रिलायन्स जिओमध्ये अमेरिकेच्या KKRची 5,550 कोटींची गुंतवणूक

कोरोनाच्या कठीण काळात रिलायन्स इंडिस्ट्रीजने मागच्या काही महिन्यांमध्ये 1 लाख 63 हजार कोटींची परकीय गुंतवणूक आपल्याकडे वळवली होती.

आता ताज्या माहितीनुसार, केकेआर या अमेरिकन गुंतवणूकदार कंपनीने रिलायन्सच्या जिओमार्ट या नव्या उपक्रमात सव्वा टक्के हिस्सेदारी विकत घेतली आहे.

जिओ या दूरसंचार कंपनीतल्या आक्रमक गुंतवणुकीबरोबरच रिलायन्सने रिटेल क्षेत्रात जोरदार हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.

जूनमध्ये कंपनीने जिओ मार्ट ही ऑनलाईन वाण सामान विक्री करणारी सेवा बाजारात आणली. या कंपनीची स्पर्धा भारतातल्या अँमेझॉनशी असेल.

याच जिओमार्टमध्ये आता केकेआरने 5,550 कोटी रुपयांची भागिदारी केली आहे. विशेष म्हणजे केकेआर या कंपनीची रिलायन्समधली ही दुसरी गुंतवणूक आहे.

यापूर्वी रिलायन्स जिओमध्ये कंपनीने 11 हजार कोटींच्या वर गुंतवणूक केली आहे. तर रिलायन्स कंपनीने विक्रमी परकीय गुंतवणूक आणून आपल्यावरचा कर्जाचा भार पूर्णपणे रिकामा करण्याचं धोरण कायम ठेवलंय.

रिलायन्स चालवणार बिग बाजार, 24,713 कोटींचा करार

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने शनिवारी 'फ्युचर' समूहाचा किरकोळ आणि घाऊक किराणा व्यवसाय 24,713 कोटी रुपयांच्या मोबदल्यात ताब्यात घेतला.

या करारामुळे रिलायन्सचा किराणा क्षेत्रातील विस्तार आणखी मजबूत होणार आहे. 'अ‍ॅमेझॉन'सारख्या ई-व्यापार कंपनीचा तुल्यबळ स्पर्धक म्हणून रिलायन्सने हे पाऊल टाकले आहे. सध्या कंपनीची मार्केट व्हॅल्यू 14.41 लाख कोटी रुपये इतकी झाली आहे.

'रिलायन्स रिटेल व्हेन्चर्स लि.' या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या उपकंपनीमार्फत हा अधिग्रहण व्यवहार करण्यात आला. या व्यवहारामुळे बिग बझार, एफबीबी, इझीडे, सेंट्रल, फुडहॉल या किराणा नाममुद्रांसह 420 शहरांतील त्यांच्या 1800 विक्री दालनांवर रिलायन्सचे वर्चस्व प्रस्थापित होणार आहे.

करारानुसार फ्यूचर समूहाचा रिटेल आणि घाऊक व्यवसाय रिलायन्स रिटेल आणि फॅशन लाइफस्टाईल लिमिटेड (RRFLL) अंतर्गत येईल. RRFLLच्या विलिनीकरणानंतर आरआरएफएलएल फ्यूचर एंटरप्राइजेस लिमिटेडमध्येही गुंतवणूक करेल. रिलायन्स 1200 कोटींची प्रेफरेंन्शियल इश्युद्वारे गुंतवणूक करेल आणि फ्यूचर एन्टरप्रायजेस लिमिटेडमधील 6.09 टक्के हिस्सा खरेदी करेल.

'फ्यूचर' समूहाचा लॉजिस्टिक (रसद पुरवठा) व्यवसाय आणि गोदाम व्यवसायही रिलायन्स ताब्यात घेणार आहे. छोटे व्यापारी आणि किराणा दुकानदार त्याचबरोबर मोठ्या ब्रँडना बरोबर घेण्याचे आमचे धोरण असून ग्राहकांनी मोजलेल्या पैशाचे त्यांना वस्तूंच्या रूपात पुरेपूर मूल्य देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे रिलायन्स रिटेलच्या संचालक इशा अंबानी यांनी सांगितले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)