You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महेंद्रसिंग धोनी : छोट्या शहरातील मुलांना मोठी स्वप्नं पाहण्याचा विश्वास देणारा खेळाडू
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
आज (7 जुलै) महेंद्रसिंग धोनीचा वाढदिवस. त्यानिमित्तानं हा लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.
धोनीच्या यशाने मध्यमवर्गाला आणि निमशहरांना मोठ्या भरारीचं स्वप्न दिलं. धोनीचा उदय हा एका अर्थाने नव्या भारताचा उदय होता.
मुख्य प्रवाहापासून, प्रसिद्धीपासून, झगमगाटापासून दूर असलेल्या शहरातूनही मोठं कर्तृत्व घडवता येऊ शकतं हा विश्वास धोनीने दिला.
2000 साली बिहारचा एक तुकडा झारखंड या नावानिशी जन्माला आला. रांची हे शहर या नव्या राज्याची राजधानी झालं. राज्याची राजधानी असली तरी रांची हे आजही निवांत पहुडलेलं गावरुपी शहर आहे. आजूबाजूला जंगलांचा अधिवास, नितळ पाण्याचा प्रपात सांडणारे धबधबे, नैसर्गिक संसाधनांची मुबलकता असणारा आदिवासीबहुल परिसर ही रांचीची ओळख. आपल्याकडचं तालुक्याचं ठिकाण वाटावं इतकं सुशेगात आयुष्य.
रांची ही दोन अक्षरं आणि धोनी ही दोन अक्षरं. धोनी या दोन अक्षरांनी रांची या दोन अक्षरांचं आयुष्यच बदलवलं. भारताच्या नकाशात टिंबाएवढं स्थान असणाऱ्या रांचीला धोनीने जगाच्या पटलावर नेलं. धोनीच्या देदिप्यमान कारकीर्दीचा परिणाम म्हणजे रांचीत क्रिकेटचं आंतरराष्ट्रीय स्टेडियम उभं राहिलं. धोनीचं कर्तृत्व बहरत गेलं तसं रांचीचा परीघ विस्तारला.
टीम इंडियात मुंबई आणि दिल्ली ही सत्ताकेंद्र मानली जातात. एकेकाळी टीम इंडियात निम्मे खेळाडू मुंबईचे असत. तो लंबक झुकला आणि आता टीम इंडियात दिल्लीचे असंख्य खेळाडू दिसतात. यादरम्यान कर्नाटक, तामिळनाडू राज्यांच्या खेळाडूंनी द्रुत लयीत वाटचाल केली.
सौरव गांगुली अर्थात दादाच्या निमित्ताने हा लंबक पूर्वेकडे सरकला. या भागातून मोठे खेळाडू घडू शकतात हा पाया गांगुलीने घालून दिला. गांगुली टीम इंडियाचा केवळ भरवशाचा ओपनर झाला नाही, तो कर्णधार झाला. मॅचफिक्सिंगने क्रिकेटविश्व ढवळून निघालेलं असताना गांगुलीने चाहत्यांचा टीम इंडियावरचा विश्वास परत मिळवला. गांगुलीने जुन्या-नव्या खेळाडूंची मोट बांधली.
गांगुलीने केलेल्या पायाभरणीवर कर्णधार म्हणून धोनीने कळस चढवला. धोनी वनडे क्रिकेटमधल्या सर्वोत्तम फिनिशर्सपैकी झालाच पण त्याहीपेक्षा टीम इंडियाचा कर्णधार म्हणून त्याचं योगदान अधिक मोलाचं आहे. तांत्रिकता आणि विश्लेषणात गुंतण्यापेक्षा नैसर्गिक ऊर्मींवर विश्वास ठेवत निर्णय घेणं, युवा खेळाडूंच्या पडत्या काळातही ठामपणे पाठिशी उभं राहणं यामुळे धोनी माणसं जिंकत गेला.
दोन विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी, आयपीएलची जेतेपदं, कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान असं क्रिकेटविश्वातलं सगळं जिंकल्यानंतरही धोनी मुंबई, दिल्लीत राहणं साहजिक पण धोनी रांचीत आपल्या फार्महाऊसवर असतो. तो लहानाचा मोठा झाला ते घर बदललं. रांची शहराच्या थोडं बाहेर धोनीचं नवं घर आहे. अतिव्यग्र क्रिकेट कॅलेंडरमधून वेळ मिळाला की धोनी रांची गाठतो.
दिवसभरात बाहेर पडलं की चाहत्यांचा गराडा असतो त्यामुळे अपरात्री बाईक काढून धोनी रांचीत फिरतो. त्याच्या फार्महाऊसवर त्याचे आवडते कुत्रे आहेत. त्यांच्याशी खेळण्यात त्याचा वेळ जातो. सोबतीला अगणित गाड्या आणि बाईक्स आहेत. त्यांची उगानिगा करतो. कोरोना काळात जगभरातले क्रिकेटपटू इन्स्टा लाईव्ह करत असताना धोनी सोशल मीडियावर फिरकला देखील नाही. प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही तो प्रसिद्धीपासून दूर राहतो.
मध्यमवर्गीय घरात जन्म, क्रिकेटची किंवा खेळांचा असा वारसा नाही, रांचीतही क्रिकेटची संस्कृती वगैरे नाही. परंतु वसंतराव देशपांडे म्हणाले होते तसं घराणं माझ्यापासून सुरू होतं तसं धोनीने स्वत:बरोबरंच शहराला ओळख दिली. धोनी म्हणजे रांची हे समीकरण लोकप्रिय होत गेलं. व्यक्तीने समष्टीला अधिष्ठान प्राप्त करून दिलं.
देशातील सगळ्यात मोठ्या अशा खरगपूरच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर टीसी म्हणून काम करणाऱ्या धोनीने पुढच्या काही वर्षात भारतीय क्रिकेटचा ट्रॅक बदलून टाकला. टीम इंडियाचा यशस्वी कर्णधार, बेस्टेस्ट फिनिशर, कॅप्टन कूल असं सगळं नावावर असलेल्या धोनीने रांचीला अव्हेरलं नाही.
छोट्या शहरांमध्ये बदल घडायला वेळ लागतो. जगण्याचा वेग कूर्म असतो. वायटूकेनंतरच्या जगात रांचीच्या नशिबात धोनी आला. तुम्ही कुठचे आहात यापेक्षा तुम्ही काय केलंत हे लक्षात ठेवलं जातं. रांचीकरांचा निरोप घेऊन धोनी चेन्नईत उतरला. चेन्नईत प्रतिरांची निर्माण केलेल्या धोनीने स्वातंत्र्यदिनाच्या साक्षीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. धोनीची कारकीर्द क्रिकेटपेक्षाही सामान्य मध्यमवर्गीय माणसाला स्वप्नं पाहून ती प्रत्यक्ष साकारायला प्रेरणादायी ठरेल. छोट्या शहरातून, गावाकडून आलोय हे सांगताना डोळ्यात चमक असेल आणि पाठीचा कणा ताठ असेल ही शिकवण धोनीने दिली.
खेळाला सर्वोत्तम देण्याची प्रोसेस
खेळात हारजीत असते, काहीवेळेला ड्रॉ असतो. परंतु या हारजितीपेक्षाही खेळण्यात सर्वोत्तम देण्याची, शंभर टक्के जीव ओतण्याची प्रक्रिया अर्थात प्रोसेस महत्त्वाची हा कार्य़कारण भाव धोनीने ठसवला. अंतिम निकाल काय याबरोबरीने तिथपर्यंतची प्रोसेस महत्त्वाची हा धोनीच्या कारकीर्दीचा गाभा होता. एकप्रकारे तो प्रोसेसचा भक्त होता. त्यालाही जिंकायचं होतं पण जिंकण्यासाठी वाट्टेल ते हा मंत्र त्याने स्वीकारलं नाही. ध्येयाप्रती जीवतोड मेहनत करायची पण जिंकता आलं नाही म्हणजे संपलं हा निराशावाद धोनीने मिटवून टाकला.
जिंकण्याने माणूस किंवा संघ अढळस्थानी जातो आणि पराभवाने तीच माणसं टाकाऊ होतात हा बाजाराने मांडलेला सिद्धांत धोनीने नाकारला. टॉस असेल, प्रेझेंटेशन सेरेमनी असेल किंवा मुलाखती असतील- त्याच्या बोलण्यात प्रोसेसचा उल्लेख सातत्याने येतो. जिंकण्यासाठी जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे करायलाच हवेत, त्यात तसूभरही मागे हटून चालणार नाही हे तत्व धोनीने जपलं.
स्वत:च्या खेळाचा अभ्यास, त्यात सातत्याने सुधारणा, प्रतिस्पर्ध्यांचा अभ्यास, वातावरणाचा नूर समजून घेणं, मैदानाचे डायनॅमिक्स कोळून पिणं ही प्रोसेस धोनीने कारकीर्दभर राबवली.
विकेटच्या पाठी उभं राहून सल्ले देताना त्याने अनेक खेळाडूंना मोठं केलं. टीम इंडियासाठी डिसिझऩ रिव्ह्यू सिस्टमचा अर्थ धोनी रिव्ह्यू सिस्टम होता. असं म्हणतात की खेळात तोच जिंकतो जो समोरच्याचं मन जाणतो. धोनी त्याअर्थी मनकवडा आहे. समोरचा बॅट्समन काय खेळेल किंवा समोरचा बॉलर कुठे बॉल टाकणार याचा अंदाज धोनीला येत असे. ही सिद्धी प्राप्त होण्यासाठी तपश्चर्या लागते. धोनीने ती रियाझरुपी प्रोसेस प्राणपणाने जपली.
कौतुकानं हुरळणं नाही, टीकेनं खचणं नाही
2007 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला प्राथमिक फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता. टीम इंडियावर प्रचंड टीका झाली होती. अनेक खेळाडूंच्या घरासमोर लोकांनी निषेध, हुर्यो उडवली होती. धोनीच्या रांचीतही हे घडलं होतं. यामुळे त्याला काही दिवस दिल्लीतच राहावं लागलं होतं. या कटू आठवणीने धोनी अंर्तबाह्य बदलला. कदाचित यामुळेच कौतुकाने मी हुरळून जात नाही आणि टीकेने खचून जात नाही हा त्याचा मंत्र झाला. कॅच असो, स्टंपिंग असो, उत्तुंग षटकार असो, शतक असो- धोनीचं सेलिब्रेशन शांतच असे.
चित्ताकर्षक नाटक मंडळी होत हातवारे नाही, आक्षेपार्ह भाषा नाही. वर्ल्डकप विजयानंतरही तो शांतच होता. असंख्य यशोशिखरं पादाक्रांत करणाऱ्या धोनीने असंख्य पराभवही पचवले. त्या पराभवांनंतर तो विचलित झाला नाही. अर्वाच्य भाषेत कोणाला बोलल्याचं ऐकिवात नाही, मैदानावर अश्रू ढाळले नाहीत, प्रतिस्पर्ध्यांना उणं दाखवलं नाही. जिंकणं आणि हरणं या पारड्यांचा तराजू धोनीने समर्थपणे तोलला. तो इकडचा झाला नाही आणि तिकडचाही झाला नाही.
जिंकण्याने उत्तेजित न होणं आणि पराभवाने खांदे पाडणं हे दोन्ही त्याला मान्य नसावं. विनोबाजींनी सांगितलेली स्थितप्रज्ञाची लक्षणं धोनीला चपखलपणे लागू होतात. जिंकल्यानंतरचं त्याचं अलिप्तपण विरक्तीची झलक देत असे. जेतेपद हातात आल्यावर ते टीममधल्या नव्या मुलांच्या हाती देऊन स्वत: दूर उभं राहण्यात पीआर गिमिक नव्हतं. ते आपसूक त्याच्या हातून घडत असे.
मला सर म्हणू नका- माही म्हणा, भाई म्हणा, भैय्या म्हणा हे त्याचं युवा खेळाडूंना सांगणं असं. माझ्या रुमचा दरवाजा तुमच्यासाठी सदैव उघडा आहे, तुम्ही कधीही येऊ शकता हे कोरडेपणाने सांगणं नव्हतं. म्हणूनच माहीभाईंची प्रोसेस समजून घेण्यासाठी टीम इंडियातली नवी पोरं त्याच्या रुममध्ये दाखल होत. माहीभाईही हातचं न राखता त्यांच्यासाठी अनुभवाचा खजिना रीता करत. रुढार्थाने धोनी ओल्ड स्कूल थिकिंगचा वारकरी पण त्याने आपल्या प्रोसेसरुपी पंथाचा वृथा अभिमान बाळगला नाही. टिकून राहण्यासाठी स्वत:ला गुणकौशल्यांच्या बाबतीत उन्नत करावं लागतं. धोनीने ते सदैव केलं.
मी तांत्रिकदृष्ट्या सर्वोत्तम कीपर नाही आणि सर्वसमावेशक बॅट्समन नाही हे धोनी स्वत:च सांगितलं होतं. मात्र तरीही क्रिकेटमधल्या सर्वोत्तम कीपर्समध्ये आणि ऑल टाईम फिनिशर्सच्या मांदियाळीत त्याचं स्थान आहे. जिंकणं-हरणं यापेक्षाही लढणं महत्त्वाचा हा विचार रुजवण्यात धोनीची भूमिका निर्णायक आहे. छोट्या छोट्या गोष्टींनी जेरीस येणाऱ्या प्रत्येकासाठी धोनीचा हा मंत्र उपयोगी पडू शकतो.
खेळताना भावनांना वाट मोकळी करून देण्याला आता स्वॅग म्हटलं जातं. परिस्थिती काहीही असली तर धोनीच्या चेहऱ्याकडे बघून काहीच कळत नसे. 32 बॉल 60 असो किंवा आपल्या बॉलरला ओव्हरमध्ये 4 चौकार बसलेले असो- धोनी थंड असे. भावनिक होण्यापेक्षा किंवा भावनांचं रासवट प्रदर्शन करण्यापेक्षा कामाप्रती एकरुप व्हा हीच त्याची मानसिकता असे. कर्म करा, फळाची अपेक्षा धरू नका हे वचन धोनी अक्षरक्ष: जगला. त्याच्या अशा प्रोसेसरुपी जगण्याची फळं टीम इंडियाला मिळाली.
खेळाडू म्हणून धोनीने जी तत्वं जपली ती सर्वसामान्य माणसाने अनुसरली तर त्याचं जगणं सुकर होऊ शकतं. हे असं करणं सोपं नक्कीच नाही. खेळाडू, कर्णधार धोनीपेक्षा धोनीचं माणूसपण त्याला मोठं करतं. भावनांवर नियंत्रण मिळवत कर्माशी तादात्म्य पावणं ही शिकवण धर्माधर्मात शिकवली जाते. धोनी नावाच्या खेळियाचा खेळण्याचा धर्म होता. तो खेळाचा आणि खेळ त्याचा आजन्म ऋणी राहील.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)