जपानी लोकांप्रमाणे आहार घेतल्यावर आपण भरपूर जगू का?

    • Author, वेरोनिक ग्रीनवुड
    • Role, बीबीसी फ्युचर

जगभरात शंभरी पार करणाऱ्या लोकांची सर्वाधिक संख्या जपानमध्ये आहेत. तिथं प्रत्येकी 1 लाख लोकांमध्ये 48 लोक शंभरी पार करतात. या आकड्याच्या जवळपास जाणारा इतर कोणताही देश जगाच्या पाठीवर नाही.

त्यामुळेच या आकडेवारीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. या लोकांकडे असं काय आहे, की जे आपल्याकडे नाही? ते नक्की खातात तरी काय?

हे वाचून 'मेडिटेरनियन डाएट' म्हणजे भूमध्य सागरी प्रदेशातील आहाराची आठवण होते. इटलीमधील शंभरी पार करणाऱ्या लोकांच्या आहारावरुन अमेरिकन पोषणतज्ज्ञ अन्सेल किज यांनी ही आहारपद्धती लोकप्रिय केली. त्यावेळेस 1970 च्या काळात त्या आहारात पशुजन्य स्निग्धपदार्थ कमी असायचे हे त्यांच्या लक्षात आलं.

1990 साली वॉल्टर विलेट या पोषणतज्ज्ञांनी एक शोधनिबंध प्रसिद्ध केला. त्यामध्ये जपानमधील लोक दीर्घकाळ जगतात आणि हृदयरोगाने मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांची संख्या तेथे कमी आहे अशी आकडेवारी प्रसिद्ध केली होती.

त्यानंतर दीर्घायुष्य आणि आहार यांचा काही संबंध आहे का हे पडताळून पाहाणारे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. जर तसे असेल तर कोणते पदार्थ आपल्या दीर्घकाळ जगण्यास उपयोगी ठरतात आणि त्यांचा समावेश आहारात केला पाहिजे याचा विचार सुरू झाला.

'जपानी आहार' ही एक ढोबळ अशी संकल्पना आहे. तुम्ही जे सुशी बफे म्हणून जे खाता त्याचा याच्याशी संबंध नाही असं जपानमधील नॅशनल सेंचर फॉर गेरिएट्रिक्स आणि जेरेंटॉलॉजीमध्ये संशोधक असणारे शू झँग सांगतात.

जपानी आहार आणि आरोग्य यांचा सहसंबंध अभ्यासणाऱ्या 39 शोधनिबंधांमधून काही सामाईक गोष्टी मात्र पुढे आल्या आहेत. त्यांनी सीफूड, भाज्या, सोयाबीन आणि सोया सॉससारखे पदार्थ, भात, मिसो सूप यांच्यावर भर दिला आहे.

झँग म्हणतात, या आहाराचा आणि हृदयरोगाने कमी मृत्यू होण्याचा नक्कीच संबंध आहे. तसेच मृत्यूदर कमी असण्याशीही त्याचा संबंध आहे.

तोहूकू विद्यापीठात अन्न आणि सूक्ष्मजीवशास्त्राचे सहायक प्राध्यापक असणाऱ्या त्सुयोशी त्सुडुकी यांनी जपानी आहारातील नक्की कोणते पदार्थ दीर्घायुष्यासाठी उपयोगी आहेत याचा अभ्यास केला आहे.

1990च्या दशकात त्यांनी एक राष्ट्रीय सर्वेक्षण घेतलं. तसेच त्या काळात अमेरिकन लोकांच्या आहारातील पदार्थांची त्याच्याशी तुलना केली. तीन-तीन आठवडे गोठवलेले, वाळवलेले पदार्थ उंदरांना खायला घालण्यात आले आणि त्यांचे निरीक्षण केले. काही उंदरांना जपानी आहारातले पदार्थ खायला दिले.

दोन्ही आहारांमध्ये स्निग्ध पदार्थ, प्रथिनं आणि कर्बोदकं समप्रमाणात असूनही जपानी आहारातील पदार्थ खाणार्‍या उंदरांच्या पोटात आणि रक्तामध्ये चरबीचे प्रमाण कमी दिसले. याचा अर्थ स्निग्धांशा स्त्रोतही महत्त्वाचा आहे. तुम्ही मटण खाता की मासे, तांदुळ खाता की गहू यावर त्याचा परिणाम अवलंबून आहे.

अधिक सखोल विचार केल्यानंतर जपानी आहारामध्येही गेल्या 50 वर्षांमध्ये बरेच बदल झालेले दिसतात. विशेषतः कॉस्मोपॉलिटन शहरांमध्ये जेथे पाश्चिमात्य देशांचा प्रभाव आहे तेथे हे बदल जास्त दिसून येतात.

1960, 1975, 1990, 2005 या वर्षामध्ये असलेल्या आहारातील पदार्थ एका प्रयोगात उंदरांना खायला घातले. फार शिजवलेले, गोठवलेले, वाळवलेले पदार्थही काही उंदरांना खायला घातले. हा प्रयोग 8 महिने चालला.

सर्व वर्षांमधल्या जपानी आहारांचे अनुमान एकसारखे आले नाही. त्यात फरक दिसला. 1975 सालचा आहार घेणाऱ्या उंदरांना मधुमेह, फॅटी लिव्हरसारखे आजार होण्याचे प्रमाण इतरांपेक्षा कमी असल्याचे दिसले.

ज्यावेळेस त्यांच्या लिव्हरचा अभ्यास संशोधकांनी केला तेव्हा त्यांच्यामध्ये फॅटी अॅसिड्स तयारच होणार नाहीत अशी जनुकं आढळली.

त्यांचा आहार सीवीड (सागरी वनस्पती, शैवाल वगैरे), सीफूड (मासे आणि तत्सम खाल्ले जाणारे सर्व सागरी प्राणी), डाळी, फळं, पारंपरिक आंबवलेले किंवा किण्वन प्रक्रिया केलेले पदार्थ (जे सिजनिंगसाठी वापरले जातात) आणि अतिरिक्त साखर कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांनी संपृक्त होता.

नंतरच्या काही प्रयोगांमध्ये 1975 सालचा आहार घेणारे उंदीर दीर्घायुषी असल्याचं दिसलं. वयपरत्वे त्यांचे शारीरिक त्रास कमी असल्याचं दिसलं.

या आहाराचा माणसांवरही सकारात्मक परिणाम दिसून येतो, अस त्सुडुकींना दिसून आलं. काही लठ्ठ लोकांना 28 दिवसांसाठी 1975 सालचा आहार देण्यात आला. त्यांचं वजन आणि कोलेस्ट्रॉल कमी झाल्याचं दिसलं.

मग जपानी आहारातून फायदा होण्याचं खरं गुपित कशामध्ये आहे? सर्वच प्रकारच्या जपानी आहारांचा सकारात्मक परिणाम होतो. ते कसे शिजवले जातात आणि त्यात कोणती पोषणमुल्यं आहेत यावर ते अवलंबून आहे असं त्सुडुकी सांगतात.

अनेक लहानलहान पदार्थांनी तयार होणारं जेवण अनेक प्रकारचे स्वाद जेवणात आणतं. हे सर्व पदार्थ बहुतांशवेळा तळण्याऐवजी उकडलेले असतात. तसेच ते तीव्र किंवा उग्र स्वादाच्या पदार्थांचं सिजनिंग त्यावर असतं. अती साखर आणि मीठाऐवजी हे चांगलंच.

थोडक्यात जपानी आहाराचं गमक त्याच्या सागरी प्राणी किंवा वनस्पती किंवा सोया सॉसमध्ये नाही तर ते चांगल्या पद्धतीनं शिजवणं, त्यात विविधता असणं, भाज्या, डाळींचा समावेश असणं यामध्ये आहे.

पण आधुनिक जपानमध्ये थोडं चित्र बदललेलं दिसतं. मधुमेहाचं प्रमाण वाढलं आहे. लठ्ठपणा वाढल्याचं दिसून येतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)