You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रोहित शर्मा आता भारतीय वनडे संघाचाही कर्णधार
रोहित शर्मा भारताचा एकदिवसीय संघाचा कर्णधार असणार आहे. विराट कोहली भारतीय टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी संघाचा कर्णधार होता. आता रोहितकडे वनडे आणि ट्वेन्टी20 संघाचं कर्णधारपद असणार आहे.
ट्वेन्टी20 विश्वचषकानंतर कर्णधार विराट कोहलीने भारताच्या ट्वेन्टी20 संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर रोहित शर्माकडे ट्वेन्टी20 संघाचं कर्णधारपद सोडवण्यात आलं होतं. वनडे संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्माची नियुक्ती करण्यात आल्याचं निवडसमितीने म्हटलं आहे.
विराट कोहलीने वनडे संघाचं नेतृत्व सोडलं का निवडसमितीने कोहलीऐवजी रोहितची निवड केली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. भारतीय कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी अजिंक्यऐवजी रोहितची निवड करण्यात आली आहे.
रोहितने 227 वनडेत भारताचं प्रतिनिधित्व करताना 48.96च्या सरासरीने 9205 धावा केल्या आहेत. यामध्ये 29 शतकं आणि 43 अर्धशतकांचा समावेश आहे. वनडे क्रिकेटमध्ये तीन द्विशतकं नावावर असणारा तो एकमेव फलंदाज आहे.
2023 मध्ये भारतात 50 षटकांचा विश्वचषक होणार आहे. त्यादृष्टीने रोहित शर्माला कर्णधारपद मिळणं हा मोठा बदल मानला जात आहे. काही दिवसांपूर्वीच राहुल द्रविड यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली होती.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी 18 सदस्यीय भारताच्या कसोटी संघाची घोषणा करण्यात आली. कोरोना नियमावली लक्षात घेऊन जंबो संघ पाठवण्यात येणार आहे. ओमक्रॉन व्हेरियंटमुळे हा दौरा लांबणीवर पडण्याची शक्यता होती. मात्र क्रिकेट साऊथ आफ्रिका आणि बीसीसीआय यांनी परिस्थितीचा आढावा घेत दौऱ्याचं स्वरुप बदललं आहे. सुधारित दौऱ्यात 3 टेस्ट आणि 3 वनडे होणार आहेत. ट्वेन्टी20 मालिका नंतर खेळवण्यात येईल. वनडे मालिका संघाची घोषणा नंतर होणार आहे.
2021 मध्ये समाधानकारक चांगली कामगिरी न झाल्याने चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना आफ्रिका दौऱ्यात संधी मिळणार का याविषयी साशंकता होती. या दोघांचीही आफ्रिका दौऱ्यासाठी निवड झाली आहे.
न्यूझीलंडविरुद्ध शतकी पदार्पण करत छाप उमटवणाऱ्या श्रेयस अय्यरलाही संघात स्थान मिळालं आहे. न्यूझीलंडविरुद्ध संघात नसलेल्या मात्र दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरील भारतीय अ संघाचा भाग असलेला हनुमा विहारी संघात परतला आहे.
सलामीची जबाबदारी रोहित शर्मा, के.एल.राहुल, मयांक अगरवाल यांच्यावर असणार आहे.
न्यूझीलंडविरुद्ध विश्रांती देण्यात आलेला ऋषभ पंतचं संघात पुनरागमन झालं आहे. अनुभवी यष्टीरक्षक वृद्धिमान साहाही संघात आहे.
रवीचंद्रन अश्विन आणि जयंत यादव यांच्यावर फिरकी विभागाची जबाबदारी असेल. दुखापतीमुळे रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांची संघात निवड झालेली नाही.
वेगवान गोलंदाजांमध्ये इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांची निवड झाली आहे. शमी आणि बुमराह यांना न्यूझीलंडविरुद्ध विश्रांती देण्यात आली आहे.
दुखापतीमुळे युवा सलामीवीर शुभमन गिलची संघात निवड करण्यात आलेली नाही. अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा या दौऱ्यासाठी विचार करण्यात आलेला नाही.
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार, रोहित शर्मा (उपकर्णधार), के.एल. राहुल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत, वृद्धिमान साहा, रवीचंद्रन अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज.
राखीव- नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चहर आणि अर्झान नागासवाला.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)