लोणारच्या गुलाबी तलावाचे 'नासा'ने काढले अंतराळातून फोटो

महाराष्ट्राच्या बुलडाणा जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याचे सरोवर जगातील आश्चर्य म्हणून ओळखलं जातं. मात्र, या जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग गेल्या काही दिवसांपासून गुलाबी झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

अवघ्या काही दिवसांच्या अंतरानं अमेरिकेच्या लँडसॅट या उपग्रहानं ही दृश्यं टिपली आहेत. नासाच्या लँडसॅट या उपग्रहानं घेतलेल्या 25 मे आणि 10 जूनच्या फोटोंमध्ये लोणार सरोवराच्या पाण्यातील फरक स्पष्टपणे दिसून आलाय.

वैज्ञानिकांनी या तलावातील पाण्याचे नमुने घेतले असून नेमका कशानं पाण्याचा रंग बदलला असावा याची तपासणी सुरू आहे. खाऱ्या पाण्यातील सूक्ष्मजीवांमुळे असं झालं असल्याचा त्यांचा अंदाज आहे.

ऑस्ट्रेलियाच्या लेक हिलियरलाही युनेलैला सलायना या प्रजातीच्या एकपेशीय शेवाळामुळे असा गुलाबी रंग चढत असल्याचं यापूर्वी दिसून आलं होतं. पाणी काहीसं शुद्ध असेल तर हे जीव हिरव्या रंगाचे असातात. पण पाणी खूप जास्त खारट झालं किंवा सूर्यप्रकाश खूप जास्त प्रमाणात मिळाला, तर ते बीटा-कॅरोटिनसारखे पदार्थ तयार करतात आणि पाणी गुलाबी होतं. पण लेक हिलियर कायम गुलाबी रंगाचं असतं.

लोणारमध्ये मात्र उष्णतेमुळे पाण्याची वाफ होण्याचं प्रमाण वाढून ते खारट बनलं असावं असा अंदाज आहे. इराणच्या लेक उर्मियामध्ये दरवर्षी उन्हाळ्यात असंच चित्र दिसून येतं.महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातलं लोणार सरोवर हे एक नैसर्गिक आश्चर्य आहे. अशनीपातामुळे तयार झालेल्या विवरामुळे हे सरोवर बनलं असल्याचं 1970च्या दशकातील संशोदनातून स्पष्ट झालं होतं.

उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणार सरोवर जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सरोवर आहे. हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे.

ऐरवी, इथलं पाणी हिरव्या रंगाचं असतं. अचानक पाण्याचा रंग गुलाबी झाल्याने सर्वजण आश्चर्यचकित झालेत. तर अनेकांच्या मनात याबाबत कुतुहुलही निर्माण झालं आहे.

पाण्याचा रंग बदलल्याचं लोणारच्या तहसीलदारांनीही मान्य केलं आहे.

"पाण्याने रंग कशामुळे बदलला, याचं संशोधन सुरू आहे. वनविभागाला या ठिकाणची सँपल्स घ्यायला सांगितलं असून तपासणीनंतरच यामागचं नेमकं कारण कळू शकेल," अशी माहिती तहसीलदार सैफन नदाफ यांनी दिली.

याबाबत सध्या अधिक संशोधन सुरू आहे. महाराष्ट्रातील सगळ्यांत छोटं पक्षी अभयारण्य म्हणूनही लोणार सरोवराची ओळख आहे.

लोणार शहरातील सांडपाणी आणि पावसाचं पाणी सरोवरात गेल्याने सरोवर गढूळ झालं असावे अशी शक्यता गावकऱ्यांकडून केली जात आहे.

मात्र शहरातील सांडपाणी आणि पावसाच्या पाण्यामुळे सरोवरातील पाण्याचा रंग बदलला नसल्याचे तहसीलदार सैदल नदाफ यांचं म्हणणे आहे. पाण्याचा रंग कशामुळे बदलला याची चौकशी करण्यात येत आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)