वर्ल्ड कप 2019: इंग्लंडचा भारतावर 31 धावांनी विजय

इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा 31 धावांनी पराभव झाला. इंग्लंडने दिलेल्या 338 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला 306 धावांचीच मजल मारता आली.

टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये स्थान पक्कं करण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागेल. भारताकडून रोहित शर्माने शतकी खेळी साकारली. मात्र ती पुरेशी ठरली नाही. इंग्लंडतर्फे लायम प्लंकेटनं 3 विकेट्स घेतल्या.

रोहित शर्मा शतक करून बाद झाला. त्या पाठोपाठ ऋषभ पंत देखील आऊट झाला. लायम प्लंकेटने हार्दिक पंड्याला आऊट केलं.

रोहितने प्लंकेटच्या गोलंदाजीवर दोन धावा घेत यंदाच्या वर्ल्ड कपमधलं तिसरं तर करिअरमधलं 25वं शतक पूर्ण केलं.

राहुल झटपट बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी डाव सावरला. कोहलीने अर्धशतक पूर्ण केलं. विराटच्या तुलनेत संयमी खेळ करणाऱ्या रोहितने रशीदच्या गोलंदाजीवर चौकार खेचत अर्धशतक पूर्ण केलं. मात्र लायम प्लंकेटने कोहलीला बाद करत ही जोडी फोडली. कोहलीने 7 चौकारांसह 66 धावांची खेळी केली.

कोहली-शर्मा जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी केली.

मोहम्मद शमीने जो रूटला बाद करत इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडलं. त्यानं 44 धावा केल्या. दुसऱ्या बाजूने बेन स्टोक्सनं अर्धशतकाची नोंद केली. इंग्लंडने तीनशे धावा पूर्ण केल्या. मोहम्मद शमीने जोस बटलरला बाद केलं. त्याने 8 चेंडूत 20 धावा केल्या. शमीने 5 विकेट्स घेतल्या.

वर्ल्ज कपमध्ये सलग तीन मॅचमध्ये चार किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारा शमी केवळ दुसरा बॉलर आहे. याआधी शाहिद आफ्रिदीने हा विक्रम केला होता. शमीने अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्ध 4 विकेट्स घेतल्या तर या मॅचमध्ये 5 विकेट्स घेतल्या.

वर्ल्ड कपमध्ये एका डावात पाच विकेट्स घेणारा शमी सहावा भारतीय बॉलर आहे. याआधी कपिल देव, रॉबिन सिंग, वेंकटेश प्रसाद, आशिष नेहरा, युवराज सिंग यांनी डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत.

जसप्रीत बुमराहने बेन स्टोक्सला बाद केलं. त्याने 54 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 79 धावांची खेळी केली.

इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोनं हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिलंवहिलं शतक झळकावलं. वनडेतलं बेअरस्टोचं हे आठवं शतक आहे. इंग्लंडने 41व्या ओव्हरमध्ये 3 विकेट्सच्या मोबदल्यात 253 धावांची मजल मारली आहे. मोहम्मद शमीने बेअरस्टोला बाद केलं. त्याने 10 चौकार आणि 6 षटकारांसह 111 धावांची खेळी केली.

इंग्लंडचा कॅप्टन इऑन मॉर्गन शमीच्या गोलंदाजीवर बाद झाला.

कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर रवींद्र जडेजाने अविश्वसनीय कॅच टिपत जेसन रॉयला माघारी धाडलं. त्याने 66 धावांची खेळी केली.

के.एल. राहुलला झालेल्या दुखापतीमुळे जडेजा फिल्डिंगसाठी मैदानात उतरला. जडेजाने डावीकडे धाव घेत पुढे जाऊन बॉलचा अंदाज घेत अफलातून झेल टिपला. रॉयने 7 चौकार आणि 2 षटकारांसह 57 बॉलमध्ये 66 धावांची खेळी केली.

इंग्लंडविरुद्धच्या मुकाबल्यासाठी टीम इंडियाने विजय शंकरऐवजी ऋषभ पंतला संघात समाविष्ट केलं आहे. इंग्लंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडने 17 ओव्हर्समध्ये 124 धावांची खणखणीत सलामी दिली.

बेअरस्टोनं चहलच्या गोलंदाजीवर आक्रमण करत अर्धशतक पूर्ण केलं. दुखापतीतून सावरत पुनरागमनम करणाऱ्या रॉयनेही अर्धशतक पूर्ण केलं.

इंग्लंडने जेम्स विन्स आणि मोईन अली यांच्याऐवजी जेसन रॉय आणि लायम प्लंकेट यांना संधी दिली आहे.

जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉय यांनी सावध सुरुवात केली आहे.

सेमी फायनलच्या तीन जागांसाठी मुकाबला आता चुरशीचा झाला असून, टीम इंडियासमोर आता इंग्लंडचं आव्हान आहे.

टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये जागा पक्की करण्यासाठी एका विजयाची आवश्यकता आहे.

इंग्लंडला पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाने पराभवाचा दणका दिल्याने त्यांचे आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली आहे. इंग्लंडला उर्वरित दोन्ही लढतीत विजय मिळवणं क्रमप्राप्त आहे.

भारतीय संघ स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे. भारतीय संघाने पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजला नमवलं आहे. न्यूझीलंडविरुद्धची मॅच पावसामुळे रद्द झाली होती.

दुसरीकडे इंग्लंडने दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, बांगलादेश, वेस्ट इंडिज यांना नमवलं मात्र ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे इंग्लंडला भारत आणि न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवणे क्रमप्राप्त आहे.

विजय शंकर खेळणार का ऋषभ पंतला संधी मिळणार?

थ्रीडी प्लेयर असं वर्णन करत निवडसमितीने ऑलराऊंडर विजय शंकरची वर्ल्ड कप संघात निवड केली होती. विजय चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल असं त्यावेळी स्पष्ट करण्यात आलं होतं.

वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत विजय चौथ्या क्रमांकावर खेळतो आहे. मात्र त्याला एकही मोठी खेळी साकारता आलेली नाही. अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्ध त्याला गोलंदाजी देण्यातच आली नाही.

केवळ फलंदाज म्हणून खेळवायचं असेल तर विजयची कामगिरी अपेक्षेनुसार आहे. अशा परिस्थितीत शिखर धवनच्या जागी संघात संधी मिळालेल्या ऋषभचा संघात समावेश करावा अशी चर्चा आहे.

ऋषभला रोहित शर्माच्या बरोबरीने ओपनिंगला पाठवण्यात यावं आणि राहुलला चौथ्या क्रमांकावर खेळवावं असंही म्हटलं जात आहे. टीम इंडिया स्पर्धेत तूर्तास अपराजित आहे. मात्र विनाकारण कर्णधार कोहली विजयी संघात बदल करण्याची शक्यता कमी आहे.

धोनीच्या खेळाकडे लक्ष

अफगाणिस्ताविरुद्ध संथ खेळी केल्यामुळे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर जोरदार टीका झाली होती. त्या मॅचमध्ये धोनीने 51 चेंडूत 28 धावांची खेळी केली होती. वेस्ट इंडिजविरुद्ध धोनीने आठवर मिळालेल्या जीवदानाचा फायदा उठवत अर्धशतकी खेळी साकारली होती.

सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी धोनीच्या खेळात काही बदल सुचवले होते. विजय शंकर आणि केदार जाधव यांचा मर्यादित अनुभव लक्षात घेता मधल्या फळीला सावरण्याची जबाबदारी धोनीवरच आहे.

बुमराह आणि शमी फॉर्मात

भुवनेश्वर कुमार दुखापतग्रस्त झाल्याने मोहम्मद शमीला संधी मिळाली. अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्ध प्रत्येकी 4 विकेट्स घेत शमीने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.

अफगाणिस्तानविरुद्ध हॅट्रिक घेत शमीने वर्ल्ड कपमध्ये असा पराक्रम करणारा केवळ दुसरा भारतीय बॉलर ठरला आहे. भुवनेश्वर पुरेशा विश्रांतीनंतर फिट झाला आहे. इंग्लंडविरुद्ध भुवनेश्वरने संघात पुनरागमन केल्यास संघात बदल होऊ शकतो.

युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या फिरकी जोडगोळीवर संघव्यवस्थापनाचा विश्वास आहे. जसप्रीत बुमराहने प्रत्येक मॅचमध्ये आपलं कौशल्य सिद्ध केलं आहे. धावा रोखणं आणि विकेट्स पटकावणं या दोन्ही आघाड्यांवर बुमराह यशस्वी ठरला आहे. बुमराह टीम इंडियाचं ट्रंप कार्ड आहे.

इंग्लंडच्या फलंदाजीला ग्रहण

जोरदार फटकेबाजीसाठी प्रसिद्ध इंग्लंडचे फलंदाज ढेपाळत असल्याचं चित्र आहे. मांडीच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीतून सलामीवीर जेसन रॉय सावरला आहे. रॉयच्या आगमनाने इंग्लंड कॅम्पमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

जो रूट, जोस बटलर, इऑन मॉर्गन, बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो या सगळ्यांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. भारतासारख्या बलाढ्य संघाविरु्ध खेळताना या अव्वल बॅट्समनवर जबाबदारी आहे.

इंग्लंडची गोलंदाजी चिंतेचा विषय

जोफ्रा आर्चर, लायम प्लंकेट, मार्क वूड, आदिल रशीद, मोईन अली आणि बेन स्टोक्स या सगळ्यांना प्रतिस्पर्धी संघाचा ऑलआऊट करण्यात सातत्याने अपयश आलं आहे. इंग्लंडला सेमी फायनलमध्ये धडक मारायची असेल तर त्यांच्या गोलंदाजांना चमकदार कामगिरी करावी लागेल. जोफ्रा आर्चरच्या फिटनेसविषयी थोडी साशंकता आहे.

हेड टू हेड

भारत आणि इंग्लंड वर्ल्ड कपमध्ये सातवेळा एकमेकांसमोर आले आहेत. भारताने 3 तर इंग्लंडने 3 मॅचेस जिंकल्या आहेत. एक मॅच टाय झाली आहे. त्यामुळे विजयाचं पारडं 50-50 असं आहे. 2011 वर्ल्ड कप स्पर्धेत या दोन संघांमध्ये शेवटचा मुकाबला झाला होता. ती मॅच टाय झाली होती.

खेळपट्टी आणि वातावरण

बर्मिंगहॅमच्या मैदानावर दोन मॅच झाल्या आहेत. या दोन्हीमध्ये मोठ्या धावसंख्येची नोंद झाली नाही.

संघ

भारत- विराट कोहली, रोहित शर्मा, के.एल.राहुल, ऋषभ पंत, विजय शंकर, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या.

इंग्लंड-इऑन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जेम्स विन्स, जो रूट, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स, लायम प्लंकेट, मार्क वूड, आदिल रशीद, मोईन अली, जोफ्रा आर्चर, लायम डॉसन, टॉम करन.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)