You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रिलायन्स जिओ : 5G ची घोषणा तर केली, पण हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात यायला किती वेळ जाणार?
- Author, झुबेर अहमद
- Role, बीबीसी प्रतिनिधी, दिल्ली
15 जुलै रोजी कंपनीची 43 वी वार्षिक बैठक पार पडली. कोरोना आरोग्य संकटामुळे ही बैठक व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात आली. रिलायन्स इंड्रस्टीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी यावेळी काही मोठ्या निर्णयांची घोषणा केली.
या निर्णयांची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाल्यास डबघाईला आलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि सामान्य लोकांवर सकारात्मक परिणाम होईल.
रिलायन्स जिओ 'मेड इन इंडिया' 5G तंत्रज्ञानासोबत लॉन्च करण्यासाठी पूर्ण तयार असल्याची घोषणा मुकेश अंबानी यांनी केली आहे.
या वार्षिक बैठकीत गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही सहभाग घेतला होता. नुकतीच त्यांनी भारतात 10 अब्ज डॉलर गुंतवण्याबाबत घोषणा केली होती.
या बैठकीत त्यांनी यापैकी 4.5 अब्ज डॉलर जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणार असल्याची घोषणा केली. गुगल आणि जिओ भागीदारीत अँड्रॉईड प्लॅटफॉर्मवर चालणारे स्वस्त स्मार्टफोन बनवणार असल्याचीही माहितीही त्यांनी दिली. यामुळे देशात 2G फोन वापरणारे तब्बल 35 कोटी ग्राहक स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहेत.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
सुंदर पिचई यांनी सांगितलं, "गुगल आणि जिओने अँड्रॉईड ऑपरेटींग सिस्टम आणि प्ले स्टोअरसाठी अनुकूल असे परवडणारे स्मार्ट फोन विकसित करण्यासंबंधी एक व्यावसायिक करार केला आहे. भारतातील कोट्यवधी लोक स्मार्टफोन खरेदी करू शकतील याचा आम्हाला आनंद आहे."
आत्मनिर्भरतेचा अर्थ चीनपासून मुक्ती असा आहे का ?
5G तंत्रज्ञान पूर्णपणे भारतीय तंत्रज्ञानाची मदत घेऊन बनवण्याचा दावा जिओने केलाय. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर योजनेला यामुळे बळ मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
कॅलिफोर्नियातील सिलिकन व्हॅली येथे राहणारे हैद्राबादचे 5G तज्ज्ञ सतीश कुमार यांनी अंबानींची ही घोषणा गेम चेंजर असल्याचं सांगितलं आहे. ते सांगतात, " मोदीजी, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत (आत्मनिर्भर बनवण्याच्या प्रयत्नात) हा संदेश मुकेश अंबानी यांनी पंतप्रधानांना दिलाय."
याच आठवड्यात अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पियो यांनी ब्रिटनकडून हुआवे या कंपनीवर लावण्यात आलेल्या बंदीचे स्वागत केले आहे. यावेळी प्रतिक्रिया देताना त्यांनी जिओ 5G तंत्रज्ञानासाठी चीनची कुठलीही मदत घेत नसल्याबाबतही कौतुक केले आहे. भारतातील काही माध्यमांकडून 'मेड इन इंडिया' जिओ 5G ला 'हुआवे किलर' असल्याचा उल्लेख केला आहे.
आता जिओकडून 5G तंत्रज्ञान केवळ स्थानिक उपकरण आणि तंत्रज्ञानापासून बनवण्याचा दावा करण्यात आल्याने देशातील दोन मोठ्या टेलिकॉम कंपन्या व्होडाफोन आणि एअरटेल यांनाही 5G नेटवर्क स्थानिक तंत्रज्ञानापासूनच बनवावे लागेल. पण ही क्षमता त्यांच्याकडे सध्यातरी नाही.
तज्ज्ञांनी दर 5G लाँचसाठी आता हुआवेची उपकरणं आणि सॉफ्टवेअरची आवश्यकता लागणार नाही. तेव्हा ज्या देशांनी हुआवेवर बंदी आणली आहे किंवा निर्णय विचाराधीन आहे त्यात भारताचाही समावेश होणार आहे.
हुआवे चीनच्या सरकारसोबत डेटा शेअर करत असल्याची भीती अमेरिकेला आहे. त्यामुळे अनेक देशांना हुआवेवर बंदी आणण्याचा सल्ला वैयक्तिकरित्या देत असल्याचं राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीही सांगितलंय.
गुगल आणि जिओचे हे परवडणारे स्मार्टफोन ही चिनी कंपनी शाओमीसाठी एक वाईट बातमी आहे. कारण शाओमी ही भारताच्या स्मार्टफोन क्षेत्रातील एक महत्वाची कंपनी आहे.
फेसबुकनेही नुकतीच जिओ प्लॅटफॉर्मसाठी 5.7 अब्ज डॉलर गुंतवणूक केलीये. फेसबुकचे व्हॉट्सअॅप रिलायन्स-जिओच्या भागीदारीमुळे चिनी प्लॅटफॉर्म वीचॅटला स्पर्धा देऊ शकेल.
सतीश कुमार यांना ही चीन-मुक्त आत्मनिर्भरता वाटते. ते सांगतात, "गुगल जिओ प्लॅटफॉर्मवर पैशांसोबत उपकरण आणि तंत्रज्ञानसुद्धा उभारत आहे. त्यामुळे याला भारतीय कंपनीची आत्मनिर्भरता असं म्हणता येणार नाही. पण चिनी कंपनी-मुक्त भारत बनवण्याचा प्रयत्न म्हणू शकतो."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)