You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विराट कोहली : बीसीसीआयशी पंगा की आक्रमकपणा नेमकं काय भोवलं?
- Author, प्रदीप कुमार
- Role, बीबीसी प्रतिनिधी
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधील भारतीय संघाचं कर्णधारपद सोडत असल्याची घोषणा शनिवारी समाजमाध्यमांवरून केली.
दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेआधीपासूनच या घोषणेबद्दलचे अंदाज वर्तवले जात होते. विराट कोहलीला कर्णधारपद वाचवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत कसोटी मालिका जिंकणं गरजेचं होतं.
पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 113 धावांनी जोरदार विजय मिळवलासुद्धा, परंतु या विजयाचा उत्साह भारतीय संघाला टिकवता आला नाही आणि पुढील दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघ हरला.
या संदर्भात ज्येष्ठ क्रीडा पत्रकार चंद्रशेखर लुथरा म्हणतात, "बीसीसीआय कोहलीला कर्णधारपदावरून दूर करणार असल्याचं या मालिकेचा निकाल लागण्यापूर्वीच स्पष्ट झालं होतं. कोहलीने त्या आधीच समजुतीची भूमिका घेत राजीनामा दिला आहे. कोहली विरुद्ध बीसीसीआय संघर्षाची ही परिणती आहे, असंही म्हणता येईल. सत्तेसमोर एका व्यक्तीचा उपाय चालत नाही, हेसुद्धा यातून पुन्हा एकदा सिद्ध झालं."
कोहली विरुद्ध बीसीसीआय
विराट कोहली विरुद्ध बीसीसीआय असा संघर्ष खरोखरच होतो आहे का?
या प्रश्नाचं उत्तर शोधण्यापूर्वी विराट कोहलीने कसोटी संघाचा कर्णधार म्हणून कोणतं योगदान दिलं हे समजून घ्यायला हवं.
कोहलीने राजीनाम्याची घोषणा करण्याच्या लगेचच बीसीसीआयने समाजमाध्यमांवर त्याच्या योगदानाचं कौतुक केलं आणि तो भारतीय कसोटी क्रिकेटमधील सर्वांत यशस्वी कर्णधार असल्याचंही मत नोंदवलं.
याच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिन्याभरापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरोधातील एक दिवसीय मालिकेची सुरुवात व्हायच्या आधी कोहलीला त्या संघाच्या कर्णधारपदावरून दूर केलं होतं. या मालिकेसाठी संघाची घोषणा करताना दोन ओळींमध्ये रोहित शर्माला कर्णधारपद देण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं, त्या वेळी कोहलीचे एका शब्दाचेही आभार मानण्यात आले नव्हते.
म्हणजे विराट कोहलीरूपी सूर्याचा अस्त सुरू झाला आहे. आता व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून त्याला संघातील स्थान टिकवून ठेवता आलं, तरी ते मोठं यश असेल.
विलक्षण कर्णधार
विराट कोहलीने कर्णधार म्हणून केलेल्या विक्रमी कामगिरीच्या संदर्भात वरील घडामोडींचा विचार करावा लागेल.
विराट कोहलीने 68 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं, त्यातील 40 सामन्यांमध्ये भारताचा विजय झाला, तर 17 सामन्यांमध्ये भारतीय संघ पराभूत झाला आणि 11 सामने अनिर्णित राहिले.
भारतीय संघाच्या आत्तापर्यंतच्या कोणत्याही कर्णधाराने संघाला इतक्या कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवून दिलेला नाही. एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराटने 95 सामन्यांमध्ये संघाचं नेतृत्व केलं, त्यातील ६५ सामन्यांमध्ये भारतीय संघ विजयी झाला.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनी (110), मोहम्मद अझरुद्दीन (90) आणि सौरव गांगुली (76) या कर्णधारांनी भारतीय संघाला अधिक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला असला, तरी यांपैकी कोणाच्याही विजयाची टक्केवारी 70 टक्क्यांहून अधिक नव्हती. विराटने मात्र कप्तान म्हणून तशी कामगिरी करून दाखवली.
आकडेवारीपलीकडे जाऊन विचार करायचा तर, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशी मैदानांवर मिळवलेले विजय त्याला उत्कृष्ट कर्णधाराचं स्थान देणारेच ठरतात. विराट कोहलीला ज्या तऱ्हेने कर्णधारपदावरून दूर जावं लागलं आहे, ते अनुचित असून त्याची पात्रता याहून कितीतरी उत्तुंग असल्याचंही या पार्श्वभमीवर सतत स्मरणात ठेवलं जाईल.
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सी. शेखर लुथरा मह्णतात, "विराट कोहलीने जाहीररित्या बीसीसीआयसोबतचे मतभेद नोंदवले होते, टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आल्यावर त्याचा राग अनावर झाला. तेसुद्धा अनपेक्षित होतं. त्याचा अंदाज चुकला असंच म्हणावं लागेल.
कधी ना कधी त्याला पायउतार व्हावं लागणारच होतं. कसोटी मालिकेतील पराभवानंतर त्याला कर्णधारपदावरून काढून टाकलं जाणं ओघानेच होणार होतं. शिवाय, गेली दोन वर्षं खुद्द कोहलीची फलंदाजीसुद्धा पूर्वीसारखी जोरकसपणे होत नसल्याचंही लक्षात घ्यायला हवं."
कोणत्या परिस्थितीत विराटने सूत्रं स्वीकारली?
भारत 2014 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला असताना अचानकच विराट कोहलीकडे कसोटी संघाच्या कप्तानपदाची धुरा आली. एडिलेडमधील सामन्यापूर्वी तत्कालीन कप्तान महेंद्रसिंग धोनीच्या अंगठ्याला झालेली जखम पूर्णतः भरून निघाली नाही, त्यामुळे कोहलीला पहिल्यांदाच कसोटी संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली.
कप्तान म्हणून आपण कशी कामगिरी बजावू शकतो, हे कोहलीने पहिल्याच सामन्यात दाखवून दिलं.
एडिलेडमधील गतिमान खेळपट्टीवर मिशेल जॉन्सन, पीटर सिड्ल व रेयान हॅरिस यांच्या गोलंदाजीला सामोरं जाताना विराट कोहलीने पहिल्या डावात 115 धावा रचल्या आणि चौथ्या डावात ३६४ धावांचं लक्ष्य गाठताना त्याने १४१ धावा केल्या. दुसऱ्या बाजूने मुरली विजय व्यतिरिक्त इतर फलंदाजांनीही साथ दिली असती, तर कोहलीला कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटी सामन्यात इतिहास घडवता आला असता.
कोहलीने विलक्षण फलंदाजी करूनसुद्धा या सामन्यात भारत ४८ धावांनी पराभूत झाला. या दौऱ्यातील पुढील दोन सामन्यांमध्ये महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सांभाळलं, पण चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं.
सिडनीत झालेल्या या सामन्यात कोहलीने पहिल्या डावामध्ये १४७ धावा फटकावल्या, तर दुसऱ्या डावात ४६ धावा केल्या. परंतु, हा सामना अनिर्णित राहिला.
कोहलीने त्या दौऱ्यावेळी केलेल्या देदिप्यमान कामगिरीची चमक अलीकडे कमी होऊ लागली होती. परंतु, फलंदाज म्हणून पुन्हा जुना खेळ दाखवायला त्याला फारसा वेळ लागला नसता. दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेतसुद्धा हे दिसून आलं.
विराट कोहलीने ज्या ६८ कसोटी सामन्यांमध्ये भारताचं कर्णधारपद सांभाळलं, त्याच सामन्यांमध्ये २० शतकं केली. असा विक्रम इतर कोणत्याही भारतीय कर्णधाराच्या नावावर नाही.
कर्णधार म्हणून कसोटी सामन्यांमध्ये विराट कोहलीपेक्षा जास्त शतकं केवळ ग्रीम स्मिथने केली आहेत. स्मिथने १०९ सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिका संघाचं नेतृत्व केलं, त्यात त्याने २५ वेळा शतक ठोकलं. कोहली सध्याच्याच गतीने शतकं करत राहिला असता, तर त्यानेसुद्धा कर्णधार म्हणून ९० कसोटी सामाने पूर्ण करेपर्यंत असा विक्रम करून दाखवला असता. पण असं घडलं नाही.
भारतीय क्रिकेटसाठी दिलेलं योगदान
कोहलीने कर्णधार म्हणून गेल्या सात वर्षांमध्ये भारतीय संघ अधिक सक्षम केला आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली ऑगस्ट २०१६ ते मार्च २०२० या काळात, म्हणजे सलग ४२ महिने (तीन वर्षं, सहा महिने) भारतीय संघ कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च स्थान टिकवून होता, यावरून त्याची कामगिरी किती लक्षणीय होती हे स्पष्ट होतं.
कोहलीच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानांवर कसोटी मालिकेत पराभूत केलं आणि कसोटी क्रिकेटमधील जागतिक विजेतेपदाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवलं.
दरम्यान, देशांतर्गत मैदानांवरसुद्धा भारतीय संघाची कामगिरी जोरदार राहिली. देशांतर्गत मैदानांवरील गेल्या १४ कसोटी मालिकांमध्ये भारतीय संघाचा पराभव झालेला नाही. कर्णधार म्हणून कोहलीने देशांतर्गत मैदानांवर २४ कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला, तर केवळ दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला.
कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचे वेगवान गोलंदाज इतके समर्थ कामगिरी करायला लागले की, आता त्यांच्या समोर जगाभरातील फलंदाजांचे पाय थरथरतात. कोणे एके काळी फिरकी गोलंदाजांची चौकडी भारतीय कसोटी संघाची ओळख होती, पण कोहलीच्या नेतृत्वकाळात वेगवान गोलंदाजांच्या चौकडीने ही जागा घेतली.
आयसीसी ट्रॉफीने हुलकावणी दिली
परंतु, कोहलीच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळात सगळंच चांगलं घडत होतं असं नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला कोणतीही मोठी स्पर्धा जिंकता आली नाही. कोहलीसुद्धा ही बोच कायम राहील.
२०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला, तर २०१९च्या विश्वचषकावेळी उपान्त्य सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला. २०२१च्या जागतिक टी-२० स्पर्धेमध्ये भारतीय संघाला उपान्त्य फेरीपर्यंत पोचता आलं नाही.
तसंच आयपीएलमध्ये रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरू संघाचं कर्णधारपद सांभाळताना आपण या संघाला कधीच आयपीएलची ट्रॉफी मिळवून देऊ शकलो नाही, याचीही कोहलीला रुखरुख वाटत राहील.
या अपयशांपेक्षाही आक्रमक स्वभावामुळे कोहलीचं जास्त नुकसान केलं. मैदानावरील कामगिरीपेक्षा त्याच्या आक्रमकतेची चर्चा जास्त होऊ लागली होती. केपटाऊनला झालेल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी डीआरएस निर्णयाचा विरोध करताना त्याने घेतलेला आक्रमक पवित्रा आपण सर्वांनी पाहिला आहे.
कर्णधार म्हणून त्याने स्वतः कधी खिलाडू वृत्तीचा आदर राखला नाही आणि संघातील इतर खेळाडूंनाही असं वागायचं प्रोत्साहन दिलं नाही. त्याला केवळ विजय मिळवायचा आहे आणि अपयश पचवण्याची क्षमता त्याच्यात उरलेली नाही, असंही वाटू लागलं होतं.
तो कोणाचंही ऐकून घेत नव्हता. अनिल कुंबळेसारख्या उत्कृष्ट क्रिकेटपटूला कोहली-शास्त्री या जोडगोळीसमोर हार मानून बाजूला व्हावं लागलं होतं, त्यावेळीसुद्धा कोहलीच्या या वृत्तीचा दाखला मिळाला.
पण काळ बदलत असतो. कामगिरी चढती असते तेव्हा दुर्गुणांकडे दुर्लक्ष केलं जातं. पण काळ बदलल्यावर याच दुर्गुणांमधूनच अडचणी निर्माण होतात.
या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने संघाचं प्रमुख प्रशिक्षकपद राहुल द्रविडकडे दिलं, तेव्हा कोहलीचा कर्णधारपदाचा कार्यकाळ संपुष्टात येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येऊ लागला होता.
परंतु, सौरव गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष असताना आणि राहुल द्रविड संघाचा प्रशिक्षक असताना भारतीय क्रिकेटमधील कोहलीसारख्या एका लखलखत्या ताऱ्याला याहून चांगल्या पद्धतीने निरोप देता आला नसता का, असा प्रश्न मात्र अनेक लोकांच्या मनात उपस्थित होतो आहे.
सर्वसामान्य क्रिकेट चाहत्यांच्या मनात हा प्रश्न निर्माण होऊ शकतो, परंतु भारतीय क्रिकेटचा प्रवास जवळून पाहणाऱ्यांना मात्र याची जाणीव आहे की, एखादा क्रिकेटपटू कितीही उत्तुंग कामगिरी करून गेला असेल तरी बीसीसीआयला त्याची फिकीर नसते.
सचिन तेंडुलकरचा अपवाद वगळता इतर कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूला सन्मानाने निरोप दिल्याचा दाखला मिळणं अवघड आहे. आणि, सचिन तेंडुलकरने संपूर्ण कारकीर्दीत बीसीसीआयशी कोणताही मतभेद दाखवला नाही, हेसुद्धा इथे लक्षात घ्यायला हवं.
इथून पुढील आव्हानं
तर, विराट कोहली अजून चांगलं क्रिकेट खेळू शकतो का, या प्रश्नाचं उत्तर निश्चितपणे होकारार्थीच द्यावं लागेल.
गेल्या दोन वर्षांमध्ये त्याने शतकं ठोकली नसली, तरी तो सातत्याने धावा करतो आहे. त्याला धावांची चणचण भासल्याचं कधीच दिसलेलं नाही. शंभर शतकांचा सचिन तेंडुलकरच्या नावावरील विक्रम मोडण्याची सर्वाधिक क्षमता सध्या विराट कोहलीकडे आहे. पण त्यासाठी त्याला संघातील स्वतःचं स्थान टिकवून ठेवावं लागेल.
कसोटी क्रिकेटमधील २७ आणि एकदिवसीय क्रिकेटमधील ४३ अशी मिळून त्याच्या नावावर ७० शतकं जमा आहेत. पण हे आव्हान सोपं नाही.
सी. शेखर लुथरा म्हणतात, "फलंदाज म्हणून त्याला आधीपेक्षा खूप जास्त चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. इतकंच नव्हे तर नवीन कप्तानाशीसुद्धा जुळवून घ्यावं लागेल. एखाद्या मालिकेत वाईट कामगिरी झाली तर त्याला कायमचा डच्चू मिळू शकतो. संघातील स्थान टिकवण्यासाठी त्याला सातत्याने उत्तम कामगिरी करावी लागेल."
विराट कोहलीने त्याच्या बाजूने बीसीसीआयशी समेट साधण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याची पाठराखण करायला आताच्या बीसीसीआयमध्ये अरुण जेटलींइतक्या वजनाचं कोणी उरलेलं नाही, अशीही चर्चा क्रिकेटच्या वर्तुळांमध्ये होते आहे. त्यामुळए विराट कोहलीला आता नव्याने सुरुवात करावी लागेल, हे उघड आहे.
फलंदाजीतील तंत्रकुशलतेच्या जोरावर तो अजूनही दोन-तीन वर्षं क्रिकेट खेळू शकतो. पण शनिवारपासूनच त्याची 'ब्रँड व्हॅल्यू' ओसरायला सुरुवात झाली, ही वस्तुस्थिती आहे. आता हे मूल्य किती खाली येईल, ते त्याच्या फलंदाजीवर अवलंबून असणार आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)