वंचित बहुजन आघाडीबरोबर काँग्रेस विधानसभा निवडणुकीसाठी चर्चा करणार -अशोक चव्हाण : #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. 'वंचित'बरोबर चर्चा करणार- अशोक चव्हाण

विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी चर्चा करणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

वंचित आघाडी भाजपाची बी टीम आहे अशी केलेली टीका राजकीय होती असंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकांबाबत अशोक चव्हाण यांनी मांडलेली मतं एबीपी माझानं प्रसिद्ध केली आहेत.

समविचारी पक्षांशी आघाडी करण्याआधी जिल्हा अध्यक्षांना विश्वासात घेऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आहे. यावेळी आपण नवीन चेहरे आणि तरुण आणि महिलांना संधी देणार असल्याचंही चव्हाण यांनी सांगितलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने तत्वतः निर्णय घेतला आहे. त्याबाबत 8 दिवसांमध्ये निर्णय होईल असंही ते म्हणाले. भाजपकडून साम-दाम-दंड-भेदाचा वापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

2. काँग्रेसचे मुख्यमंत्री राहुल गांधींना भेटणार

काँग्रेसशासीत पाच राज्यांचे मुख्यमंत्री पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची आज भेट घेणार आहेत. गांधी यांनी काँग्रेस पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नये अशी ते विनंती करणार आहेत. राहुल गांधी यांनी 25 मे रोजी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती.

त्यानंतर काँग्रेसच्या सुमारे 200 नेत्यांनी तसंच पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे देऊ केले होते. आज सोमवारी पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग, राजस्थानचे अशोक गेहलोत, छत्तीसगडचे भूपेश बघेल, मध्य प्रदेशचे कमलनाथ, पाँडेचेरी व्ही. नारायणसामी आज राहुल गांधी यांची भेट घेतील.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जी. परमेश्वरा आणि राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलटही यावेळी उपस्थित राहाण्याची शक्यता आहे. हिंदुस्तान टाइम्सने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

3. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा राज्यात मुक्काम

जुलैच्या पहिल्या आठवड्यातही मान्सूनचा पाऊस राज्यात तळ ठोकणार आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा तसंच उत्तर महाराष्ट्रातही चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा येत्या 48 तासांमध्ये अधिक तीव्र होईल आणि त्याचा मध्य भारतात परिणाम जाणवेल.

विदर्भात आज सोमवारी तसंच उद्या मंगळवारी रेड अलर्ट घोषित करण्यात आला असून मुसळधार किंवा तीव्र मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

त्यापाठोपाठ कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण अधिक असेल. कोकणात सिंधुदुर्गपासून मुंबई-ठाणे ते पालघरपर्यंत आज सोमवारी मुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. महाराष्ट्र टाइम्सने हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

4. कोंढवा दुर्घटनेप्रकरणी बांधकाम व्यावसायिकांना पोलीस कोठडी

शनिवारी पहाटे पुण्यातील कोंढव्यात भिंत कोसळून 15 मजुरांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक विपुल आणि विवेक अगरवाल यांना अटक केली होती. त्यांनंतर त्यांना शनिवारी पुणे न्यायालयात हजर केलं असता 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठोठावण्यात आली आहे.

याप्रकरणी जगदीशप्रसाद अगरवाल, सचिन अगरवाल, राजेश अगरवाल, विवेक अगरवाल, विपुल अगरवाल या 5 जणांसह साइट इंजिनियर, साइट सुपरवायजर, कंत्राटदार यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसत्ताने हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

5. पाकिस्तानातून तस्करी केलेलं 2700 कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त

पाकिस्तानातून अटारी-वाघा सीमेवरून भारतात आणलेला 532 किलो हेरॉइनचा साठा कस्टम अधिकाऱ्यांनी शनिवारी जप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत 2700 कोटी रुपये इतकी आहे.

पाकिस्तानातून तस्करी केलेला अमली पदार्थाचा इतका मोठा साठा कस्टम अधिकाऱ्यांनी आजवरच्या इतिहासात कधीही जप्त केला नव्हता.

या तस्करीचा सूत्रधार तारिक अन्वर असून तो काश्मीरमधील हंडवाराचा रहिवासी आहे. त्याच्या साथीदाराला अमृतसरमधून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. पाकिस्तानमधून आलेल्या मालवाहू ट्रकमध्ये हे अमली पदार्थ ठेवण्यात आले होते. लोकमतने हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)