You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुकेश अंबानींना मागे टाकणारा आशियातील सर्वांत श्रीमंत उद्योजक कोण आहे?
चीनचे जुंग सानसान यांनी भारतातील मुकेश अंबानी यांना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिलं स्थान पटकावलं आहे.
ब्लूमबर्ग बिलिएनिअर्स इंडेक्सनुसार 2020 या वर्षात सानसान यांच्या संपत्तीत 7 अब्ज डॉलर्सची वाढ झाली. भारतातील मुकेश अंबानींसोबतच चीनच्याच जॅक मा (अलिबाबाचे सह-संस्थापक) यांनाही त्यांनी मागे टाकलं आहे.
बाटलीबंद पाणी निर्मिती आणि लस निर्मिती कंपन्यांच्या बळावर त्यांनी हे यश मिळवलं आहे.
अनेक क्षेत्रात आजमावलं नशीब
ब्लूमबर्ग बिलिएनिअर्स इंडेक्सनुसार सानसान यांच्याकडे 77.8 अब्ज डॉलर्सची मालमत्ता आहे. जगाच्या श्रीमंतांच्या यादीत त्यांचा क्रमांक सातवा आहे.
सानसान 'lone wolf' नावानेही ओळखले जातात. त्यांनी पत्रकारिता, मशरूमची शेती, आरोग्य क्षेत्र अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नशीब आजमावलं.
सानसान यांनी 'बिजिंग वॉन्टई बायोलॉजिकल' ही त्यांची लस निर्मिती कंपनी याचवर्षी चीनच्या भांडवली बाजारात लिस्ट केली होती.
तीन महिन्यांनंतर त्यांनी 'नॉन्गफू स्प्रिंग' ही त्यांची बाटलीबंद पाण्याची कंपनी हाँगकाँग शेअर बाजारात लिस्ट केली.
त्यांचा हा निर्णय त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरला. कंपनी शेअर बाजारात लिस्ट होणार, या घोषणेसोबतच ते जॅक मा यांनाही मागे टाकणार, हे स्पष्ट झालं होतं.
सानसान यांच्यााधी अलिबाबाचे सह-संस्थापक जॅक मा चीन आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते.
भांडवली बाजारातील उत्तम सुरुवात
हाँगकाँग भांडवली बाजारात लिस्ट झाल्यानंतर जुंग सानसान यांची बाटलीबंद पाण्याची कंपनी शेअर बाजारातील सर्वाधिक नफा कमावणाऱ्या कंपन्यांपैकी एक बनली. लिस्टिंग नंतर कंपनीचे शेअर्स 155 टक्क्यांनी वधारले.
बिजिंग वॉन्टई बायोलॉजिकल कंपनीचे शेअर्सही 2000 टक्क्यांनी वधारले. चीनमध्ये ज्या कंपन्या कोरोना विषाणूवरील लस निर्मिती करत आहेत त्यापैकी ही एक कंपनी आहे.
बूल्मबर्ग बिलिएनिअर्स इंडेक्सनुसार जुंग सानसान यांनी इतिहासात सर्वात वेगाने मालमत्तेत वाढ करणाऱ्या व्यक्तींच्या यादीत स्थान मिळवलं आहे.
जगातील अनेक श्रीमंतांचं नशीब कोरोना काळात अधिकच फळफळलं. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बोझेस त्यांच्यापैकीच एक.
मुकेश अंबानींच्या मालमत्तेतही वाढ
भारतात मुकेश अंबानी यांच्या मालमत्तेतही 18.3 अब्ज डॉलर्सची वाढ झाली. त्यांची एकूण मालमत्ता आहे 76.9 अब्ज डॉलर्स. रिलायन्स इंडस्ट्रीनं तंत्रज्ञान आणि ई-कॉमर्स क्षेत्रात आणण्यासाठी त्यांनी अनेक करार केले.
या वर्षाच्या सुरुवाातीलाच फेसबुकने रिलायन्स जिओमध्ये 5.7 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती.
मात्र, जॅक मा यांच्या मालमत्तेत यावर्षी घसरण बघायला मिळाली. ऑक्टोबरपर्यंत त्यांची मालमत्ता 61.7 अब्ज डॉलर्स होती. मात्र, आता ती घसरून 51.2 अब्ज डॉलर्सवर आली आहे.
त्यांच्या अलिबाबा कंपनीवर चीनच्या अधिकाऱ्यंचं बारीक लक्ष आहे. अलिबाबावर एकाधिकार स्थापण्यासाठी चुकीचे व्यवहार करण्यात आल्याचे त्यांच्यावर आरोप आहेत. दुसरीकडे याच कंपनीची सहकारी कंपनी असलेली एंट ग्रुप नोव्हेंबर महिन्यात शेअर बाजारात लिस्ट होणार होती. मात्र, लिस्टिंग रोखण्यात आली.
चीनमधील बहुतांश अब्जाधीश तंत्रज्ञान क्षेत्रातून येतात. मात्र, ख्वावे, टिकटॉक आणि वुई चॅटवरून चीन आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढल्याने शेअर बाजारात चीनी टेक कंपन्यांच्या किंमती घसरल्या आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)