You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
काँग्रेसमध्ये सुरू झालेल्या राजीनामासत्रामागची कारणं काय आहेत?
- Author, मोहम्मद शाहीद
- Role, बीबीसी प्रतिनिधी
आखिल भारतीय काँग्रेस किसान सभेच्या अध्यक्षपदाचा माजी खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिला. राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ आपण राजीनामा देत आहोत असं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर या संघटनेची कार्यकारिणी आपण बरखास्त करत आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे.
पण आपल्या पदाचा राजीनामा देणारे नाना पटोले हे एकमेव काँग्रेस नेते नाहीत. काँग्रेसमध्ये सध्या राजीनामासत्र सुरू आहे. मात्र, महत्त्वाचं म्हणजे राजीनामा देणाऱ्यांमध्ये बहुतांश नावं अनोळखी आहेत.
काँग्रेसच्या वेगवेगळ्या राज्य कार्यकारिणी मिळून आतापर्यंत शंभरहून अधिक जणांनी राजीनामे दिले आहेत. यातलं सर्वांत मोठं नाव हे राज्यसभा खासदार विवेक तनखा यांचंच आहे. तनखा पक्षाचे कायदा आणि मानवाधिकार सेलचे अध्यक्षही आहेत.
विवेक तनखा यांनी ट्वीट करत सल्ला दिला की राहुल गांधी यांना त्यांची टीम निवडण्याची पूर्ण मुभा मिळावी, यासाठी पक्षातल्या सर्वांनीच पदांचा राजीनामा द्यायला हवा. यापूर्वी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनीदेखील राजीनामा देण्याचं वक्तव्य केलं होतं.
तसंच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी देखील राजीनाम्याची तयारी दर्शवली होती.
याव्यतिरिक्त राजीनामा देणाऱ्यांमध्ये दिल्ली प्रदेश काँग्रेस समितीचे कार्यकारी अध्यक्ष राजेश लिलौठिया आणि तेलंगणा प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्षा पूनम प्रभाकर यांचाही समावेश आहे.
तर शनिवारी उत्तर प्रदेश काँग्रेस समितीच्या 35 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी लोकसभा निवडणुकीत राज्यात पक्षाच्या पराभवासाठी आपण स्वतः जबाबदार असल्याचं सांगत राजीनामे दिले.
राजीनामासत्राला कुठून झाली सुरुवात?
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देऊ केला होता. मात्र, तो स्वीकारण्यात आला नाही.
यानंतर गुरुवारी हरियाणाच्या काँग्रेस नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत राहुल गांधी कथितरित्या म्हणाले की त्यांनी पराभवाची जबाबदारी घेतली. मात्र, राज्य कार्यकारिणीत कुणीही पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला नाही. यानंतरच राजीनामासत्र सुरू झालं.
मात्र, काँग्रेसला जवळून ओळखणाऱ्या जाणकाराचं म्हणणं आहे की राहुल गांधी यांनी असं काहीही म्हटलेलं नव्हतं. मीडियाने ही 'अफवा' पसरवली.
काँग्रेसची रणनीती काय आहे?
या राजीनाम्यांकडे कसं बघितलं गेलं पाहिजे? यावर ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी म्हणतात की, हे स्पष्टपणे काही पदाधिकाऱ्यांचं नाटक आहे.
त्या म्हणतात, "इतक्या जुन्या काँग्रेस पक्षात अशा दारुण पराभवाच्या महिनाभरानंतर ही ओरड सुरू झाली आहे आणि पक्षाला कुठलीच दिशा सापडत नाहीय. राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत धाडस दाखवलं होतं. मात्र, त्यांचा राजीनामा अजूनही स्वीकारण्यात आलेला नाही. काँग्रेसची परिस्थिती स्पष्ट दिसत नाही आणि सध्या जे राजीनामे दिले जात आहेत त्यावरून एखादं नाटक सुरू असल्यासारखं वाटतंय."
असं सांगण्यात येतंय की पक्षाध्यक्षपद सोडण्याची राहुल गांधी यांच्या मनाची पूर्ण तयारी झाली आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, यासाठी हे राजीनामे देण्यात येत आहेत का, हा प्रश्न पडला आहे.
काँग्रेसवर बारिक लक्ष ठेवून असलेले ज्येष्ठ पत्रकार विनोद शर्मा म्हणतात की राहुल गांधी पद घेणार नाहीत, हे निश्चित आहे.
ते म्हणतात, "काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या संसदीय समितीच्या बैठकीत आपण राजकारणात सक्रीय राहू. मात्र, पक्षाध्यक्ष राहणार नाही, असं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं होतं. राजीनामे देणारी मोठी नावं नाहीत आणि जनतेला त्यांची नावंही माहिती नाहीत. हा केवळ त्यांचा स्वतःला नेता म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न आहे."
काँग्रेसपुढे आता कोणता मार्ग आहे?
2014 साली पक्षाच्या पराभवानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनीदेखील पक्षामधल्या आपापल्या पदांचा राजीनामा देऊ केला होता. मात्र, ते मान्य करण्यात आले नाहीत. त्यापूर्वी शरद पवार यांनी पक्ष सोडल्यानंतर सोनिया गांधी यांनी राजीनामा देऊ केला होता. मात्र, तोही स्वीकारण्यात आला नव्हता.
तर आताही राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष असायला हवं का? विनोद शर्मा म्हणतात की काँग्रेसने हंगामी पक्षाध्यक्ष निवडला पाहिजे.
ते म्हणतात, "काँग्रेस पक्षाने आपला नवा नेता निवडावा, अशी जर काळाची गरज असेल तर त्यांनी एक हंगामी अध्यक्ष निवडावा. जेणेकरून पक्षाचं कामकाज सुरू राहील आणि पक्षाचं सरचिटणीसपद प्रियंका गांधी यांना द्यावं. असं केल्याने त्यांच्या अडचणी दूर होतील."
संघटनेत प्रियंका गांधी महत्त्वाच्या पदावर राहिल्या तर काँग्रेसच्या अडचणी कशा दूर होतील? यावर विनोद शर्मा म्हणतात, "गांधी कुटुंब असल्याशिवाय पक्ष एकसंध राहणार नाही, असं पक्षातल्या नेत्यांना वाटतं. ही काँग्रेससमोरची मोठी समस्या आहे. बऱ्याच अंशी हे खरंदेखील आहे. यामुळे त्यांच्यावर वंशवादाचा आरोपही करण्यात येतो. नव्या अध्यक्षाने प्रियंका गांधी यांना सरचिटणीसपदावर कायम ठेवलं तर त्या संघटना मजबूत करू शकतील."
तर नीरजा चौधरी यांना वाटतं की काँग्रेसला पुनरुज्जीवीत व्हायचं असेल तर त्यांना अध्यक्ष बदलवावा लागेल. शिवाय इतरही अनेक कामं करावी लागतील.
त्या म्हणतात, "गांधी-नेहरू कुटुंबातला सदस्य अध्यक्ष नसतानाही काँग्रेस चांगलं काम करू शकते. मात्र, त्यासाठी त्यांच्या पक्षातल्या लोकांचा पाठिंबा गरजेचा आहे. पक्षात नवीन ऊर्जा आणायची असेल तर जनतेचा पाठिंबा असणाऱ्यांना समोर आणावं लागेल. जमिनीशी नाळ जुळलेल्या नेत्यांना आणावं लागेल."
विनोद शर्मा काँग्रेस पक्षात प्राण फुंकण्यासाठी कॅडर महत्त्वाचा असल्याचं सांगतात. त्यांचं म्हणणं आहे की पक्षात आता नवीन कॅडरची भरती करणं गरजेचं आहे.
ते म्हणतात, "या पक्षात नव्या रक्ताचा संचार करायचा असल्यास त्यांना मोठी सदस्य नोंदणी मोहीम राबवावी लागेल. यासाठी केंद्रात आणि राज्यात केवळ नेते बदलून चालणार नाहीत. त्यासोबतच पक्षाला जनतेशी संबंधित मुद्द्यांवर काम करावं लागेल आणि रस्त्यावर उतरावं लागेल."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)