अॅल्युमिनियमच्या त्या बॅटमुळे क्रिकेटचे नियम बदलण्यात आले

    • Author, प्रवीण कासम
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

15 डिसेंबर 1979 ची ही गोष्ट ,म्हणजे साधारण 40 वर्षांपूर्वीची. अॅशेस मालिकेतला एक सामना पर्थच्या WACA मैदानावर सुरू होता.

अॅशेस म्हणजेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंडचा पारंपरिक सामना होता. ऑस्ट्रेलियाचा स्कोअर झाला होता 8 विकेट्सवर 219 रन्स. बॅटिंग करणाऱ्या डेनिस लिलींनी इयान बोथमचा एक चेंडू एक्सट्रा कव्हरच्या दिशेने टोलावला.

बॉल खेळून ते लगेच तीन रन्स घेण्यासाठी धावू लागले, पण तेवढ्यात एका आवाजाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. हा आवाज त्यांच्या बॅटमधून येत होता.

याच वादग्रस्त बॅटमुळे क्रिकेटचे नियम बदलण्यात आले.

काय होता हा वाद?

डेनिस लिलींच्या हातातली ती बॅट इतरांच्या बॅटप्रमाणे लाकडी नव्हती तर ती होती अॅल्युमिनियमची. यामुळेच बॉल बॅटवर आदळल्यानंतर मैदानात एक आवाज घुमला होता.

या मॅचच्या बारा दिवस आधीच लिली यांनी वेस्ट इंडिजच्या विरुद्ध एक सामना खेळताना या बॅटचा वापर केला होता.

अंपायरचा आक्षेप

वेस्ट इंडिजसोबतच्या या मॅचदरम्यान कोणीही डेनिस लिलींच्या अॅल्युमिनियम बॅटविषयी आक्षेप घेतला नाही. पण इंग्लंडसोबत खेळल्या जाणाऱ्या मॅच दरम्यान त्या टीमचे कॅप्टन माईक ब्रेअर्ली यांनी आक्षेप घेतला.

अशा प्रकारच्या अॅल्युमिनियमच्या बॅटचा वापर केल्याने बॉलच्या पृष्ठभागावर परिणाम होण्याची शक्यता असल्याची तक्रार त्यांनी केली. लिली यांनी या मॅचमध्ये ही बॅट वापरू नये असं यानंतर त्या मॅचचे अंपायर मॅक्स ओ-कॉनेल आणि डॉन वेजर यांनी त्यांना सांगितलं.

पण लाकडी बॅटच वापरणं गरजेचं आहे आणि अॅल्युमिनियमची बॅट वापरता येणार नाही, असं क्रिकेटच्या नियमावलीमध्ये (रूल बुक) कुठेही सांगण्यात आलेलं नाही, असं म्हणत लिली यांनी असं करण्यास इन्कार केला.

यादरम्यान त्यांना आपला राग आवरता आला नाही, आणि बेभान होत त्यांनी आपली बॅट भिरकावली.

शेवटी ऑस्ट्रेलियन टीमचे कॅप्टन ग्रेग चॅपल मैदानात आले आणि त्यांनी डेनिस लिलींची लाकडी बॅटचा वापर करण्याबद्दल समजूत काढली. यानंतर लिलींनी लाकडी बॅटने खेळायला सुरुवात केली, पण ते 3 रन्स काढून आऊट झाले.

ही बॅट तयार कशी केली?

सुरुवातीला बेसबॉलची बॅट लाकडापासून बनवण्यात येत असे. पण काही वर्षांनी बॅट बनवण्यासाठी लाकडाऐवजी अॅल्युमिनियचा वापर होऊ लागला.

यावरूनच प्रेरणा घेत क्लब क्रिकेट खेळणाऱ्या ग्रॅहम मोनघन यांनी एक खास बॅट बनवून घेतली. ही बॅट अॅल्युमिनियमची होती.

ग्रॅहम आणि डेनिस लिली चांगले मित्र होते. हे दोघं बिझनेस पार्टनरही होते. यामुळे डेनिस लिली मैदानात अॅल्युमिनियमची बॅट घेऊन उतरले. पण पंचांनी आक्षेप घेतल्यानंतर यावर बंदी आणण्यात आली.

बॅटसाठीच्या नियमांत बदल

अॅल्युमिनियमच्या बॅटवरून झालेल्या वादानंतर ऑस्ट्रेलियामध्ये याप्रकारच्या बॅट्सची विक्री प्रचंड वाढली.

पण या घटनेनंतर क्रिकेटच्या नियमावलीमध्ये काही नियम नव्याने सामील करण्यात आले. यातला एक निर्णय होता क्रिकेट खेळण्यासाठी फक्त लाकडी बॅटच्या वापराविषयीचा.

याआधी बॅटविषयी क्रिकेट नियमावलीमध्ये अशा प्रकारचा कोणताही निर्णय नव्हता. नवीन नियम अस्तित्त्वात आल्यानंतर अॅल्युमिनियम बॅटच्या वापरावर पूर्णपणे बंदी आणण्यात आली. पण क्रिकेटच्या इतिहासामध्ये या घटनेची नोंद झाली.

1981मध्ये इंग्लंडच्या विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये डेनिस लिलींनी आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवली. त्यांनी चार विकेट्स घेत इंग्लंडची बॅटिंग उद्ध्वस्त केली.

ही मालिका ऑस्ट्रेलियाने 3-0ने जिंकली. पण या मालिकेचा उल्लेख केल्यानंतर क्रिकेट प्रेमींना अॅल्युमिनियम बॅटचा वाद आठवतो.

'मार्केटिंगसाठीची क्लृप्ती'

आपल्या आत्मचरित्रामध्ये डेनिस लिलींनी या वादाविषयी विस्ताराने लिहिलं आहे. यात त्यांनी म्हटलंय, "आम्ही आमच्या बॅट्स विकण्यासाठी वापरलेली ही मार्केटिंग क्लृप्ती होती."

इयान बॉथमनेही आपलं पुस्तक 'बॉथम्स बुक ऑफ द ऍशेस - A Lifetime Love Affair with Cricket's Greatest Rivarlry' मध्येही या वादाविषयी लिहिलंय.

डेनिस लिली बद्दल बॉथम लिहितात, "लिली एक उत्तम बॉलर होते, पण त्यांची बॅटिंग फारशी चांगली नव्हती. या मॅचमध्ये चांगलं खेळता यावं म्हणूनच फक्त त्यांनी अॅल्युमिनियम बॅटने खेळाचा निर्णय घेतला होता. "

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)