महेंद्रसिंग धोनी: ब्रिटिशांनी भारताची पहिली क्रिकेट टीम कशी तयार केली?

    • Author, प्रशांत किदंबी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

क्रिकेटबाबत असं म्हटलं जातं की खरंतर हा एक भारतीय खेळ आहे पण चुकून इंग्रजांनी त्याचा शोध लावला.

ऐतिहासिकदृष्ट्या गमतीची एक गोष्ट म्हणजे खास ब्रिटिशांसाठीचा, उच्चवर्गीय असा समजला जाणारा हा खेळ पूर्वी त्यांचीच कॉलनी असणाऱ्या एका देशाचं वेड बनलेला आहे. त्याहीपेक्षा विलक्षण गोष्ट म्हणजे आता भारत जागतिक क्रिकेटमधली एक सुपरपॉवर आहे.

भारतीयांसाठी ही बाब अतिशय महत्त्वाची आहे कारण त्यांच्यामते त्यांची क्रिकेट टीम - "'टीम इंडिया" भारतीय ऐक्याचं प्रतीक आहे आणि यातले खेळाडू देशातल्या विविधतेचं प्रतिनिधित्व करतात.

क्रिकेट खेळणारा देश

माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड म्हणतो, "गेल्या दशकभरामध्ये भारतीय क्रिकेट टीम ही देशाचं प्रतिनिधित्व सर्वाथाने करत आहे. या टीममधले सदस्य भिन्न संस्कृतींचे आहे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे आहेत आणि समाजाच्या विविध स्तरांतून आलेले आहेत."

पण क्रिकेट आणि भारत देशातलं हे नातं ना नैसर्गिक होतं ना टाळता न जेण्याजोगं.

12 वर्षं आणि फसलेल्या तीन प्रयत्नांनंतर पहिली क्रिकेट टीम 1911च्या उन्हाळ्यात क्रिकेटच्या मैदानात उतरली. लोकप्रिय हिंदी चित्रपट - लगान - पाहिलेल्या अनेकांना असं वाटू शकतं की ही 'राष्ट्रीय टीम' इंग्रज साम्राज्याच्या विरुद्ध असेल. पण तसं नसून ही टीम खरंतर इंग्रजांनीच तयार केली होती.

भारतीय उद्योगपती, संस्थानिक आणि प्रचारकांनी ब्रिटिश सरकार, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार, सैनिक आणि व्यावसायिक प्रशिक्षक या सगळ्यांच्या सोबत काम करत भारतीय क्रिकेट टीम अस्तित्वात आणली.

विराट कोहली आणि त्याची टीम 2019च्या आयसीसी वर्ल्ड कपच्या मोहीमेवर निघायच्या शंभरपेक्षा जास्त वर्षांपूर्वी, ब्रिटिश अधिकारी आणि स्थानिक उच्चभ्रूंच्या प्रयत्नांतून उभ्या राहिलेल्या भारतीय क्रिकेट टीमने ब्रिटिश साम्राज्यामध्ये देशाचं प्रतिनिधित्त्व केलं होतं.

रणजींची जादू

भारतीय क्रिकेट टीमच्या निर्मितीची कथा दीर्घ आणि सुरस आहे. 1898 मध्ये पहिल्यांदा ही कल्पना मांडण्यात आली ती कुमार श्री रणजीत सिंह ऊर्फ रणजी यांच्यामुळे. भारतीय राजकुमार असलेल्या रणजी यांच्या बॅटिंग करिश्म्याने फक्त ब्रिटनच नाही तर सगळं ब्रिटिश साम्राज्यच प्रभावित झालं होतं.

भारतीय क्रिकेटचा प्रचार करणाऱ्यांनी टीम तयार करण्यासाठी रणजी यांच्या प्रसिद्धीचा फायदा घ्यायचं ठरवलं. पण रणजी आपल्या क्रिकेटमधल्या प्रसिद्धीचा फायदा घेत नवनगरचे राजा झाले होते. या स्वतंत्र टीमसाठीच्या मोहीमेमुळे आपल्या राष्ट्रीयत्त्वाचा प्रश्न येईल आणि त्याचा परिणाम इंग्लंडच्या क्रिकेट टीमचं मैदानात प्रतिनिधित्व करण्यावर होईल, अशी भीती त्यांना वाटली.

पण ब्रिटिश राजवटीमध्ये असेही काही जण होते ज्यांच्यावर रणजी यांच्या क्रिकेटमधील अचंबित करणाऱ्या यशाचा परिणाम झाला नव्हता. तेव्हाच्या 'बॉम्बे'चे माजी गव्हर्नर लॉर्ड हॅरिस हे त्यापैकीच एक. रणजी त्यांना नेहमीच एका स्वैर पक्ष्याप्रमाणे वाटत.

चार वर्षांनी पुन्हा हालचालींना सुरुवात झाली. यावेळी प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती वेगळ्या होत्या. आता ब्रिटिश भारतातील युरोपियन यासाठी हालचाली करत होते. त्यांना त्यांच्या देशांतल्या टीम्सनाही आकर्षित करायचं होतं. त्यांनी स्थानिक उच्चभ्रूच्या सोबतीने भारतीय क्रिकेट टीम उभी करायचा प्रयत्न केला. या देशाकडे क्रिकेटसाठीचं 'डेस्टिनेशन' म्हणून त्यांना सर्वांना आकर्षित करायचं होतं.

पण हिंदू, पारशी आणि मुस्लीम यांच्यामध्ये या टीममधल्या त्यांच्या प्रतिनिधित्वावरून तीव्र मतभेद झाले आणि हा प्रयत्नही फोल ठरला.

1906मध्येही पुन्हा प्रयत्न करण्यात आला आणि तो देखील पूर्वीच्याच प्रयत्नांसारखाच निष्फळ ठरला.

1907 ते 1909 या वर्षांमध्ये तरूण भारतीयांनी हिंसात्मक आंदोलनं केलं आणि ब्रिटिश अधिकारी आणि त्यांना साथ देणाऱ्यांना यामध्ये लक्ष करण्यात आलं. देशामध्ये भारतीयांना मुक्तपणे संचार करू न देण्याबद्दल ब्रिटनमध्ये खड्या चर्चा झाल्या.

अवलियांची मांदियाळी

या सगळ्या गोष्टींनी तयार झालेल्या नकारात्मकतेमुळे व्यथित झालेल्या आघाडीच्या उद्योगपतींनी आणि समाजकारण्यांनी, महत्त्वाच्या भारतीय राजांच्या सोबतीने लंडनला भारतीय क्रिकेट टीम पाठवण्याची ही मोहीम पुन्हा सुरू केली. या घटनेला ऐतिहासिक महत्त्व आहे कारण पहिल्यांदाच 'ऑल इंडिया' क्रिकेट टीम आकार घेत होती.

साम्राज्यासमोर भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ज्या लोकांची निवड करण्यात आली होती, ते सगळं अवलिया होते.

या टीमचे कॅप्टन होते 19 वर्षांचे पतियाळाचे महाराज भूपिंदर सिंह. नव्याने राज्याभिषेक झालेले हे महाराज सुखासीन होते आणि भारतातले सर्वांत शक्तीशाली शीख समजले जात.

बाकीच्या टीमची निवड धर्मानुसार करण्यात आली. यामध्ये 6 पारशी होते, 5 हिंदू होते आणि 3 मुस्लीम होते.

पण भारताच्या या पहिल्या क्रिकेट टीममधली सगळ्यांत वेगळी गोष्ट म्हणजे टीममध्ये असलेला दोन दलितांचा सहभाग. तेव्हाच्या बॉम्बेमधील बाळू आणि शिवराम हे पालवणकर बंधू उच्चवर्णीय हिंदूंच्या विरोधावर मात करत त्यावेळचे सर्वोत्कृष्ट क्रिकेटर बनले होते.

या टीमकडे पाहून लक्षात येतं की कशाप्रकारे 20व्या शतकाच्या सुरुवातीला क्रिकेट टीमवर ब्रिटिशकालीन भारतामधील सांस्कृतिक आणि राजकीय गोष्टींचा पगडा होता.

पारशांसाठी या क्रिकेटच्या मैदानाला एक विशेष महत्त्व प्राप्त झालं कारण त्यावेळी या समाजाच्या खालवणाऱ्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत होती. जसजसे हिंदू आणि मुस्लीम क्रिकेटच्या पिचसोबतच इतरत्रही आघाडीवर येऊ लागले, तसतसा पारशी समाज स्वतःच्या सामाजिक स्तराच्या घसरणीची चिंता करू लागला.

उत्तर भारतातल्या मुस्लिमांसाठीही क्रिकेटचं वेगळं महत्त्व होतं. ब्रिटिशांनी या उपखंडामध्ये स्थापित केलेल्या राजकीय सत्तेसोबत क्रिकेटमुळे त्यांना एक नवं नातं निर्माण करता आलं.

विशेष गोष्ट म्हणजे ब्रिटिशकालीन भारतामधल्या महत्त्वाच्या शिक्षण संस्थांपैकी एका संस्थेमध्ये क्रिकेटचा हा खेळ समाविष्ट करण्यात आला होता. तो ही मुस्लिमांचं एक वेगळं राजकीय स्थान निर्माण करण्यासाठी. पहिल्या भारतीय क्रिकेट संघातल्या चार मुस्लिम खेळाडूंपैकी तिघे अलीगढचे होते.

तिथल्या मोहम्मदन एँग्लो - ओरियंटल कॉलेज या सुप्रसिद्ध संस्थेची स्थापना समाज सुधारक सर सय्यद अहमद खान यांनी केली होती. आपल्या समाजामध्ये परदेशी शिक्षणाचा प्रसार करण्याचा त्यांचा हेतू होता.

अखेरीस क्रिकेट हा हिंदूंसाठीही असा आरसा ठरला ज्याच्या माध्यमातून जातीव्यवस्थेचा समाजावर होणाऱ्या घातक परिणामांचा विचार हिंदू समाजाला करावा लागला.

या सगळ्या वादाचं मूळ होतं, क्रिकेटची विलक्षण गुणवत्ता असणारं दलित कुटुंब. त्यांच्या क्रिकेट कौशल्यांमुळे आणि कामगिरीमुळे उच्चवर्णीय हिंदू पाळत असलेल्या विषमता आणि भेदाभेदाच्या चालीरीतींविषयी सवाल उभे राहिले.

पालवणकर बंधूंबाबत बोलायचं झालं, तर त्यांना त्यांच्या मानासाठी आणि आपल्यावर अन्याय होऊ नये म्हणून क्रिकेटमुळे झगडावं लागलं.

विशेषतः बाळू पालवणकर त्यांच्या उपेक्षित समाजामध्ये लोकप्रिय झाले. भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि दलित चळवळीचे प्रणेते बाबासाहेब आंबेडकरदेखील बाळू पालवणकरांना मानत.

दुसरीकडे महाराजा भूपिंदर सिंग यांच्यासाठी मात्र हा राजेशाही खेळ त्यांच्या भविष्यातील राजकीय हेतूंसाठी महत्त्वाचा ठरला. युद्धांमध्ये अडकलेल्या या राजाने त्याच्या पहिल्या संपूर्ण भारतीय टीमच्या कप्तान असण्याचा फायदा राजा म्हणून स्वतःच्या नेतृत्वाविषयी लोकांना असलेल्या शंका मिटवण्यासाठी केला.

साम्राज्याशी इमान

या मोहीमेला आर्थिक पाठबळ देणाऱ्या आणि सगळ्याचं आयोजन करणाऱ्या ब्रिटिश साम्राज्याच्या इमानदार लोकांसाठी क्रिकेट हे माध्यम होतं - भारताची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचं आणि भारत कायमच ब्रिटिश साम्राज्याचा भाग राहील हे ब्रिटनमधल्या अधिकाऱ्यांना पटवून देण्यासाठीचं.

ग्रेट ब्रिटन आणि नॉर्दर्न आर्यलंडच्या दौऱ्यावर गेलेल्या पहिल्या संपूर्ण भारतीय टीमच्या दौऱ्याचं हेच उद्दिष्टं होतं आणि यासाठी निवडण्यात आलेली वेळही योगायोगाची नव्हती. पंचम जॉर्ज यांचा लंडनमध्ये राज्याभिषेक त्या वर्षी झाला होता आणि त्यानंतर ते दिल्ली दरबारासाठी भारतात आले होते.

उपखंडामध्ये सध्या क्रिकेट म्हणजे आरडाओरडा करून देशप्रेम व्यक्त करण्याचं माध्यम बनलं आहे. आता या खेळाला "शस्त्रांविना युद्धाचं" स्वरूप देण्यात आलेलं आहे. अशा सगळ्या गदारोळात क्रिकेटचा हा विस्मरणात गेलेला इतिहास आठवणं हे सुखकारक आहे.

(डॉ. प्रशांत किदंबी हे युनिव्हर्सिटी ऑफ लिस्टरमध्ये कलोनियल अर्बन हिस्टीचे सहाय्यक प्राध्यापक असून ते क्रिकेट कंट्री : द अनटोल्ड हिस्ट्री ऑफ द फर्स्ट ऑल इंडिया टीम (पेंग्विन वायकिंग) या पुस्तकाचे लेखक आहेत.)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)