विराट कोहलीचं टी-20 क्रिकेट करिअर धोक्यात आलंय का?

    • Author, चंद्रशेखर लुथरा,
    • Role, वरिष्ठ क्रीडा पत्रकार.

अगदी काही महिन्यांपूर्वीपर्यंत विराट कोहली क्रिकेटच्या बहुतांश फॉरमॅट्समध्ये उत्कृष्ट फलंदाज होता.

कोहलीच्या फलंदाजीनं सचिन तेंडुलकरच्या वनडे क्रिकेटमधील 49 आणि क्रिकेटच्या 51 शतकांचा विक्रम तुटताना दिसत होतं. 2017 साली मुख्य प्रशिक्षकपदी अनिल कुंबळेच्या जागी रवी शास्त्रींना घेऊन विराटच्या दबदब्यावर भारतीय क्रिकेट बोर्डानं मोहर उमटवली होती. एक दशकभर विराटचा हा दबदबा कायम राहिला.

विराटचा दबदबा असण्याचं कारण त्याची फलंदाजी धडाकेबाज होती. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर 70 शतकं काही साधी गोष्ट नव्हती. मात्र, कोहलीच्या फलंदाजीला 22 नोव्हेंबर 2019 नंतर उतरती कळा लागली. कारण या दिवसानंतर त्यानं एकदाही शतकी खेळी केली नाही.

विराट नोव्हेंबर 2019 नंतर 100 सामने खेळला. त्यात 17 कसोटी, 21 एकदिवसीय आणि 25 टी-20 सामन्यांसह 37 आयपीएल सामन्यांचा समावेश आहे. मात्र, यात एकदाही तो शतक पूर्ण करू शकला नाही.

विराटच्या बॅटला काय झालं?

असं नाहीय की, विराट पूर्णपणे आऊट ऑफ फॉर्म आहे. कर्णधारपदाच्या कारकीर्दीत त्यानं उत्तम कामगिरी केली. आताही तो सुरुवात चांगली करतो, मात्र चांगल्या खेळीत त्याचा रुपांतर होताना दिसत नाहीय.

बांगलादेशविरोधात कोलकात्यात शतक ठोकल्यानंतर अनेकदा तो पन्नास किंवा त्याहून अधिक धावा करण्यात यशस्वी झाला. मात्र, करिअरमधील 71 व्या शतकापर्यंत तो पोहोचतच नाहीय.

इंग्लंडविरोधातील एजबॅस्टन कसोटीपासून पहिल्या एकदिवसीय सामन्यापर्यंत विराटनं मोठी धावसंख्या उभारली नाही. यानंतर तर त्याच्या संघात असण्याबद्दलही प्रश्न उपस्थित केले गेले.

एजबेस्टन कसोटीआधी भारत लिसेस्टरशायर काऊंटीच्या विरोधात एक सराव सामना खेळला होता. त्यात विराटनं आपल्या फॉर्ममध्ये दिसत होता.

पहिल्या डावात 33 धावा बनवल्यानंतर विराटनं दुसऱ्या डावात 67 धावा बनवल्या होत्या. मात्र, एजबॅस्टन कसोटीत विराटनं केवळ 11 आणि 20 धावा बनवल्या.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येच नव्हे, तर आयपीएलमध्येही विराट फारसं काही करू शकला नाही.

यंदाच्या आयपीएलमध्ये विराटनं 16 सामन्यांमध्ये केवळ 341 धावसंख्या नावावर केली. यात त्याचा स्ट्राईक रेटही 116 पेक्षा कमी राहिला. हा स्ट्राईक रेट त्याच्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटपेक्षा फारच कमी आहे.

विराटच्या अशा कामगिरीची कारणं काय?

विराट मोठ्या कालावधीपासून मोठी खेळी करू शकला नाहीय. मात्र, फलंदाजी करताना तो अडखळतानाही दिसत नाही.

धावांसाठी तो संघर्ष करतोय असंही चित्र नाही. मात्र, तरीही फार वेळ तो मैदानात तग धरून राहताना दिसत नाहीय.

यावरून क्रीडा विश्लेषकांना वाटतंय की, विराटचा आत्मविश्वास कमी होत चालला आहे किंवा फलंदाजीवर तो लक्ष केंद्रित करू शकत नाहीय.

विराट भले मैदानात संघर्ष करताना दिसत नसेल, मात्र तांत्रिक चुका त्याची पाठ सोडताना दिसत नाहीय. हल्ली तो अनेकदा फ्रंट फूटवर खेळताना दिसतोय. मात्र, यामुळे तो मोठी खेळी करत नाहीय, असं म्हणणं अतिशयोक्ती ठरू शकते.

क्रिकेटसारख्या खेळात नशिबाचा भागही खूप महत्त्वाचा असतो. विराट जेव्हा धावांचा पाऊस पाडत होता, तेव्हा त्यांच्या खेळण्यातल्या तांत्रिक चुकांची फारशी चर्चा झाली नाही.

विराटच्या करिअरमध्ये एका शतकासाठी इतका वेळ वाट पाहावी लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. कसोटी क्रिकेटमधील फलंदाजांच्या ताज्या रँकिंगमध्येही तिसऱ्या स्थानावरून विराट 13 व्या स्थानावर आला आहे.

त्याचसोबत, पहिल्यांदाच क्रिकेट रसिक विराटच्या संघातील स्थानावरही प्रश्न उपस्थित करत आहेत.

सोशल मीडियावर चर्चा होतेय की, विराटच्या या अपयशाचं टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरवरही परिणाम होतोय.

दुसरीकडे, विराटचे समकालीन इंग्लंडचा जो रूट, न्यूझीलंडचा केन विलियम्सन आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्हन स्मिथ सातत्यानं चांगली कामगिरी करतायेत.

टी-20 संघातून वगळण्याची मागणी

आपल्या फॉर्ममध्ये परतण्यासाठी विराटनं यंदाच्या आयपीएलमध्ये सलामीला उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचाही त्याला फारसा फायदा झाल्याचं दिसलं नाही.

त्याचा स्ट्राईक कमी होत गेला. टी-20 इंटरनॅशनल सामन्यातही युवा खेळाडूंचा स्ट्राईक रेटही चांगला राहिला.

यावर्षी आयसीसी टी-20 वर्ल्डकपसाठी आता 100 हून कमी दिवस राहिलेत. ऑस्ट्रेलियाच्या मैदानातली आव्हानं पाहता विराटला 15 सदस्यांच्या टीममधूनही बाहेर ठेवण्याची मागणी केली जातेय. याचं मोठं कारण म्हणजे, विराटची जागा घेण्यासाठी इतर खेळाडूही तयार आहेत.

सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर आणि दीपक हुड्डा यांसारखे खेळाडू विराटची जागा घेण्याच्या रांगेत आहेत.

टी-20 वर्ल्डकपआधी भारतीय निवडकर्त्यांना वेस्ट इंडीज आणि झिम्बब्वेचा दौरा करणाऱ्या आणि एशिया कपमध्ये भाग घेणाऱ्या टीमची निवड करावी लागणार आहे.

जर या दौऱ्यासाठी विराटला निवडलं गेलं नाही, तर त्याच्यासोबत थोडा कठोरपणा होईल, असं त्याचं आतापर्यंतचं करिअर पाहता वाटू शकेल. पण त्याची जागा घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनाही फार काळ रांगेत ठेवता येणार नाहीय.

27 वर्षीय दीपक हुड्डाचं उदाहरण समोर आहे, जो धडाकेबाज फलंदाजीसह ऑफ स्पिन गोलंदाजीही उत्तम करतो.

रोहतकमध्ये जन्मलेला दीपक हुड्डाचा उत्तम वापर यावेळी आयपीएलमध्ये लखनऊ जायंट्सनं गोलंदाज म्हणून केला होता.

टी-20 मध्ये रविचंद्र अश्विनचं कमबॅक कठीण दिसतंय, अशावेळी यजुवेंद्र चहलसोबत हुड्डा चांगली जोडी बनू शकतो.

दीपक हुड्डाचं वैशिष्ट्य आहे की, तो टीमच्या गरजेनुसार कुठल्याही स्थानी फलंदाजी करण्यासाठी तयार असतो.

आयर्लंडविरोधात केवळ 55 चेंडूत त्यानं ज्या पद्धतीने हुड्डा खेळला, तसं भारतात फार कमीवेळा दिसून येतं. तो स्पिन खेळतानाही डगमगत नाही आणि शॉर्टपिच चेंडू खेळतानाही डगमगत नाही. ऑस्ट्रेलियातील मैदानं पाहता, त्याचं हे वैशिष्ट्य भारतासाठी फायद्याचं ठरू शकतं.

संधी मिळण्याच्या प्रतीक्षेत खेळाडू

भारतीय टी-20 संघात संधी मिळण्याची प्रतीक्षा अनेक खेळाडूंना आहे. जगभरातील आंतरराष्ट्रीय संघांनी प्रचंड आक्रमक अशा खेळाडूंना संघात स्थान दिलं आहे.

दुसरीकडे भारताकडे आजही आघाडीच्या फळीत लोकेश राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे परंपरागत पद्धतीने खेळणारे फलंदाज आहेत.

तिन्ही फलंदाज मोठी खेळी खेळण्यात सक्षम आहेत. पण शेवटपर्यंत डाव नेण्याची इच्छाशक्ती यांच्यात अद्याप कमी दिसून आली.

अशा स्थितीत दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंतसारखे खेळाडू मध्यफळीला मजबूत करण्याचं काम करू शकतात.

खरं तर विराट कोहलीला वगळण्यासाठी संघ प्रशासनाकडे अनेक कारणेही आहेत. कारण चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या ज्येष्ठ खेळाडूंनाही कामगिरीच्या आधारावर संघाबाहेर बसावं लागलं होतं.

काऊंटी स्पर्धेत चांगली कामगिरी करून पुजाराने संघात पुन्हा स्थान मिळवलं. तर रहाणे अद्याप संघाबाहेरच आहे.

कोहलीची जागा घेण्यासाठीच्या रांगेत अनेक नव्या दमाचे खेळाडू आहेत. यामध्ये श्रेयस अय्यरचा समावेश आहे. त्याच्याकडे फटकेबाजी करण्याची क्षमता आहे.

श्रेयसला आतापर्यंत अनेक संधी देण्यात आल्या. पण इंग्लंड दौऱ्यात त्याच्यातील कमतरता समोर आली. त्याच्याव्यतिरिक्त संजू सॅमसनही संघात जागा मिळवण्याच्या प्रतीक्षेत आहे.

सध्या सर्वांचं लक्ष एका खेळाडूवर आहे. तो म्हणजे सूर्यकुमार यादव.

त्याने 24 वनडे सामन्यांमध्ये 41 च्या सरासरीने तसंच 97 च्या स्ट्राईकरेटने धावांचा रतीब घातला आहे.

शिवाय इंग्लंडविरुद्ध अंतिम टी-20 सामन्यात त्याने 55 चेंडूंत 117 धावा करून अफलातून कामगिरी केली होती.

या सामन्यात भारताला पराभवाचा झटका बसला तरी सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीने सर्वांची मने जिंकली होती.

कोहलीची पुढची वाटचाल

कोहलीची क्षमता पाहता तो या संकटातून बाहेर येईल, असा विश्वास सर्वांना आहे.

18 व्या वर्षी दिल्लीच्या रणजी संघातून खेळत असताना त्याच्यावर अशा प्रकारची परिस्थिती ओढावली होती. पण त्याने सर्व दबाव झुगारून लक्षवेधी कामगिरी केली होती.

त्यावेळी कोहली कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात आपला पहिला सामना खेळत होता. या सामन्याच्या आदल्या रात्री त्याच्या वडिलांच्या निधनाची माहिती त्याला मिळाली. पण त्याने मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.

या सामन्यात विराटने आपल्या करिअरची सर्वोत्तम खेळी खेळली होती. कर्नाटकच्या मजबूत गोलंदाजीला तोंड देत त्याने 90 धावा केल्या. त्याच्या या खेळीला आजही अविस्मरणीय म्हणूनच संबोधलं जातं.

गेल्या 30 महिन्यांपासून कोहलीने क्रिकेटच्या मैदानात मोठा डाव खेळलेला नाही. पण तो पुनरागमन करेल, याचा विश्वास त्याच्या चाहत्यांना आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)