You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मित्रांसाठी मदत मागायला 'ते' 12 किलोमीटर पायी चालत गेले आणि...
ऑस्ट्रेलियामध्ये एक वडील आणि दहा वर्षांचा मुलगा पुरात अडकले होते. त्यांच्या सहप्रवाशांनी तब्बल 12 किलोमीटर पायी प्रवास करत त्यांच्यासाठी मदत मागून आणली. त्यानंतर या बापलेकांची सुटका झाली.
रविवारी (27 डिसेंबर) हे सर्वजण क्वीन्सलँडच्या दिशेने प्रवास करत होते. त्यांची कार पुरानं भरलेल्या रस्त्यावर अडकली.
बाहेर पडता येत नसल्यानं या गटानं कारमध्येच रात्र काढली. सकाळी त्यांच्यापैकी तिघेजण 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या माउंट इसा या शहराच्या दिशेने चालायला लागले.
वाटेत पोलिस स्टेशन लागल्यानंतर गाडीतच थांबलेल्या बाप-लेकांच्या सुटकेचा थरार सुरू झाला. ते नेमके कुठे अडकले आहेत, याची माहिती मॅपच्या सहाय्याने पोलिसांना दिली गेली.
संध्याकाळ होत असताना सुटकेसाठी आलेल्या पथकाच्या हेलिकॉप्टरने गाडीच्या टपावर उभ्या असलेल्या वडील आणि मुलाला पाहिलं.
सुटका करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्या दोघांची प्रकृती चांगली आहे आणि त्यांना कोणत्याही वैद्यकीय उपचारांची गरज नाहीये.
"ते अतिशय चांगल्या अवस्थेत माउंट इसा एअरपोर्टवर पोहोचले," असं सुटका करणाऱ्या RACQ LifeFlight Rescue सर्व्हिसनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
रेस्क्यू पायलट रसेल प्रॉक्टर यांनी या वडील आणि मुलाची स्तुती केली आहे. बचावासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी या दोघांनी घेतली होती, असं त्यांनी म्हटलं. ते एका जागी न घाबरता थांबले आणि त्यांनी पिण्याचं पाणीही सोबत ठेवलं होतं.
"एवढा वेळ वाट पहावी लागली तरी ते मदत येईपर्यंत त्यांच्या गाडीजवळच थांबले."
क्वीन्सलँड अँब्युलन्सनं सांगितलं की, मदत मागण्यासाठी चालत आलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनाही वैद्यकीय उपचारांची गरज भासली नाही.
ऑस्ट्रेलियामध्ये सध्या 'ला निना'चा प्रभाव जाणवत आहे. त्यामुळे पाऊस आणि पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. क्वीन्सलँडमध्ये याचा प्रादूर्भाव अधिक दिसून येतोय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)