भारत-पाकिस्तान वर्ल्ड कप मॅच: 'सर्फराझला जे करण्यास मनाई केली होती, त्याने तेच सगळं केलं’ - ब्लॉग

    • Author, वुसअतुल्लाह खान
    • Role, पाकिस्तानहून, बीबीसीसाठी

या वर्ल्ड कप स्पर्धेत सगळ्यात जास्त रंगलेल्या मॅचमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानवर 89 धावांनी विजय मिळवला. त्याबद्दलही अभिनंदन. आणि 140 धावांसह भारताचा डाव रचणाऱ्या रोहित शर्माचंही अभिनंदन.

ज्या फलंदाजानं एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामान्यात तीनवेळा द्विशतक झळकावलंय, त्याला 140 धावा काढायला काय लागतं. मला फक्त वाईट एका गोष्टीचं वाटत आहे की जर पावसाने हजेरी लावलीच होती तर त्याने आणखी 2-3 तास तरी इथे थांबायलं हवं होतं ना. काय बिघडलं असतं त्याचं?

पण ते म्हणतात ना, जेव्हा काळ मुळावर उठतो तेव्हा सरळ गोष्टीही वाकड्याच होतात. पाकिस्तानने 35 ओव्हर्सपर्यंत मॅच खेळली होती आणि तितक्यात पाऊस आला.

डकवर्थ लुईस नियमानुसार 50 ओव्हर्स कमी करून तो सामना 40 ओव्हर्सचा करण्यात आला. त्यामुळे पुढच्या 20 चेंडूत पाकिस्तानला 130 धावा करायच्या होत्या. यापेक्षा वाईट थट्टा काय असू शकते?

आतापर्यंत पाकिस्तानने वर्ल्ड कपमध्ये फक्त 3 गुण मिळवले आहेत. त्यांना पुढच्या चारही मॅच जिंकाव्या लागणार आहेत.

भारताची पुढची मॅच ही अफगाणिस्तानविरुद्ध आहे. तर पाकिस्तानची गाठ दक्षिण आफ्रिकाशी आहे. यावर आता मी काय बोलू!

पण इतिहास पाहिला तर 1992सालच्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची अशीच स्थिती होती. पण टीमने शेवटच्या चारही मॅच जिंकत उपांत्य आणि अंतिम सामनाही जिंकला होता.

पण हे 1992 नाहीये आणि सर्फराज हा काही इमरान खान नाहीये.

इमरान खान यांनी निवडणुकींच्या आधी मोदींच्या विजयाची भविष्यवाणी केली होती. याच इमरान खान यांनी रविवारची मॅच सुरू होण्यापूर्वी एक संदेश पाठवला होता - की पाकिस्तानने टॉस जिंकला तर प्रथम बॅटिंग करा. आणि स्पेशलिस्ट बॅट्समनना आधी खेळवा. लिंबू-टिंबूंना मागून बोलवा, कारण ते मॅचचं प्रेशर झेलू शकणार नाहीत.

पण सर्फराझला जे करण्यास मनाई केली होती, त्याने तेच सगळं केलं. टॉस जिंकूनही त्यानं फील्डिंग घेतली आणि बॅटिंगच्या वेळी त्यानं त्याच्या मर्जीप्रमाणं बॅट्समनचा क्रम ठरवला.

गोलंदाजांनीही मनभरून शॉर्ट पिच बॉलिंग केली. कदाचित त्यांना रोहित शर्माचं मन दुखवायचं नव्हतं. रोहितला शॉर्ट पिच बॉलवर खेळायला फार आवडतं.

पण इमरान खान यांचा सल्लाही किती उपयोगी पडला असता? कारण आजपर्यंत वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान भारताला हरवू शकला नाहीये. अगदी 1992मध्ये पाकिस्ताननं वर्ल्ड कप जिंकला होता, पण तेव्हाही भारतानेच पाकिस्तानला हरवलं होतं.

पण असू द्या... असेल असेल. आपला पण एक दिवस असेल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)