You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वर्ल्ड कप 2019: सानिया मिर्झा-शोएब मलिक पाकिस्तानात का आहेत निशाण्यावर?
रविवारच्या मॅचनंतर पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक आणि त्याची पत्नी आणि भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा सध्या निशाण्यावर आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेत भारतानं पाकिस्तानचा पराभव केला. त्यानंतर पाकिस्तानमधील प्रेक्षकांनी या जोडीवर निशाणा साधला आहे.
शोएब आणि पाकिस्तानच्या इतर क्रिकेटपटूंचा एक फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत ही सगळी मंडळी इंग्लंडच्या एका कॅफेमध्ये बसलेली दिसत आहे. हा व्हीडिओ वर्ल्ड कपमधील भारत आणि पाकिस्तान सामन्याच्या एक दिवसापूर्वीचा म्हणजेच 15 जूनच्या रात्रीचा आहे, असं सांगितलं जात आहे.
सामन्यापूर्वी नाईट क्लबला जाणं दाखवून देतं की पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना मजा करणं जास्त महत्त्वाचं वाटत होतं, भारताविरुद्धचा सामना नाही, असा एक रोष पाकिस्तानी नागरिक व्यक्त करत आहेत. तसंच जेवणासाठी बाहेर जाणं हे खेळाडू फिटनेसबद्दल गंभीर नसल्याचं दाखवतं, असंही लोक म्हणत आहेत.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातला क्रिकेटचा सामना दोन्ही देशांमधील लोक अत्यंत गंभीरपणे घेतात. आजवरच्या वर्ल्ड कपच्या कोणत्याच सामन्यात पाकिस्ताननं भारताचा पराभव केलेला नाही.
अशातच या व्हीडिओमुळे आता पाकिस्तानी नागरिक खेळाडूंविषयीचा राग व्यक्त करत आहेत.
सानिया आणि शोएब यांच्यासोबत पाकिस्तानचे क्रिकेटपटू शनिवारी रात्री 2 वाजेपर्यंत ग्लास कॅफेमध्ये होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मॅच होती.
असं असलं तरी, जो व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे, तो खरा असला तरी, सामन्याच्या आदल्या दिवशीचा नाही. तो 13 जूनच्या रात्रीचा आहे.
कोणत्याही खेळाडूनं नियमाचं उल्लंघन केलेलं नाही, असं याबाबतीत पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डानं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी म्हटलंय की, "क्रिकेटपटू त्यांच्या कुटुंबीयांसोबत सामन्याच्या दोन दिवस अगोदर कॅफेमध्ये गेले होते."
या प्रकरणाविषयी सानिया मिर्झा यांनी ट्वीट केलं आहे, "हा व्हीडिओ पूर्वपरवानगीशिवाय रेकॉर्ड करण्यात आला आहे. असं करणं आमच्या खासगीपणाचं उल्लंघन आहे. त्यावेळी आमच्यासोबत लहान मुलंही होती. सामना हरल्यानंतरही लोकांना बाहेर जेवण्याची अनुमती असते."
शोएब मलिक यांनीही एका वर्तमानपत्राचा रिपोर्ट शेयर करत म्हटलं आहे की, "आमच्याशी संपर्क साधून पाकिस्तानच्या मीडियानं या प्रकाराबद्दल जाणून घ्यायला हवं की नको? मी 20 वर्षांपासून पाकिस्तानसाठी क्रिकेट खेळत आहे. वैयक्तिक आयुष्यावर स्पष्टीकरण द्यावं लागणं त्रासदायक आहे. हा व्हीडिओ 15 जूनच्या रात्रीचा नसून 13 जूनचा आहे."
शोएब यांनी दुसऱ्या एका ट्वीटमध्ये लिहिलंय की, "आमच्या कुटुंबीयांविषयी आदर बाळगा, असं मी सर्व मीडिया आणि लोकांना आवाहन करत आहे. कुटुंबाला अशा वादात अडकवू नये, ही वाईट बाब आहे."
पाकिस्तानचे क्रिकेटपटू मोहम्मद आमिर यांनी ट्वीट केलंय की, कृपया, खेळाडूंसाठी अपशब्द वापरू नका. तुम्ही आमच्या खेळावर टीका करू शकता. आम्ही चांगलं प्रदर्शन करू. आम्हाला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे.
भारताविरुद्धच्या पराभवानंतर आता पाकिस्तानच्या खेळाडूंविरोधात चौफेर प्रश्न उपस्थित होत आहेत. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर यांनी तर पाकिस्तानचे कर्णधार सर्फराझ अहमदला ब्रेनसेल संबोधलं.
भारतासोबतच्या सामनादरम्यान जांभई देतानाचा सर्फराझचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमुळे पाकिस्तानी संघाच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
भारताविरुद्धच्या पराभवामुळे सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची पाकिस्तानची आशा धुसर झाली आहे. आतापर्यंत पाकिस्तान वर्ल्डकपमध्ये 3 सामन्यांमध्ये पराभूत झाला आहे. पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये पोहोचायचं असल्यास उर्वरित 4 सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागेल.
या विजयानंतर पाकिस्तानचे 11 पॉईंट होतील. अडचण ही आहे की, पाकिस्तानचं नेट रन रेट खूपच कमी आहे. त्यामुळे पाकिस्तानला हे चारही सामने जिंकावे लागणार आहेत.
पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये पोहोचायचं असल्यास न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश यांना पराभूत करावं लागेल. याशिवाय वेस्ट इंडिजलाही 2 सामन्यांमध्ये पराभव पत्कारावा लागेल. याचा अर्थ सेमीफायनलमध्ये पोहोचणं हे आता पाकिस्तानच्या हातात नसून इतर संघांच्या जय-पराजयावर अवलंबून आहे.
पाकिस्तानाची पुढील सामना 23 जूनला दक्षिण आफ्रिकेबरोबर आहे. असं असलं तरी, दक्षिण आफ्रिका यंदा कमकुवत दिसत आहे. हा संघ इंग्लंड, बांगलादेश आणि भारताकडून पराभूत झाला आहे.
यानंतर पाकिस्तानचा वेस्ट इंडिजशी सामना होईल. वेस्ट इंडिजनं आतापर्यंत अफगाणिस्तानविरुद्धचा सामना तेवढा जिंकला आहे.
पाकिस्तान हा सामना जिंकू शकतो, पण दक्षिण आफ्रिकेनं न्यूझीलंडचा पराभव केला तर पाकिस्तानसाठी हे अडचणीचं ठरेल.
पाकिस्तान बर्मिंघहमध्ये 26 जूनला न्यूझीलंडविरुद्ध खेळेल. पाकिस्तानसाठी ही सगळ्यात कठीण मॅच आहे. न्यूझीलंडनं आतापर्यंत सर्व सामने जिंकले आहेत, भारताविरुद्धचा सामना मात्र पावसामुळे थांबवण्यात आला होता.
यानंतर पाकिस्तानचा लीड्समध्ये अफगाणिस्तान आणि लॉर्ड्समध्ये बांगलादेशविरुद्ध सामना होईल. अफगाणिस्तानला पाकिस्तान हरवू शकतं, पण अफगाणिस्ताननं पाकिस्तानचा सराव सामन्यात पराभव केला आहे. पाकिस्तानचा शेवटचा सामना बांगलादेशविरुद्ध होईल.
बांगलादेशचा संघ चांगला खेळ करत आहे, 17जूनला त्यांनी वेस्ट इंडिजला 322 धावांचा पाठलाग करत हरवलं. त्यामुळे बांगलादेशला पराभूत करणं सोपी गोष्ट नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)