वर्ल्ड कप 2019 : जेव्हा बांगलादेशने टीम इंडियाचं वर्ल्ड कपमधलं आव्हान संपुष्टात आणलं होतं...

सेमी फायनलमध्ये स्थान पटकावण्यासाठी टीम इंडियाला उर्वरित दोन मॅचपैकी एकामध्ये विजय मिळवणं अत्यावश्यक आहे. मंगळवारी टीम इंडियाचा मुकाबला बांगलादेशशी होणार आहे. याच बांगलादेशने वर्ल्ड कपच्या इतिहासात एकदा टीम इंडियाचा पुढच्या फेरीत जाण्याच मार्ग रोखला होता.

त्या कटू आठवणी आहेत 2007 वर्ल्ड कपच्या. त्या वर्ल्ड कपची संरचना वेगळी होती. भारताच्या गटात बर्म्युडा, श्रीलंका आणि बांगलादेश होते.

बर्म्युडा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवीन असल्याने त्यांची लिंबूटिंबू म्हणून गणना होत होती. टीम इंडियासाठी ही मॅच सहज विजयाची होती. बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यापैकी बांगलादेशचं आव्हान तुलनेनं सोपं होतं. मात्र तिथेच गोष्टी फिरल्या.

तारीख होती 17 मार्च 2007 आणि मैदान होतं पोर्ट ऑफ स्पेन. टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंग घेतली.

तत्कालीन टीम इंडियामध्ये सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी यांचा समावेश होता. मात्र गोलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टीवर बांगलादेशच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर टीम इंडियाने गुडघे टेकले.

टीम इंडियाचा डाव अवघ्या 191 धावांतच आटोपला. मश्रफी मुर्तझाने 4 तर अब्दुर रझ्झाक आणि मोहम्मद रफीक यांनी प्रत्येकी 3 विकेट्स टिपल्या.

मात्र तेव्हाच्या बांगलादेश संघाला हे आव्हानही कठीण ठरेल असं भाकित क्रिकेटपंडितांनी वर्तवलं होतं. तमीम इक्बाल (51), मुशफकीर रहीम (56) आणि शकीब अल हसन (53) या तेव्हाच्या युवा शिलेदारांनी अर्धशतकी खेळी करत बांगलादेशचा विजय सुकर केला.

हा पराभव टीम इंडियाच्या जिव्हारी लागला. या पराभवातून सावरत टीम इंडियाने नवख्या बर्म्युडाला धूळ चारली. मात्र श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाच्या पदरी पराभवच आला आणि वर्ल्ड कपच्या प्राथमिक फेरीतूनच गाशा गुंडाळण्याची वेळ ओढवली.

टीम इंडियाचं आव्हान प्राथमिक फेरीत संपुष्टात आल्याने वर्ल्ड कपचं आर्थिक डोलारा कोसळला. क्वार्टर फायनल, सेमी फायनल आणि फायनल या महत्त्वाच्या सामन्यांमध्ये जगभर लोकप्रिय अशी टीम इंडिया नसल्याने आयसीसीला प्रचंड आर्थिक फटका बसला.

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सुरुवात दणक्यात केली. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज यांना नमवत टीम इंडियाने सेमी फायनलच्या दिशेने मजबूत पाऊल टाकलं. मात्र इंग्लंडविरुद्ध पराभूत झाल्याने टीम इंडियासाठी बांगलादेशविरुद्धची लढत कळीची झाली आहे.

योगायोग म्हणजे 12 वर्षांपूर्वी टीम इंडियाला पराभूत करण्यात वाकबगार असे मश्रफी मुर्तझा, तमीम इक्बाल, मुशफकीर रहीम आणि शकीब अल हसन मंगळवारी होणाऱ्या मुकाबल्यात खेळत आहेत.

शकीब अल हसन सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत शकीब अव्वल पाचमध्ये आहे. सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्यांच्या यादीतही तो अव्वल दहामध्ये आहे. मुशफकीर रहीमही चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मुर्तझाकडे बांगलादेशच्या संघाची धुरा आहे.

गेल्या काही वर्षात बांगलादेशने त्यांच्या खेळाचा दर्जा अमूलाग्र सुधारला आहे. इंग्लंडच्या भौगौलिक परिस्थितीची तपशीलवार माहिती असणारे स्टीव्ह ऱ्होड्स त्यांचे मुख्य प्रशिक्षक आहेत.

इंग्लंडमध्ये खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव असणारा नील मॅकेन्झी त्यांचे बॅटिंग प्रशिक्षक आहेत. वेस्ट इंडिजचे ज्येष्ठ खेळाडू कोर्टनी वॉल्श त्यांचे बॉलिंग सल्लागार आहेत.

दक्षिण आफ्रिकेच्या रायन कुक यांच्यामुळे बांगलादेशच्या फिल्डिंगचा दर्जा उंचावला आहे. भारताचे माजी फिरकीपटू सुनील जोशी बांगलादेशच्या फिरकीपटूंना मार्गदर्शन करतात.

टीम इंडियाच्या बॅट्समनचे कच्चे दुवे ते नक्कीच चांगल्या प्रकारे उलगडू शकतात. श्रीलंकेचे मारिओ विल्लावरयन हे बांगलादेशचे स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच आहेत. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशची कामगिरी चांगली होण्यात या सगळ्यांचा वाटा मोलाचा आहे.

बांगलादेशसाठीही ही मॅच अटीतटीची आहे. त्यामुळे तेही जिंकण्यासाठी सर्वस्व ओतून खेळतील.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)