You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सांगली वटवृक्ष वाचवा मोहीमेला यश, 400 वर्षं जुनं झाड वाचलं
- Author, स्वाती पाटील
- Role, बीबीसी मराठीसाठी
सांगली जिल्ह्यातील भोसे गावाच्या हद्दीत असलेलं 400 वर्षांपूर्वीचं झाड राष्ट्रीय महामार्गात जाणार होतं. हे झाड वाचावं यासाठी वृक्षप्रेमींनी आणि गावकऱ्यांनी मोहीम राबवली होती. या मोहिमेला यश आलं आहे.
हे झाड तोडलं जाणार नसल्याचं आपल्याला कळवण्यात आलं आहे असं ट्विट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
याआधी काय झालं?
रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 च्या चौपदरीकरणाचं काम सुरू आहे. या मार्गावर मिरज ते पंढरपूर दरम्यान मौजे भोसे गावात गट नंबर 436 मध्ये यल्लमा मंदिराशेजारी 400 वर्षांचा जुना वटवृक्ष आहे. मात्र, महामार्गाच्या रुंदीकरणासाठी वडाचं हे झाड तोडण्यात येणार आहे. याला वृक्षप्रेमींनी विरोध केला आहे.
वडाचे झाड किमान 1000 वर्षं जगते. त्यापासून आपल्याला पर्यावरणाच्या दृष्टीने असंख्य फायदे मिळतात. पण 400 वर्ष जुनं झाड आता तोडण्यात येणार आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या या झाडाला तोडल्यानंतर पुन्हा असे झाड येण्यासाठी 400 वर्ष वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे महामार्गसाठी पर्यायी मार्गाचा विचार करावा अन्यथा उपोषणाचा इशारा वृक्षप्रेमी प्रवीण शिंदे यांनी दिला आहे.
वडाच्या या झाडाला वाचवण्यासाठी सुरू केलेल्या या मोहिमेला सह्याद्री वनराई चे सयाजी शिंदे, अरविंद जगताप यांनी पाठिंबा दिला आहे. तर वकील असीम सरोदे यांनी कायदेशीर मदतीचे आश्वासन दिले आहे.
आषाढी वारीदरम्यान मिरजमार्गे पंढरपूरला जाताना शेकडो वारकरी याच झाडाखाली विसावा घेतात. पर्यावरणाचा समतोल राखणारे हे झाड तोडू नये अशी विनंती भोसे गावातील गावकरी शिवाजी बोळी यांनी केली आहे
वडाच्या झाडाचे संवर्धन करावे या मागणीसाठी निसर्गप्रेमी आणि भोसे गावातील गावकऱ्यांनी या झाडाला मिठी मारत चिपको आंदोलन केले. यावेळी झाड वाचलेच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. तर वारकरी संप्रदायातील लोकांनी झाडाखाली टाळ मृदंग वाजवत भजन करत झाड वाचवण्यासाठी साद घातली आहे.
भोसे गावात 400 वर्षांपूर्वीचा महाकाय वटवृक्ष आहे त्याचा विस्तार जवळपास 400 चौ मी इतका व्यापक आहे. हा वटवृक्ष ऐतिहासिक ठेवा तर आहेच पण हे वटवाघूळ आणि दुर्मिळ प्रजातींचे निवासस्थान आहे त्यामुळं हा वटवृक्ष तोडण्यात येऊ नये अशी विनंती सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यानी पत्राद्वारे नितीन गडकरी यांना केली आहे.
दरवर्षी पौष महिन्यात यल्लमा मंदिरात यात्रा भरते. यावेळी जिल्ह्यासह परराज्यातील भाविक येतात. हे भाविक याच झाडाखाली निवास करतात. त्यामुळं हे झाड तोडण्यात येऊ नये अशी विनंती करणारा ठराव मंजूर करण्यात आला आहे. भोसे गावातील गावकऱ्यांनी नुकतीच ग्रामसभा घेत हा ठराव मंजूर केला आहे भारत सरकारने या विनंतीची दखल घ्यावी अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली.
वडाच्या या झाडावर फुलपाखरू, माकड, वटवाघूळ, आणि इतर प्राणी तसंच दुर्मिळ जातींचे असे 700 हून अधिक प्रजाती निवास करतात. त्यामुळं गावकऱ्यांसह निसर्गप्रेमींना हे झाड जिव्हाळ्याचा विषय आहे.
या झाडाचा इतिहास माहीत असूनही सरकार हे झाड तोडण्याचा घाट घालत आहे असा आरोप वृक्षप्रेमी दिनेश कदम यांनी केला आहे. या महामार्गासाठी मिरज ते भोसेपर्यंतची 50 वर्षांपूर्वीची जवळपास 930 झाडं तोडली आहेत. शेजारी मार्ग मोकळा असून देखील या झाडावर कुऱ्हाड मारली जाते. सरकार केवळ फायद्यासाठी 400 वर्ष जुनं वडाचे झाड तोडत आहे असा आरोप दिनेश कदम यांनी केला.
या झाडाला वाचवण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आंदोलन करण्यात येत आहे. यासाठी एक ऑनलाइन पिटीशन दाखल केली असून त्याला पाठिंबा देण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
शिवकालीन वड वाचवण्यासाठी सुरू असलेल्या या मोहिमेची राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दखल घेतली आहे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना आदित्य ठाकरे यांनी नुकतेच एक पत्र पाठवले.
या पत्रातून भोसे गावातील वटवृक्षाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी या वटवृक्षाचे जतन करण्याची विनंती आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून अजून यावर उत्तर आलेले नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)