कॉफीच्या झाडांच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर : संशोधन

    • Author, हेलन ब्रिग्ज
    • Role, बीबीसी न्यूज

जगभरात कॉफीच्या जवळपास 124 प्रजाती आढळतात. यापैकी 60% प्रजाती लवकरच नामशेष होण्याची भीती आहे. नुकताच याविषयीचा सखोल अभ्यास प्रसिद्ध करण्यात आला आहे.

जंगलात कॉफीच्या जवळपास 100 प्रकारच्या प्रजाती आढळतात. त्यापैकी केवळ दोन प्रकारची कॉफी आपण पेय म्हणून वापरतो.

लागवडीखालील कॉफीच्या पिकासाठी जंगली कॉफी टिकणे गरजेचे आहे आणि त्यामुळेच सध्याची परिस्थिती गंभीर असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

जगात पाचपैकी एक वनस्पती धोक्यात आहे आणि 60% ही संख्या "खूपच जास्त" आहे.

क्यूच्या रॉयल बॉटोनिक गार्डनचे डॉ. अॅरॉन डेव्हिस म्हणतात, "जंगली कॉफी नसती तर आज आपण जी कॉफी पितो ती मिळाली नसती."

"कॉफी लागवडीचा इतिहास बघितला तर कॉफीची पैदास करण्यासाठी जंगली कॉफीचाच वापर करण्यात आलेला आहे."

यासंदर्भात 'Science Advances' या मासिकात एक संशोधन छापून आलेले आहे. त्यानुसार दीर्घकालीन जागतिक कॉफी उत्पादनासाठी 'महत्त्वाच्या' असलेल्या कॉफीसह जंगली कॉफीच्या संवर्धनासाठी करण्यात आलेले उपाय 'अपुरे' पडत आहेत.

आज माहिती असलेल्या जंगली कॉफीपैकी 75 प्रकारच्या प्रजाती नामशेष होण्याचा धोका आहे. तर 35 प्रकारच्या कॉफींना धोका नाही. उर्वरित 14 प्रजातींबाबत अजून पुरेशी माहिती मिळालेली नाही.

याशिवाय, 28% जंगली कॉफीचे उत्पादन मळ्यांमध्ये होत नाही आणि केवळ निम्म्या जाती बियाण्यांच्या बँकेत संरक्षित ठेवल्या जातात.

ग्लोबल चेंज बायोलॉजीने केलेल्या दुसऱ्या एका अध्ययनात असे आढळले आहे की वातावरण बदल लक्षात घेता IUCN रेड यादीच्या नामांकनानुसार जंगली अरॅबिका जातीची कॉफीदेखील लोप पावण्याच्या मार्गावर आहे.

केवळ वातावरण बदलामुळे या कॉफीचे उत्पन्न 50% घटण्याचा धोका असल्याचे या अभ्यासात आढळले आहे.

कॉफीच्या लागवडीसाठी कॉफी अरॅबिकाच्या बियाण्यांचा वापर होतो.

इथियोपियाला अरॅबिया कॉफीचे माहेरघर मानले जाते. तेथील वर्षावनात ही कॉफी नैसर्गिकरित्या वाढते.

आदिस अबाबमधील इन्वॉरमेंट अँड कॉफी फॉरेस्ट फोरमचे डॉ. तॅडेसे वोल्डेमारियम गोले सांगतात, "अरॅबिका कॉफीचे महत्त्व लक्षात घेता जंगलात या कॉफीला उद्भवलेला धोक्याचा अभ्यास करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करायला हवे."

जंगली कॉफी आणि तिचे महत्त्व

जगात कॉफीचे अनेक प्रकार आहेत. मात्र कॉफीप्रेमींपैकी फारच थोड्यांना माहिती असेल की हे सर्व प्रकार कॉफिया अरॅबिका आणि कॉफिया रोबस्ट या कॉफीच्या केवळ दोनच जातींपासून तयार होतात.

खरेतर या दोन जातींशिवाय जंगलात नैसर्गिकरित्या वाढणाऱ्या कॉफीच्या तब्बल 122 जाती आहेत.

या जंगली कॉफींपैकी बऱ्याचशा चवीला चांगल्या नसतात. मात्र वातावरण बदल आणि कॉफीच्या रोपावर पडणाऱ्या किडीपासून रक्षण करून भविष्यात संवर्धन करता येईल असे जीन्स या जंगली कॉफींमध्ये मिळू शकतात.

कॉफी पिकाचे भविष्य टिकवायचे असेल तर आपल्याला या जंगली कॉफीचाच आधार घ्यावा लागणार आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

डॉ. डेव्हिस म्हणतात, "त्या जंगली स्रोतांची आपल्याला सतत गरज पडणार आहे."

नामशेष होण्याच्या निकषावर कॉफीची इतर वनस्पतींशी तुलना

जगातील पाचपैकी एक वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. कॉफीविषयी सांगायचे तर 60% कॉफी नामशेष होण्याची भीती आहे.

50% जंगली चहा आणि आंबा विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे तर 6% हेझलनट आणि 9% पिस्ता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

जंगली कॉफी कुठे आढळते?

आफ्रिकेच्या घनदाट जंगलात आणि मॅडागास्करच्या बेटावर मोठ्या प्रमाणावर जंगली कॉफी आढळते. याशिवाय भारत, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाच्या काही भागात जंगली कॉफी आढळते.

कॉफीचे कुठले प्रकार पेय म्हणून वापरतात?

जगात दोन जातींच्या कॉफीचा सर्वात जास्त वापर होतो. अरॅबिका (कॉफिया अरॅबिका) आणि रोबस्टा (कॉफिया कॅनेफोरा)

आणखी एका जातीच्या कॉफीची लागवड केली जाते. लिबेरिका (कॉफी लिबेरिका). मात्र ती पेय म्हणून वापरली जात नाही.

'क्रॉप वाईल्ड रिलेटिव्ह्ज' म्हणजे काय?

ज्या पिकांची लागवड केली जाते त्या पिकांसारखेच जिन्स असलेल्या त्याच वनस्पतींच्या जंगली जाती म्हणजेच क्रॉप वाईल्ड रिलेटिव्ह.

ही वनस्पती जंगलात उगवते आणि त्या जातींचा लागवडीखालील जातींशी संकरही करता येऊ शकतो.

शेतीचा शोध लागला तेव्हापासून पिकाचे उत्पादन आणि पोषणमूल्य वाढविण्यासाठी या जंगली जातींचा वापर केला जात आहे.

शास्त्रज्ञांचे म्हणणे काय?

कॉफी लागवडीला असलेला धोका आपण लक्षात घेतला पाहिजे आणि ते धोके पार करण्यासाठी आपल्याकडे पुरेसे स्रोत असले पाहिजे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

इतर सर्व उष्णकटिबंधीय वनस्पतींप्रमाणेच कॉफीच्या बिया थंड करून वाळवता येत नाहीत. त्यामुळे 45% कॉफीच्या जाती यांची मळ्यात लागवड करता येत नाही.

केवच्या डॉ. ईमीर निक ल्युगाधा सांगतात, "IUCN रेड लिस्टने पहिल्यांदाच कॉफीला असलेल्या धोक्याविषयी संशोधन केले आहे आणि 60% ही आकडेवारी खूपच जास्त आहे."

त्या म्हणतात, "या नव्या माहितीमुळे कॉफी उत्पादन क्षेत्राच्या संवर्धनासाठी कॉफिच्या कोणत्या जातींना प्राधान्य द्यावे, हे कळेल आणि योग्य कृती करता येईल."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)