प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्र्यांशी संगनमत, अशोक चव्हाणांचा आरोप

    • Author, अभिजीत कांबळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

राज्यात सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा ठिकठिकाणी सुरू आहेत. त्यांच्या सभांमधून ते नरेंद्र मोदी-अमित शाहंवर जोरदार टिका करत असल्यानं त्याचा फायदा आपल्याला होईल अशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अपेक्षा आहे. पण दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीमुळे होणारं मतविभाजन ही काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरणार असं दिसत आहे.

प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे लोकसभा निवडणुकीत काही मतदारसंघात आमचं नुकसान होऊ शकतं, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत मान्य केलं आहे.

लोकसभा निवडणुकीचे 3 टप्पे झाल्यानंतर घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीशी दोन हात करायला निघालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे फटका बसणार का, असा प्रश्न उपस्थित झालाय.

बीबीसी मराठीशी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, "प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीशी आघाडी करण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न केला. पण त्यांनी आघाडी केली नाही. त्यांना आघाडी करायचीच नव्हती. मुख्यमंत्र्यांशी संगनमतानं त्यांनी हे उमेदवार उभे केले असावेत असा माझा आरोप आहे. त्यांच्या उमेदवारांमुळे काही ठिकाणी आमचं नुकसान होणार आहे, आणि नुकसान करण्यासाठीच त्यांनी हे उमेदवार उभे केले."

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना बीबीसीने अशोक चव्हाणांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी प्रतिक्रियेला नकार दिला. एवढंच नाही तर त्यांनी बीबीसीकडून याबाबत प्रश्न विचारण्याच्या हेतूबद्दलच शंका व्यक्त केली आणि पुढे काहीही बोलण्यास नकार दिला.

वंचित बहुजन आघाडीने राज्यातील जवळपास सर्व मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. स्वत: प्रकाश आंबेडकर अकोला आणि सोलापूर या दोन मतदारसंघातून निवडणूक लढले आहेत.

याशिवाय औरंगाबादमधून आमदार इम्तियाज जलील, सांगलीतून गोपीचंद पडळकर, नांदेडमधून यशपाल भिंगे, अमरावतीमधून गुणवंत देवपारे, बुलडाण्यातून बळीराम सिरस्कार हे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख उमेदवार आहेत.

वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीत आघाडी न झाल्यानं मतविभाजन होऊ शकेल अशी चर्चा सुरुवातीपासूनच आहे. यावर प्रकाश आंबेडकरांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना म्हटलं होतं की वंचित बहुजन आघाडी उलट भाजपची परंपरागत मतं आपल्याकडे वळवणार आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीला वंचित बहुजन आघाडीमुळे नुकसान होऊ शकतं असंच राजकीय निरीक्षकांचंही मत आहे. दैनिक लोकमतच्या ठाणे आवृत्तीचे प्रमुख संदीप प्रधान यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की निश्चितच काँग्रेस-राष्ट्रवादीला नुकसान होऊ शकतं. "2014 च्या लोकसभा निवडणुकीत देशभरात दलितांनी तसंच काही प्रमाणात मुस्लिमांनीही नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला. मात्र गेल्या पाच वर्षांत हे घटक विविध कारणांमुळे मोदींपासून दूर होत गेले.

महाराष्ट्रात दलित आणि मुस्लीम पर्यायाच्या शोधात होते आणि त्यांना हा पर्याय प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसींच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीनं उपलब्ध करून दिला. त्यामुळे त्यांना बराच पाठिंबाही मिळाला. त्यामुळे अर्थातच दलित-मुस्लीम या काँग्रेसच्या पारंपरिक मतांचं विभाजन होणार आहे. या विभाजनामुळे निश्चितच काही जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फटका बसू शकतो. विशेष करून ज्याठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप-सेनेत अटीतटीची लढत होत आहे, अशा मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीमुळे फटका बसेल," असं संदीप प्रधान यांचं म्हणणं आहे.

ओवेसींना पाठिंबा वाढला की शिवसेना-भाजपला फायदाच होतो असंही निरीक्षण संदीप प्रधान यांनी नोंदवलं आहे. "असदुद्दीन ओवेसींना जसा जसा पाठिंबा वाढतो ही गोष्ट भाजप आणि शिवसेना या हिंदुत्ववादी पक्षांच्या पथ्यावर पडते. आपला हिंदुत्वाचा मुद्दा मग ते अधिक जोरकसपणे मांडून ध्रुवीकरण करू शकतात. हाही मुद्दा विचारात घ्यावा लागेल."

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या या नुकसानीचा थेट फायदा भाजपला मिळेल असं मत महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहायक संपादक विजय चोरमारे यांनी मांडलंय.

बीबीसीशी बोलताना त्यांनी म्हटलंय, "वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा मिळत असला तरी तो जागा जिंकण्यासाठी कितपत उपयोगी पडेल हे सांगता येणार नाही.

अर्थात त्यांनी घेतलेल्या मतांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका आणि शिवसेना-भाजपला फायदा होऊ शकतो. सोलापूर, अकोला, सांगली आणि औरंगाबाद हे चार मतदारसंघ आहेत की जिथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार चांगली लढत देण्याच्या स्थितीत होते. तिथं काँग्रेस-राष्ट्रवादीला थेट फटका बसू शकतो. वंचित बहुजन आघाडी विधानसभा निवडणुकीत मात्र जागा जिंकू शकते."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)