेने या झाडांना लेकरासारखं जगवलं आहे. त्यामुळे ही झाडं तोडू नये. केवळ जीर्ण झाडं तोडायला परवानगी आहे. ही परवानगी त्या झाडाच्या मालकानं द्यायला हवी, असा शिवाजी महाराजांचा आदेश होता. त्यासाठी त्या झाडाच्या मालकाला योग्य ती रक्कम देण्यात यावी, असं ही महाराजांनी या आज्ञापत्रात लिहीलं होतं.

या अज्ञापत्रातूनच आपल्याला प्रेरणा मिळाल्याचं सयाजी सागंतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)