पुण्यात सिंहगड रोडवर संरक्षक भिंत कोसळून 6 जणांचा मृत्यू : #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. पुण्यात आंबेगाव-सिंहगडमध्ये संरक्षक भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू

दोन दिवसांपूर्वी पुण्यातल्या कोंढवा भागात आल्कन स्टायलस या इमारतीची संरक्षक भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच पुण्यात पुन्हा असाच प्रकार घडला आहे. आंबेगावमधील सिंहगड कॉलेज कँपसची संरक्षक भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यृ झाला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

या दुर्घटनेत नऊ जण जखमी झाले असून अग्निशमन दलातर्फे मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

राधेलाल पटेल (२५), जेटू लाल पटेल (५०), ममता राधेलाल पटेल (२२) आणि जेटू चंदन रवते अशी मृतांची आतापर्यंत समजलेली नावं आहेत. मृत व्यक्ती मूळच्या छत्तीसगढच्या असल्याची माहिती मिळत आहे.

2. कोण म्हणतंय मुंबई तुंबलीये? - मुंबईच्या महापौरांचा सवाल

'मुंबई कुठेच तुंबली नाही, तुम्ही विनाकारण प्रश्न निर्माण करत आहात. कुठेही पाणी तुंबलेले नाही किंवा वाहतूक कोंडीही झालेली नाही. त्यामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झालेले नाही,' असा दावा मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. महाराष्ट्र टाइम्सनं हे वृत्त दिलं आहे.

रविवार रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सोमवारी अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. रुळांवर पाणी साठल्यामुळे लोकलचं वेळापत्रकही कोलमडलं होतं. पण महापौरांनी या गोष्टी फेटाळून लावल्या.

'तुम्ही मला पाणी कुठे तुंबले हे दाखवा. मी त्या ठिकाणी तुमच्यासोबत प्रशासनाला घेऊन येतो,' असं महापौरांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 'मी स्वत: सांताक्रुजहून भायखळ्यापर्यंत गाडीनं आलो तसंच मुंबईचा महापौर म्हणून मी सर्व ठिकाणी फिरलो, मात्र मला कुठेही पाणी तुंबलेलं दिसलं नाही. मुंबई पूर्वपदावर आहे,' असंही महापौरांनी म्हटलं.

3. जलयुक्त शिवार योजनेतील गैरव्यवहाराच्या एसीबी चौकशीचे आदेश

जलयुक्त शिवार योजनेतील कामांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाद्वारे (एसीबी) करण्याचे आदेश विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सोमवारी राज्य सरकारला दिले. लोकमतनं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

जलयुक्त शिवार योजनेच्या 1300 कामांबाबत तक्रारी आहेत. पुरंदर तालुक्यात गैरव्यवहार झाल्याची कबुली मंत्र्यांनी सभागृहात दिली असल्याचं या बातमीत म्हटलं आहे.

या गैरव्यवहारांची एसीबी चौकशी करण्यास कृषी आयुक्तांनीच लेखी विरोध केल्यानं अनियमितता लपविण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या गैरव्यवहाराची एसीबी चौकशी व्हावी, अशी विरोधकांची मागणी होती.

4. कोस्टल रोडचा मार्ग बदलल्यास शेकडो कोटींचे नुकसान-मुंबई महापालिका

कोस्टल रोडच्या प्रस्तावित मार्गात बदल केल्यास प्रकल्पाचा खर्च शेकडो कोट्यवधींनी वाढेल असा युक्तिवाद मुंबई महापालिकेच्या वतीनं उच्च न्यायालयात करण्यात आला. सोमवारी यासंदर्भात न्यायालयातील सर्व युक्तिवाद संपला असून न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला आहे. एबीपी माझानं हे वृत्त दिलं आहे.

मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवर राज्य सरकार तसंच महापालिकेच्या वतीनं 29.2 किलोमीटरचा कोस्टल रोड बांधण्यात येत आहे.

कोस्टल रोडमुळे मच्छिमारांच्या व्यवसायावर परिणाम होईल तसंच पालिका आणि सरकारनं यासाठी आवश्यक परवानग्या घेतल्या नसल्याचा दावा करत कोळीवाडा नाखवा आणि वरळी मच्छिमार सर्वोदय सहकारी सोसायटीच्या वतीनं उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

सोसायटी फॉर इम्प्रूव्हमेन्ट ग्रीनरी अँड नेचरनंही यासंबंधी याचिका दाखल केली होती. या याचिकांवर न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू होती.

5. 'देशाच्या अखंडतेचा भंग करणाऱ्यांना प्रत्युत्तर देऊ'

जम्मू-काश्मीरमध्ये जमुरियत (लोकशाही), काश्मिरियत (संस्कृती) आणि इन्सानियत (मानवता) टिकवण्यासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रयत्न केले होते. मोदी सरकार हा मार्ग सोडणार नाही. मात्र, देशाच्या अखंडतेचा भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिला आहे. द इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवटीला सहा महिन्यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर करण्यात आला. समाजवादी पक्ष आणि बिजू जनता दलाने या प्रस्तावाला पाठिंबा दिला. राज्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवरील गावांसाठीही तीन टक्के आरक्षण लागू करण्याचे विधेयकही संमत करण्यात आलं.

काश्मीर खोऱ्यातील लोकांनी भीती बाळगू नये. त्यांनी भारताशी स्वत:ला जोडून घ्यावे मग, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची असेल, असंही शाह यांनी म्हटलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)