You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुकेश अंबानी आणि जेफ बेजोस बिग बाजारवरून आमनेसामने का आले आहेत?
- Author, आलोक जोशी
- Role, ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी
जगातील सर्वाधिक श्रीमंत आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आता आमनेसामने आले आहेत. दोघांच्या मध्ये आहेत भारताचे रिटेल किंग किशोर बियाणी आणि त्यांचं बिग बाजार.
रिटेल उद्योगातील बिग बाजार या लोकप्रिय ब्रँडवरूनच अॅमेझॉनचे मालक जेफ बेजोस आणि रिलायन्स समुहाचे मुकेश अंबानी या दोघांमध्ये ठिणगी पेटली आहे.
जेफ बेजोस जगातले सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत, तर मुकेश अंबानी हे भारतातले सर्वाधिक श्रीमंत आहेत. जगभरात श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी यांचा क्रमांक चौथा आहे.
गेल्या रविवारी (25 ऑक्टोबर) अॅमेझॉनने सिंगापूर आंतरराष्ट्र आर्बिटेशन सेंटरमध्ये एक अंतरिम आदेश जारी करवून घेतला. यामध्ये फ्यूचर ग्रुप आपला व्यवसाय रिलायन्स समुहाला विकू शकत नाही, असा आदेश देण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती आपण जाणून घेऊ.
बियाणी यांच्या फ्यूचर ग्रुपने आपला संपूर्ण रिटेल आणि होलसेलचा व्यवसाय रिलायन्स समुहाच्या रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडला विकला आहे. संबंधित करारारवर त्यांनी सहीसुद्धा केली आहे.
ऑगस्ट महिन्यात दोन्ही कंपन्यांनी याची घोषणा केली होती. यासाठी रिलायन्स तब्बल 24 हजार 700 कोटी रुपये फ्यचर ग्रुपला देणार आहे.
जगभरातील सर्वच रिटेल व्यावसायिकांची नजर फ्यूचर ग्रुपवर
रिलायन्स आणि फ्यूचर ग्रुपच्या करारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. अखेर किशोर बियाणी हा करार का करत आहेत? हा करार केल्यानंतर त्यांचा संपूर्ण रिटेल आणि होलसेल व्यवसाय विकला जाईल. तरीही कंपनीचं संपूर्ण कर्ज मिटणार नाही.
कंपनीने गेल्या काही वर्षात नवे व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रचंड पैसा खर्च केला होता. बियाणी कुटुंबाने स्वतःचे शेअर्ससुद्धा गहाण ठेवले. व्यवसाय वाढून उत्पन्न वाढेल, तेव्हा हे कर्च चुकतं करून शेअर्स सोडवून घेऊ, असा त्यांचा विचार होता.
किशोर बियाणी गेल्या कित्येक दिवसांपासून जगभरातील एखाद्या मोठ्या रिटेलरशी हातमिळवणी करण्याच्या प्रयत्नात होते. वॉलमार्टशी त्यांची लांबलचक चर्चा झाली. जगभरातील अनेक दिग्गजांशीही त्यांची चर्चा झाली. फ्रान्सच्या कारफुअरसोबत त्यांचा करार होईल, असा अंदाज गेल्या 10 वर्षांपासून व्यक्त केला जात होता.
सोप्या शब्दात सांगायचं तर जगभरातील अनेक मोठ्या रिटेलर्सची नजर फ्यूचर ग्रुपवर होती. भारतात हीच सर्वात मोठी रिटेल कंपनी आहे. आगामी काळात टाटा, बिर्ला किंवा रिलायन्ससारख्या कंपन्यांसोबतच्या स्पर्धेत टिकायचं असेल तर मोठा भागीदार असावा, असं फ्यूचर ग्रुपच्या व्यवस्थापनालासुद्धा वाटत होतं.
पण यामध्ये फक्त एकच अडचण होती. ती म्हणजे भारताचं परकीय गुंतवणूक धोरण. विशेषतः रिटेल व्यवसायात परदेशी गुंतवणुकीबाबत सर्व सरकारं सावधगिरी बाळगतात.
कोणताही परदेशी गुंतवणुकदार कंपनीत योग्य प्रमाणात भागिदारी मिळेपर्यंत गुंतवणूक करण्यास तयार होत नाही. कमीत कमी निर्णयात सहभाग घेण्यासाठीचा दबाव निर्माण करण्याएवढं हे प्रमाण असावं, असा त्यांचा विचार असतो.
रिटेल व्यवसायाचे नियम ही गोष्ट कठीण बनवतात. काही अटी-शर्थींसह आता सिंगल ब्रँड रिटेलमध्ये 100 टक्के आणि मल्टी ब्रँड रिटेलमध्ये 51 टक्क्यांपर्यंतची भागिदारी परदेशी कंपनी घेऊ शकते. पण याचा मार्ग इतका सोपाही नाही.
अनेक कंपन्या या अटींशी सहमत नसतात. दुसरी सर्वात मोठी अडचणी म्हणजे ऑनलाईन रिटेलर म्हणजेच ई-कॉमर्स कंपन्यांसाठी हे नियम पूर्णपणे वेगळे आहेत.
ही सूट मिळाल्यानंतरसुद्धा कोणतीही ई-कॉमर्स कंपनी भारतात कोणत्याही रिटेल कंपनीत 10 टक्क्यांपेक्षा जास्त भागिदारी विकत घेऊ शकत नाही. तसंच दोन्ही कंपन्यांचा ऑनलाईन व्यापार आणि ऑफलाईन म्हणजेच दुकान, स्टोअर, गोदाम वगैरे यांचा आपसांत कोणताही संबंध राहणार नाही, अशीसुद्धा अट आहे.
हा नियम विचित्र आहे. कारण एका बाजूला अॅमेझॉन भारतात प्रचंड व्यवसाय करत आहे. तर दुसरीकडे भारतात सुरू झालेलं फ्लिपकार्ट आता वॉलमार्टच्या ताब्यात गेलं आहे. पण अॅमेझॉनसाठी फ्यूचर ग्रुप किंवा त्यांसारख्या रिटेलरची भागिदारी खरेदी करणं अजूनही सोपं नाही.
जगभरात अॅमेझॉन सर्वात मोठा ऑनलाईन रिटेलर
अनेक रिटेलर्सनी आपापल्या पार्टनरचा शोध करून ठेवलेला होता. कायद्यांमध्ये बदल झाल्यास करार करण्याचा त्यांनी विचार केलेला आहे. जागतिक इकोनॉमिक फोरमच्या अंदाजानुसार, 2030 पर्यंत अमेरिका आणि चीननंतर भारत जगभरातील सर्वात मोठी रिटेल बाजारपेठ बनणार आहे.
यावर्षी देशातील रिटेल व्यवसाय सुमारे 70 हजार कोटी डॉलर इतका आहे. येत्या 10 वर्षांत हा व्यवसाय वाढून सुमारे 1 लाख 30 हजार डॉलरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.
जगातील सर्वात मोठा ऑनलाईन रिटेलर असलेल्या अॅमेझॉनची या गोष्टीकडे नजर असणं स्वाभाविकच आहे. त्यामुळेच आज ना उद्या सरकार परकीय गुंतवणुकीसाठीचा मार्ग सोपा करेल, अशी त्यांना अपेक्षा होती.
ऑनलाईन आणि ऑफलाईन रिटेल व्यवसाय वेगळा कसा असू शकतो, हा प्रश्न अर्थतज्ज्ञ विचारत असतात.
याच सगळ्या घडामोडींदरम्यान अॅमेझॉनने फ्यूचर ग्रुपसोबत एक करार केला होता. 2019 च्या ऑगस्ट महिन्यात फ्यूचर ग्रुपची कंपनी फ्यूचर कूपन्स लिमिटेडची 49 टक्के भागिदारी अॅमेझॉनने खरेदी केली होती.
ही कंपनी गिफ्ट व्हाऊचर, पेमेंट अॅप आदी गोष्टींचा व्यवसाय करते. म्हणजेच तुम्ही बिग बाजार किंवा सेंट्रल मॉलमधून गिफ्ट व्हाऊचर विकत घेऊन इतरांना देता, तो व्हाउचर या कंपनीचा असतो.
पण सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या कंपनीकडे फ्यूचर रिटेल लिमिटेडमध्ये जवळपास 10 टक्के भागिदारी होती.
म्हणजेच फ्यूचर रिटेलमध्ये पैसे लावणं ही सुरुवात असून येत्या काळात यामध्ये वाढ करता येईल, असं अॅमेझॉनला वाटत होतं.
अधिकार मिळाल्यास फ्यूचर ग्रुप रिटेलचा व्यवसाय पूर्णपणे विकत घेता येईल, असंही अॅमेझॉन-फ्यूचरच्या करारपत्रकात लिहिलेलं होतं.
म्हणजेच अॅमेझॉनने मागच्या दाराने फ्यूचर ग्रुपमध्ये भागिदारी घेण्यास सुरुवात केल्याचं म्हटलं जात होतं.
हा करार ऑगस्ट 2019 ला झाला होता, हे आपण लक्षात घ्यायला हवं. त्यादरम्यान फ्यूचर ग्रुप फुड बाजार, फॅशन अॅट बिग बाजारसारखे नवे फॉरमॅट तसंच बिग बाजार हा नवा ब्रँड वाढवण्याच्या प्रयत्न होता.
गेल्या सहा-सात वर्षात इतर कंपन्या किंवा त्यांचा व्यवसाय खरेदी करून आपला व्यवसाय वाढवण्याचाही फ्यूचर ग्रुपचा प्रयत्न होता.
कोरोना व्हायरसमुळे अडचणी
या काळात फ्यूचर ग्रुपने भरपूर कर्ज घेतलं. दरम्यान रिलायन्स रिटेलचा व्यवसायही वाढत चालला होता. IPO आणि डी-मार्टसुद्धा नव्या जोशात वाढत होतं.
देशाची परिस्थिती सुधारत चालल्याचं सांगण्यात येत होतं. त्यामुळे कर्ज घेऊन व्यवसाय वाढवण्यात धोका नव्हता.
कर्जासाठ प्रमोटर बियाणी यांनीसुद्धा अनेक शेअर गहाण ठेवले. त्यावेळी फ्यूचर रिटेलचा शेअर 380 रुपयांना होता. पण फेब्रुवारी महिन्यात अचानक शेअरच्या किंमतीत घट झाली. काही काळ त्यांचे शेअर 100 रुपयांपर्यंत खाली आले.
भाव पडत चालल्याचं दिसताच बँक मार्जिनमध्ये आणखी शेअर मागतात. त्यामुळे बियाणी यांचे सर्वच शेअर बँकांकडे गहाण पडले, अशी परिस्थिती निर्माण झाली.
दरम्यान कोरोना व्हायरसचं आगमन झालं. मार्च-एप्रिल महिन्यातील लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्यांचं कंबरडं मोडलं. खरेदी-विक्रीच बंद झाली. त्यामुळे व्यवसाय ठप्प झाला.
पुढच्या तीन-चार महिन्यात फ्यूचर ग्रुपला सात हजार कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं किशोर बियाणी यांनी एका मुलाखतील म्हटलं आहे.
अखेर कंपनीला विकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्याकडे कोणताच पर्याय शिल्लक राहिला नव्हता, असंही बियाणी यांनी सांगितलं.
सिंगापूरच्या न्यायालयात कंपनीच्या वकिलांनीही हाच युक्तिवाद मांडला आहे. हा करार केला नसता तर कंपनी दिवाळखोरीत निघाली असती, असं त्यांनी म्हटलं.
पण अॅमेझॉनने हा वाद सिंगापूरला का नेला? आता हा करार इथेच अडकणार का?
याबाबत आत्ताच काही सांगू शकत नाही. फक्त दोन्ही पक्षांकडून औपचारिक वक्तव्यं येत आहेत.
सिंगापूर न्यायालयाचा निर्देश मिळाल्यानंतरही रिलायन्सने हा करार पूर्ण करण्यास आपण कटिबद्ध असल्याचं म्हटलं. असंच एक वक्तव्य फ्यूचर ग्रुपकडूनही आलं.
या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
पण कायदेतज्ज्ञांच्या मते, सिंगापूरमधील न्यायालयाचा निर्णय भारतात थेट लागू होत नाही. वादात अडकलेल्या दोन्ही पक्षांनी त्यांचा आदेश ऐकल्यास काही हरकत नाही.
पण फ्यूचर ग्रुप हा करार थांबवण्यास तयार नसला तर अॅमेझॉनला भारतातील एखाद्या न्यायालयात जाऊन सिंगापूर न्यायालयाचा हा निर्णय दाखवावा लागेल. हा निर्णय भारतात कायम ठेवावा लागेल. तेव्हाच हा करार रोखला जाईल.
दोन्ही पक्ष आमनेसामने कशामुळे?
सूत्रांच्या माहितीनुसार, फ्यूचर ग्रुप आता पुढाकार घेण्याऐवजी वाट पाहत आहे. अॅमेझॉनने खटला दाखल करावा, मग त्यावर प्रतिक्रिया द्यावी, असा त्यांचा विचार आहे. ही सुनावणी दिल्ली हायकोर्टातच होऊ शकते. कारण फ्यूचर आणि अॅमेझॉनच्या करारानुसार वाद दिल्लीतच सोडवण्यात यावा, असा उल्लेख आहे.
जाणकारांच्या मते, फ्युचर ग्रुपचे दोन युक्तिवाद त्यांची बाजू भक्कम दाखवतात.
1. अॅमेझॉनसोबतच्या करारात फ्यूचर रिटेल कोणताच पक्ष नव्हता, त्यामुळे त्यांना हा व्यवसाय विकण्याचा हक्क आहे.
2. शिवाय हा व्यवसाय न विकल्यास कंपनी दिवाळखोरीत जाईल. असं झाल्यास हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येऊ शकते.
अॅमेझॉन आणि फ्यूचर ग्रुप यो दोघांनाही बिग बाजार आपल्याकडे ओढून घ्यायचं आहे, त्यामुळेच या मुद्द्यावरून अॅमेझॉन आणि रिलायन्स आमनेसामने आले आहेत.
भारतात 10 हजार 900 स्टोअर्स आणि 1 लाख 30 हजार कोटी रुपयांच्या वार्षिक व्यवसायासर रिलायन्स रिटेल देशातील सर्वात मोठी रिटेल कंपनी आहे. फ्यूचर ग्रुपसोबतचा करार त्यांना आणखी 1700 स्टोअर आणि 20 हजार कोटी रुपयांचं उत्पन्न देईल.
पण अॅमेझॉनच्या डोक्यात वेगळा विचार आहे. त्यांना भारतात साडेसहा अब्ज डॉलर गुंतवायचे आहेत. त्यांना सर्वात मोठं आव्हान रिलायन्सकडूनच आहे. रिलायन्सकडे फक्त रिटेल नेटवर्कच नाही तर जिओ मार्टसारखं ऑनलाईन पोर्टलसुद्धा आहे.
अॅमेझॉनला फक्त ऑनलाईन व्यवसायावर अवलंबून राहावं लागेल. तर ऑनलाईन मार्केटमध्ये फ्लिपकार्टने आदित्य बिरला फॅशन रिटेलमध्ये भागिदारी खरेदी केली आहे. यामुळेच अॅमेझॉन हा करार रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे.
फ्यूचर ग्रुपने हा करार मोडल्यास नवीन खरेदीदार आणण्याची जबाबदारीही घेण्यासाठी अॅमेझॉन तयार आहे, असा प्रस्ताव त्यांनी सिंगापूरमध्ये मांडला होता.
याबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. पण लवकरच नेमकं चित्र स्पष्ट होईल, अशी अपेक्षा आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)