You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कर्जतजवळ मालगाडी घसरली, पावसामुळे रेल्वेवाहतूक विस्कळीत
कर्जतजवळ जामरुंग आणि ठाकूरवाडी या स्थानकांदरम्यान मालगाडीचे डबे घसरले आहेत. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून सकाळी मुंबईतून पुण्याच्या दिशेने (डाऊन) जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
लांब पल्ल्याच्या गाड्या इगतपुरीतमार्गे वळवण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेबरोबर पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या मार्गावरही परिणाम झाला आहे. पालघर परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे काही ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे.
पालघरमध्ये पहाटे 4 ते 5 या वेळेत 100 मिमी इतका पाऊस पडला असून या परिसरात एका रात्रीत 361 मिमी इतका पाऊस पडला आहे.
पावसामुळे आणि मालगाडी घसरल्यामुळे सीएसएमटी- पुणे (इंद्रायणी एक्स्प्रेस) सीएसएमटी-पुणे (इंटरसिटी एक्स्प्रेस), सीएसएमटी-पुणे (डेक्कन एक्स्प्रेस), सीएसएमटी-कोल्हापूर कोयना मुंबई-पुणे दरम्यान रद्द करण्यात आली आहे. भुसावळ-पुणे एक्स्प्रेस नाशिक रोड स्थानकात थांबविण्यात आली आहे.
सीएसएमटी-बेंगळुरु उद्यान एक्स्प्रेस, मनमाड एक्स्प्रेस, अहमदाबाद-पुणे दुरांतो एक्स्प्रेस, इंदूर-पुणे एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. हुजुरसाहिब एक्स्प्रेस पुण्यातच थांबवली आहे तसंच हमसफर एक्स्प्रेस पनवेलमध्ये थांबविण्यात आली आहे.
डहाणू येथे पहाटे साडेपाचपर्यंत 295 मिमी पाऊस पडला आहे. त्याचप्रमाणे हीच स्थिती पुढे 5 जुलैपर्यंत कायम राहिल असे स्कायमेट संस्थेने स्पष्ट केलं आहे.
रद्द झालेल्या गाड्या
मुंबई-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस
मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस
पुणे-मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेस
पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस
मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस
पुणे-भुसावळ एक्स्प्रेस
पुणे-पनवेल पॅसेंजर
मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस (मुंबई-पुणे दरम्यान रद्द)
भुसावळ-पुणे एक्स्प्रेस (नाशिकरोड स्टेशन स्थानकात थांबवली)
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)