मुकेश अंबानींचा '100 अब्ज डॉलर्स क्लब'मध्ये समावेश, पहिल्या स्थानी कोण?

आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेले मुकेश अंबानी यांनी जागतिक स्तरावर यशाचा आणखी एक टप्पा ओलांडला आहे. 100 अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेल्या अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानींचा समावेश झाला आहे.

टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क आणि अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस हे आघाडीवर असलेल्या या यादीमध्ये अंबानी यांचा 11 वा क्रमांक आहे.

मुकेश अंबानी यांच्या संपत्तीमध्ये गेल्या वर्षात 23.8 अब्ज डॉलर्सची भर पडली. त्यामुळं ताज्या आकडेवारीनुसार त्यांची संपत्ती 100.6 अब्ज डॉलर्स असल्याचं ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्समध्ये म्हटलं आहे.

मुकेश अंबानी यांनी टेलिकम्युनिकेशन आणि रिटेल क्षेत्रातील उदयोगांच्या माध्यमातून गेल्या वर्षी चांगला नफा कमावला. त्यामुळं या यादीत त्यांचा समावेश झाला आहे.

या यादीत बिल गेट्स, लॅरी पेज, मार्क झुकरबर्ग अशा दिग्गजांचाही समावेश आहे. मुकेश अंबानी यांनी विविध क्षेत्रांतील कंपन्यांच्या माध्यमातून बाजारपेठेवर पकड मिळवत रिलायन्सला यशाच्या शिखरावर नेलं आहे.

अंबानींना वरचं स्थान मिळवण्याची संधी

ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सच्या वतीनं जाहीर करणाऱ्या या यादीत पहिल्या स्थानावर प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क हे आहेत. या यादीनुसार त्यांची संपत्ती 222 अब्ज डॉलर्स एवढी आहे, तर दुसऱ्या स्थानी 191 अब्ज डॉलर्ससह जेफ बेजोस दुसऱ्या स्थानी आहेत.

बिल गेट्स, लॅरी पेज आणि मार्क झुकरबर्ग हे यादीत अनुक्रमे चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत.

मुकेश अंबानी यांनी या यादीमध्ये 11 वं स्थान मिळवलं आहे. त्यांच्या आधी दहाव्या स्थावी वॉरेन बफे असून त्यांच्या आणि अंबानींच्या संपत्तीत 2 अब्ज डॉलरचा फरक आहे. त्यामुळं आगामी काळात मुकेश अंबानींना यादीत आणखी वरचं स्थान मिळवण्याची संधी आहे.

या यादीत पहिल्या वीसमध्ये असलेले आणखी एक भारतीय उद्योगपती म्हणजे गौतम अदानी. गौतम अदानी हे चौदाव्या क्रमांकावर असून त्यांची संपत्ती 73.3 अब्ज डॉलर एवढी आहे.

अंबानींच्या कारकीर्दीतील महत्त्वाचे टप्पे

1977 - रिलायन्स टेक्सटाईल्स इंडस्ट्रीजनं लोकांना शेअरच्या रुपानं भागीदारी विकली.

1996 - अंबानींनी 6 ऑइल रिफायनरी कॉम्प्लेक्स उभारणीसाठी 6 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली.

2002 - बंगालच्या महासागरात भारतातील सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा स्त्रोत शोधला.

2002 - धीरुभाई अंबानी यांचं निधन.

2005 - भाऊ अनिल अंबानींबरोबरच्या वादामुळं रिलायन्स समूहाचं विभाजन

2011 - भारतातील ऑइल आणि गॅस ब्लॉकमधील हिश्श्याची भारत पेट्रोलियमला 7.2 अब्ज डॉलरमध्ये विक्री.

2013 - विभाजनानंतर प्रथमच भावाबरोबर व्यवहार केला.

2015 - 16 अब्ज डॉलरचं मोबाईलचं नेटवर्क सुरू करण्याची घोषणा

(स्त्रोत-ब्लूम्बर्ग)

मोबाईल, रिटेलची चांगली कामगिरी

मुकेश अंबानी यांनी त्यांच्या वडिलांकडून वारसाहक्कानं मिळालेल्या तेल उद्योगाबरोबरच काळानुसार इतर क्षेत्रांत उडी घेत रिलायन्स समूहाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत नेला आहे.

सुरुवातीला काही क्षेत्रासाठी मर्यादित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रिलायन्सनं आता रिटेल, ई कॉमर्स, तंत्रज्ञान आणि टेलिकम्युनिकेशन या क्षेत्रात पाय पसरले आहेत.

रिटेल क्षेत्रात मुकेश अंबानींच्या रिलायन्स समुहानं गेल्या काही दिवसांत अनेक भागीदारांशी हातमिळवणी करत उद्योग अधिक वाढवला आहे.

जियोच्या माध्यमातून ते देशातील अव्वल मोबाईल सेवा पुरवठादार ठरले आहेत. या सर्वामुळं गेल्या वर्षी झालेल्या नफ्याच्या जोरावर मुकेश अंबांनींनी हे यश मिळवलं.

फोर्ब्सच्या यादीत होते दहाव्या स्थानी

एप्रिल महिन्यात फोर्ब्सनं जगातील सर्वाधिक श्रीमंतांची यादी जाहीर केली होती. या यादीमध्ये मुकेश अंबानी हे 10 व्या क्रमांकावर होते.

कोरोना संकटाच्या काळामध्ये अनेक उद्योगांना मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र त्या काळातही मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सनं योग्य धोरणांसह नफा मिळवण्याचा प्रयत्न केला.

रिलायन्सनं कोरोनाच्या संकटाच्या काळात 35 अब्ज डॉलरचा निधी जमवला होता. रिलायन्स जिओची एक तृतीयांश भागीदारी फेसबुक आणि गूगल सारख्या मोठ्या गंतवणूकदारांना अंबानींनी विकली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)