मुकेश अंबानींचे वारसदार कोण, कोणत्या मुलाजवळ जाणार कोणता व्यवसाय?

जेव्हा 2002 मध्ये रिलायन्स उद्योगसमूहाचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांचं निधन झालं, तेव्हा त्यांच्या संपत्तीवरून त्यांच्या दोन मुलांमध्ये अर्थात मुकेश आणि अनिल अंबानींमध्ये मोठा वाद झाला होता.

अखेर त्यांची आई कोकिळाबेन धीरुभाई अंबानी यांना मध्यस्थी करावी लागली होती आणि दोन भाऊ, त्यांचे उद्योग वेगळे झाले होते.

अशीच परिस्थिती पुढच्या पीढीवर उद्भवू नये, याची खबरदारी घेत मुकेश अंबानी यांनी आपल्या वारसा पुढे कुणाकडे कसा जाणार, याची माहिती दिली आहे.

नुकत्याच मुंबईत झालेल्या Reliance Industries Limited च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांनी संकेत दिले आहेत की त्यांच्या तीन मुलांकडे म्हणजेच अनंत, आकाश आणि ईशा यांच्याकडे वेगवेगळ्या उद्योगांची धुरा सोपवण्याची तयारी सुरू झाली आहे.

या सभेत ते म्हणाले की, "सध्या आकाश आणि ईशा यांनी अनुक्रमे जिओ आणि रिटेल विभागांमध्ये नेतृत्वाची पदं सांभाळली आहेत. ते आपल्या कन्झ्युमर बिझनेसमध्ये अगदी सुरुवातीपासून खूप उत्साहाने गुंतले आहेत."

पुढे त्यांनी सांगितलं की "अनंतसुद्धा रिलायन्स एनर्जीमध्ये जोमाने काम करतोय. एवढंच नव्हे तर तो जास्तीत जास्त वेळ जामनगरमध्येच घालवतोय."

गुजरातच्या जामनगरमध्ये रिलायन्सची सर्वांत मोठी पेट्रोलियम रिफायनरी आहे, ज्याचा रिलायन्सच्या एकूण महसूलात मोठा वाटा आहे.

याशिवाय रिलायन्सचे दोन मोठे क्षेत्र आहेत - एक म्हणजे रिटेल, ज्यात जिओ मार्ट आणि इतर रिटेल स्टोर्सचा समावेश आहेत, ईशा अंबानी-पिरामल याकडे लक्ष घालतेय.

आणि दुसरा म्हणजे टेलिकॉम आणि डिजिटल सेवा - ज्यात जिओ मोबाईल आणि इंटरनेट सेवांचा समावेश आहे. हा उद्योग आकाशकडे आहे.

हे तीनही उद्योगांचे भाग-भांडवल आणि उलाढाल समानच आहे.

आतापर्यंत फक्त आकाश अंबानीच रिलायन्सच्या कुठल्याही एका कंपनीत पूर्णवेळ पदावर आहे. जून महिन्यात मुकेश अंबानींनी आकाश अंबानीला रिलायन्स जिओ इन्फोकॉमचं अध्यक्ष केलं होतं. तर इतर दोघं म्हणजे अनंत आणि ईशा संचालक मंडळात आहेत.

पण मुकेश अंबानींनी आत्ताच निवृत्त होत असल्याचे कुठलेही संकेत दिले नाहीत. ते सध्या 65 वर्षांचे आहेत आणि रिलायन्सच्या जवळजवळ कंपन्यांचे प्रमुख आहेत.

या सर्वसाधारण सभेत ते हेसुद्धा म्हणाले की या तीन्ही मुलांनी आपल्या संस्थापकांची अर्थात धीरुभाईंची विचारसरणी पूर्णपणे अंगीकारली आहे.

हे तरुण तडफदार नेते आहेत, जे सध्या रिलायन्समध्ये भारी काम करत आहेत. पण हो, त्यांना दररोज रिलायन्समधले वरिष्ठ नेते, मी आणि आमचं संचालक मंडळ पूर्णवेळ मार्गदर्शन करतो," असं पीटीआय वृत्तसंस्थेने म्हटलंय.

2002 मध्ये धीरुभाई अंबानी यांचा मृत्यू झाल्यानंतर मुकेश आणि अनिल यांच्यात वाद निर्माण झाले होते, याचे कारण म्हणजे धीरुभाई अंबानी यांचे मृत्यूपत्र नव्हते. या पार्श्वभूमीवर 65 वर्षीय मुकेश अंबानी यांनी पुढील नेतृत्व कोण करेल हे स्पष्ट केलं आहे त्याला एक वेगळे महत्त्व आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)